मंगळवार, ३० जुलै, २०१३

निखळ-१४: गुरूजी, तुम्ही होता म्हणून..!

('दै. कृषीवल'मध्ये 'निखळ' या पाक्षिक सदराअंतर्गत सोमवार, दि. २९ जुलै २०१३ रोजी प्रकाशित झालेला लेख...)
नुकतीच गुरूपौर्णिमा झाली. यानिमित्तानं साऱ्यांनीच आपापल्या गुरूंना वंदन करण्याची, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी घेतली. माझ्या आयुष्यातही अशा अनेक मार्गदर्शक गुरूंचं फार मोठं आणि मोलाचं स्थान आहे. त्यातीलच आद्य म्हणता येतील असे एक म्हणजे कागल (जि. कोल्हापूर) इथले ढोले गुरूजी. आजही माझ्या आयुष्यात गुरूजींचं स्थान खूप महत्त्वाचं आहे. गुरूपौर्णिमेनिमित्त त्यांना माझं वंदन...
Dhole Guruji
माणसाच्या आयुष्याला योग्य वळण लागण्यासाठी (माझ्या दृष्टीनं) तीन लोक फार महत्त्वाची भूमिका बजावतात. पहिले आई-वडिल, दुसरे गुरू आणि तिसरे म्हणजे मित्र-मैत्रिणी. (यात बायको नावाचा चौथा लोकही ॲड होतो, पण तो फार पुढे- आणि फारच इन्फ्युएन्शियल!) माझ्या बाबतीत बोलायचं झाल्यास वाह्यातपणाची आणि वाया जाण्याची बरीच लक्षणं माझ्यात होती; पण, वरील तीन घटकांच्या स्वतंत्र आणि कणखर प्रयत्नांच्या सामूहिक परिणामामुळं ही शक्यता बरीचशी निवळली. (अधून-मधून जुनी लक्षणं डोकं वर काढतात, हा भाग वेगळा.)
असाच एक जगावेगळा आणि अपरंपार प्रेम करणारा गुरू माझ्या आयुष्याच्या सुरवातीच्या टप्प्यातच मला लाभला. भूपाल ढोले गुरूजी त्यांचं नाव! सन १९८५मध्ये सांगलीच्या केसीसी प्राथमिक शाळेतून मी कागल (जि. कोल्हापूर) च्या हिंदूराव घाटगे विद्यामंदिरात तिसरीत प्रवेश घेतला. तिसरी-चौथी अशी दोनच वर्षं तिथं होतो. दोन्ही वर्षी ढोले गुरूजी माझे वर्गशिक्षक होते. वर्गाला एकच शिक्षक असल्यानं सगळे विषय तेच शिकवत. विषय सोपा करून, मनोरंजक करून सांगण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. चौथीला त्यांनी मला स्वतःहून शिष्यवृत्ती परीक्षेला बसवलं. शाळा सुटल्यानंतर वर्गात तासभर आणि त्यानंतर संध्याकाळी त्यांच्या घरी तासभर (कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता) असा दररोज ते माझा अभ्यास घेत. अंगणातल्या पेरुच्या झाडावर मी माकडासारखा लोंबकळत असे आणि खाली कट्ट्यावर बसून गुरूजी प्रश्न विचारत. कित्येकदा शाळेतून माझ्या घरी न जाता मी थेट त्यांच्याच घरी जाई तेव्हा काकू पहिल्यांदा मला हात-पाय धुवून नाष्टा, दूध देत असत. गुरूजींच्या त्या अंगणातच माझा मराठी भाषेचा आणि बुद्धिमत्ता चाचणीचा पाया तयार झाला. 
गुरूजींनी आत्मविश्वास तर इतका दिला की, दैनंदिन प्रार्थनेच्या वेळी तिसरीचा हा विद्यार्थी राष्ट्रध्वजाच्या पायरीवर उभा राहून सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना न अडखळता, न चुकता 'भारत माझा देश आहे..' ही प्रतिज्ञा सांगत असे. वक्तृत्व स्पर्धांत, निबंध स्पर्धांतही गुरूजी परस्पर माझं नाव नोंदवत असत आणि आईबाबांच्या बरोबरीनं माझी तयारी करवून घेण्यालाही हातभार लावत असत. एकदा तर सुटीच्या दिवशी मी मित्रांसोबत ग्राऊंडवर खेळत होतो, त्यावेळी आत कुठलीशी सहावी, सातवीच्या गटाची निबंध स्पर्धा सुरू होणार होती. गुरूजींना खिडकीतून मी दिसलो आणि त्यांनी हाक मारली. आत बोलावून थेट स्पर्धेला त्या सर्व 'दादा' लोकांसोबत बसवलं. अर्ध्या तासात निबंध स्पर्धा झाली. पुढच्या तासाभरात निकाल लागला आणि त्या 'दादां'च्या स्पर्धेत पहिला नंबर घेऊन मी घरी परतलो.
