मला नेहमीच असं वाटत आलंय, की प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ यावी लागते. बाकी गोष्टींचं जाऊ द्या, पण या लेखाची सुद्धा वेळ येण्यासाठी जवळ जवळ सव्वा वर्षाचा कालावधी लोटलाय. गंमत अशी झाली की, गेल्या वर्षी म्हणजे बरोब्बर 15 ऑगस्ट 2010 रोजी माझा मित्र धर्मेंद्र पवार याच्या आग्रहानं आणि पुढाकारानं आम्ही दहा वर्षांपूर्वीच्या आमच्या एमजेसीच्या ग्रुपचं गेट-टुगेदर लोणावळ्यात करायचं ठरवलं. सातातले पाचजण आले, म्हणजे कोरम चांगला होता. त्यावेळी आम्ही कार्ल्याची लेणी पाह्यचं ठरवलं, पण सुटीचा दिवस असल्यानं एकवीरा देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गाड्यांचं पार्किंग डोंगराच्या पायथ्यापर्यंत आलं होतं. वर गाडी न्यायची सोयच नव्हती. तेव्हा परत फिरण्याशिवाय पर्याय नव्हता. आता करायचं काय? त्यावेळी तिथून विरुद्ध दिशेला पण जवळच भाजे लेणी असल्याची माहिती मिळाली. तोपर्यंत मला फक्त कार्ले लेणीच ऐकून माहिती होती. अशा तऱ्हेनं गेल्या वर्षी आम्ही भाजेची लेणी पाहिली. कार्ल्याची लेणी पाहण्यासाठी पुन्हा मध्ये जवळजवळ सव्वा वर्षाचा काळ जावा लागला. आमच्या मंत्री कार्यालयातल्या स्टाफनं गेल्या 20 नोव्हेंबर 2011 रोजी एक दिवसाची ट्रीप लोणावळ्याला आयोजित केली. त्यावेळी हा कार्ले लेणी पाहण्याचा योग जुळून आला. दोन्ही वेळा या लेण्यांवर काही लिहावं, असं वाटलं, पण काही कारणानं राहून गेलं. काढलेले फोटो मात्र मित्रांसोबत शेअर केले. आता हा लेख लिहण्याचं कारण सुद्धा धर्मेंद्रच आहे. 'अमृतवेल'च्या पर्यटन विशेषांकासाठी काही देतोस का, असं त्यानं विचारलं आणि आपसूकपणे मी त्याला कार्ले आणि भाजेच्या लेण्यांविषयी लेख देतो, असं सांगितलं. म्हणजे लेणीदर्शनाला कारणीभूत ठरलेला माझा मित्रच पुन्हा या लेखामागची देखील प्रेरणा ठरला.
वाचक हो, इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासून ते इसवी सनाच्या दहाव्या शतकाच्या कालखंडात आपल्या देशात कित्येक लेणी खोदल्या गेल्या. त्यातील जवळपास बाराशे ज्ञात आहेत. वैशिष्ट्य म्हणजे या बाराशे पैकी हजारभर लेणी तर केवळ आपल्या महाराष्ट्रात आहेत. कोंडाणे, कार्ले, भाजे, बेडसे, जुन्नर, नाशिक पांडवलेणी, धाराशिव, खरोसा, कोकणच्या घाटवाटांवरची ठाणाळे, खडसांबळे, गांधारपाले, कऱ्हाड मार्गावरची शिरवळ, आगाशिवची लेणी आणि पैठणजवळची पितळखोरे, पाटण, वेरूळ, औरंगाबाद-अजिंठ्याची लेणी असं हे लावण्य-लेणं आपल्या राज्यभरात विखुरलं आहे. त्यापैकी लोणावळा परिसरातील कार्ले आणि भाजे ही लेणी आपल्याला प्राचीन वारशाची प्रकर्षानं जाणीव करून देतात आणि आपण त्यांचं जतन करण्यात कमी पडतो आहोत, याची टोचणीही मनाला लावतात. उपासनेच्या या ठिकाणांना भेट दिल्यानंतर आपली प्राचीन कला, संस्कृती, इतिहास, व्यापार-उदीम अशा एक ना अनेक ठेव्यांची महती आणि माहिती या लेणी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतात. गरज असते ती फक्त आपुलकीनं त्यांच्याकडं पाहणाऱ्या नजरेची!
