बुधवार, ९ मे, २०१२

आत्महत्येच्या विचारावर 'विजय'!


Vijay Gaikwad

मंगळवार, दि. 8 मे 2012… मंत्रालयातला एक नेहमीसारखाच दिवस… फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह काही प्रमुख मंत्री राज्यातल्या दुष्काळग्रस्त स्थितीबाबत केंद्र सरकारला अवगत करण्यासाठी व मदत मिळविण्यासाठी मा. पंतप्रधानांच्या भेटीला गेल्यानं तुलनेत कमी वर्दळीचा…  याच वर्दळीबरोबर कृष्णा दादाराव डोईफोडे हा आंतरवळी-खांडी (ता. पैठण, जि. औरंगाबाद) या गावचा एक तरुण मंत्रालयात दाखल झाला… मंत्रालयात आपली कामं होण्यासाठी किंवा करवून घेण्यासाठी येणाऱ्या गर्दीपेक्षा तो वेगळा होता… त्याला त्याचं काही काम करून घ्यायचं नव्हतं किंवा कुणाचं काम करवून द्यायचंही नव्हतं… तो आला होता मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायला… निवेदनाचा विषय होता… आत्महत्या करणेबाबत…!
मित्रहो, आज कदाचित सारं मंत्रालय हादरून गेलं असतं, जर या तरुणानं त्याचा इशारा खरा करून दाखवला असता तर…! पण तो आत्महत्या करू शकला नाही, इतकंच नव्हे, तर तो त्याच्या या आत्महत्येच्या विचारापासून परावृत्तही झाला… आणि या दोन्ही गोष्टींना कारणीभूत ठरला आपला एक सहृदय पत्रकार मित्र… त्याचं नाव विजय गायकवाड!
डोक्यावर अडीज लाख रुपयांचं कर्ज… परतफेड न करू शकल्यानं व्याजासह पावणेतीन लाखांवर गेलेला परतफेडीचा आकडा डोक्यात सतत भुणभुणत असलेला… तशात वृद्ध आईवडिलांची जबाबदारी… कृषी अनुदान मिळू न शकलेलं… कापसाच्या पॅकेजमधून काही लाभ नाही… अशा परिस्थितीत जगणं मुश्कील झालेला कृष्णा काल मंत्रालयात आला तोच मुळी अतिशय गांजलेल्या आणि दीनवाण्या अवस्थेत… हातात प्लॅस्टीकची एक पिशवी, त्यात कागदपत्रं आणि मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन… उद्या (दि. 9 मे 2012 रोजी) मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा इशारा देणारं…!
मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर असलेल्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या टपाल शाखेत कृष्णानं आपलं निवेदन दिलं… पोच घेतली… आणि तो मुख्य सचिवांच्या कार्यालयाला निवेदन देण्यासाठी निघाला आणि त्याच्या लक्षात आलं की त्याच्याकडं ओ/सी घेण्यासाठी झेरॉक्स नाहीय ते… कृष्णा झेरॉक्सच्या शोधात मंत्रालयाच्या तळमजल्यावरच्या प्रेस रुमकडं आला… तिथं 'ॲग्रोवन'चे मंत्रालय प्रतिनिधी आणि आमचा मित्र विजय गायकवाड याच्याकडं त्यानं झेरॉक्सबद्दल चौकशी केली… त्याच्या हातातलं थेट आत्महत्येचं निवेदन पाहून विजय सटपटला… दुसरा एखादा त्याच्या जागी असता तर पलीकडं न्यूजरुममधनं घ्या झेरॉक्स, असं सांगून मोकळा झाला असता… पण सामाजिक जाणीवा अद्याप शाबूत असलेल्या संवेदनशील मनाच्या विजयनं मात्र तसं केलं नाही… या शेतकऱ्यानं जर कदाचित आत्महत्या केली असती, तर त्याच्या दैनिकाला उद्या सनसनाटी मेन फीचर मिळालं… मिडियाला सुद्धा तुफानी बातमी मिळाली असती… पण विजयनं तसा विचार केला नाही… त्यानं कृष्णाला प्रेस रुममध्ये बसवून घेतलं… आणि समजावलं… आज मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री एक तर दिल्लीत आहेत, आणि त्याचं निवेदन त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत खूप उशीर झालेला असेल… किंगफीशरच्या मालकाला सुद्धा अडचणीतून जावं लागतंय, तिथं आपण सर्वसामान्य आहोत… अडचणींचा सामना करून त्यातून मार्ग काढायला शिकलं पाहिजे… मी स्वतः तुझ्यासाठी कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांना भेटतो… संबंधित अधिकाऱ्यांशी बोलतो… काही तरी मार्ग काढू… पण आत्महत्येचा विचार डोक्यातून काढून टाक… असं विजय त्याला समजावत होता… बोलता बोलता त्याची नजर कृष्णाच्या प्लॅस्टीक पिशवीतून बाहेर डोकावणाऱ्या, व्यवस्थित कागदात गुंडाळलेल्या एका वस्तूकडं गेली… कुतुहलापोटी विजयनं त्या वस्तूला हात लावला… तर कृष्णा त्याला हात लावू देईना… विजयनं बळेच त्याच्या हातून ती वस्तू घेतली… तिचं कागदी वेष्टन काढलं… आणि पाहतो तर काय… ती एका जहाल कीटकनाशकाची-मोनोक्रोटोफॉसची बाटली होती… ती पाहून आता मात्र विजयला घाम फुटला… यावेळी त्याच्या मदतीला तिथं आलेले पत्रकार संजीवन ढेरे धावले… त्यांनीही कृष्णाला समजावण्याचा प्रयत्न केला… पण तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही, असं दिसल्यावर पलीकडंच असलेल्या पोलीस कंट्रोल रुमकडं त्याला घेऊन गेले… कीटकनाशकाची बाटली… तीही एवढा बंदोबस्त असतानाही मंत्रालयात दाखल झाल्याचं पाहून पोलीस अधिकाऱ्यांची काय अवस्था झाली असेल… याची तुम्हीच कल्पना करा…! तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी ती बाटली आधी ताब्यात घेतली आणि कृष्णाला त्यांनीही समजावण्याचा प्रयत्न केला… पण तरीही त्याच्या मनोवस्थेत काही फरक पडत नाहीसं दिसल्यानं त्याला मरीन ड्राइव्ह पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आलं… तिथं रात्री पोलीसांनी त्याची अवस्था लक्षात घेऊन त्याला व्यवस्थित जेवण वगैरे दिलं आणि बसवून ठेवलं… पोलीसांच्या गराड्यात अस्वस्थ झालेल्या कृष्णानं रात्री पुन्हा विजयला तिथून फोन केला… दादा, मला इथं भिती वाटतेय, तुम्ही या ना इकडं… असं त्याचं आर्जव ऐकून विजय पुन्हा रात्री त्याच्या साथीला जाऊन बसला… दरम्यानच्या काळात पोलीसांनी त्याच्या आईवडिलांना फोन लावून त्याला घेऊन जाण्यासाठी यायला सांगितलं… विजयनं आणि पोलीसांनी पुन्हा रात्रभर कृष्णाला समजावलं… औरंगाबाद विभागाच्या कृषी सह-संचालकांशी विजयनं संपर्क साधून कृष्णाला मदत करण्याबाबत विनंती केली… त्यांनीही ती मान्य केली… आपल्यासाठी सारे जण करत असलेल्या प्रयत्नानं एक नवी उमेद मनी जागलेल्या कृष्णानं अखेर… पुन्हा आपण आत्महत्येचा विचारही मनात आणणार नाही… असं विजयला सांगितलं… विजयच्या आणि पोलीसांच्याही मनावरचं मळभ दूर झालं… आणि एक नवी पहाट सूर्याची नवी किरणं घेऊन पोलीस स्टेशनमध्येच नव्हे; तर, कृष्णाच्या आयुष्यातही दाखल झाली…!
असे कित्येक कृष्णा निराशेच्या गर्तेत बुडून आपल्या आयुष्याचा अंत करत असतात… त्यांना प्रत्येक वेळी त्यांच्या विचारापासून परावृत्त करणारा असा एखादा तळमळीचा विजय भेटेलच, असं नाही… पण आपण त्यांच्यासाठी 'विजय' होण्याचा प्रयत्न तरी करून बघायला काय हरकत आहे?
विजय, तुझं मनापासून अभिनंदन!!

