गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२

बाबूराव बागुल यांच्या साहित्यात माणसांना जोडण्याचे सामर्थ्य: प्रा. जी.के. ऐनापुरे

 

साहित्यिक बाबूराव बागुल विचारमंचतर्फे कोल्हापूर येथे ज्येष्ठ समीक्षक प्रा. जी.के. ऐनापुरे यांना पहिला 'बाबूराव बागुल स्मृती पुरस्कार' ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे आणि प्रा. शोभा बागुल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी शेजारी प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार.

बाबूराव बागुल पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना प्रा. जी.के. ऐनापुरे. मंचावर (डावीकडून) प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार, ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे आणि प्रा. शोभा बागुल.

बाबूराव बागुल यांच्या असंग्रहित कथांच्या संपादित 'सूर्याचे सांगाती' या पुस्तकाचे प्रकाशन करताना ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे. मंचावर (डावीकडून) प्रा. नितीश सावंत, प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार, प्रा. जी.के. ऐनापुरे, प्रा. शोभा बागुल, डॉ. आलोक जत्राटकर.

बागुल यांच्या असंग्रहित कथांचे संपादित सूर्याचे सांगाती प्रकाशित

कोल्हापूर, दि. २४ फेब्रुवारी: माणसांना जोडण्याचे नैसर्गिक सामर्थ्य बाबूराव बागुल यांच्या साहित्यामध्ये आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक प्रा. जी.के. ऐनापुरे यांनी काल येथे केले.

साहित्यिक बाबूराव बागुल विचारमंच, नाशिक आणि कोल्हापूर येथील बाबूराव बागुल साहित्यप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने बागुल यांच्या असंग्रहित कथांच्या संपादित सूर्याचे सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. येथील दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार-साहित्यिक उत्तम कांबळे होते, तर प्रा. शोभा बागुल प्रमुख उपस्थित होत्या.

प्रा. ऐनापुरे म्हणाले, बाबूराव बागुल म्हणजे एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे जाण्याचे तिकीट नैसर्गिकरित्या असणारे अर्थात माणसांना, त्यांच्या माणूसपणाला परस्परांशी जोडण्याचे सामर्थ्य असणारे साहित्यिक होते. बागुलांची कथा ही चळवळीच्या दबावाखाली लिहीलेली नाही, तर तिच्यात मानवी स्वातंत्र्यासाठीचा एक स्वतंत्र असा हुंकार होता. बागुलांच्या विस्थापित असण्याचा परिणाम त्यांच्या समग्र साहित्यव्यवहारावर दिसून येतो. त्यात अंतर्भूत सूत्र अगदी पक्के होते. त्याचप्रमाणे मार्क्सवादाचे व आंबेडकरवादाचे नेमके आकलन असल्यामुळेच बागुलांचे साहित्य मध्यवर्ती प्रवाहाला जाऊन थेट भिडते.

हा पुस्तक प्रकाशन समारंभ म्हणजे बाबूराव बागुल यांना मरणोत्तर वाहिलेली उच्च दर्जाची आदरांजली असल्याचे सांगून उत्तम कांबळे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, या निमित्ताने बागुलांच्या असंग्रहित कथांचे संकलन-संपादन झाले आहे. याचप्रमाणे त्यांच्या असंग्रहित कविता, कादंबऱ्या, अन्य लेखन, भाषणे आदी साहित्याचेही संपादन व्हावे आणि अंतिमतः त्यांचे समग्र साहित्य एकत्रित प्रकाशित होण्याची गरज आहे. त्यासाठी सामाजिक-राजकीय दबाव निर्माण होण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली. बाबूरावांच्या साहित्याला उत्तम दर्जाचा समीक्षक लाभला असता, तर त्यांचे साहित्य केव्हाच वैश्विक झाले असते, इतका त्याचा दर्जा उच्च स्वरुपाचा होता, असे मतही त्यांनी व्यक्त केले. महान साहित्यिकाच्या साहित्याचे संपादन कशा पद्धतीने करायला हवे, याचा उत्तम वस्तुपाठ या संग्रहाच्या निमित्ताने प्रा. ऐनापुरे यांनी निर्माण केला आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

यावेळी बागुल यांच्या कन्या प्रा. शोभा बागुल यांनी बागुलांची वेदाआधी तू होतास ही कविता सादर केली, त्याचप्रमाणे आपल्याला वडिलांकडून आईचे वात्सल्य कसे लाभले, याच्या आठवणीही सांगितल्या.

या कार्यक्रमात प्रा. जी.के. ऐनापुरे यांना पहिला बाबूराव बागुल स्मृती पुरस्कार प्रा. बागुल आणि श्री. कांबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि रोख ५१ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार यांनी स्वागत केले, डॉ. नितीश सावंत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. दुर्योधन कांबळे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. आलोक जत्राटकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. रविंद्र श्रावस्ती, संजय पाटोळे, शिवाजी पाटील, डॉ. विनोद कांबळे, डॉ. सर्जेराव पद्माकर, डॉ. संभाजी बिरांजे, सिद्धार्थ कांबळे, दादासाहेब तांदळे आदी उपस्थित होते.
सोमवार, २१ फेब्रुवारी, २०२२

चला, बाबूराव बागुलांचे स्मरण करू या...“अरे, ती माझी बंदूक तरी द्या,

नाही तर तुक्याची वीणा तरी द्या,

गावोगावी जाईन म्हणतो.....

या वीणेवर क्रांतीची कीर्तने

गाईन म्हणतो.”

आपल्या समग्र साहित्यातून ज्यांनी समाजक्रांतीची, जाणिवेची बीजे अखंड रोवली, जोपासली, ते ज्येष्ठ साहित्यिक कालकथित बाबूराव बागुल यांच्या असंग्रहित कथांचा संपादित ‘सूर्याचे सांगाती’ हा ग्रंथ येत्या २३ फेब्रुवारीस सायंकाळी ५ वाजता शाहूभूमी कोल्हापूरमध्ये प्रकाशित होतो आहे. 

या कार्यक्रमास प्रा. शोभा बागुल यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे सर, ज्येष्ठ समीक्षक-लेखक प्रा. जी.के. ऐनापुरे, प्राचार्य प्रकाश कुंभार, प्रा. नितीश सावंत, प्रा. दुर्योधन कांबळे आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रा. ऐनापुरे यांना ‘बाबूराव बागुल पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे होणाऱ्या या कार्यक्रमास साहित्यप्रेमी नागरिकांनी, विद्यार्थी-विद्यार्थिनींनी कोविड-१९विषयक नियमावलीचे पालन करीत उपस्थित राहावे, हे सस्नेह निमंत्रण...

बुधवार, ९ फेब्रुवारी, २०२२

अजीब दास्ताँ है ये...

 गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे ६ फेब्रुवारी २०२२ रोजी निधन झाले. भारतीय संगीताच्या क्षेत्रात सुमारे आठ दशके लीलया विहरणारा आठवा सूर हरपला. खरोखरीच प्रत्येक भारतीयाच्या जीवनात निर्माण झालेली ही पोकळी वर्णन करण्यासाठी खरे तर शब्द अपुरेच पडत राहतील. आकाशवाणीवरील पहाटेच्या भूपाळीपासून ते रात्री उभीराच्या भुले बिसरे गीतपर्यंत हरघडी  आपल्याला साथ देणारा, आपले आयुष्य संगीतमय करणारा हा स्वर लोपल्याचे दुःख वर्णनातीत आहे.

एखादी व्यक्ती जाते, एखादा कलाकार जातो, तेव्हा त्याच्या चांगल्या योगदानाची आठवण काढून त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली जावी, असा अलिखित संकेत असतो. त्याप्रमाणे माध्यमांतून, समाजमाध्यमांतून लतादिदींच्या विषयी चाहत्यांनी भरभरून लिहीले देखील. त्यांच्या अनेक आठवणी, किस्से यांना अक्षरशः ऊत आला. ही बाब चांगलीच म्हणावी. व्यक्तीशः सांगायचे झाले, तर अशा अनेक व्यक्ती आहेत की, ज्यांच्या उत्तुंग योगदानाबद्दल मला त्यांच्या मृत्यूनंतरच समजले आणि मी हयातभर त्यांच्या प्रेमात पडलो. लताबाईंच्या जीवनपटाचे, कारकीर्दीचे तर आपण साक्षीदार आहोत, याचा खरे तर आपल्याला अभिमान वाटायला हवा. तसा तो मला वाटतो सुद्धा!

