(प्रिय वाचक हो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात असताना 'महान्यूज' या वेबपोर्टलच्या निर्मितीमधील माझा सहभाग आपल्यापैकी बहुतेकांना ठाऊक आहेच. पण आता तेथून बाहेर पडून खूप पुढे गेल्यानंतरही शासनामध्ये आपल्या या जुन्या सहकाऱ्याची आठवण व्हावी, असे क्षण दुर्मिळच. पण, माझ्या आयुष्यात ते आले. महान्यूजला उत्कृष्ट ई-प्रशासनासाठीचा सुवर्ण पुरस्कार मिळाला. या निमित्ताने आदरणीय मनिषा म्हैसकर मॅडम (आय.ए.एस.) आणि 'टीम महान्यूज'ने अगदी आवर्जून मला 'महान्यूज आणि मी' या विषयावर लिहावयास लावून ते दि. ६ मे २०१४ रोजी 'महान्यूज'वर 'वाचावे असे काही' या सदरामध्ये प्रकाशित केले. माझ्यासाठी हा निखळ पुनर्प्रत्ययाचा आनंद होता. मागील महिन्यात मी तो आपल्यासमवेत या ब्लॉगवर शेअर केला आहेच. मात्र, त्याहून आनंदाचा आणि आश्चर्याचा सुखद धक्का म्हणजे हाच लेख माझ्या ‘टीम लोकराज्य’नेही जून २०१४ च्या अंकात संपादित स्वरुपात प्रकाशित केला. हा लेखही आपणासाठी ‘लोकराज्य’च्या सौजन्याने येथे पुनर्प्रकाशित करीत आहे.- आलोक जत्राटकर)
![]() |
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या 'महान्यूज' या वेबपोर्टलचे
उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुख यांच्या हस्ते वर्षा
बंगल्यावर झाले. या प्रसंगी मुख्यमंत्र्यांसमवेत महान्यूज टीम (डावीकडून) मयुरा
देशपांडे-पाटोदकर, आलोक जत्राटकर, डॉ.
गणेश मुळे, राज्यमंत्री श्री. राजेंद्र शिंगणे, मनिषा पाटणकर-म्हैसकर (आयएएस), वर्षा आंधळे,
संचालक श्रद्धा बेलसरे-खारकर, अंजू कांबळे आदी.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय विविध माध्यमांद्वारे राज्यातील
नागरिकांशी थेट संवाद साधत असते. आजघडीला विभागाचे महान्यूज हे वेब पोर्टल अतिशय
लोकप्रिय झाले आहे. या पोर्टलची निर्मितीप्रक्रिया रंजक आणि प्रेरणादायी आहे.
महान्यूजच्या सुरुवातीच्या काळाविषयी टीमचे सदस्य आलोक जत्राटकर आपले अनुभव सांगत
आहेत...
'महान्यूज आणि मी' या विषयावर लेख
देण्यासंदर्भात फोन आला आणि त्यानंतर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या एका
ध्यासपर्वाच्या स्मृतींनी माझ्या मनाचा ताबा घेतला. 'महान्यूज'
या वेबपोर्टलची निर्मिती ही जितकी महत्त्वाकांक्षी योजना होती,
तितकीच ती निर्मिती प्रक्रिया खूप जिकिरीची आणि तरीसुद्धा एक समृद्ध
अनुभव देणारी होती. त्यामागं तत्कालीन महासंचालक आणि आताच्या सचिव मनीषा म्हैसकर
यांची तळमळ आणि सक्रिय मार्गदर्शनाचा वाटा आहे.
'महान्यूज' या वेबपोर्टलची
संकल्पना प्रत्यक्षात येण्यापूर्वी आणि दि. १९ सप्टेंबर २००८ रोजी तत्कालीन
मुख्यमंत्री (स्व.) विलासराव देशमुख यांच्या हस्ते या पोर्टलचे लोकार्पण होणार
होतं. या काळात म्हैसकर मॅडमनी विभागाचा चेहरामोहरा पालटण्याचा ध्यास घेतला होता.
ब्लॅक अॅन्ड व्हाईट
त्याचं समाजाच्या सर्व स्तरांतून स्वागत झालेलं होतं. या यशानं
प्रेरित होऊन 'ऊर्दू लोकराज्य'चंही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते
लोकार्पण करण्यात आलं होतं. मुद्रित माध्यमांमध्ये अशी मोहोर उमटवीत असतानाच
इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये आकाशवाणीवरील 'दिलखुलास' आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील 'जय
महाराष्ट्र' हे कार्यक्रम लोकप्रियतेचे नवनवे उच्चांक
प्रस्थापित करत होते. इंटरनेटवर वेबपोर्टल तयार करून राज्यातीलच नव्हे, तर जगभरातील मराठी भाषिक वाचकांशी जोडण्याची महत्त्वाकांक्षा त्यांच्या
मनी होती. त्यातून त्यांनी राज्यभरातल्या अधिकाऱ्यांमधून डॉ. गणेश मुळे यांची टीम
लीडर म्हणून तर त्यांच्या जोडीला डॉ. किरण मोघे, मनीषा
पिंगळे आणि तांत्रिक बाजू सांभाळण्यासाठी मयुरा देशपांडे,
अरविंद जक्कल आणि आर्टिस्ट सुनील कुंभेरे यांची निवड केली होती. ही
टीम मॅडमच्या मार्गदर्शनाखाली कामालाही लागली होती. काम प्रचंड होतं. राज्यभरातून
दररोज यशकथांच्या अक्षरशः शेकडो इ-मेल्स प्राप्त होत होत्या. त्यामुळं त्यातील
मजकूर डाऊनलोड करून घेणं आणि त्यांचं विभागनिहाय, विषयनिहाय सॉर्टिंग करणं ही जबाबदारी प्रामुख्यानं मी,
मोघे सर आणि पिंगळे मॅडम यांच्यावर होती. बेलसरे मॅडम, मुळे सर हे प्रशासकीय तर देशपांडे मॅडम, जक्कल आणि
तांत्रिक सल्लागार संजीव लाटकर हे तांत्रिक बाजू सांभाळत होते.
अनेक चर्चा, बैठकांमधून 'महान्यूज' मध्ये
सुरवातीलाच एकूण तेरा सदरं आणि त्या दिवशीच्या राज्यातील सर्वाधिक महत्त्वाच्या
पाच बातम्या असाव्यात, असं नियोजन होतं. सदरांमध्ये
महाइव्हेंट, ई-बातम्या, साक्षात्कार
(मुलाखती), महासंस्कृती, शलाका,
तारांकित (यशकथा), चौकटीबाहेर, आलेख (शासकीय योजनांची तपशीलवार माहिती), फर्स्ट
पर्सन, गॅलरी (छायाचित्रे), महाऑप
(रोजगार संधी), हॅलो (वाचक प्रतिक्रिया), लोकराज्य (कर्टन रेझर), दिलखुलास व जय महाराष्ट्र
(मुलाखतींचे शब्दांकन) यांचा समावेश होता. आणि महत्त्वाचं म्हणजे ही सर्व सदरं
आम्हाला रोजच्या रोज अपलोड करावयाची होती- अगदी रविवार आणि सार्वजनिक सुटीच्या
दिवशीसुद्धा!
ऑनलाइन मिडियावरील मजकुरासाठीची महत्त्वाची पूर्वअट म्हणजे तो शॉर्ट
बट स्वीट आणि क्रिस्पी असला पाहिजे. वाचकाला जास्त स्क्रोल न करावे लागता संपूर्ण
स्टोरी आशयासह समजली पाहिजे. या आणि आणखी व्यवधानांसाठी डॉ. मुळे यांनी एक
स्टाइलबुक तयार केलं. त्यामुळं कन्टेन्टच्या आमच्या टीमवर जबाबदारी होती ती
प्रत्येक स्टोरीला शॉर्ट पण आशयसंपन्न बनवण्याची, लाटकर सरांनी डमी साइट आमच्या हवाली केली. त्यावर काम
सुरू झालं. साइटमधल्या त्रुटी जशा लक्षात येतील, तशा आम्ही
आमच्या तांत्रिक टीमला आणि वरिष्ठांना सांगत होतो. त्यावर काम केलं जात होतं.
ऑफिसमध्ये दररोज दिवसातून तीनवेळा आमचं ब्रेनस्टॉर्मिंग सेशन व्हायचं ते बेलसरे
मॅडमच्या केबीनमध्ये. पहिलं सकाळी कार्यालयात आल्या आल्या-त्यात दिवसभराचं नियोजन
केलं जायचं. दुपारी तीनच्या बैठकीत त्या नियोजनाचा फॉलोअप आणि स्टेटस पाहिला
जायचा. आवश्यक तिथं अॅडिशन, डिलीशन व्हायचं आणि संध्याकाळी
पाचच्या बैठकीत मजकुरावर अंतिम हात फिरवला जायचा.
उद्घाटनासाठी वेगळं काय करता येईल, यावर विचारमंथन सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांचे
जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे यांनी फ्लॅशमध्ये एक प्रोग्राम तयार करून
मुख्यमंत्र्यांनी माऊस क्लिक करताच अगदी चौघडे, ढोलताशांच्या
गजरासह (हे सारं व्हर्चुअलच!) एक महाद्वार उघडते आणि त्यातून महान्यूजचा लोगो
सामोरा येतो आणि लगेच पोर्टलचे होम पेज उघडते, अशी कल्पना
मांडली. महासंचालकांनी ती उचलून धरली.
या उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांना पोर्टलबद्दल लाइव्ह प्रेझेंटेशन
देण्याचे ठरले होते. त्यासाठी नॅरेशनला म्हैसकर मॅडम आणि प्रेझेंटेशनच्या लॅपटॉपवर
मी बसावे, असे ठरले होते. या ठिकाणीही मॅडमच्या क्राइसिस मॅनेजमेंटच्या व्यवधानाची
प्रचिती आली. समजा, पोर्टल ऐनवेळी ऑनलाइन उघडले नाही,
तर प्लॅन ए, बी आणि सी अशी तयारी करण्यात आली.
उद्घाटनाच्या दिवशी क्रीम कलरच्या ड्रेसकोडमध्ये महान्यूज टीम 'वर्षा' बंगल्यावर पोहोचली. उद्घाटन समारंभझोकात पार
पडला. मुख्यमंत्र्यांनी, मुख्य सचिवांनी या प्रकल्पाबद्दल
समाधान व्यक्त केले आणि त्याच्या यशस्वितेसाठी शुभेच्छा दिल्या. मग राजभवनवर
तत्कालीन राज्यपाल एस.सी. जमीर आणि मंत्री हर्षवर्धन पाटील यांनाही प्रेझेंटेशन
देण्यात आले. राज्यपालांनी त्यावेळी एक मार्मिक प्रश्न उपस्थित केला होता,
'या तुमच्या उपक्रमाचा माझ्या चंद्रपुरातल्या आदिवासी बांधवांना काय
लाभहोणार?' त्यावर म्हैसकर मॅडमनीही खूप प्रभावी उत्तर दिलं
होतं. त्या म्हणाल्या होत्या, 'सर, आम्ही
त्यांच्यासाठीच्या साऱ्या योजनांची माहिती या पोर्टलवर देणार आहोत, जेणेकरून त्याठिकाणी कार्यरत असलेल्या शासकीय, अशासकीय
व्यक्ती, संस्थांना त्यांची माहिती होईल आणि सरकारी
दफ्तरातून त्यासंदर्भात थेट मदत मिळवून देता येईल किंवा काम करता येईल. भविष्यात
त्यांच्यापर्यंत सहज पोहोचण्याचा हा एक महत्त्वपूर्ण पर्याय असेल. तंत्रज्ञानाचे
लाभतिथपर्यंत पोहोचविण्यासाठीच हा उपक्रम आम्ही आरंभला आहे.' आज त्यांच्या या विधानाची प्रचिती आपल्याला येते आहेच.
उद्घाटन झालं, पण आता महान्यूज टीमची जबाबदारी वाढली होती. पहिल्या
तीन दिवसांतच दहा हजारांहून अधिक हिट्स पोर्टलला मिळाल्या. यावरून लोकांचं
पोर्टलवर बारकाईनं लक्ष आहे, हे दिसत होतं.
दरम्यानच्या काळात म्हैसकर मॅडम मुंबई महानगरपालिकेत गेल्या.
माझीदेखील बदली झाली. आज ई-प्रशासनाच्या सुवर्ण पुरस्काराची मोहोर महान्यूज
टीमच्या कामगिरीवर उमटली आहे. यावेळी पुन्हा म्हैसकर मॅडमच माहिती व जनसंपर्क
विभागाच्या सचिव आहेत, ही सुद्धा योगायोगाची गोष्ट. त्यामुळंही महान्यूज टीमचा आनंद आणि उत्साह
द्विगुणित झाला असल्यास नवल नाही. महान्यूज टीमच्या कामगिरीचा मला निरतिशय अभिमान
आहे. सुवर्ण पुरस्कार प्राप्त महान्यूजच्या पायोनिअर टीमचा एक महत्त्वाचा भाग
म्हणून मला काम करता आलं, अशी अभिमानाची भावना मनी दाटून
येते आहे. शेवटी आपलं लेकरू ते आपलंच, हेच खरं!
महान्यूजचा सन्मान
'लोकराज्य'चं संपूर्ण फोर कलर 'न्यू लूक लोकराज्य'मध्ये रूपांतर झालेलं होतं आणि महान्यूजला
विविध संस्थांनी पुरस्कार देऊन उत्कृष्ट कामाची पावती दिली आहे. त्यामध्ये राज्य
मराठी विकास संस्थेमार्फत देण्यात येणारा शासकीय वेब पोर्टल प्रवर्गातील प्रथम
पुरस्कार आणि माहिती-तंत्रज्ञान विभागातर्फे देण्यात येणारा शासकीय
संकेतस्थळासाठीचा गोल्ड पुरस्कार यांचा समावेश होतो. राष्ट्रीय पातळीवर मानाचा
समजल्या जाणाऱ्या मंधन पुरस्काराच्या अंतिम फेरीपर्यंत महान्यूजने मजल मारली होती.
माहिती खात्यात गुणात्मक बदल
माहिती व जनसंपर्क विभागाने मोठ्या जिद्दीने व चिकाटीने 'महान्यूज' हा उपक्रम साकारला. त्यामुळे मी सर्वप्रथम या विभागाचे अभिनंदन करतो.
गेल्या दोन टर्ममध्ये माहिती विभागाच्या चांगल्या कामाचा मी गुणात्मक फरक अनुभवतो
आहे. महान्यूजमधून आता शासन निर्णय सरळ लोकांपर्यंत जाणार आहेत. हे वेब पोर्टल
मराठीतून आहे हे विशेष. हल्ली मराठीवर खूप चर्चा होते. जगभरातले समस्त मराठीजन
यामुळे महाराष्ट्राशी जोडले जातील. या उपक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो.
-
विलासराव देशमुख, मुख्यमंत्री ('लोकराज्य'
ऑक्टोबर २००८ मधून)
जिल्हावार बातम्या महत्त्वाच्या
राज्य शासन विविध क्षेत्रात खूप चांगले काम करीत आहे. अनेक क्षेत्रात
महाराष्ट्र हे देशपातळीवर पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. शासनाचे हे काम
नागरिकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याने न्यूज पोर्टल हा महत्त्वाचा विषय आहे.
जिल्ह्यांच्या बातम्यांसाठी मी हे पोर्टल पाहतो. सर्वांनी ते आवश्य पहावे.
महान्यूजचे मोबाईल अॅप हे देखील बदलत्या काळातील महत्त्वाचे पाऊल आहे.
- पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री