(विजय गायकवाड यांचा संपर्क क्रमांक : 9870447750 आणि इ-मेल पत्ता vijay.agrowon@gmail.com)

३३ टिप्पण्या:

  1. प्रशांत सातपुते९ मे, २०१२ रोजी ५:४९ PM

    अतिशय सुंदर.. मानवी संवेदना बोथट झालेल्या सध्याच्या पत्रकारितेत विजय गायकवाडांची ही पत्रकारिता संवेदना जागृत करणारी आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. आम्ही उद्याच्या अंकात वापरतोय ...
    - sunjay awate

    उत्तर द्याहटवा
  3. विजयने केलेले काम मोठे हे खरेच... पण आलोक, तुमची संवेदनशीलता मला खूपच महत्त्वाची वाटते. एकूणच, आमच्या जमातीने शिकावे, असे बरेच आहे तुमच्याकडे. बाय द वे, विजय, भारीच! उद्या आम्ही हा असाच ब्लॉग विजयच्या फोटोसह पान एकवर वापरतोय.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. सर, मी मूळचा तुमच्या जमातीचाच आहे; शासकीय कळपात सामील झालोय, इतकेच! आपण ब्लॉग वापरताय, ही खरंच आनंदाची गोष्ट आहे. Vijay deserves the appreciation. Thank you very much!!

