सोमवार, २८ मे, २०१२

मुंबई पोलीसांची असीम शौर्यगाथा!


पोलीस कॉन्स्टेबल दिलीप वऱ्हाडी यांचा सत्कार करताना गृहमंत्री आर.आर. पाटील. शेजारी गृह राज्यमंत्री सतेज पाटील.

 दि. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला कोणता भारतीय नागरिक विसरू शकेल? या हल्ल्यात महाराष्ट्रानं, देशानं कित्येक शूर पोलीस अधिकारी-कर्मचारी, जवान आणि निरपराध नागरिक गमावले. पण, याच हल्ल्याच्या वेळी, जगाच्या इतिहासात कधीही झाली नाही, अशी घटना घडली. ती म्हणजे दहशतवादाचा चेहरा खऱ्या अर्थानं यावेळी प्रथमच साऱ्या जगासमोर आला. आणि ही कामगिरी केली होती, मुंबईचे पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम ओंबळे यांनी! एके-47 मधून बेछूट गोळीबार करत सुटलेला दहशतवादी अजमल कसाब याला आपल्या हाती असलेल्या लाठीच्या सहाय्यानं आणि असीम धैर्याच्या जोरावर जेरबंद करणारे ओंबळे स्वतः शहीद झाले, मात्र आपल्या शेजारी देशाचा दहशतवादाला असणारा वरदहस्त प्रथमच पुराव्यानिशी सामोरा आला. तुकाराम ओंबळे यांचं हौतात्म्य हे मुंबई पोलीसांची कर्तव्यपरायणता, कामाप्रती अतीव निष्ठा आणि देशाप्रती अत्युच्च समर्पणशीलता यांचं सर्वोच्च प्रतीक ठरलं.
शहीद ओंबळे यांची आठवण होण्याचं कारण म्हणजे या महिन्यात म्हणा, किंवा गेल्या दोन आठवड्यांत दोन अशा घटना घडल्या की, ज्यांच्यामुळं मुंबई पोलीसांची ही समर्पण वृत्ती पुन्हा एकदा झळाळून सामोरी आली. जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या संरक्षणासाठी मुंबई पोलीस सदैव तत्पर असल्याचा दिलासा या घटनांतून मुंबईकरांना निश्चितपणे मिळाला आहे.