एका संपादक मित्राने सोशल मीडियावर लताबाईंच्या अनुषंगाने एक सुंदर प्रश्न विचारला, लतादिदी गेल्याचे समजल्यानंतर त्या क्षणी आपल्या मनी कोणते गाणे आले?’ खरे तर अवघडच प्रश्न. कारण लतादिदींची गाणी आठवण्याची गरजच पडत नाही आपल्याला. दररोज त्यांचे कोणते ना कोणते गीत गुणगुणत असतोच आपण. त्यातले तत्क्षणी एखादेच आपल्या मनात येणे तसे अवघडच. गीतांची नुसती गर्दी झालेली मनात. गाण्यांनी प्रथमच मनात कल्लोळ मांडलेला. त्या महान गायिकेच्या आवाजाचे गारुडच असं की, तिची अनेक गीते मनःपटलावर नुसती रुंजी घालू लागलेली. काही चित्रवाणीच्या पडद्यावर दाखविली जात होती तर काही आकाशवाणीच्या सुरावटींबरोबर वातावरणात सर्वदूर विहरत होती. त्यामुळे संपादक मित्राच्या या प्रश्नाला उत्तर देणे माझ्या आवाक्यापलिकडचे होते. मात्र, शेकडो लोकांनी त्या प्रश्नाला कॉमेंटच्या माध्यमातून उत्तर दिले होते. काहींनी खरोखरीच काही अवीट, अजरामर तर काहींनी माहिती नसलेली अगर विस्मरणात गेलेल्या गीतांचीही याद दिली. मात्र, त्यात एक प्रवाह औचित्यभंग करणारा होता आणि विशेषतः त्यामध्ये युवा पत्रकारांची संख्या लक्षणीय होती, हे माझ्यासाठी फार चिंताजनक होते. अशा अनेक व्यक्ती आहेत की ज्यांच्या कलाकारीच्या आपण प्रेमात असतो, मात्र, त्यापलिकडे जाऊन त्यांच्या वर्तनविषयक इतर अनेक बाबी आपल्याला पटत असतीलच, असे नाही. किंवा त्या आपण पटवून घेतल्या पाहिजेत, असेही नसते. त्या त्या वर्तनामागे ज्याची त्याची स्वतःची एक कारणमीमांसा असू शकते. अगर जोपर्यंत अखिल सामाजिक, राष्ट्रीय हितसंबंधाला बाधा पोहोचेल, अशा पद्धतीने ती वागत नाही, तोवर तिचे उत्तरदायित्व मर्यादित राहते. या उत्तरदायित्वाची मर्यादा अथवा कक्षा हवी तितकी वाढविता येऊ शकते, हे जरी खरे असले तरी त्या मर्यादेच्या कक्षेवर आपण अतिक्रमण वा अधिक्रमण करू नये, हेही तितकेच खरे आणि योग्य.

माझ्याही मनात लतादिदींच्या अनुषंगाने गीता दत्त, सुमन कल्याणपूर, अनुराधा पौडवाल अशी नावे आली. जयप्रभा स्टुडिओ आणि त्यापलिकडेही अनेक किस्से आठवले. बाबासाहेबांची गीते म्हणण्यास दिलेला त्यांचा नकारही आठवला. पण, यामध्ये नुकसान आंबेडकरी समाजाचे झालेले नाही. लताबाईंच्या कारकीर्दीत राहून गेलेली एक उणीव म्हणून त्याकडे पाहायला हवे. भारतीय समाजाचे बाबासाहेबांविषयीचे आकलन हा एक सार्वत्रिक आत्मचिंतनाचाच भाग आहे. त्याला लतादिदी अपवाद ठरत नसतील, तर त्याला भारतीयांचे हे सामाजिक मानसिक पर्यावरण कारणीभूत आहे, असा आरोप करावा लागतो. काहीही असो, लतादिदींनी भारतरत्न स्वीकारला तो देशाचे पहिले दलित राष्ट्रपती डॉ. के.आर. नारायणन् यांच्या हस्ते, ही बाब आपण नजरेआड करू शकत नाही. दिदींनी वडिलांच्या माघारी चिमुरड्या वयात उचललेली कुटुंबाची जबाबदारी आणि त्या जबाबदारीचं आयुष्यभर निभावलेलं ओझं कसं विसरणार? त्यांच्या गीतांनी आपल्या सुखदुःखात दिलेली साथ कशी नाकारणार?