चौथीच्या तालुकास्तरीय केंद्र परीक्षेत केवळ एका मार्कानं माझा पहिला क्रमांक हुकला तर माझ्या आईवडिलांइतकंच किंबहुना त्यांच्यापेक्षा अधिक वाईट गुरूजींना वाटलं होतं. त्या निकालानंतर ते साधारण तासभर माझी समजूत घालत होते. त्यावेळी मला फारसं काही वाटलं नाही. पहिल्या नंबराचं ग्लॅमर त्या वयात असण्याचं कारण नव्हतं. पण आज जेव्हा तो प्रसंग अंधूक आठवतो, तेव्हा गुरूजी माझ्याइतकीच स्वतःच्या मनाचीही समजूत घालत होते, असं मला आज जाणवतं. माझ्याबद्दल इतका आत्मविश्वास त्यांच्या मनात असल्याचं ते द्योतक आहे.  
अभ्यासू विद्यार्थी म्हणून गुरूजींचं माझ्यावर प्रेम होतंच. आणि त्या प्रेमाच्या तीव्रतेचाही अनुभव मी घेतला. एकदा वर्गात काही आगाऊपणा केला म्हणून गुरूजींनी हिरव्यागार वेताच्या छडीचा प्रसाद माझ्या हातावर दिला. एकच छडी बसली होती, पण अस्सा काही वळ उठला होता की बस्स! रात्री माझा हात सुजला. आईबाबांना सांगितलं, गुरूजींनी मारलं म्हणून; तर दोघांनीही मलाच माझ्या आगाऊपणाबद्दल रागावलं. पुन्हा तसा वागलास तर गुरूजींना पुन्हा चोप द्यायला सांगू, असंही बजावलं. दुसऱ्या दिवशी ताप भरून मी शाळेत जाऊ शकलो नाही. तिकडं मला जितक्या यातना झाल्या नसतील, त्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त गुरूजींच्या मनाला झाल्या. त्यांनाच अपराधी वाटू लागलं. माझी आई माध्यमिक शिक्षिका तर वडिल प्राध्यापक. त्यांच्या मुलाला आपण मारलं म्हणून त्यांना माझ्यासारख्या प्राथमिक शिक्षकाबद्दल काय वाटलं असेल, असा विचार त्यांच्या मनाला कुरतडत होता. त्यात दुसऱ्या दिवशी मी गैरहजर! त्यामुळं गुरूजींचं टेन्शन अधिकच वाढलं. त्या दिवशी शाळा सुटल्यावर ते तडक माझ्या घरी आले. आईही नुकतीच शाळेतून आलेली. मी अंथरुणातच होतो. गुरूजी माझ्याजवळ बसले, मला कुरवाळलं, तेव्हा त्यांच्या डोळ्यांत पाणी उभं होतं. एवढ्या गुणी पिल्लाला कसं काय बरं मी मारू शकलो?’ असा स्वगत प्रश्न त्यांनी स्वतःलाच विचारला. पण आईनं त्यांना सांगितलं, तुम्ही केलंत, ते योग्यच केलंत. केलेल्या चुकीची शिक्षा ही ज्या-त्या वेळीच झालेली योग्य असते. त्यामुळं अजिबात वाईट वाटून घेऊ नका. तोपर्यंत बाबाही आले, त्यांनीही गुरूजींना, पुन्हा हा असा आगाऊपणानं वागला तर बिनधास्त शिक्षा करा. आम्ही तुम्हाला अजिबात विचारणार नाही, दोष देणार नाही, असं सांगितलं. तिसरीमधला हा प्रसंग मी केव्हाच विसरून गेलो होतो. पण आजही जेव्हा गुरूजींना मी जेव्हा भेटतो, तेव्हा मला मारलेल्या त्या छडीची आठवण होऊन गुरूजी आजही कळवळतात. तेव्हा गुरूजींच्या माझ्यावरील अतीव प्रेमाची जाणीव होऊन मन गहिवरुन येतं.
