महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक आणि माझे मित्र किशोर गांगुर्डे यांना जळगावच्या बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची पीएच.डी. पदवी जाहीर झाली. किशोर यांनी 'महाराष्ट्र शासनाच्या माहिती प्रसारणासाठी समाजमाध्यमांचा वापर आणि प्रभाव: एक अभ्यास' (A Study on the Use and Impact of Social Media for Information Dissemination by the Government of Maharashtra) या विषयावर शोधप्रबंध सादर केला.
किशोर यांचे हे संशोधन यासाठी महत्त्वाचे आहे की, ते स्वतः माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सोशल मीडिया शाखेचे संकल्पक आहेत. शासकीय माहिती प्रसाराच्या कामी शासनात सोशल मीडियाची सुरवात करून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना सन २०१८मध्ये नागरी सेवा दिनास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानितही करण्यात आले. या कामाच्या अनुभवाच्या जोरावर शासनाचे निर्णय, लोकाभिमुख योजना, धोरणे आणि माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात समाजमाध्यमांची भूमिका किती प्रभावी ठरते, याविषयीचे विश्लेषण त्यांनी या संशोधनाअंतर्गत केलेले आहे.
काही ‘डॉक्टर’ असे असतात की, त्यांनी सोशल मीडियावर संशोधन केलेले असते; मात्र, गुगल सर्चबारमध्ये google.com टाकून गुगलवर जाणारे असतात. या पार्श्वभूमीवर, किशोर यांच्या संशोधनाचे वेगळेपण हे की, त्यांनी आधी केले आहे आणि मग त्या कृतीला संशोधनबद्ध केले आहे. त्यामुळे त्यांचे संशोधन स्वानुभवसिद्ध आहे. महाराष्ट्र शासनातील जबाबदारीच्या पदांवर काम करीत असताना त्याव्यतिरिक्तचा वेळ देऊन संशोधन सिद्धीला नेणे किती जिकिरीचे असू शकते, हे माझ्यापेक्षा अधिक कोणाला ठाऊक असेल? त्यामुळेच सन्मित्र ‘डॉक्टर’ किशोर यांचे जाहीर अभिनंदन करीत असताना मला सर्वार्थाने आनंद आणि अभिमान वाटतो आहे.