      हटवा
  4. विजय अभिनंदन..आणि प्रियदर्शन^तुझेही कारण विजयचा हा विजय सर्वांसमोर आणल्याबद्दल

    उत्तर द्याहटवा
  5. Vijay deserves the praise. But tell me one thing. Who was the inward clerk in CM's office? Didn't he notice the threat of suicide in that memorandum? The episode has underpinned that the government is insensitive on the farmers' issues.

    उत्तर द्याहटवा
  6. विजय साहेब...
    हार्दिक अभिनंदन !!!
    मुंबईच्या बजबजपुरीत माणुसकीचा दिवा फक्त तुमच्यासारख्या काही लोकांमुळेच जिवंत आहे.
    एखाद्या परिस्थितीने गांजलेल्याला धीर देवून त्याच्यामध्ये जगण्याचे बळ निर्माण करणं यासारखं दुसरं कोणताही मोठ काम नाही.
    एक जीव वाचवून त्याच्यावर अवलंबून असलेल्या ४-५ जीवांची होऊ घातलेली परवड थांबाविल्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन आणि आभार...

    -शंतनू शिंदे – ह्युस्टन, टेक्सास.

    उत्तर द्याहटवा
  7. आजच्या जमान्यात हे असं काही घडु शकतं, हे समजुन खुप उभारी आली. विजय आणि आलोक, दोघेही अभिनंदनास पात्र आहात. -सतीश लळीत.

    उत्तर द्याहटवा
  8. Vijayrao,
    Jeevanat dusare kay ahe,manusaki shivay,you are great! Go ahead !!!

    Reg
    Yashwant Gawade

    उत्तर द्याहटवा
  9. Vijayrao,
    Jeevanat dusare kay ahe,manusaki shivay,you are great! Go ahead !!!

    Reg
    Yashwant Gawade

    उत्तर द्याहटवा
  10. thank yashwat..................! ayushyachy pratyek tappyavar suport dilas. ek jiv vachawlyache samadhan....

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. no words to express, Viju u have shown an outstanding example, why u r in agro genr'zim. U hv nt only save one man but his entire family. keep it up good work. Lots of expectations from u

      हटवा
    2. Alok , thanks to you for making us aware

      हटवा
  11. विजयराव आपण एका शेतकऱ्याला आत्म्हत्येपासून परावृत्त केल्याबद्दल धन्यवाद तसेच आलोक यांनी हि माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल आभारी आहोत.
    चंद्रशेखर जोशी, दापोली

    उत्तर द्याहटवा
  12. अप्रतिम...
    विजय गायकवाड यांच.
    त्यांच्यासह सहृदयता दाखवलेल्या अनेकांच.
    ते आमच्यासमोर आणणाऱ्या आलोक यांच्यासह
    हे वाचणाऱ्यांचही आणि दाद देणाऱ्यांचं.
    अप्रतिम,अशा भरकटलेल्या कृष्णांसाठी
    अनेक विजय तयार होवोत...या सदिच्छेसह.

    उत्तर द्याहटवा
  13. प्रिय मित्रा विजय तुझं मनापासून अभिनंदन आणि अलोकचंही. उमदीच्या काळातच जीवनाच्या शेवटावर येऊन ठेपलेल्या व्यक्तीला अचानक कुणी तरी भेटावं आणि जगण्याला बळ मिळावं, हा केवळ सिनेमा अथवा कथा- कादंबऱ्यांतलाच विषय नाही, ते वास्तव विजयमुळे दिसलं. या घटनेमुळे कृष्णाला समस्यांसह जगणं शिकण्यास नक्कीच बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करायला हरकत नाही.

    उत्तर द्याहटवा
  14. BUT WHAT ABOUT HIS FUTURE R U SURE THAT AFTER ONE YEAR THAT PERSON SHOULD BE OUT OF PROBLEMS

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. surely.....! To empower farmer is our(Agrowon) duty. I am in constantly touch with krishana. after going back to aurangabad he has aproached to ank and agri dept. everyone is suporting him now. most imp is that he now confident.Natharao karad fron injegaon will personally meet him...Hope so he future will evergreen....

      हटवा
  15. Vijay che khup khup kautuk ani krushna la navin ayushyabadhal shubhechha....Alok tujhedekhil abhinandan...lekh chhan ahe..

    उत्तर द्याहटवा
  16. त्रिवार अभिनंदन ..आत्महत्या रोखण्यासाठी आर्थिक मदतीसोबत..पायाभूत सुविधा आणि मनोबल उंचावण्याची गरज आहे..
    मनोज हाडवळे

    उत्तर द्याहटवा