काहीही असो! व्यक्ती गेल्यानंतर तिच्या चांगल्या बाबी आपण आठवाव्यात, त्यातील अधिक चांगल्याचा स्वीकार करावा आणि माणूस म्हणून तिच्या हातून झालेल्या चुकांचा पाढा वाचत न बसता, त्या पाठीवर टाकून पुढे चालत राहावे, या संकेताचा इथे लोकांना विसर पडला, याचा खेद मात्र निश्चितपणाने मोठा आहे. विशेषतः पत्रकारितेच्या क्षेत्रात नव्याने उमेदवारी करीत असलेल्या युवा मित्र-मैत्रिणींनी या गोष्टीचे भान अत्यंत कटाक्षाने सांभाळण्याची गरज मला तीव्रतेने अधोरेखित करावीशी वाटते. याचे कारण म्हणजे आपल्या लेखणीच्या माध्यमातून किमान सामाजिक प्रबोधन करण्याची अन्य घटकांपेक्षा काही अधिकची संधी या घटकाला प्राप्त झालेली असते. अशा वेळी कालकथित व्यक्तीबद्दलच्या पूर्वग्रहांना जर माध्यमकर्मी औचित्यभंग करून स्थान देऊ लागली, तर त्यासारखी चुकीची दुसरी गोष्ट असणार नाही. त्याहूनही व्यथित करणारी बाब म्हणजे असे पूर्वग्रह मनात बाळगल्याने मानसिकदृष्ट्या कलुषित होणारी ही मने पुन्हा अन्य बाबींकडे स्वच्छ दृष्टीकोनातून पाहू शकतील का, पाहू लागतील का, हा अस्वस्थ करणारा प्रश्न मनात डोकावतो. समाजमानस अधिकाधिक सजग, सबळ आणि सकारात्मक घडावे, यासाठीची प्रमुख जबाबदारी ज्याच्या खांद्यावर, तो पत्रकारितेमधील हा नव युवा वर्ग. आणि तो जर अशा पूर्वग्रहदूषित नजरांनी भोवतालाकडे पाहू लागला, तर त्या पूर्वग्रहांवर सातत्याने फुंकर घालून फुलवित राखणारे अनेक प्रबळ प्रवाह सध्या भोवतालात कार्यरत आहेत, त्यांच्या चिथावणीने आपण पथभ्रष्ट होण्याचा धोका अधिकच वाढतो.

माझ्या तरुण मित्र मैत्रिणींना सांगणे एकच, एखाद्या विषयाच्या सर्व बाजू माहिती करून घेणे आणि त्याविषयी समाजमानसाला अवगत करीत राहणे, हा आपल्या कर्तव्याचा भाग आहेच. ते कर्तव्य आपण बजावित राहिले पाहिजेच. मात्र, काळ-वेळ पाहून त्याचा सारासारविवेकाने निर्णय घेतला जाणेही तितकेच महत्त्वाचे आहे. तसे न झाल्यामुळेच शाहरुख खानने लतादिदींसाठी फातेहा पढल्यानंतर त्यांच्या चिरशांतीसाठी दुआ मागितली, त्याचे इतके भ्रष्ट आकलन करवून घेऊन उठविण्यात आलेल्या वावटळीचे भारतीय समाजात वादळात रुपांतर झालेच नसते. आपल्या भारतीयत्वाचे धिंडवडे आपणच असे काढले नसते!