गुरुवार, २५ ऑगस्ट, २०११

संत चोखामेळा यांची समग्र अभंगगाथा!

'श्री संत चोखामेळा समग्र अभंगगाथा व चरित्र' या प्राचार्य डॉ. आप्पासाहेब पुजारी संपादित महत्त्वपूर्ण गाथेचा प्रकाशन समारंभ डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते येत्या सोमवारी (दि. 29 ऑगस्ट 2011) सायंकाळी 6 वाजता नवी पेठ, पुणे येथील पत्रकार भवनामध्ये होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गो.ब. देगळूरकर असतील तर श्री. अरुण खोरे आणि श्री. वा.ल. मंजूळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कोल्हापूरच्या तेजस प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित करण्यात येत असलेल्या या गाथेमध्ये संत चोखामेळा यांच्या नव्याने उपलब्ध झालेल्या नऊ अभंगांचा समावेश करण्यात आलेला आहे, हे या पुस्तकाचे अत्यंत महत्त्वाचे असे वैशिष्ट्य आहे.
अभंगगाथेचे संपादक प्राचार्य डॉ. आप्पासाहेब पुजारी यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना याठिकाणी देत आहे.

चोखोबांनी मराठी सारस्वताला दिलेली देणगी ही अतुलनीय व अलौकिक स्वरूपाची आहे. चोखोबांनी आपल्या हयातीत अभंगाव्यतिरिक्त इतरही रचना केल्याचे आज तरी स्पष्ट खुलासा होत नाही. आज त्यांचे केवळ 349 + 9 एवढे अभंग वाचकांना उपलब्ध आहेत. प्रस्तुत लेखकाने चोखोबांचे नव्याने उपलब्ध झालेले 9 अभंग या गाथेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रातील आणखी काही ग्रंथालयांतील जुनी बाडे तपासली तर आणखी काही अभंग हाती लागण्याची दाट शक्यता आहे.
अनेक संदर्भ ग्रंथांचा आढावा घेता, चोखोबांनी 'विवेकदीप' नावाचा एक ग्रंथही लिहिल्याचा वारंवार उल्लेख येतो, परंतु आजपर्यंत अनेकांनी अनेक वेळा प्रयत्न करून देखील तो काही दृष्टीस पडलेला नाही. तो ग्रंथ जर उपलब्ध झाला तर चोखोबांच्या साहित्यावर आणखी प्रकाश पडू शकेल. चोखोबांच्या साहित्य निर्मितीसंबंधी आज अनेक प्रश्न निर्माण होतात. चोखोबांना मुळात लिहिता-वाचता येत होते का? एकंदरीत त्या काळातील प्राप्त परिस्थितीचा विचार करता, संस्कृत ही प्रभावी भाषा होती आणि ती शिकण्यासाठी चोखोबांना अनुकूल परिस्थिती होती, असे वाटत नाही. त्या काळी बरेच साहित्य संस्कृत भाषेत होते, तर मग या सर्वांचे वाचन चोखोबा कसे करीत असत? ज्ञानदेव, नामदेव व इतर समकालीन संतांच्या रचना चोखोबांनी कशा वाचल्या असतील? सामाजिक परिस्थितीचा आढावा घेता चोखोबांना यातिहीन म्हणून सतत दूर ढकलत असताना समाजाच्या अंतरंगाचे दर्शन आपल्या अभंगवाणीतून ते कसे करू शकले?