दि. 15 ऑगस्ट 2010 :कार्ल्याला जाता येत नाही, असं दिसल्यानं तुलनेनं कमी गर्दी असलेल्या भाजे लेणीसमूहाकडं आम्ही मित्रमंडळींनी मोर्चा वळवला. वेळ भरपूर असल्यानं नेहमीच्या वाटेनं चढण चढण्याऐवजी आम्ही विरुद्ध दिशेनं थोडंसं ट्रेकिंग करत डोंगर चढण्याचं ठरवलं. मस्त हिरवागार परिसर, ठिकठिकाणी कोसळणारे धबधबे आणि त्याखाली सुटीचा आणि तारुण्याचा आनंद लुटणारी तितकीच हिरवीगार तरुणाई अशा मस्त वातावरणाचा अनुभव घेत आम्ही डोंगर चढलो. बाय द वे, हा डोंगर म्हणजे लोहगड-विसापूर जोडीपैकी विसापूरचा!
अर्धा एक किलोमीटरची चढण चढून आल्यानंतर हळूहळू भाजे लेण्यांची झलक आम्हाला दिसू लागली. आम्हाला सर्व प्रथम दिसला तो स्तूपसमूह! काही स्तूप डोंगरांच्या खोबणीत तर काही खोबणीबाहेर. डोंगरावरुन येणारे हलके झरे त्यांच्यावर जणू अभिषेक करत होते. अगदी पहात राहावं, असं दृष्य. मी त्याचा व्हिडिओ सुद्धा चित्रित केला. इथं एकूण चौदा स्तूप आहेत. भाजे इथं राहिलेल्या काही मान्यवर बौद्ध भिक्षूंची ही स्मारकं आहेत. त्यावर त्यांचे काही लेखही कोरलेले पुसटपणे दिसतात.
या स्तूपसमूहाच्या उजव्या बाजूला असलेल्या धबधब्याखाली चिंब भिजण्याचा आनंद लुटणारे लोक पाहून आमची पावलं तिकडं वळली. धबधब्याकडं पाहात असतानाच आमच्या नजरेला पडली, ती पाठच्या सूर्यगुंफेकडं! इथं इतकी उत्कृष्ट शिल्पं आमच्या नजरेस पडली की पाहताना अगदी भान हरपलं. व्हरांडा, आत दालन आणि त्यात आणखी काही खोल्या अशी विहारसदृश रचना. पौराणिक प्रसंग, शस्त्रसज्ज द्वारपाल, उत्कृष्ट कोरीव प्राणी-पक्षी आणि बरंचसं नक्षीकाम. इंद्र आणि सूर्याचा देखावा तर पाहात राहावा असाच. चार घोड्यांच्या रथावर आपल्या दोन पत्नींसह आरुढ झालेला सूर्य, त्यांच्यावर छत्रचामरे ढाळणारे सेवक-सेविका आणि त्या रथाखाली तुडविला जाणारा राहू, असा प्रचंड शिल्पपट इथं कोरला आहे. अन्य एका शिल्पामध्ये ऐरावतावर स्वार असलेला इंद्र कोरला गेल्याची माहिती सांगितली जाते. त्याखाली वादक, देवदेवता यांचीही शिल्पं आहेत. पण या शिल्पांचा नेमका हाच अर्थ आहे का, याची मात्र अभ्यासकांनीच योग्य शहानिशा केलेली बरी! ही शिल्पं आपल्या मनावरही कोरली जातात, एवढं मात्र नक्की. याच सूर्यगुंफेच्या व्हरांड्यातल्या ओट्यांवर तसंच कोरीव खांबाच्या वरच्या बाजूलाही काही विस्मयचकित करणारी शिल्प पाहायला मिळाली. ओट्यावरच्या शिल्पांमध्ये घोडे, बैल आदी प्राण्यांना पंख असल्याचंही दाखवलं आहे. त्या काळच्या कला-संस्कृतीवर पडलेला पर्शियन संस्कृतीच्या प्रभावाची कल्पना कदाचित ही शिल्पं आपल्याला करून देत असावीत, असं वाटलं.