घटना पहिली :
            शिकलगर टोळीचे दरोडेखोर विरारमध्ये असल्याची खबर दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अन्सार पिरजादे यांना दि. 13 मे 2012 रोजी सकाळी मिळाली. ही शिकलगर टोळी म्हणजे दरोडेखोरीच्या बाबतीतली अतिशय निष्ठूर मानली जाते. दरोडा तर टाकायचाच, पण पुरावा मागे राहू नये, म्हणून संबंधित कुटुंबातल्या सर्वांनाच मारुन टाकायला ते मागेपुढे पाहात नाहीत. त्याचप्रमाणं अटक टाळण्यासाठी पोलीसांवरच उलटून प्रतिहल्ला करायलाही हयगय करत नाहीत. भूतकाळात पोलीसांच्या बाबतीत असे प्रतिहल्ले झालेलेही आहेत. त्यामुळं या टोळ्यांना पकडायचं, म्हणजे पोलीसांना जीवावर उदार होऊनच जावं लागतं.
तर.. पिरजादे यांना खबर मिळताच, त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक शंकर खटके यांना आपल्या टीमसह विरारला जाऊन दरोडेखोरांसाठी सापळा रचण्याचे निर्देश दिले. त्यानुसार श्री. खटके हे हवालदार चंद्रकांत माने, हवालदार शांताराम भुसार, पोलीस नाईक नामदेव भोगले, पोलीस नाईक प्रवीण जोपळे, पोलीस शिपाई शिवाजी भोसले, शिवराम बांगर आणि दिलीप वऱ्हाडी यांच्यासह पूर्ण तयारीनिशी बाहेर पडले.
ही टीम विरार पूर्वेला चंदनसार रोडवरच्या राहील पेट्रोल पंपाच्या जवळ सकाळी अकराच्या सुमारास पोहोचली. त्याचवेळी त्यांना समोरून एक टेम्पो येताना दिसला; मात्र, पोलीस वाहन पाहून त्या टेम्पोने यू-टर्न घेतला आणि अमित हाऊसिंग सोसायटीच्या गेटमध्ये थांबला. पाठोपाठ येणारा दुसरा टेम्पोही या टेम्पोच्या पाठीमागे थांबला.
कॉन्स्टेबल शिवराम बांगर यांचा सत्कार करताना गृहमंत्री आर.आर. पाटील.
            या वाहनांच्या संशयास्पद हालचाली पाहून पोलीसांची टीम तातडीनं त्या टेम्पोच्या दिशेनं पुढं सरकली. सर्वांनी टेम्पोला घेरलं आणि टेम्पोतल्या संशयित व्यक्तींना खाली उतरायला सांगितलं. त्यानंतर काही क्षणांतच, टेम्पोमध्ये लपवलेल्या लोखंडी कांब (सळई) आणि तलवारी घेऊनच दरोडेखोर झपकन खाली आले आणि त्यांनी पोलीसांवर हल्ला चढवला. त्यातल्या एकानं पोलीस कॉन्स्टेबल दिलीप वऱ्हाडी यांच्यावर लोखंडी कांबेनं वार केले. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. त्याचवेळी दुसऱ्या दरोडेखोरानं कॉन्स्टेबल शिवराम बांगर यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. जमिनीवर कोसळलेल्या बांगर यांच्यावर तिसरा दरोडेखोर तलवारीचे वार करण्याचा प्रयत्न करत होता, आणि बांगर ते हातांवर झेलत चुकवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना ठार करण्याचेच दरोडेखोरांचे प्रयत्न सुरू होते. आपला सहकारी जीवघेण्या संकटात असल्याची जाणीव गंभीर जखमी असलेल्या दिलीप वऱ्हाडी यांना झाली. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोझिशन घेतली आणि आपल्याकडचं सर्व्हीस रिव्हॉल्व्हर हल्लेखोरांवर रोखलं आणि त्यांना हातातली शस्त्रं खाली टाकायला सांगितलं. मात्र, हा काय गोळी घालणार, अशा अविर्भावात त्या दरोडेखोरांनी त्याच्याकडं दुर्लक्ष केलं आणि बांगर यांच्यावर ते प्रहार करणार, इतक्यात वऱ्हाडी यांनी आपल्या सहकाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी त्या हल्लेखोरावर एक राऊंड फायर केला. गोळी त्याच्या पायात घुसली आणि त्याच्या हातून तलवार गळून पडली. वऱ्हाडी यांच्या तत्पर हालचालीचा इतका जोरदार परिणाम झाला, की त्यामुळं दरोडेखोर गांगरले. त्यांच्या त्या गोंधळलेल्या स्थितीचा फायदा घेऊन पोलीसांनी त्या सहा गुन्हेगारांना अटक केली. कॉन्स्टेबल दिलीप वऱ्हाडी यांनी अतिशय बिकट परिस्थितीत प्रसंगाचं गांभीर्य ओळखून आणि स्वतःच्या जीवालाही धोका असताना आपल्या सहकाऱ्याला वाचवण्यासाठी जी कर्तव्यतत्परता आणि साहस दाखवलं, त्याला तोड नाही. त्यांच्या या दक्ष हालचालींमुळंच वीसपेक्षाही अधिक दरोड्याचे गुन्हे नावावर असलेली अतिशय जहाल दरोडेखोरांची टोळी मुंबई पोलीसांच्या ताब्यात आली.
--
घटना दुसरी:
गुणाजी पाटील यांचा सत्कार करताना मुंबई पोलीस आयुक्त अरुप पटनाईक.
दि. 19 मे 2012, दुपारी 12.45 वा.ची वेळ. वरळी पोलिस स्टेशनला एक कॉल येतो.. राजीव गांधी वांद्रे-वरळी सी-लिंकवरून एका महिलेनं उडी मारल्याचा! प्रकाराचं गांभीर्य लक्षात येऊन पोलीसांची टीम तातडीनं सायरन लावूनच घटनास्थळाकडं रवाना होते. पोलीस वाहनावर चालक असतात.. गुणाजी पाटील.. वय वर्षे 51.
ही टीम तीन ते चार मिनिटांतच सी-लिंकवर संबंधित ठिकाणी पोहोचते, तर तिथं बघ्यांची ही गर्दी जमलेली.. खाली पाण्यात गटांगळ्या खाणारी महिला तर दिसतेय, पण काय करावं कुणालाच सुचेनासं झालेलं! फायर ब्रिगेडला यायलाही किती वेळ लागेल, माहित नव्हतं; बरं, ते येईपर्यंत ती महिला जिवंत राहील की नाही, याचीही शाश्वती नाही. वरळी पोलीस स्टेशनमधून गेलेली टीमही संभ्रमात पडलेली! त्याचवेळी कुणाला काही समजायच्या आतच पोलीस हवालदार - ड्रायव्हर गुणाजी पाटील सी-लिंकच्या त्या 20-25 फुटांवरुन खाली खवळत्या समुद्रात उडी टाकतात आणि त्या गटांगळ्या खाणाऱ्या महिलेला हाताला धरून, लाटांवर तरंगत ठेवून महत्प्रयासानं किनाऱ्याला आणतात. त्या महिलेला सुरक्षितपणे किनारी आणणारे गुणाजी पाटील यांच्या पायाला मात्र जबर मार बसलेला! मात्र, त्या दुखापतीची चिंता वाटण्यापेक्षा एक जीव वाचवल्याचं समाधानच त्यांच्या चेहऱ्यावर झळकतं.
जल्पा पुजारी असं नाव असलेली ती विवाहिता, कौटुंबिक वादातून आत्महत्या करण्यासाठी गेलेली! पाटील यांनी जीवावर उदार होत दाखवलेलं साहस आणि हिकमतीमुळं तिचा जीव तर वाचलाच, पण आत्महत्येचा विचारही तिच्या मनातून गेला. दोन-तीन दिवसांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन पाटील यांना तिनं वाचवल्याबद्दल धन्यवादही दिले.
--
 मुंबई पोलीसांच्या या असीम शौर्याची राज्य शासन आणि पोलीस प्रशासन यांनी तातडीनं दखल घेतली. या सर्व शूर पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांचा राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, मुंबई पोलिस आयुक्त अरुप पटनाईक, अतिरिक्त पोलीस आयुक्त रामराव पवार यांनी सत्कार करून कौतुक केलं. धाडसी पोलीस कॉन्स्टेबल दिलीप वऱ्हाडी यांच्या नावाची तर ‘राष्ट्रपती शौर्य पदका’साठी तर गुणाजी पाटील यांची ‘पंतप्रधान जीवनरक्षा पदका’साठी शिफारस करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, अगदी अनपेक्षितपणे, ‘राज ट्रॅव्हल्स’नं दिलीप वऱ्हाडी आणि गुणाजी पाटील यांना त्यांच्या कुटुंबियांसह मलेशिया-थायलंडची सहल ऑफर केली आहे. पोलीसांच्या कर्तबगारीची शासनाबरोबरच एखाद्या कंपनीनं दखल घेण्याचा हा प्रसंगही निश्चितच वेगळा आणि त्यांना आणखी चांगल्या कामगिरीसाठी बळ देणारा ठरणार आहे.
मुंबई पोलीसांच्या या कर्तबगारीला माझा एकदम कडक सॅल्यूट!!!