एवढया प्रतिकूल परिस्थितीत देखील कसदार व अमरत्व प्राप्त झालेले साहित्य चोखोबांनी कसे निर्माण केले, हाही एक मोठा प्रश्नच आहे. सातशे वर्षांपासूनचे जे साहित्य आजही अमर अशा स्वरूपात आहे ते साहित्य निर्माण करणाऱ्या लेखकाकडे-चोखोबांकडे-अगाध व अफाट प्रतिभाशक्ती होती हे निर्विवाद. त्या व्यतिरिक्त त्यांचे चिंतन व मनन हे अधिक महत्त्वाचे वाटते. समाजातील उच्च स्तरातील लोकांच्या बोलण्यातील व वागण्यातील विसंगती त्यांना सतत सलत असावी. तेच त्यांच्या चिंतनाचे व मननाचे विषय होते. चोखोबांच्या ज्ञानेंद्रियाची बाजू अधिक सशक्त होती, असे वाटते. कारण त्यांच्या अभंगांचे विश्लेषण करतेवेळी याचे दर्शन प्रकर्षाने झाल्याखेरीज राहत नाही. ज्ञानार्जनासाठी चोखोबांनी ज्ञानदेव व नामदेव आदी संतांच्या सोबतीने पुष्कळसे देशाटन व तीर्थाटन केले. त्यामुळे अनेक संतांचा व सज्जनांचा सहवास त्यांना लाभला. चोखोबांची श्रवणशक्ती देखील मोठी होती, असे वाटते. त्यांना लिहिता-वाचता येत नव्हते हे गृहीत धरून पुढे लिहावयाचे झाले, तर समकालीन संतांच्या रचना एकांतात वाचण्यासाठी चोखोबांना त्या काहीच उपयोगाच्या नव्हत्या. ज्यावेळी स्वत: त्या संतांच्या वा इतरांच्या मुखातून बाहेर पडेल त्याच वेळी त्याचा अर्थ व मर्म चोखोबांच्या काळजाला जाऊन भिडत असे आणि अगाध अशा स्वरूपातील श्रवण शक्तीच्या आधारेच त्यांनी ही साहित्य निर्मिती केली.
चोखोबांना आपल्या साहित्य निर्मितीत संतांचा सहवास हा अत्यंत महत्त्वाचा वाटतो. तत्कालीन वर्णाश्रम पध्दतीत समाजातील कर्मठांनी चोखोबांना जरी दूर लोटले असले तरी संतांनी मात्र त्यांना जवळ केले होते. त्यामुळे आपल्या निष्ठापूर्व भक्तीने संत मेळयात त्यांनी फार मोठे स्थान प्राप्त करून घेतले होते.
ज्ञानदेव व नामदेवांच्या अभंग रचनेच्या संख्येच्या मानाने आज उपलब्ध असलेल्या चोखोबांच्या अभंगांची संख्या अगदीच मर्यादित आहे. चोखोबांनी आपली अभंग रचना करण्यास कधी सुरुवात केली आणि किती काळ हे व्रत चालू होते, याचाही अंदाज लागत नाही. त्यांनी दीर्घकाळ अभंग रचना केली असावी असे गृहीत धरले तर आज उपलब्ध आहे त्यापेक्षा अधिक अभंगरचना त्यांनी केली असावी असे वाटते; परंतु आज उपलब्ध असलेल्या अभंगांची संख्या पाहता व त्यांच्या व्यासंगाचा आढावा घेता आजची त्यांच्या अभंगांची संख्या अपुरी आहे, असे वाटते. एका वाचनात हे सर्व अभंग नजरेखालून घातले तर अभंगरचना खंडित झाल्याची जाणीव झाल्याखेरीज राहात नाही.
चोखोबांच्या अभंगांचा दर्जा संतश्रेष्ठाचा आहे. नैसर्गिकपणा, सहजसुंदरता, सामाजिक आशय, बांधीव रचना, इत्यादी साहित्यिक गुणांनी चोखोबांच्या अभंगांना मराठी सारस्वतात मानाचे स्थान आहे. चोखोबांची वाणी चोख होती. 'वाणी नाही शुद्ध धड न ये वचन' असे त्यांचे मत होते. यावरून असे दिसते की, त्यांना आत्मप्रौढीचा तिटकारा होता. आपला विचार, सिध्दांत आणि अभंगांबाबत त्यांना पराकोटीचा आदर होता.
चोखोबांच्या अभंगात भक्तीविषयक व पारमार्थिकविषयक आशय तर आहेच, परंतु त्यांच्या मनातील दु:ख व्यक्त करणारे अभंगही आहेत. याही पुढे जाऊन द्वैत-अद्वैत, गीता यातील अनेक तत्त्वज्ञानाच्या गोष्टी अत्यंत समर्थपणे आपल्या अभंगातून मांडल्या आहेत. भगवंताच्या रूपाचे, त्याच्या भक्ती, त्याच्या सामर्थ्याचे, करुणा स्वभावाचे गुणगान करण्यासाठी चोखोबांनी जशी अनेक अभंगांची निर्मिती केली, तसेच गुरुपरंपरेतील ज्ञानेश्वर व नामदेवांचे वर्णन करण्यासाठी देखील अनेक अभंग खर्ची टाकले आहेत.
माणसाचा व पर्यायाने समाजाचा विकास काही प्रमाणात त्याच्या आर्थिक सुबत्तेवर अवलंबून असतो, परंतु त्या विकासाच्या परिपूर्णतेला नैतिक व आध्यात्मिकतेचीही जोड द्यावी लागते. तेव्हा संतसाहित्य हे टाळकुटे साहित्य नसून त्याचा गाभा उलगडून पाहिला तर सुखी व सुसंस्कृत जीवनासाठीचे अनेक मौलिक विचार व मार्ग त्यात सापडतात. या संदर्भात कदम यांनी दिलेला दृष्टांत मला मनापासून आवडतो. ते म्हणतात, एके ठिकाणी आग लागली असता त्याकडे धावून गर्दी करणारे लोक आग विझविण्यासाठी काहीच करू शकत नाहीत, परंतु आग विझवण्यासाठी पाण्याच्या साठयाकडे धावणारेच अखेर ती आग विझवू शकतात. हे जसे खरे आहे त्याप्रमाणे संतांच्या कार्याचे व संतसाहित्याचे महत्त्व आहे. प्रथमदर्शनी टाळकुटे वाटत असले तरी अखेर जीवनाचे खरे मर्म त्यातच आहे.
ज्ञानदेव, नामदेव आदी संतांनी समाजात आध्यात्मिक लोकशाही रुजविण्यासाठी जे शतकोटी प्रयत्न केले त्यातील मूर्तिंत उदाहरण म्हणजे संत चोखामेळा होय. प्रस्तुत समाजाने हीन मानलेल्या चोखोबांना नामदेवांनी गुरूपदेश दिले. आपल्या प्रभावळीतील संतमंडळीत चोखोबांना संतश्रेष्ठत्वाचे स्थान देऊन, त्यांच्या हीन कुळाचा कलंक धुऊन त्यांच्या अभंगवाणीचे मुक्त कंठाने गुणगान करून आध्यात्मिक लोकशाहीची पताका त्यांनी चोखोबांच्या खांद्यावर ठेवली.