तिथून मग आम्ही या भाजे लेण्याचं प्रमुख वैभव असलेल्या मुख्य चैत्यगृहाच्या दिशेनं चालायला सुरवात केली. स्तूपसमूह मागे टाकून आम्ही पुढे आलो आणि भव्य पिंपळपानाच्या आकाराचं मुख्य चैत्यगृह आणि त्याच्या आजूबाजूचे विहार एकदम दृष्टीपथात आले आणि हे दृश्य नजरेत आणि कॅमेऱ्यात साठवत आम्ही तिथंच उभे राहिलो. स्तंभित व्हावं, असाच हा सारा नजारा होता. साधारण इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासून कोरण्यास सुरवात झालेल्या भाजे लेण्यांच्या निर्मितीची आणि तिथल्या बदलांची प्रक्रिया ही पुढं इसवी सनाच्या सहाव्या शतकापर्यंत म्हणजे सुमारे सातशे ते आठशे वर्षं सुरूच होती. या सर्व कालखंडाचं प्रतीक जणू आमच्यासमोर उभं होतं.
पिंपळपानाच्या आकाराची चैत्यकमान, चैत्यगवाक्षं, कोरीव सज्जे, कातळात खोदलेल्या कड्या, जाळीदार नक्षी, यक्ष आणि युगुलं असा सारा उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना इथं पाहायला मिळतो. मुख्य चैत्यगृहाचा थाट तर काही औरच आहे. पूर्ण खुलं असल्यानं अत्यंत प्रकाशमय अशा या चैत्यगृहाचं देखणेपण पाहात राहावं असं आहे. १७.०८ मीटर लांब-खोल, ८.१३ मीटर रुंद आणि ७.३७ मीटर उंच अशा या चैत्यगृहात ओळीनं सत्तावीस अष्टकोनी खांब आहेत आणि मधोमध अत्यंत गुळगुळीत स्तूप! (आजच्या प्रेमीयुगुलांनी या स्तुपावर देखील आपली नावं कोरल्याचं पाहून वाईट वाटल्याशिवाय राहिलं नाही.) चैत्यगृहाचं गजपृष्ठाकृती छत आतून लाकडी तुळयांनी सांधलेलं आहे. आज 2200 वर्षानंतर सुद्धा या लाकडी तुळया शाबूत असल्याचं पाहून आश्चर्य वाटल्याखेरीज राहात नाही. इथल्या खांबांवर कमळ-चक्रादी शुभचिन्हंही कोरलेली आढळतात तर स्तुपामागच्या काही खांबांवर ध्यानस्थ भगवान बुद्धाच्या चित्रप्रतिमाही, अगदी अस्पष्ट का होईना, पण दिसतात.
या चैत्यगृहाच्या आजूबाजूला एकूण एकवीस विहार आहेत. मुख्य चैत्यगृहाला लागून तर अनेक दालनांना पोटात घेणारा दुमजली विहार आहे. दरवाजे, खिडक्या, झोपण्याच्या बाकांनी युक्त अशा विहारांची मालिकाच इथं आहे. काही बाकांच्या खाली तर सामान ठेवण्यासाठी कप्पेही केलेले दिसतात. भाजेच्या लेण्यांमध्ये ब्राह्मी लिपीतले सुमारे बारा शिलालेख सापडले आहेत. त्यातल्या काहींमध्ये दान देणाऱ्यांचा नामोल्लेख आढळतो. या विहारांसमोर स्वच्छ पाण्याचे जुळे टाकही दिसतात. या टाक्यावरही 'महारठी कोसिकीपुत विण्हुदत' या दात्याचं नाव कोरल्याचं दिसतं. त्याच्याशेजारच्या टाक्याजवळ एक शिवलिंगही दिसतं.