अलीकडचा एक प्रसंग तर त्याहून हृदयद्रावक. गेल्या वर्षी गुरूजींवर अँजिओप्लास्टी करावी लागली. तेव्हा मी मुंबईत होतो. गुरूजींना जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं जात होतं, नेमक्या त्या क्षणी त्यांनी माझी आठवण काढली. काकूंनी ऑपरेशन झाल्यावर माझ्याशी बोलणं करून देतो, असं सांगितल्यावर मग कुठे ते आत गेले. ऑपरेशननंतर काकूंनी फोन करून मला हा प्रकार सांगितला. पोटची मुलं सोबत असताना त्या क्षणी गुरूजींना माझी आठवण व्हावी, यापेक्षा त्यांच्या माझ्यावरील प्रेमाचा आणखी कोणता मोठा दाखला असू शकतो. त्यानंतर मी गुरूजींशीही बोललो, त्यांना काळजी घ्यायला सांगितलं. आता तर काय, कोल्हापुरात आल्यामुळं निपाणीला येता जाता अधून-मधून कागलमध्ये त्यांना भेटायला जाणं होतं.
माझा माझ्या साऱ्याच गुरूजनांच्या बाबतीत एक प्रॉब्लेम होतो, तो म्हणजे मी इतरांसारख्या त्यांच्याशी अगदी खुलून बोलू शकत नाही. त्यांच्या गुरू असण्याचा एक प्रभाव (दबाव नव्हे!) आपसूकच माझ्यावर असतो. मी त्यांच्यासमोर त्यांचा विद्यार्थीच असतो आणि मग त्यांच्याशी संवादात एक प्रकारची तांत्रिकता येते, असं मला वाटतं. ढोले गुरूजींच्या बाबतीत मात्र ही तांत्रिकता, का कोणास ठाऊक पण कधीच जाणवली नाही. त्यांच्या वात्सल्याचा झरा इतका निर्मळ आणि प्रामाणिक आहे, की अन्य कोणतीही कृत्रिमता निर्माण व्हायला तिथं काही संधीच नाही. नुसतं त्यांच्या शेजारी बसलो आणि त्यांच्या प्रेमाचा हात पाठीवर फिरला तरी त्या आश्वासक संवादाला शब्दांची गरज भासतच नाही. त्यांच्या वयोमानाने क्षीण झालेल्या नजरेतला आपुलकीचा भाव खूप काही सांगून जातो. त्या नजरेत मी तो चौथीतलाच त्यांचा विद्यार्थी असतो आणि माझ्याही मनात ते बाल्य, मनाचं निरागसपण जागृत ठेवण्याचं काम त्यांची ती नजर करते. जमिनीशी नातं न तुटू देता भराऱ्या मारण्याचं बळ त्यातून मिळतं. आज आयुष्यात जेवढंही काही छोटंमोठं यश मिळवता आलं आहे, ते केवळ गुरूजी, तुम्ही होता म्हणूनच शक्य झालं आहे, एवढंच जाहीरपणे सांगावंसं वाटतं.

मंगळवार, १६ जुलै, २०१३

कोल्हापूर: 'एज्युकेशन हब'च्या दिशेने!