ज्ञानेश्वरांच्या समकालीन अभंग रचनाकार आपले अभंग रचावयाचेच म्हणून एकांतात बसून स्वत: लेखन करण्याची पध्दती नव्हती. विठ्ठलभक्तीच्या धुंदीत न्हाऊन निघालेले हे संत भजन-कीर्तनातच आपले विचार अभंगांच्या माध्यमातून मांडत असत. कालांतराने त्यांच्या शिष्यांनी, भक्तांनी व लेखनिकांनी ते अभंग (साहित्य) उतरून घेतलेले असे. चोखोबांच्या बाबतीत देखील हेच घडले आहे. त्या काळी बिंदाुधवाचार्य नावाचे मूळचे कन्नड भाषिक सद्गृहस्थ मंगळवेढा किंवा पंढरपूरच्या दरम्यान रहात होते. त्यांचा मुलगा अनंतभट्ट यांनी चोखोबांच्या साहित्याचे (अभंगांचे) लेखन केल्याचा जनाबाईच्या एका अभंगात उल्लेख आढळतो.
चोखोबांच्या मरणोत्तर 700-750 वर्षांनंतर देखील त्यांचे (358 च्या आसपास) अभंग आज ग्रंथरूपाने शिल्लक आहेत, हे मराठी वाचकांचे मोठे भाग्य समजावे. एवढया प्रदीर्घ काळात त्यांच्या सर्व अभंगांचे वारंवार लेखन झाले नसावे. ज्ञानदेवाच्या, नामदेवाच्या, तुकारामाच्या एकत्र साहित्याच्या अनेक हस्तलिखित प्रती आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उपलब्ध आहेत, परंतु चोखोबांच्या अभंग रचनेच्या संदर्भात असे घडले नसावे, असे वाटते. म्हणून काळाच्या ओघात काही अभंग नष्ट देखील झाले असावेत. अनेक वेळा अभंग उतरून घेत असताना त्यात बदल देखील झाले असतील. (मला मिळालेल्या एका हस्तलिखितात-चोखामेळा हे नाव चोखामेला असे लिहिले आहे.) याच प्रक्रियेत काही अभंग नष्टही झाले असतील, तर काही भाष्यकारामुळे अधिक सुस्पष्टही झाले असतील.
चोखोबांचे अभंग उतरून घेणारे अनंतभट्ट यांच्या निष्ठेविषयी थोडी शंका घेतली जाते, ती म्हणजे चोखोबांना नेमके काय सांगावयाचे होते तेच अनंतभट्टांनी उतरून घेतले कशावरून? त्या अभंगात बदल केले नसावे कशावरून? वगैरे वगैरे. परंतु या संदर्भात दोन गोष्टी स्पष्ट कराव्याशा वाटतात. एक म्हणजे त्या काळच्या हीन जातीतील चोखोबांचे अभंग उतरून घेण्यासाठी उच्च जातीतील एक ब्राह्मण-अनंतभट्ट-चोखोबांच्याकडे जातो हे किती विचित्र होते! या कार्यासाठी त्यावेळच्या समाजांनी अनंतभट्टांना किती त्रास दिला असावा वा छळले असावे, ही कल्पनाच न केलेली बरी. कदाचित अनंतभट्टांना वाळीत देखील टाकले असावे. हे सर्व सहन करून देखील अनंतभट्टांनी चोखोबांच्या अभंगांचे लेखन केले यात चोखोबांप्रमाणे अनंतभट्ट देखील मोठे वाटतात. चोखोबांच्या अभंगातील कस, निरूपण आणि आशय हे समाजाला उपयुक्त असल्याचे अनंतभट्टांनी त्यावेळी मनापासून जाणले असावे. म्हणूनच त्या काळात हे धाडस त्यांनी केले असावे. दुसरे असे की, त्यावेळी अनंतभट्टांसारखे साक्षर (त्यावेळी बहुसंख्य साक्षरवर्ग हा ब्राह्मणच होता) लोक हे लिहिण्यासाठी पुढे आले नसते तर आज चोखोबांचे अभंग वाचावयास मिळाले असते का? इतक्या शतकांनंतर देखील चोखोबांचे अभंग अमर झाले त्यात अनंतभट्टांचे देखील योगदान निश्चितच महत्त्वाचे आहे.
प्रत्येक महापुरुषाने आपापल्या काळात महान काम केले म्हणूनच ते त्या काळी महापुरुष झाले. त्यांच्या काळात जी आव्हाने होती, त्या आव्हानांना समर्थपणे सामोरे ते गेले म्हणूनच ते त्या काळी महापुरुष ठरले. काही वेळा या महापुरुषांना, त्यांच्या कार्याला सध्याच्या काळात जोखले जाते व काही प्रमाणात प्रतिकूल मतही व्यक्त केले जाते, परंतु असे होऊ नये. कारण काळाच्या ओघात जशी परिस्थिती पलटते तसे समाजासमोरील आव्हाने देखील बदलतात. चोखोबांच्या बाबतीत असेच काहीसे झाल्यासारखे वाटते. चोखोबांच्या काळी आव्हान होते ते समाजातील उच्च-नीचतेचे, सामान्य जातीतील लोकांना उच्च कुळाचे समजणाऱ्यांकडून होणाऱ्या अमानुष छळाचे आणि मुख्य प्रश्न होता तो कमालीच्या दारिद्रयाचा. या सर्व प्रश्नांविषयी चोखोबांनी समर्थपणे जाब विचारून पाटला (आजच्या भाषेत सरकार) समोर आपले गाऱ्हाणे मांडले आहे. प्रसंगी विरोधही केला आहे, परंतु हे सर्व त्या काळातील रूढ परिस्थितीला धरून होते हे महत्त्वाचे. चोखोबा व त्यांच्या कुटुंबीयांचे हे कृत्य सातशे वर्षांनंतरच्या आजच्या कसोटीवर मोजले तर कदाचित ते अन्यायाचे ठरेल. नामदेव, सावता माळी, गोरा कुंभार, नरहरी सोनार, सेना न्हावी, जनाबाई यासारख्या बहुजन समाजातील या संतांच्या समर्थ फळीत आपल्या कुटुंबासहित सामील होणे व अन्यायाविरुध्द लढा देणे ही चोखोबांची त्या काळातील अनन्यसाधारण कामगिरी होती, एवढेच म्हणावे लागेल.
देव बाटविला म्हणून चोखोबांचा मानसिक व शारीरिक छळ केल्याची स्वत: चोखोबा आपल्या अभंगातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करतात. सोयरा व कर्मेळा यांनी देखील या संदर्भात केवळ खंतच व्यक्त केली नाही, तर भगवंतांना सणसणीत जाबही विचारला आहे. त्या काळातील सामाजिक स्थितीचे हे कुटुंब बळी होते, असेच म्हणावे लागेल. चोखोबा हीन यातीतील म्हणून तर छळ होत होताच, परंतु त्यांची विठ्ठलासोबत असलेली प्रेमपूर्ण मैत्री, अफाट प्रे व भक्ती ह्यामुळे छळाची तीव्रता अधिक होती. याचे दाखले आपणास अनेकांच्या अभंगातून अनेक वेळा मिळतात. विठ्ठल स्वत: चोखोबांच्या झोपडीत जाऊन दहिभात खाऊन आला. त्यावेळी चोख्याने देव बाटविला म्हणून मारले. एकदा तर मध्यरात्री विठ्ठलाने आपल्या दर्शनासाठी चोखोबांना आपल्या गाभाऱ्यात बोलाविले आणि आपल्या गळयातला कंठा दिला. त्यावेळी कंठा चोरल्याच्या आरोपावरून चोखोबांना बैलाच्या पायाला जुंपून छळले. असे अनेक प्रसंग आहेत. या दोन्ही प्रसंगात चोखोबांची काहीच चूक नव्हती. चूक होती ती फक्त विठ्ठलाच्या लेखी चोखोबांचे असलेले महत्त्व. हेच छळामागील मुख्य कारण असले पाहिजे.