चैत्यगृहाच्या समोर भारतीय पुरातत्त्व विभागानं या लेण्यांची माहिती देणारी कोनशिला बसविली आहे. 'भाजे येथील हीनयान (थेरवाद) परंपरेतील गुंफा इ.स.पूर्व दुसरे शतक ते इ.सनाचे पहिले शतक या काळात कोरल्या गेलेल्या 29 गुंफांचा समूह आहे. हे दख्खनमधील सर्वात प्राचीन बौद्ध केंद्रांपैकी एक असल्यामुळे गुंफा स्थापत्याच्या विकासाच्या अभ्यासासाठी त्यांचे महत्त्व अपरंपार आहे. चैत्यगृहांच्या (प्रार्थनागृह) रचनेत भाजे येथील चैत्यगृह सर्वात महत्त्वाचे शैलगृह आहे. चैत्यगृहाच्या रचनेत प्राचीन स्थापत्याचे दगडामध्ये तंतोतंत अनुकरण केल्यामुळे छताला लाकडी तुळया, दगडातले साधे सरळ पण किंचित कललेले अष्टकोनी स्तंभ तसेच पूर्वी केलेल्या लाकडांचा वापर दर्शवणारे अनेक पुरावे गुंफांच्या आत व बाहेर पाहावयास मिळतात. पूर्वी या प्रार्थनागृहांची दर्शनी बाजू काष्ठशिल्पांनी अलंकृत केली होती. आज जरी ते शिल्लक नसले तरी आतमध्ये संपूर्ण छताला लाकडी कमानी जोडल्या आहेत. या गुंफेतील स्तुपाचा खालचा भाग हा गोलाकार असून त्याखलचा भाग अंडाकृती आहे. तसेच वरती 'हर्मिका' नावाचा चौकोनी भाग आहे. येथे निरनिराळ्या गुंफांमध्ये एकूण 12 शिलालेख आहेत. त्याचप्रमाणे येथे असलेला स्तुपांचा समूह सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्यातर्फे या गुंफा गॅझेट नोटिफिकेशन क्र. 2704-ए दि. 26-5-1909 नुसार राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित तथा संरक्षित केल्या आहेत.'
ही माहिती देण्याचं कर्तव्य शासनानं बजावलं असलं तरी, या संरक्षित स्मारकाचं खरं संरक्षण तेव्हाच होईल, जेव्हा या अमूल्य ठेव्याच्या संरक्षणाची व संवर्धनाची खरी जाणीव या मातीतल्या मनामनात निर्माण होईल, अशी भावना दाटून आली. त्या प्राचीन शिल्पकारांना मनोमन धन्यवाद देऊन आम्ही सर्व मित्रांनी मुख्य वाटेनं डोंगर उतरायला सुरवात केली- धबधब्याखाली भिजणारी सुंदर पण मर्त्य शिल्पं पाहात!
