शनिवार, ८ जुलै, २०००

सीमाप्रश्न सुटेपर्यंत 'अनवाणी' राहण्याची जगावेगळी प्रतिज्ञा!

(सोलापूरच्या दै. संचारच्या सर्व आवृत्त्यांच्या पहिल्या पानावर दि. ८ जुलै २००० रोजी ठळकपणाने बायलाइन प्रकाशित झालेली माझी बातमी.)






(आलोक जत्राटकर)


कोल्हापूर, दि. ७: निपाणी आणि परिसरातील नागरिकांसाठी सीमाप्रश्न हाअत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. येथील मराठी भाषिकांनी या भागाचे महाराष्ट्रात विलीनीकरण व्हावे म्हणून प्रयत्न चालविले आहे. परंतु आजतागायत हा प्रश्न सोडविण्याऐवजी या प्रश्नाचे राजकीय भांडवल अधिक प्रमाणात झाल्याचे दिसते.

या पार्श्वभूमीवर सामान्यजनांनी आपल्यापरीने सीमाप्रश्नासाठी योगदान देणे अत्यंत महत्वाचे आहे. यापैकीच एक असणारे रामचंद्र धोंडीबा परीट (दिवाणजी) हे सध्या कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठासमोर पानपट्टीचा गाडा चालवतात. 'सीमाप्रश्न जोपर्यंत सुटत नाही, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, अशी त्यांनी प्रतिज्ञा केली आहे.
रामचंद्र परीट मूळचे निपाणीचे. त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. सातवीनंतर त्यांना शालेय शिक्षणाला रामराम ठोकून दिवाणजीची नोकरी पत्करावी लागली. विनोबांच्या भूदान चळवळीची कर्नाटकातील सभा आटोपताच त्यांच्या महाराष्ट्रात प्रवेशावेळी कन्नडमधून भाषणे झाली, त्याला मोठा विरोध झाला. त्यामध्ये अनेकांनी विविध प्रतिज्ञा करून आपल्या मराठी अस्मितेचा रंग दाखवला. अंगावर वस्त्र परिधान न करण्याची, दाढी व केस न कापण्याची अशा प्रतिज्ञा केल्या. त्याच प्रसंगी रामचंद्र परीट यांनी सीमाप्रश्न सुटेपर्यंत पायात चप्पल न घालता अनवाणी राहण्याची प्रतिज्ञा घेतली. त्यानुसार, आजतागायत ते अनवाणी राहिले आहेत. त्यांच्या या महाराष्ट्रनिष्ठेला 'दै. संचार'चा सलाम!

शनिवार, १ जुलै, २०००

श्रमाची पूजा बांधणारा साहित्यिक

(सोलापूरच्या 'दै. संचार'साठी बेळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. निपाणीचे ज्येष्ठ साहित्यिक श्री. महादेव मोरे यांच्या वाढदिवसाची दि. १ जुलै २००० रोजी 'संचार'च्या अष्टपैलू पुरवणीत सर्व आवृत्त्यांत छापून आलेली याची बातमी.)



'श्रमाची पूजा' बांधत आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारणाऱ्या महादेव मोरे या वास्तववादी साहित्यिकाच्या अनोख्या वाढदिवसाची कथा....


निपाणी येथील ज्येष्ठ साहित्यिक महादेव मोरे यांचा बासष्ठावा वाढदिवस त्यांनी आपली नित्याची कामे उरकूनच साजरा केला.

आज वाढदिवस असूनही मोरे गुरुवारचा बाजार असल्याने आणि त्यांच्या पिठाच्या गिरणीकडे गावातील व बाजाराला येणाऱ्या लोकांची दळणासाठी रीघ लागत असल्याने सकाळी लवकरच ते तिकडे गेले होते. 'झोंबडं', 'वर आभाळ, खाली धरती', 'एकोणीसावी जात', 'स्टैंड', 'दवणा', 'इंगीत', 'पावणा', 'डूख', 'चिताक', आदि ३९ पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांच्या 'झोंबडं' या कादंबरीला १९७५-७६ चा ग. ल. ठोकळ पुरस्कार आणि 'चिताक'ला राज्यशासनाचा पुरस्कार मिळाला आहे. अजूनही ते विविध वृत्तपत्रांसाठी, दिवाळी अंकांसाठी कथा लिहित असतात. परंतु 'साहित्याने प्रतिष्ठा मिळते पण भाकरी नाही' या मताचे श्री. मोरे हे निपाणी येथे पिठाची गिरणी चालवून गुजराण करतात. अत्यंत साधी राहणी व प्रसिद्धी-पराङमुखता ही मोरे यांची वैशिष्ट्ये आहेत. गेल्या वर्षी श्री. आनंद यादव यांनी मोरे यांच्या एकसष्टी कार्यक्रमात 'महादेव मोरे यांचे कर्तृत्व, साहित्यक्षेत्रातील योगदान जितके आहे. त्याप्रमाणात त्यांची दखल घेतली गेलेली नाही.' ही खंत बोलून दाखविली होती आणि ते सत्यही आहे.
मोरे यांचे अभिनंदन करण्यासाठी शहरातील व परिसरातील साहित्यिक, त्यांचे चाहते आणि नागरिक त्यांच्या गिरणीत येऊनच शुभेच्छा देत होते आणि मोरे ही त्यांचा आपले काम करतच स्वीकार करीत होते. 'दै. संचार'च्या वतीने आमचे प्रतिनिधी आलोक जत्राटकर यांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले.