डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेत 'आविष्कार जल-अभियांत्रिकीचा' या विषयावर बोलताना अभियंते विनय कुलकर्णी. |
कोल्हापूर, दि. ४ मे २०२४: जल-अभियांत्रिकीचे
क्षेत्र हे आव्हानात्मक असले तरी करिअरच्या मुबलक संधीही या क्षेत्रात उपलब्ध
आहेत. अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांनी या क्षेत्राचा जरुर विचार
करावा, असे आवाहन टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स लि. कंपनीचे उप-सरव्यवस्थापक विनय
कुलकर्णी यांनी आज केले. आ’लोकशाही वाहिनीच्या वतीने आयोजित डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेमध्ये ते ‘आविष्कार
जल-अभियांत्रिकीचा!’ या विषयावर बोलत होते. तिसऱ्या वर्षीचे द्वितिय व अंतिम पुष्प त्यांनी गुंफले.
श्री. कुलकर्णी यांनी
आपल्या व्याख्यानामध्ये जल-अभियांत्रिकीच्या क्षेत्रामधील आव्हानांची, आवश्यक
क्षमतांची, ज्ञानाची आणि करिअर संधींची विस्तृत माहिती दिली. ते म्हणाले,
जल-अभियांत्रिकी क्षेत्राचा आवाका अतिशय मोठा आहे. अभियांत्रिकीच्या पदविका, पदवी
तसेच पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमात त्यासंदर्भातील विषयांचा अभ्यासक्रमात
समावेश आहे. फ्लुईड मॅकेनिक्स विषयात पाण्याच्या वर्तनाचा सविस्तर अभ्यास आहे.
हायड्रॉलॉजीमध्ये पावसासह जमिनीवरील आणि भूगर्भातील पाण्याचा अभ्यास आहे. पाण्याचे
पृथ्वीवरील वितरण आणि त्याची हालचाल याविषयी अभ्यास करता येतो. हायड्रॉलिक्समध्ये कालव्यांची
निर्मिती, त्यांची संरचना, पाईपलाईन्स, पूरसंरक्षक संरचना तसेच पाण्याच्या
यांत्रिक गुणवैशिष्ट्यांचा अभ्यास केला जातो. वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगमध्ये शाश्वत
जलव्यवस्थापनाचा विचार, विकास आणि नियोजन समाविष्ट असते. कोस्टल/मरिन (तटीय)
अभियांत्रिकीमध्ये समुद्रकिनाऱ्यांवरील प्रकल्प विकासाचा अभ्यास असतो. पर्यावरणीय
अभियांत्रिकीमध्ये पाणी, हवा, माती यांच्या गुणवत्तेचे संरक्षण, प्रदूषण नियंत्रण
आणि सांडपाणी शुद्धीकरण आदींचा विचार असतो. त्याचप्रमाणे वॉटर सप्लाय, सॅनिटेशन
अभियांत्रिकीमध्ये जलशुद्धीकरण प्रकल्प, सिंचन आदींचा अभियांत्रिकीय दृष्टीकोनातून
अभ्यास असतो. हा अभ्यास करीत असताना त्याच्या जोडीने भूशास्त्राचा अभ्यासदेखील
अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्यामधून भूस्तराच्या संरचनेचा सखोल अभ्यास करावा लागतो,
जेणे करून कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये भक्कम बांधकामाची उभारणी करता येऊ
शकेल. त्याचप्रमाणे रिमोट सेन्सिंग, जीआयएस या नवतंत्रज्ञानात्मक शाखांचा अभ्यासही
उपयुक्त ठरतो. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना स्पर्धा
परीक्षांच्या माध्यमातून केंद्र तसेच राज्य शासनाच्या पाटबंधारे, कृषी, जलसंपदा,
महापालिका प्रशासन आदी ठिकाणी अभियंता म्हणून करिअरच्या संधी आहेत. सेंट्रल वॉटर
कमिशन, ओशनोग्राफी केंद्र, रिमोट सेन्सिंग एजन्सी, नॅशनल वॉटर अकॅडमी, भारतीय
हवामान विभाग अशा अनेक विभागांमध्ये संशोधक, अभियंता म्हणून संधी आहेत. खाजगी
क्षेत्रात आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये तर भरपूर संधी आहेत. अपार कष्ट आणि
परिश्रम करावे लागत असले तरी त्यातून उभे राहणारे सृजनशील अभियांत्रिकी काम हे
मोठे समाधान देणारे असते, असेही कुलकर्णी म्हणाले.
विनय कुलकर्णी यांनी
आपल्या भाषणामध्ये जल-व्यवस्थापन आणि अभियांत्रिकीच्या इतिहासाचाही थोडक्यात आढावा
घेतला. ते म्हणाले, पाणी व्यवस्थापन हा मानव उत्क्रांतीच्या इतकाच जुना घटक आहे.
दहा हजार वर्षांपूर्वी धान्य विकासाच्या पद्धती बदलत असताना मानवाने नदीच्या
किनारी वसाहती वसविण्यास सुरवात केली. तेव्हापासूनच सिंचन, सांडपाणी व्यवस्थापन,
पाण्याचे वहन अशा गोष्टी तो शिकला. इसवी सनाच्या चौथ्या शतकातच रोमन अभियंत्यांनी
तेथील नगरांसाठी शेकडो मैलांवरुन जमिनीखालून तसेच कालव्यांद्वारे पाणी वाहून
आणण्याची किमया केली. भारतात थरच्या वाळवंटानजीक असलेल्या चाँदबावडी या दहाव्या
शतकातील सुमारे शंभर फूट खोल बांधीव विहीरीतून आजतागायत पाणीपुरवठा सुरू आहे. सिंधु
संस्कृतीमध्ये पाणी व सांडपाणी व्यवस्थापनाचे दाखले प्राप्त झाले आहेत. आधुनिक
काळात १८८०मध्ये पहिला काँक्रिट आर्च (कमानीच्या आकाराचा) डॅम बांधण्यात आला.
चीनमधील यांगझी नदीवर थ्री गॉर्जेस हे महाकाय धरण उभारण्यात आले. भारतातील
भाक्रा-नानगल धरण हा देशातील पहिला १५०० मेगावॅट वीजनिर्मिती करणारा प्रकल्प ठरला.
टाटांनीही खाजगी क्षेत्राकडून धरणबांधणी व ऊर्जानिर्मितीची मुहूर्तमेढ रोवली.
त्यांनी मुळशी, भुशी, भिरा, वळवण, ठोकरवाडी आदी धरणे बांधली. सर एम.
विश्वेश्वरय्या, डॉ. वीरभद्रन् रामनाथन, डॉ. जॉन ब्रिस्को, डॉ. राजेंद्रसिंह राणा
आदी संशोधक आणि जलतज्ज्ञांमुळे भारताचे जल अभियांत्रिकी व व्यवस्थापन क्षेत्र
समृद्ध झाले, असेही त्यांनी सांगितले. वाढते शहरीकरण, त्या शहरी विकासाचे नियोजन,
तापमानवाढ, बदलते पर्जन्यमान आदी सर्व बाबींची शाश्वत विकासाशी सांगड घालणे आवश्यक
असून शक्य त्या ठिकाणी पर्यावरणपूरक बांधकामे करण्यास प्राधान्य देण्याची गरज
असल्याचे मतही विनय कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या
सुरवातीला आ’लोकशाही वाहिनीचे संपादक डॉ. आलोक जत्राटकर यांनी स्वागत व परिचय करून
दिला, तसेच आभार मानले.