आपल्या ज्ञानाचे सामर्थ्य सिध्द करीत चोखोबा संतमंडळीत वावरू लागले. हळूहळू मानाचे स्थान मिळवू लागले. याचीही पोटदुखी काही प्रस्थापित लोकांची वाढली असावी. ज्या ज्या वेळी या समूहाच्या संतापाचा उद्रेक झाला त्या त्या वेळी काही ना काही कारणे पुढे करून चोखोबांचा छळ (मनगटातील दंडुकेशाहीच्या आधारे) केला. प्रस्थापितांच्या विरुध्द बंड केल्याने अशीच वागणूक अनेकांना मिळाल्याचे दाखले या समाजात रग्गड सापडतात. प्रस्थापितांच्या विरोधात भागवत धर्माची पताका तेराव्या शतकात ज्ञानदेवांनी फडकाविली आणि या झेंडयाखाली बंडाच्या भूमिकेत अनेक संत येऊन दाखल झाले. त्यात नामदेव, गोरा कुंभार, नरहरी सोनार, जनाबाई आदी अनेक संत होते, परंतु चोखोबा देखील या बंडाच्या निशाणाखाली सरसावले होते, हे विशेष. कारण एक तर समाजाने मानलेल्या उच्च कुळात चोखोबांचा जन्म झाला नव्हता. कोणतीच शैक्षणिक वा आध्यात्मिक परंपरा चोखोबांच्या पाठीशी नव्हती. पाठीशी होती ती प्रस्थापितांचे प्रस्थ मोडून काढण्याची अदम्य इच्छा. त्यांच्या या सुप्त इच्छेला ज्ञानदेव व नामदेवांनी खतपाणी घातले, हे कौतुकाचे आहे. त्यांचा सहवास, प्रेरणा व आपुलकी निश्चितच चोखोबांना लाभली. आध्यात्मिक लोकशाही प्रस्थापित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नात चोखोबा धाडसाने व जिद्दीने सामील झाले होते. हीन जातीत जन्मलेल्या चोखोबांना त्या काळात समाजाच्या विरोधात जाऊन भागवत धर्माच्या छताखाली आणण्याचे जे धाडस ज्ञानदेव, नामदेवांनी केले तितकेच धाडस समाजाचा कडवा विरोध पत्करून, माणुसकीला काळिमा लावणारे छळ सोसून देखील या संतांच्या कार्यात मनोभावे सामील झाले, हे चोखोबांचे सर्वात मोठे धाडसच होते. भागवत धर्माचा मोह चोखोबांना या कारणासाठी झाला असावा की त्यात समतेची शिकवण आहे. भगवंतापुढे उच्चनीच असा कोणताच भेदभाव नाही.
चोखोबांचे व्यक्तिमत्त्व हे अलौकिक स्वरूपाचे होते. प्रस्थापित समाजाने त्यांना कितीही छळले तरी उच्चवर्णीय समाजाविषयी त्यांच्या मनात कोठेही तिटकारा नव्हता. सूडाची भावना नव्हती. तशा प्रकारचा विचारही त्यांच्या वाणीतून कोठेही डोकावत नाही. क्षमा हा देवांच्या नंतर संतांचाही स्थायिभाव आहे. तेव्हा चोखोबा केवळ संत नव्हे, तर संतश्रेष्ठ होते. म्हणूनच क्षमा ही भावना त्यांच्या नसानसात संचारत असली पाहिजे. त्यांच्या या उदार अंत:करणाच्या हृदयातून उमललेली ही अभंगवाणी इतक्या वर्षांनंतर देखील आजही टवटवीत वाटते.
संतश्रेष्ठ यांना शोभेल अशी अविचल व शांत वृत्ती चोखोबांची होती. त्यामुळे समाजातील काही
वर्गाकडून होणाऱ्या छळाला अत्यंत शांत चित्ताने व सहनशीलतेने सामोरे गेल्यामुळे समकालीन संतांच्या लेखी चोखोबा उच्चपदस्थ झाले होते. त्यांच्याविषयीचा आदर हा वाढत होता. चोखोबांच्या चरित्रात असे दिसते की लोकांनी त्यांना ज्या ज्या वेळी छळण्याचा प्रकार केला त्या त्या वेळी चोखोबा सहिसलामत सुटले व त्यांनी छळणाऱ्यांनाच तोंडावर आणले. तेव्हा जनाबाई आपल्या एका अभंगात म्हणते की, चोखोबांनी देवालाच ऋणी करून घेतले.
चोखामेळे संत भला। तेणे देव भुलविला॥
भक्ती आहे ज्याची मोठी। त्याला पावतो संकटी॥
चोख्यामेळ्याची करणी। त्याने देव केला ऋणी॥

असेच उद्गार सोयराबाईचे देखील आहेत.
पंढरिचे ब्राह्मणें चोख्याशी छळिलें। तयालागीं केलें नवल देवें॥
सकळ समुदाव चोखियाचे घरीं।ऋद्धी सिद्धी द्वारी तिष्ठताती॥

परंतु चोखोबांची ही क्षमाशीलता काहींना पळपुटेपणाची वाटत असावी. त्या अन्यायाविरुध्द बंड पुकारण्यासच हवे होते, असेही मत व्यक्त केले जाते; परंतु चोखोबांना समजून घेण्यामध्ये आपण कमी पडतो की काय, असे वाटते. कारण बारकाईने चोखोबांचे एक एक अभंग वाचून काढले तर अन्यायाविरुध्द त्यांची संस्कारित प्रतिक्रिया कोणत्याही बंडखोरी वृत्तीला मागे टाकणारी आहे. क्षमागुणातून कोणत्याही बलाढय ताकदीला सहज जिंकता येते ह्या समजुतीचीच चोखोबांची बंडखोरीची वृत्ती होती.
कै. शंकरराव खरात यांच्या एका पुस्तकाचे नाव 'चोखोबांचा विद्रोह' असे आहे. यातील चोखोबांची बंडखोरी आणि चोखोबांचा धर्मशास्त्राशी विद्रोह ही दोन प्रकरणे महत्त्वाची वाटतात. 'संत चोखामेळा आणि मी' या दलित नाटककार भि. शि. शिंदे यांनी लिहिलेल्या ग्रंथात चोखोबांचा विद्रोह कालसापेक्ष दृष्टिकोनातून जाणून घ्यायला हवा, त्यावेळचे त्यांचे कार्य आजच्या काळाच्या निकषावर तपासायला नको, असे म्हटले आहे.
''आधुनिक काळात क्रांती शब्दाचा अर्थ इतका कडवा बनला आहे आणि त्यात हर्षविषादांची एवढी कडवट खेचाखेच असावी लागते की, महाराष्ट्रीय संतांनी तेव्हाच्या समाजात परमार्थ पीठावरून ही एक क्रांती केली असे म्हटले, तर केवळ आधुनिक पध्दतीने विचार करणाऱ्यांना ते खरे वाटत नाही आणि विशेष म्हणजे त्यात काही गोडी वाटत नाही. आपल्या उच्च शिक्षणात ऐतिहासिक रसिकता या नावाचा विषय स्वतंत्रपणे शिकवावयास हवा असे वाटते. आपल्याला आपल्या काळाच्या संबंधाने जेवढी रसिकता दाखविता येते, तेवढी ऐतिहासिक काळासंबंधाने दाखविता येत नाही, ही मोठी दु:खाची गोष्ट आहे.''
चोखोबा, सोयराबाई आणि कर्मेळा यांच्या अभंग वाड्.मयावरून श्री. म. माटे म्हणतात, ''इतक्या पूर्वीच्या अस्पृश्य पुढाऱ्यांनी सुध्दा अस्पृश्यतेविरुध्द केवढी तक्रार केलेली होती, याचा उत्तम बोध होतो. या तक्रारीत केवळ पारमार्थिक दु:ख होते असे समजणे अगदी साफ चूक आहे. या संतांच्या मनाचे हे दुखणे अगदी स्पष्टपणे सामाजिक होते; आणि त्यामुळे भक्तिरसात डुंबत असताना सुध्दा त्यांच्या मनाचे समाधान समूळ नष्ट झालेले होते. कर्ममेळयाने केलेली तक्रार तर उघड उघड सामाजिक आहे; आणि त्याने दाखविलेल्या तुसडेपणाच्या भावनेला सामाजिक धार उत्पन्न झालेली आहे. देवापुढे वागत असतानासुध्दा तुझा मला काय उपयोग आहे, असे तो बिनमुर्वतीने म्हणतो. सध्याच्या काळातील त्या समाजातील सर्वश्रेष्ठ पुढारी डॉ. आंबेडकर हे राष्ट्राच्या संगतीत नांदत असतानाच आणि हिंदू धर्माच्या पोटीच जन्माला आलेले असताना तुमचा आम्हाला काय उपयोग आहे? असे त्वेषाने विचारीत असत. विचारण्याची भूमिका बदललेली आहे इतकेच, परंतु सामाजिक दु:ख आणि सामाजिक त्वेष तोच आहे. याचा अर्थ असा की, कर्ममेळा आणि आंबेडकर यांच्या भावना एकमेकाशी सुसंगत आहेत. आज जी तक्रार अस्पृश्य लोक करीत आहेत तीच सामाजिक तक्रार सातशे वर्षांपूर्वीचे महार पुढारी करीत होते, हे अनंतभट्टाने लिहून ठेवलेल्या वाड़्.मयावरून स्पष्ट दिसते. हे वेड त्यांच्या डोक्यात कोणी आधुनिकांनी शिरकविलेले नाही.''
