![]() |
पणजी (गोवा) येथे आयोजित पीआरसीआयच्या ग्लोबल कॉन्क्लेव्हचे बोधचिन्ह |
‘कम्युनिकेशन इन द न्यू डिकेड: मॅपिंग द मेगा ट्रेन्ड्स’ या विषयावर होणार चर्चा
कोल्हापूर, दि. १७ फेब्रुवारी:
पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडिया (पी.आर.सी.आय.) या संस्थेच्या १५व्या ग्लोबल
कम्युनिकेशन कॉन्क्लेव्हचे (जागतिक परिषद) आयोजन २८ व २९ मे २०२१ रोजी पणजी (गोवा)
येथे करण्यात आले आहे. ‘कम्युनिकेशन
इन द न्यू डिकेड:
मॅपिंग द मेगा ट्रेन्ड्स’ या मध्यवर्ती संकल्पनेवर परिषद
होणार आहे. ही माहिती संस्थेचे पश्चिम विभागीय सहसचिव डॉ. आलोक जत्राटकर व
कोल्हापूर चॅप्टरचे अध्यक्ष राजेश शिंदे यांनी दिली आहे.
जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत व्यावसायिकांची राष्ट्रीय मातृसंस्था असलेल्या
पीआरसीआयतर्फे जनसंपर्क व्यावसायिक व माध्यमकर्मी यांच्यासाठी दरवर्षी कार्यशाळा,
चर्चासत्रांसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. देशातील विविध प्रमुख
ठिकाणी वार्षिक ग्लोबल कॉन्क्लेव्हचेही आयोजन करण्यात येते. यंदा २८ व
२९ मे २०२१ रोजी पणजी येथे ही परिषद होत आहे. या परिषदेत संस्थेच्या देशभरातील ३८ चॅप्टरसह
वर्ल्ड कम्युनिकेटर्स कौन्सिलच्या संयुक्त अरब अमिरात, श्रीलंका, बांगलादेश,
नेपाळ, भूतान, यु.के., अमेरिका आणि सिंगापूर आदी देशांतील सुमारे ४००हून अधिक प्रतिनिधी
सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांसाठीच्या यंग कम्युनिकेटर्स क्लबचे विद्यार्थी
प्रतिनिधीही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या परिषदेत राष्ट्रीय व
आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्षणीय कामगिरी बजावणाऱ्या व्यावसायिकांना प्रतिष्ठेचे चाणक्य
पुरस्कार, हॉल ऑफ फेम पुरस्कार तसेच तरुणांना कौटिल्य राष्ट्रीय पुरस्कार, माध्यम
पुरस्कार, शैक्षणिक पुरस्कार, डब्ल्यूसीसी इंटरनॅशनल पुरस्कार आणि एक्सलन्स
पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
दरम्यान, काल बेंगलोर येथून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एम.बी. जयराम यांनी या
परिषदेची अधिकृत घोषणा केली. बेंगलोर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के.आर. वेणुगोपाल यांच्या
हस्ते जागतिक परिषदेच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय
अध्यक्ष डॉ. टी. विनय कुमार, यु.एस. कुट्टी, आर.टी. कुमार, श्रीमती लता, रामेंद्र
कुमार, बी. श्रीनिवास मूर्ती, श्री. रुबेन आदी उपस्थित होते.