शुक्रवार, २६ जानेवारी, २०२४

आणखी एका सावित्रीचा इतिहास अन् शिवरायांच्या शिलेदारांचा प्रवास...

हुबळीतील विवेकानंद जनरल हॉस्पिटलचे सीईओ डॉ. राहुल मुणगेकर यांच्यासमवेत डॉ. आलोक जत्राटकर


हॉस्पिटलचा इतिहास अभिमानानं मिरविणाऱ्या दोन महत्त्वाच्या कोनशिला


हुबळीतील विवेकानंद जनरल हॉस्पिटलची इमारत आणि हॉस्पिटलमध्ये दररोज म्हटली जाणारी प्रार्थना


सध्या काही कारणाने हुबळीमध्ये आहे. इथल्या विवेकानंद जनरल हॉस्पिटलच्या प्रांगणात फिरत असताना दर्शनी भागातच दोन कोनशिला नजरेस पडल्या. पहिला होता- इंडियन विमेन एड सोसायटी, हुबळी यांच्या इमारतीच्या पायाभरणीचा. १ नोव्हेंबर १९२९ रोजी मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर फ्रेडरिक ह्यूज साईक्स यांच्या पत्नी लेडी साईक्स यांच्या हस्ते हा समारंभ करण्यात आलेला होता. ही जागाही साईक्स यांनी सदर महिलांच्या संस्थेला दान दिलेली होती. त्या दिवशी या गव्हर्नर दांपत्याच्या हस्ते अनेक विकासकामांचं उद्घाटन इथं करण्यात आलं होतं. हुबळीतलं प्रसिद्ध साईक्स पार्क, जे आता जवळच्या चिटगुप्पी हॉस्पिटलच्या नावावरुन ओळखलं जातंय, त्याचंही उद्घाटन त्याच दिवशी झालेलं. तर, परिसरातील महिलांच्या आरोग्याची काळजी वाहण्यासाठी ही इंडियन विमेन एड सोसायटी स्थापन झाली होती. विशेषतः सुरक्षित प्रसुती होऊन माता व बाल मृत्यू रोखणे हा प्रमुख हेतू होता. हावेरी येथून विवाह होऊन हुबळीच्या महाजन कुटुंबात आलेल्या डॉ. सावित्री महाजन यांनी ही जबाबदारी स्वीकारली आणि निष्ठापूर्वक अखेरपर्यंत निभावली. त्यांनी इतकं असोशीनं काम केलं की, आयडब्ल्यूए म्हणून नव्हे, तर सावित्रीबाईंचा दवाखाना म्हणून लौकिक पसरला याचा.
दुसरी कोनशिला होती, ही या इमारतीच्या उद्घाटनाची- खरे तर याच फलकानं माझं कुतूहल जागं झालेलं. तर, हे उद्घाटन झालं होतं दि. ७ डिसेंबर १९३८ रोजी, मुंबई प्रांताचे तत्कालीन पंतप्रधान बॅ. बी.जी. तथा बाळासाहेब खेर यांच्या हस्ते. हा मुंबई प्रांत म्हणजे आजच्या महाराष्ट्रासह दक्षिण गुजरात आणि उत्तर कर्नाटकाचा बहुतांश भूगोलव्याप्त बृहन्महाराष्ट्र होता. इथं किम्स आणि रेल्वेची इस्पितळं असली तरी या विभागातलं केवळ महिलांसाठीचं असं हे एकमेव हॉस्पिटल. अगदी १९९०च्या दशकापर्यंत हॉस्पिटलनं हा लौकिक जपला, पण काळाची पावलं ओळखून सर्वसामान्य शेतकरी, गोरगरीब जनता यांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं पावलं उचलण्यात आली. ट्रस्टमध्ये परिसरातील नामवंत उद्योजक, व्यावसायिकांनी सहभाग दर्शविला आणि हॉस्पिटलचा कायापालट होऊ लागला. दानशूर व्यक्तींच्या सहभागातून विस्तार करण्यात आला. आधुनिक सुविधांचा लाभ रूग्णांना मिळू लागला. परिसरातील नामवंत तज्ज्ञ डॉक्टर जोडले गेले. त्यांच्या अनुभवाचाही फायदा लोकांना होतो आहे. सर्व शासकीय योजनांचे लाभ रूग्णांना दिले जातात. त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या सक्षम रुग्णांना हव्या त्या सुविधांनी सज्ज कक्षही येथे निर्माण केले आहेत. १३x१३चे प्रशस्त ICU कक्ष आहेत. शतकाच्या उंबरठ्यावर आता इमारती आणि सुविधा यांचाही विस्तार केला जातो आहे.