('दै. महाराष्ट्र टाइम्स'च्या कोल्हापूर आवृत्तीने 'कोल्हापूर रायझिंग' हे कोल्हापूरच्या विविध क्षेत्रांतील प्रगतीचा आणि भविष्यकालीन वाटचालीचा सर्वंकष वेध घेणारे पृष्ठ प्रकाशित करण्यास सुरवात केली आहे. यामध्ये कोल्हापूरच्या शैक्षणिक वाटचालीसंदर्भात शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.जे. पवार यांचा सविस्तर लेख सोमवार, दि. १५ जुलै २०१३ रोजी प्रकाशित करण्यात आला. या लेखासाठी शब्दांकन करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. या लेखामध्ये मा. कुलगुरूंनी कोल्हापूरबरोबरच एकूणच देशाच्या शैक्षणिक प्रगतीचा व भवितव्याचाही उत्कृष्ट वेध घेतला आहे. म्हणून हा लेख माझ्या ब्लॉग-वाचकांसाठी 'दै. महाराष्ट्र टाइम्स'च्या सौजन्याने येथे पुनर्प्रकाशित करीत आहे.- आलोक जत्राटकर)

 
कोल्हापूर शहर आणि परिसराचा जेव्हा मी शैक्षणिकदृष्ट्या विचार करतो, तेव्हा या शहराचा या क्षेत्रातील समृद्ध आणि पुरोगामी वारसा पाहून भारावून जातो. आज कोल्हापूर शैक्षणिकदृष्ट्या एका वेगळ्या टप्प्यावर येऊन उभे ठाकले आहे. सर्वंकष आणि सातत्यपूर्ण प्रगतीचा वेग पकडणाऱ्या कोणत्याही शहराच्या बाबतीत असा महत्त्वपूर्ण टप्पा येतच असतो. पारंपरिक शिक्षणाबरोबरच अपारंपरिक, व्यावसायिक, कौशल्यवृद्धीला चालना देणाऱ्या अशा सर्व प्रकारच्या शिक्षणाची पंढरी किंवा एज्युकेशन हब म्हणून कोल्हापूर आज नावारुपाला येत आहे. तथापि, मी असे म्हणेन की, कोल्हापूरचे द्रष्टे भाग्यविधाते राजर्षी शाहू महाराज यांनी त्यांच्या काळातच कोल्हापूरला खऱ्या अर्थाने एज्युकेशन हब बनविले. मूठभरांच्या मक्तेदारीतून शिक्षणाला मोकळे करीत समाजाच्या सर्व स्तरांतल्या, तळागाळातल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची कवाडे खुली करतानाच त्यांच्या गरजा लक्षात घेऊन शैक्षणिक संस्थांची आणि त्यांच्या जोडीला वसतीगृहांची उभारणी त्यांनी केली. आणि त्यानंतरच्या काळात इथल्या शिक्षण संस्थांतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी कोल्हापूरच्या लौकिकात भर घालण्याचे आणि राजर्षी शाहूंचे कार्य सफल करण्याचे काम केले. या पार्श्वभूमीवर, कोल्हापूरच्या या मूळच्या शैक्षणिक वारशाला आजच्या काळाचे नवे संदर्भ आणि आयाम यांची जोड देऊन तो अधिक वृद्धिंगत करण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आहे.
सन 1962मध्ये आपल्या स्थापनेपासून गेली 50 वर्षे शिवाजी विद्यापीठ सुद्धा कोल्हापूरच्या प्रवर्तनशील वाटचालीमधील एक सक्रिय शैक्षणिक व्यवस्था आहे. गेल्या 50 वर्षांमध्ये विद्यापीठाने स्थानिक विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेतानाच राष्ट्रीय आणि जागतिक शैक्षणिक परिस्थितीचा वेळोवेळी वेध घेत त्याबरहुकूम विद्यार्थ्यांना आवश्यक ते अभ्यासक्रम अभ्यासण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास घडवून कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारीही करवून घेतली. आजघडीलाही विद्यापीठ केवळ स्थानिकच नव्हे, तर शैक्षणिक क्षेत्रातील जागतिक बदलांचा वेध घेत असून त्या दृष्टीने नवनवे अभिनव अभ्यासक्रम राबविण्यावर भर देत आहे. काही दिवसांपूर्वीच 'स्कूल ऑफ नॅनो सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजी'च्या नूतन इमारतीचा पायाभरणी समारंभ करण्यात आला. नजीकच्या भविष्यात नॅनो-टेक्नॉलॉजी हा बदलत्या तंत्रज्ञानाचा नवा की-वर्ड असणार आहे, याची जाणीव ठेवून विद्यापीठाने या अभ्यासाची संधी आपल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध केली आहे. विद्यापीठाच्या तंत्रज्ञान (बी.टेक.) अधिविभागाने अगदी अल्पावधीत TEQIP (Technical Education Quality Improvement Programme) राबविण्यास सुरवात केली आहे. जैवतंत्रज्ञान अधिविभागाने देशातल्या आघाडीच्या टॉप टेन बी.टी. स्कूलच्या यादीत स्थान पटकावले आहे तर विद्यापीठ सुद्धा देशातल्या टॉप-50 विद्यापीठांच्या यादीत 26व्या क्रमांकावर आहे. तंत्रज्ञानविषयक आधुनिक अभ्यासक्रम राबवित असतानाच विद्यापीठाने 'यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट'च्या माध्यमातून ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अत्यावश्यक असे अभ्यासक्रम राबविण्यालाही प्राधान्य दिले आहे. जेणे करून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये ग्रामीण व्यवस्थापनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना अभ्यासता येईल आणि राष्ट्रीय विकासामध्ये स्थानिक पातळीवरुनही त्यांना उत्तम प्रकारे योगदान देता येईल. या व्यतिरिक्त  'नॅशनल नॉलेज नेटवर्क'मध्ये विद्यापीठाबरोबरच संलग्नित 170 महाविद्यालयांचाही समावेश झाला असून त्यायोगे आयआयटी आणि आयआयएम येथील विद्यार्थ्यांच्या बरोबरीने आपला विद्यार्थीही राष्ट्रीय व्याख्यानांचा लाभ घेऊ लागला आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावण्यास मदत झाली आहे.