''चोखामेळयाने सात्त्विक संतापाने विचारलेले प्रश्न त्यांच्यानंतरच्या पिढीतल्या कर्ममेळयाने उघड उघड मराठी समाजाला आव्हान देऊन अधिक स्पष्ट केले. ह्या सर्वच कुटुंबीयांनी शोषित वर्गाची नवी आविष्कारशैली मराठी कवितेच्या सुरुवातीलाच अमोघ करून ठेवली. प्रत्यक्ष विठ्ठलाला लाज वाटेल असे प्रश्न विचारून ठेवले. त्यामुळे चोखामेळयाच्या कुटुंबीयांचे मराठी परंपरेत अढळ स्थान आहे. कारण ह्या सर्वांनी निष्कपट मनाने एका अवाढव्य परंपरेला उगमस्थानीच धोक्याचे इशारे देऊन ठेवले. 'पंचहि भूतांचा एकचि विटाळ' म्हणून घटापटाची चर्चा करणाऱ्यांची तोंडे बंद करून टाकली. ह्या सर्व विद्रोही गोष्टी त्यांनी साहित्यिक चर्चा म्हणून केल्या नाहीत, तर प्रत्यक्ष स्वत:च्या जगण्यातून विकसित केल्या आणि मग कवितेत मांडल्या.''
जातीभेद, वर्णभेद समूळ खणून काढण्यासाठी संतांनी शतकोटीचे प्रयत्न केले. ज्ञानोबा, नामदेवापासून ते तुकारामापर्यंत अगदी अलीकडच्या काळात गाडगेबुवा, महात्मा जोतिराव फुले, महात्मा गांधी, साने गुरुजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींनी देखील पराकोटीचे प्रयत्न केले. तरीही हा रोग बरा होताना दिसत नाही. उलट आजच्या समाजकारणाचा व राजकारणाचा विचार करता नव्या रूपात जातीभेदाची आवश्यकता आहे की काय, असे वाटू लागले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चोखामेळा यांच्याविषयी अत्यंत आदराचे उद्गार काढले आहेत. त्यांनी आपले The untouchables नावाचे इंग्रजीतील एक पुस्तक चोखामेळा, नंदनार व रविदास यांना अर्पण करून त्यांच्याबद्दलचा आपला आदर व्यक्त केला आहे. त्यात ते लिहितात- ''चोखामेळा, नंदनार व रविदास हे अस्पृश्य समाजात जन्मले. आपल्या निष्ठायुक्त कृत्य, संयमी व न्यायी वृत्ती यामुळे ते सर्वांपेक्षा उच्चतम आदरास पात्र ठरले. त्या तीन संतांच्या स्मृतीस अर्पण.'' 1936 साली, हिंदू धर्माचा त्याग करून दुसऱ्या धर्मात प्रवेश करण्यासाठी अस्पृश्यांची परिषद बोलावली होती. त्या परिषदेत भाषण करताना आंबेडकर श्रोत्यांना म्हणाले - If someone asks you - what your caste is, you say that you are a Chokhamela or Harijan; but you do not say you are a Mahar.
मराठीत असे म्हणता येईल की, तुम्हाला कोणी तुची जात विचारली तर महार म्हणून सांगू नका तर चोखामेळा किंवा हरिजन म्हणून सांगा; परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्म स्वीकारल्यानंतर त्यांच्या अनुयायांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आणि भागवत धर्म, हिंदू धर्मात विश्वास ठेवून असणाऱ्या चोखोबांना अनुयायांचा मोठा वर्ग मिळाला नाही. म्हणून चोखोबा जिवंत असताना त्यावेळच्या समाजाने त्यांना उपेक्षिले आणि आज मेहुणपुरा येथील त्यांच्या जन्मस्थळाची दुरवस्था, पंढरपुरातील वास्तव्याचे त्यांचे एकमेव निशाण ती उद्ध्वस्त झालेली दीपमाळा, मंगळवेढा व पंढरपुरातील त्यांच्या समाध्या पाहिल्या तर दुर्लक्षितच आहेत हे निश्चित. ही खंत व्यक्त करीत असताना भालचंद्र नोडे म्हणतात, ''बिचारा चोखा यातिहीन म्हणून त्यांची वारकऱ्यांना पर्वा नाही आणि भरभराटलेल्या दलित चळवळीने तर विठ्ठलभक्त चोख्याला प्रतिगामी ठरविले. असा एकूण हा भला संत मराठी परंपरेपासून तेव्हाही व आताही दूरच राहिला. शेवटी संतांनाही जातीचे पाठबळ लाभलेले दिसते, परंतु केवळ स्वत:च्या आविष्कार सामर्थ्यावर सातशे वर्षे जिवंत राहिलेला चोखा हा एकमेव मराठी कवी ठरतो, हाही एक नवा वारसा ह्यापुढील साहित्यप्रेमिकांना सांभाळावा लागेल. चोखामेळा सतत स्फूर्तिदायक वाटत राहील, असे वाटते.''
- प्राचार्य डॉ. आप्पासाहेब पुजारी (मोबाइल क्र. 9960125015)