दि. 20 नोव्हेंबर 2011 :एखाद्या सुटीच्या दिवशी कुठंतरी छोटीशी ट्रीप काढण्याचं पर्यटन मंत्री कार्यालयातल्या आमच्या सर्व स्टाफनं ठरवलं होतं. आता मुंबईपासून सिंगल डे ट्रीप म्हटल्यानंतर लोणावळ्याचाच पर्याय सर्वांनी उचलून धरला. शनिवारी संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर रात्री लोणावळ्याला पोहोचायचं, दुसऱ्या दिवशी, रविवारी दुपारपर्यंत थोडी मौजमजा करायची आणि संध्याकाळी मुंबईत रिटर्न, असा थोडक्यात कार्यक्रम ठरला. शनिवारी रात्री कार्ला इथल्या एमटीडीसीच्या रिसॉर्टला पोहोचलो. सर्वांनी एकत्रितपणे मस्त खानपान केलं, झक्कास गप्पागोष्टी केल्या. दुसऱ्या दिवशी काय करायचं, याचा ठोस असा कार्यक्रम काही ठरला नव्हता. तेव्हा माझ्या मनानं उसळी मारली. गेल्या वर्षी आपल्या कार्ल्याच्या लेणी पाहायच्या राहून गेल्या आहेत. तेव्हा या सर्व ग्रुपला घेऊन तिथं जावं, असा विचार मनात आला. भाविक मंडळी एकवीरेचं दर्शन घेतील आणि मला लेण्या पाहता येतील, असं वाटून मी तो प्रस्ताव माझ्या सहकाऱ्यांसमोर मांडला आणि सर्वांनीच त्याला अनुमोदन दिलं. फक्त सकाळी लवकर निघणं आवश्यक असल्याचं गतानुभवावरुन सर्वांना सांगितलं.
रविवारी सकाळी नाष्ता करून आम्ही कार्ले डोंगराकडं निघालो. पहाटे लवकर आलेल्या भाविकांच्या गाड्या परतताना दिसल्या. डोंगराकडं जाणाऱ्या वाहनांची वर्दळ होतीच. पण यावेळी आम्ही डोंगरावरच्या पार्किंग लॉटपर्यंत बऱ्यापैकी व्यवस्थित पोहोचलो. (बऱ्यापैकी व्यवस्थित यासाठी की, वळणावळणाच्या या सिंगल रोडवर समोरुन एखादं मोठं वाहन आलं तरी वाट करून देताना अडचण होते. त्यात चढही तीव्र होता.) वाहनं पार्किंग करून आम्ही डोंगर चढायला सुरवात केली. वाटेत दोन्ही बाजूला एकवीरा देवीसाठी साड्या, नैवेद्य आणि प्रसादांची अगणित दुकानं दुतर्फा ओळीनं मांडलेली. वरती चढून आलो तर एकवीरा देवीच्या मंदिरानं झाकोळलं गेलेलं मुख्य शैलगृहाचं प्रवेशद्वार दिसलं. तरीही लेणीचं मूळचं सौंदर्य लपत नव्हतं, ही गोष्ट अलाहिदा.
देवीच्या दर्शनासाठी भली मोठी रांग लागलेली. आता या रांगेत उभं राहून किती वेळ जाणार, या विवंचनेत पडलो. अखेर एक निर्णय घेतला. ज्यांना दर्शनासाठी जायचंय, त्यांनी जावं. मी आणि माझे सहकारी दत्तात्रय खिल्लारी, आम्ही दोघांनी लेणी पाहायला जायचं ठरवलं. दर्शनाला गेलेली टीम आम्हाला मागाहून जॉइन होणार होती. आता हाताशी वेळ मुबलक होता.
आम्ही रांग सोडून मुख्य शैलगृहाच्या प्रवेशद्वाराशी आलो. कार्ल्याच्या या लेणी समूहात एक चैत्यगृह आणि उर्वरित विहार अशा एकूण सोळा लेणी आहेत. इ.स. पूर्व पहिले शतक ते इ.सन पाचवे शतक या दरम्यानच्या काळात ती खोदण्यात आलीत. एक ते तीन मजल्यांच्या या विहारांमध्ये जाण्यासाठी डोंगरातच अंतर्गत जिने खोदल्याचे दिसतात. काही विहारांकडे जाण्याचे जिने तुटल्यानं तिकडं प्रवेश बंद केला आहे. एका जिन्यावरुन मात्र पहिल्या मजल्यापर्यंत जाऊन ध्यानगृह व विहार पाहता येतात. आम्ही तसं ते नंतर पाहिले.
तर, मुख्य चैत्यगृहाच्या प्रवेशद्वाराशीच एकवीरा देवीचं मंदिर मध्ययुगात कधीतरी निर्माण करण्यात आलंय. (त्या काळी बौद्ध आणि हिंदूंचा संघर्ष आणि परस्पर विद्वेष किती पराकोटीला पोहोचला असेल, याचं प्रत्यंतरच जणू लेण्यांच्या पार्श्वभूमीवरील हे मंदिर पाहिलं की येतं. हिंदू आणि बौद्ध संस्कृतीच्या मिलाफाचं प्रतीक म्हणून मात्र या मंदिराकडं नक्कीच पाहता येणार नाही. हा धार्मिक अधिक्रमणाचा भाग आहे. आणि ज्या काळात ते घडलं, ते पाहता त्याला स्वाभाविकच म्हटलं पाहिजे. वेरुळमध्ये जो लेणीसमूह आहे, तिथं मात्र बौद्ध, जैन आणि हिंदू संस्कृतीचं एकत्रित प्रतिबिंब पाहता येतं. असो!) या मंदिरामुळं कार्ल्याच्या लेणी समूहाला भेट देणाऱ्यांची संख्या आपोआपच मोठी असते, पण त्यात ती खऱ्या अर्थानं 'पाहणाऱ्यांची' संख्या मात्र नगण्यच! (पुन्हा एकदा असो!)
आम्ही मंदिराच्या मागे थेट मुख्य चैत्यगृहासमोर आलो, आणि तिथलं दृश्य पाहून थक्कच झालो. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला सुमारे 45 फूट उंचीचा एकसंध सिंहस्तंभ नजरेच भरला. सारनाथच्या धर्तीवर उभारलेला हा सोळा कोनी स्तंभ आपल्या प्राचीन वास्तुकलेची साक्षच देतो. स्तंभाच्या अग्रभागी एक वाटोळा कळस, त्यावर आमलक, हर्मिकेचा चौथरा आणि त्यावर बसलेली सिंहाची चौकडी पाहताच आत काय पाहायला मिळणार आहे, याची उत्सुकता लागते. या स्तंभावर त्याचा करविता ‘महारठी अग्निमित्रणक’ याच्याबाबतचा ब्राह्मी लेखही दिसतो. या चैत्यगृहाच्या उजव्या बाजूलाही पूर्वी स्तंभ आणि त्यावर चक्र असावं. याची एक सूचक शिल्पाकृती चैत्यगृहातील एका खांबावर काढलेली आढळते. तिथं सिंह आणि चक्र असलेल्या खांबांच्या मध्ये स्तूप दाखवलेला आहे.
कार्ल्याच्या चैत्यगृहाबाहेर व्हरांडा खोदलेला दिसतो. व्हरांड्यात शिल्पाकृतींचं वैभवच जणू साकार झालं आहे. मिथुन शिल्पाच्या जोड्या, हत्ती, भगवान बुद्धाचे शिल्पपट, चैत्यकमानी आणि गवाक्षांमध्ये सजलेले मजले यांनी हा व्हरांडा खालपासून वरपर्यंत भरून गेला आहे. येथील स्त्री-पुरूषांच्या शिल्पांमधून त्या काळचा पेहराव पाहायला मिळतो. स्त्रियांनी डोक्यावर पदर घेतला आहे, त्यांच्या कमरेला शेला आहे तर पुरूषांनी धोतर व पागोटे परिधान केले आहे. बांगड्या, तोडे, मेखला, गळ्यातील हार, कर्णफुले, बिंदी अशी आभूषणेही महिलांच्या अंगावर दिसतात.
व्हरांड्याच्या दोन्ही बाजूला अनेक मजली प्रासादांचे देखावे कोरले आहेत. त्यांच्या तळाशी सोंडा उध्वस्त झालेले प्रत्येकी तीन हत्ती दोन्ही बाजूला दिसतात. पुढं महायान पंथाच्या काळात इथं भगवान बुद्धाच्या मूर्तीही खोदण्यात आल्याचं दिसतं. इथल्या चैत्यकमानी, गवाक्ष आणि सज्जे यांची रचना तर जणू एखाद्या प्राचीन नगरीचाच देखावा उभा करतात. हा देखावा डोळ्यांतही मावत नाही की कॅमेऱ्याच्या एका फ्रेममध्येही! आपण अचंबित होऊन टप्प्याटप्प्याने हे वैभव नजरेत साठवतच राहतो. काय पाहू अन् काय नको, अशी द्विधा मनःस्थिती होत असतानाच, आपण समोर दिसणाऱ्या प्रत्येक शिल्पाचा अर्थ लावण्याचाही प्रयत्न करू लागतो. हे अर्थ लावणं नाही साधलं तरी हा अद्भुत ठेवा पाहिल्याचं समाधान निश्चित लाभतं.
भाजे इथल्या चैत्यगृहाप्रमाणंच या चैत्यगृहालाही पिंपळपानाकृती कमान कोरलेली दिसते. आम्ही चैत्यगृहात प्रवेश केल्यानंतर आणखीच स्तंभित झालो. तब्बल १३.८७ मीटर रूंद, ३७.८७ मीटर खोल आणि १४.०२ मीटर उंच असं हे बहुधा सर्वात मोठं चैत्यगृह असावं. आत गेल्यानंतर नजरेत भरतात ते दुतर्फा असलेले 37 कोरीव खांब आणि छताच्या लाकडी तुळया. ते पाहता पाहताच आपली नजर भव्य अशा स्तुपावर स्थिरावते. भाजे इतका लख्ख प्रकाश या शैलगृहात येत नाही (कदाचित मंदिरामुळं असेल). त्यामुळं आतल्या अंधुक प्रकाशात एक गूढता निर्माण झाल्यासारखं वाटतं. इथल्या दोन्ही बाजूंच्या प्रत्येकी 15 अष्टकोनी खांबांवर हत्तीवर आरुढ अशा स्त्री-पुरूषांच्या जोड्या कोरलेल्या दिसतात. निरखून पाहिल्यावर असं दिसतं की, या प्रत्येक खांबावरची कलाकृती वेगवेगळी आहे. त्या प्रत्येकावर कलाकारांनी अपार कष्ट घेतलेले आहेत. दोन खांबांवर तर आपल्याला 'स्फिंक्स'सारखी आकृती पाहून आश्चर्य वाटल्याखेरीज राहात नाही.
इथला स्तूपही उत्तुंग आणि उत्कृष्ट असा आहे. स्तुपावरचे लाकडी छत्र, त्यावरच्या नक्षीसह आजही शाबूत असल्याचं दिसतं. कार्ल्याच्या या लेणीत ब्राह्मी लिपीतले एकूण ३५ शिलालेख सापडले आहेत. त्यांच्या माध्यमातून प्राचीन काळासंदर्भातली बरीचशी माहिती अवगत झाली आहे. 'वैजयन्तिचा श्रेष्ठी भूतपाल याने तयार केलेले हे लेणे जम्बुद्वीपात उत्कृष्ट आहे,' अशा अर्थाचा एक शिलालेख इथं आहे. आणि आजही तो या लेण्यांना लागू पडतो.
या चैत्यगृहाच्या बाजूला असलेल्या एकमजली-दुमजली विहारांमध्ये आम्ही गेलो. तळमजल्यावर एकमेव बऱ्यापैकी सुस्थितीतील असे शिल्प पाहायला मिळाले. इथं पूर्वी काही शिल्पं असावीत, असा अंदाज येईल न येईल, अशा पद्धतीनं ती उध्वस्त झाल्याचं दिसतं. स्तुपावर असतो, त्याप्रमाणे एक कोरीव घुमटही याठिकाणी दिसला. पण त्याच्याबद्दलही अंदाज करण्यापलिकडं आम्ही काहीच करू शकलो नाही. इथून बाहेर पडताना सुद्धा तशाच संमिश्र भावना पुन्हा मनात दाटून आल्या- एक उत्तम ठेवा पाहिल्याबद्दलचा आनंद आणि त्यांचं महत्त्व जाणण्यात तसंच जपण्यात आपण कमी पडत असल्याबद्दलचं दुःख!