विद्यापीठ आपल्या परीने कोल्हापूरच्या शैक्षणिक विकासामध्ये योगदान देण्यास बांधील आहेच. पण आज या निमित्ताने कोल्हापूरचा एज्युकेशन हब म्हणून विकास करण्यासाठी आज निर्माण झालेल्या पोषक परिस्थितीचाही आपण वेध घ्यायला हवा. आज राष्ट्रीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये दिल्ली-मुंबई-बंगळूर-चेन्नई असा कॉरिडॉर विकसित झाला आहे, असे म्हणायला हरकत नाही. त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्येही मुंबई-पुणे-नाशिक-औरंगाबाद असा औद्योगिक आणि शैक्षणिक चतुष्कोन तयार होतो आहे. तथापि, आज मुंबईखालोखाल पुणे आणि बऱ्याच अंशी नाशिक हे जवळपास संपृक्ततेच्या पातळीवर पोहोचले आहे- अगदी सर्वच बाबतीत. त्यामुळे आता विकासाचा हा कोन पुण्याच्या पुढे सातारा आणि कोल्हापूर असा पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने सरकल्याचे आपल्याला दिसून येते. कोल्हापूरच्या बाबतीत बोलायचे झाले तर, उद्योग, सहकार, कृषी, संस्कृती, कला, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रांच्या बाबतीत दक्षिण महाराष्ट्रातील आघाडीचे केंद्र म्हणून या शहराचा लौकिक आधीच सर्वत्र आहे. त्याचा फायदा इथल्या शैक्षणिक विकासाला नक्कीच झाला आहे, होतो आहे. सर्वच प्रकारच्या कनेक्टिव्हीटीच्या नकाशावर कोल्हापूर लवकरच दाखल झालेले असेल, असे चित्र आहे. रस्त्यांची कनेक्टिव्हीटी उत्तम आहेच. पण आता महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विमानतळही कात टाकण्याच्या तयारीत आहे. कोकण रेल्वे आणि कराड-कर्नाटक अशा थेट मार्गांच्या सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने रेल्वे कनेक्टिव्हीटी विस्तारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. साहजिकच कोकण रेल्वेशी कोल्हापूर जोडले गेल्यास सागरी मार्गांशीही समीपता निर्माण होणार आहे. अशा प्रकारे हर एक मार्गाची कनेक्टिव्हिटी कोल्हापूरच्या भविष्यकालीन विकासात कळीची भूमिका बजावणार आहे. हा विकास औद्योगिक आणि सेवा क्षेत्रांच्या संदर्भात अधिक भरीव असण्याची अधिक शक्यता आहे कारण मुळात कोल्हापूरला तशी पार्श्वभूमी आहे. इथला फौंड्री उद्योग, सहकारी साखर कारखाने, दूध प्रक्रिया उद्योग, सूतगिरण्या, गूळ उत्पादन, सांगली भागातील हळद, द्राक्ष आदी उत्पादने, साताऱ्याकडची आले आणि फुले ही उत्पादने आणि या साऱ्यांच्या जोडीला कृषीपूरक व्यवसायांची दीर्घ परंपरा लक्षात घेता इथली शिक्षणव्यवस्थाही त्यांना पूरक अशा पद्धतीने विकसित होणे गरजेचे आहे. या व्यवस्थेमध्ये विद्यापीठ हे हृदय आहे; तर, तिन्ही जिल्ह्यांमध्ये असणारा विस्तार हे शरीर आहे. या सर्व स्तरांवर आवश्यक तो पूरक शिक्षणक्रम आणि प्रशिक्षण उपलब्ध होणे, हा महत्त्वाचा टप्पा असणार आहे. येथील उद्योग-व्यवसायांना आवश्यक असणारे कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळ स्थानिक पातळीवरच निर्माण होणे, ही मोलाची बाब असणार आहे. त्यामुळेच इथल्या शिक्षण क्षेत्राला भविष्यात विकासाच्या दृष्टीने अनेक संधी उपलब्ध आहेत, असे मला वाटते.
कोल्हापूर हे शक्तीपीठ म्हणूनही देशाच्या धार्मिक नकाशावर स्थान मिळवून आहे. इथला ऐतिहासिक वारसा आणि निसर्गाचा या परिसरावर असलेला वरदहस्त लक्षात घेता इथल्या पर्यटन विकासाच्या संधीही म्हणाव्या तितक्याशा विकसित झालेल्या नाहीत. त्या अनुषंगाने उद्योग-व्यवसायांचा विकास आणि त्यांना पूरक अभ्यासक्रम हे सुद्धा कोल्हापूरच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यांच्या बरोबरीनेच प्रगत तंत्रज्ञानाधारित अभ्यासक्रम हे स्थानिक स्तरापर्यंत आपल्याला आज ना उद्या आणावेच लागतील, याची जाणीवही शिक्षण संस्थांना बाळगावी लागेल. तशी मानसिकता आतापासूनच त्यांनी तयार करायला हवी. वर म्हटल्याप्रमाणे शिवाजी विद्यापीठाने त्या दिशेने पावले उचलली देखील आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि कालसुसंगत, नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांनाच यापुढील काळात मागणी राहील.
आजघडीला एक नवा ट्रेन्ड रुजतो आहे, तो म्हणजे 'अमल्गमेशन'चा. आतापर्यंत अभियांत्रिकीच्या क्षेत्रामध्ये स्पेशलायझेशन, सुपर स्पेशलायझेशनला मोठे महत्त्व होते, आजही आहे. तथापि, आता हळू हळू मॅकेनिकल+ इलेक्ट्रॉनिक्स, मॅकेनिकल+ ऑटोमेशन, स्पेस+ रोबोटिक्स, आयटी+ इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हील+ आयटी+ मॅनेजमेंट असा अमल्गमेशनचा नवा ट्रेन्ड आहे. त्याच्या जोडीनेच 'सँडविच' अभ्यासक्रमांचाही नवा ट्रेन्ड विकसित होतो आहे. 'सँडविच कोर्स' याचा अर्थ चार वर्षांचा एखाद्या अभियांत्रिकीचा पदवी कोर्स पूर्ण केल्यानंतर पुढे केवळ दोन वर्षांमध्ये आपल्या करिअरला उपयुक्त अशा अन्य अभियांत्रिकी कोर्सची पदवीही संपादन करण्याची विद्यार्थ्याला संधी उपलब्ध करून देण्यात येऊ लागली आहे. या अभ्यासक्रमांना विद्यार्थीप्रियता लाभत असून ती लक्षात घेऊन अनेक विद्यापीठे अशा प्रकारचे अभ्यासक्रम राबविण्यास प्राधान्य देताना दिसत आहेत. म्हणजे केवळ एकांगी शिक्षण आता उपयोगाचे नाही, हे विद्यार्थ्यांच्याही लक्षात येऊ लागले आहे आणि ते मूळ पदवीबरोबरच अधिकचे पूरक शिक्षण, प्रशिक्षण घेण्यावर भर देऊ लागले आहेत. जे या गोष्टींकडे लक्ष देणार नाहीत, त्यांचा स्पर्धेत टिकाव लागणार नाही.