८ टिप्पण्या:

 1. दुर्लक्षित महान संताचे वास्तव व मार्मिक विश्लेषण

  उत्तर द्याहटवा
 2. दुर्लक्षित महान संताचे वास्तव व मार्मिक विश्लेषण

  उत्तर द्याहटवा
 3. दुर्लक्षित महान संताचे वास्तव व मार्मिक विश्लेषण

  उत्तर द्याहटवा
 4. दुर्लक्षित महान संताचे वास्तव व मार्मिक विश्लेषण

  उत्तर द्याहटवा
 5. आप्पासाहेब पुजारी सरांनी या पुस्तकाद्वारे बहुमोल काम केले आहे..तथापि हे पुस्तक पुण्यात मिळू शकले नाही.. वरील लेखाच्या शेवटी लिहिलेला अप्पासाहेबांचा फोन नं invalid असल्याचा मेसेज येतो आहे.. कृपया सरांचा नं कळवावा.. तसेच त्यांना नमस्कार कळवावा..
  दत्ता दंडगे 9850901719

  उत्तर द्याहटवा
 6. आज 21 व्या शतकात संत चोखामेळा यांचे अभंग कोणीही कीर्तनकार घेत नाहीत ,काय ईथही जात मानली जाते?का आपापले खिसे भरण्यासाठीच हे कीर्तनकार कीर्तने प्रवचने करतात? 🙏🙏🙏🙏🙏

  उत्तर द्याहटवा