३ टिप्पण्या:

 1. Hats-off to Mumbai Police...pan Alok, kalchyach TOI madhe MuPo badhhal Mumbaimadhil tarun mandalinche kahi changle mat nahi ase ale hote...in fact, "TALIBANIZED MuPo" ase shirshakamadhe lihile hote..vachun thoda dhakka basla pan police tari kay karnar mhana....kahi dangal, khun, maramari zale ki polisanchya navane udo-udo apanch karnar ani tyani thode surakhsesathi prayatn kele ki tyana "Talibani niyam" mhananar..malatari vatatey ki MuPo sarkhya polisanche jivan jagatil kontyach polisanche nasel...sadaiv kartavydaksh, varun dabav, dahashatvadache savat, ani rojche dhakadhakiche jivan....
  kahi aso, tyanchya shouryabadhal khup kautuk ani dhanywad...
  Alok, lekh chhan ahe, as usual...keep it up..

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. प्रिय भालू, तुझे म्हणणे अगदी खरे आहे. तुला सांगतो डिसेंबर 2009च्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात एक लाख लोकसंख्येमागे 166 पोलीस तर देश पातळीवर 129 पोलीस अशी संख्या होती. या दोन-तीन वर्षात समजा ही संख्या अनुक्रमे 200 आणि 150 पर्यंत पोहोचल्याचे गृहित धरले तरीही कमीच आहे. या पार्श्वभूमीवर आपले पोलीस स्वतःच्या कुटुंबाची, घरादाराची चिंता न करता ज्या पद्धतीनं काम करतात, त्याबद्दल त्यांना खरंच धन्यवाद दिले पाहिजेत. स्वतःच्या घरची दिवेलागण पाहणं नशिबी नसलेले पोलीस नागरिकांच्या घरचे दिवे सुरक्षित राहावेत, म्हणून डोळ्यांत तेल घालून काम करतात. साहजिकच ती सुद्धा माणसंच आहेत. छोट्या-छोट्या गोष्टींनी आपला सुद्धा बॅलन्स जातो, तिथं नेहमीच गुन्हेगारांशी संबंध येणाऱ्या पोलीसांकडून आपण नेहमीच बॅलन्स राहण्याची अपेक्षा करणं, मला तरी चुकीचं वाटतं. (भलेही, मला स्वतःलाही त्यांच्या या प्रवृत्तीचा कित्येकदा राग येतो.) पण आपण त्यांना समजून घ्यायला नको का? शेवटी आपण सारे एकाच समाजाचे घटक आहोत- जिथे चांगले लोक आहेत आणि वाईटही! Thanks for being with me always!!!

   हटवा
 2. पोलिस व त्यांचे काम मांडणाऱ्या आपल्या पत्रकारांचे आभार

  उत्तर द्याहटवा