याठिकाणी एका गोष्टीचा मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो, ती म्हणजे भारतीय शिक्षण व्यवस्थेने सन 1958मध्ये सर्वप्रथम वैज्ञानिक धोरणाचा अंगिकार केल्यापासून ते आजतागायत तंत्रज्ञानविषयक धोरण, माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण आणि आता नव्यानेच जाहीर करण्यात आलेले विज्ञान तंत्रज्ञान नवनिर्माणाचे धोरण, अशा सर्व धोरणांच्या माध्यमातून कालसुसंगत शिक्षण पद्धती, अभ्यासक्रमांचे महत्त्व ओळखून ते राबविले आहेत. नव्या धोरणामधील नवनिर्माणाचा (Innovation) उल्लेख मला खूप महत्त्वाचा वाटतो. जागतिकीकरणाच्या आजच्या युगात नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांच्या माध्यमातूनच नवनिर्मितीची अपेक्षा आपल्याला बाळगता येऊ शकणार आहे. त्या दृष्टीने आजच्या शिक्षण क्षेत्रातील धुरिणांनी, तज्ज्ञांनी आणि संस्थाचालकांनी सुद्धा अशा अभ्यासक्रमांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. उद्योग-व्यवसाय यांच्या सहकार्यातून काही वेगळ्या अभिनव अभ्यासक्रमांची आखणी केली पाहिजे, जेणे करून आपल्या संस्थांमधून मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या कुशल प्रशिक्षित मनुष्यबळाला लगोलग रोजगार संधीही उपलब्ध होऊ शकतील.
जोसेफ एस. नाई ज्युनियर यांनी ' फ्युचर ऑफ पॉवर' या त्यांच्या पुस्तकामध्ये सन 2045मध्ये जागतिक व्यवस्था रचना कशी असेल, याची अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. पूर्वी अमेरिका आणि रशिया अशी द्वि-ध्रुवीय (Bipolar) जागतिक रचना रशियाच्या विघटनानंतर एकध्रुवीय बनून राहिली. तथापि, चीन आणि भारत यांच्या अर्थव्यवस्थांनी आजघडीला चालविलेली प्रगती पाहता नजीकच्या काळात अमेरिका-भारत-चीन अशी त्रि-ध्रुवीय (Tri-polar) जागतिक रचना आकाराला येईल, अशी मांडणी नाई यांनी केली आहे. जागतिक व्यवस्थेमध्ये भारताला हे तिसऱ्या ध्रुवाचे स्थान मिळवून देण्यामध्ये शिक्षणव्यवस्थेची कळीची भूमिका असणार आहे. 'सायन्स टेक्नॉलॉजी इनोव्हेशन पॉलिसी'च्या अंमलबजावणीच्या यशस्वितेवरच केवळ कोल्हापूरचेच नव्हे; तर देशाचे भवितव्य अवलंबून आहे, असे माझे मत आहे.
या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचा एज्युकेशन हब म्हणून विकास घडवून आणत असताना दोन गोष्टींकडे आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या जोडीने आपण विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्रांचे शिक्षणही आवर्जून दिले पाहिजे. अभ्यासक्रमातच तसा संगम घडवून आणला पाहिजे. याचे कारण म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून प्रगती साधण्यास प्रवृत्त करत असतानाच विद्यार्थ्यांना आपण यंत्रमानव म्हणून नव्हे, तर सुसंस्कृत मानव म्हणून घडविण्याची गरज आहे. एखाद्या यंत्राच्या रचनेइतकीच किंबहुना त्याहूनही अधिक सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया त्यांना समजली पाहिजे. त्याचप्रमाणे भारतीय संविधानाबरोबरच मानवी अधिकार, माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार आदी सर्वसाधारण आयुष्यामध्ये विविध टप्प्यांवर सामोऱ्या येणाऱ्या कायद्यांविषयीची जाणीव जागृती करण्यासाठी प्रत्येक अभ्यासक्रमांमध्ये त्यांचा समावेश केला जाणे हे अधिक उपयुक्त, संयुक्तिक ठरणार आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे विकास कोणत्याही स्वरुपाचा असला तरी तो सस्टेनेबल म्हणजे संवर्धनशील, पर्यावरणपूरक असला तरच त्याचे लाभ मानव जातीला दीर्घकाळ पर्यंत उपभोगता येऊ शकणार आहेत, याची जाणीवही विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याला आपले प्राधान्य असले पाहिजे. 'सस्टेनेबल डेव्हलपमेंट' हा आपल्या मूल्यशिक्षणाचा, मूल्य व्यवस्थेचा मूलभूत घटक असला पाहिजे. पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने संवेदनशील पिढी निर्माण करण्याची जबाबदारी आजच्या शिक्षण व्यवस्थेवर आहे. ती नाकारुन कोणत्याही प्रकारची शाश्वत प्रगती साधणे अशक्यप्राय आहे.