ही सारी माहिती मला हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल मुणगेकर अतिशय अभिमानपूर्वक सांगत होते. कोणीतरी आमच्या इतिहासाबद्दल इतक्या आपुलकीनं जाणून घेऊ इच्छित आहे, ही आमच्यासाठीही आनंदाची बाब आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सुमारे तासभराचा वेळ त्यांनी मला दिला.
आता यातलं उपकथानक असं की, सीईओ मुणगेकर यांचं नाव पाहून मी त्यांना विचारलं, सर, आपण मूळचे कोकणातले का? त्यावर ते जाम खूष झाले आणि त्यांच्या घराण्याचा वृत्तांत त्यांनी सांगितला. सध्या ते कारवार येथे स्थायिक झाले असले तरी नजीकच्या सदाशिवगडचे. मुणगेकरांचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या सदाशिवगड स्वारीच्या वेळी त्यांच्यासमवेत इकडे आले होते. स्वराज्यावर मिर्झाराजेंच्या स्वारीचे संकट आले म्हणून महाराजांना घाईने परतावे लागले असले तरी काही शिबंदी त्यांनी गडाचे संरक्षण व देखभालीसाठी सदाशिववगडी ठेवली. त्यामध्ये मुणगेकरांचे पूर्वज होते. यावेळी महाराजांनी गडाच्या पायथ्याशी असलेल्या दुर्गादेवीच्या मंदिराचा जीर्णोद्धारही केला होता. याची देखभालही या लोकांकडेच होती. महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या वेळी आणखी एकदा इथे आले. दुर्गादेवी मंदिरात त्यांनी पूजाअर्चाही केली आणि पुढे मार्गस्थ झाले.
तेव्हापासून मुणगेकर कुटुंबीय इथे स्थायिक झाले. पण, आपला लढाऊ बाणा या कुटुंबानं सोडला नाही. मुणगेकरांचे पणजोबा स्वातंत्र्य लढ्यात होते. आजोबांनी दुसऱ्या महायुद्धात सहभाग घेतलेला, तर त्यांचे वडील भारतीय सेनेत होते. स्वतः डॉ. राहुल मुणगेकर आणि त्यांचे दोन बंधूही सैन्यदलात सेवारत होते. दोघे भाऊ मराठा बटालियनमध्ये आणि राहुलजी हे एमएमजी आर्टिलरी विभागात कार्यरत होते. तेथून ते २०१४ मध्ये विवेकानंद हॉस्पिटलमध्ये सीईओ म्हणून रुजू झाले. तेव्हापासून अतिशय गतीने नवे बदल करत असताना आपल्या सर्व सहकाऱ्यांमध्ये सेवाभावाची रुजवात करण्याला प्राधान्य दिले. विवेकाने सेवा करा आणि त्यातून समाधान, आनंद मिळवा, असा आपल्या नावाचा वेगळा अर्थ रुजवला, ज्याची प्रचिती येथे येते. त्यांनी ज्ञान आणि सेवा यांची सांगड घालून एक प्रार्थनाही तयार केली आहे, जी रोज सकाळी म्हटल्यानंतरच दिवसाच्या कामकाजाला सुरवात केली जाते.
एकूणात, एका कोनशिलेपासून सुरू झालेला माहितीचा हा प्रवास मला एका रंजक ऐतिहासिक सफरीवर घेऊन गेला, एवढे खरे!