--00--00--00--00--00--00--00--00--00--00--00--00--00--00--00--00--00--00--00--'देवीचा कोप झाला तर..?'
आम्ही कार्ला इथल्या मुख्य चैत्यगृहात प्रवेश केला, त्यानंतर थोड्याच वेळात तिथं एक कुटुंब आलं. त्या कुटुंबातली लहान मुलगी काही आजारी असावी. त्या लोकांनी अतिशय झटपट स्तुपासमोरच काही अंतरावर पुजेची मांडणी केली. एक पुजेचा तांब्या, कापूर, अगरबत्त्या, नारळ वगैरे-वगैरे. एवढ्यात त्यातल्या एका वयस्कर बाईच्या अंगात आलं, ती घुमू लागली. तिनं घुमतंच त्या मुलीला आईच्या हातून खेचून घेतलं आणि कपाळाला उदी लावली. त्यानंतर तिच्यासोबतच्या महिलांनीही नैवेद्य वगैरे दाखवून यथासांग पूजा पार पाडली. यावेळी तिथं पुरातत्त्व खात्याचा एक सुरक्षा रक्षकही तिथं होता. त्याला मी विचारलं, 'हे तुम्ही इथं कसं करू देता?' तो उत्तरला, 'साहेब, इथं असले प्रकार नित्याचेच आहेत. मंदिरात एवढी पूजा करण्यासाठी वेळ मिळत नसल्यानं ते चैत्यगृहात करतात. आता देवी अंगात आलेल्या बाईला इथनं हटकायचं तरी कसं? देवीचा कोप झाला तर..?' त्याच्या या प्रश्नाला माझ्याकडं उत्तर नव्हतं! (या सर्व घटनेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग मी करून ठेवलं आहे.)
एवढंच नव्हे, तर; चैत्यगृहाच्या बाहेरही लेणी परिसरात जिथे मिळेल तिथे डोंगरांच्या खोबण्यांत दगडाला शेंदूर फासून भाविक जनतेच्या श्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्या 'दुकान'दारांचीही उपस्थिती इथं पाह्यला मिळाली.
'नाणे'श्रद्धा!कार्ल्याच्या मुख्य चैत्यगृहात काही शाळा-कॉलेजचे विद्यार्थीही होते. काही पाहण्याऐवजी तिथं उभं राहून फोटो काढून घेण्यात त्यांना अधिक स्वारस्य होतं. तेही ठीक आहे. पण खरा कहर तर पुढंच झाला. काही जण स्तुपावर सुटे पैसे फेकत होते. ते कशासाठी, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर असं समजलं की, ज्याचं नाणं तीन प्रयत्नांत स्तुपावर राहील (किंवा घरंगळणार नाही), त्याची मनोकामना पूर्ण होते. आता बोला! बुद्धिदेवता भगवान बुद्धाच्याच डोक्यावर नाणं फेकून मनोकामना पूर्ण करण्याच्या मागे लागलेल्या या तरुणांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटूनही मी ती केली नाही. कारण जमानाच अंधश्रद्धाविरोधी कायद्याच्या विरोधाचा आहे!
कार्ले-भाजे इथे कसे जावे?लोणावळा हे केंद्र ठेवून कार्ले आणि भाजे या दोन्ही लेण्यांकडे जाता येते. मळवली रेल्वे स्थानकापासून कार्ले लेणी साधारण नऊ किलोमीटरवर तर भाजे लेणी साधारण एक ते दीड किलोमीटर इतक्या अंतरावर आहेत. लोणावळ्याला मुंबई किंवा पुणे येथून बस अथवा रेल्वेने जाता येते. दोन्ही बाजूंनी सरासरी दोन तासांच्या अंतरावर हे हिल स्टेशन आहे.