सोमवार, २ मे, २०११

इशारा लादेनच्या मृत्यूचा!

कुख्यात दहशतवादी आणि जगभरातील तमाम दहशतवादी संघटनांचा प्रेरणास्रोत असलेला ओसामा बिन लादेन अमेरिकन सीआयएकडून पाकिस्तानात मारला गेल्याचं आज सकाळी लोकल ट्रेनमध्येच एसएमएसद्वारे समजलं. (थँक्स टू न्यू टेक्नॉलॉजी!) साहजिकच ट्रेनमध्ये दुसरं काहीच करता येत नसल्यानं याच बातमीच्या अनुषंगानं डोक्यात विचारचक्र सुरू झालं. एखादी बातमी ही जशी विचारांना चालना देत असते, त्याचप्रमाणं लादेनसारख्यांचे मृत्यू आपल्यासमोरचे प्रश्न संपुष्टात न आणता नव्या गुंतागुंतीच्या प्रश्नांना जन्म देत असतात. त्या प्रश्नांची उत्तर आपण कशा पध्दतीनं शोधतो, यावर येणाऱ्या काळाची वाटचाल ठरत असते.
लादेनच्या मृत्यूनं अशाच काही विचारांची, प्रश्नांची आवर्तनं माझ्या मनात उमटली. अमेरिकेनं पोसलेल्या एका भस्मासुराचा त्यांच्याच एजन्सीकडून अंत होण्यानं एक वर्तुळ पूर्ण झालं आहे. त्याचबरोबर 9 सप्टेंबर, 2001 रोजी साऱ्या जगाच्या साक्षीनं अमेरिकेच्या टि्वन टॉवर्सवर विमानहल्ला करून या इमारतीबरोबरच अमेरिकेच्या अतिआत्मविश्वासाच्याही चिंधडया उडवणाऱ्या लादेनच्या मृत्यूनं सुडाचं चक्रही पूर्ण झालं आहे.
अमेरिकेवर दहशतवादी हल्ला होईपर्यंत भारतानंच दहशतवादाच्या सर्वाधिक झळा सोसल्या होत्या. कित्येक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून भारतानं या प्रकाराचं गांभीर्य पटवून देण्याचा आतोनात प्रयत्न चालवला होता. पण त्याकडं म्हणावं तितकं कोणी लक्ष दिलं नाही. 9/11च्या हल्ल्यानंतर मात्र दहशतवाद ही जगासमोरची सर्वात मोठी आणि भीषण समस्या असल्याचा साक्षात्कार अमेरिकेला झाला आणि मग गेली दहा-अकरा वर्षे लादेनला पकडून अथवा मारुन दहशतवादाचा खातमा करण्यासाठी अमेरिकेनं दक्षिण आशियामध्ये आपल्या फौजा उतरवल्या. दरम्यानच्या काळात सद्दाम हुसेनच्या पाडावानंतर मध्य-पूर्वेमध्ये अमेरिकेचं बऱ्यापैकी (की उत्तमपैकी?) बस्तान बसलं. जोडीनं लादेनच्या निमित्तानं अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्येही फौजा उतरवण्याची नामी संधी अमेरिकेला चालून आली आणि अशा संधींचं सोन्यात रुपांतर करण्यात अमेरिकेचा हात कोणीही धरू शकत नाही.
आता लादेनच्या मृत्यूची घोषणा करून अमेरिकेचं पाकिस्तानमध्ये फौजा उतरवण्यामागचं (छुपं) इप्सित साध्य झालं असल्याची शक्यताच मोठया प्रमाणात जाणवते आहे. कारण लादेनला पाकिस्तानसारख्या छोटया देशामध्ये किती काळ पळू द्यायचं, किती काळ लपू द्यायचं आणि पकडायचं की मारायचं, याचा निर्णय हा सर्वस्वी अमेरिकेवरच अवलंबून होता आणि त्यांनी तो योग आज साधला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी, गेल्या आठवडयात आपण स्वत:च लादेनला मारण्याची परवानगी सीआयएला दिल्याचं आजच्या निवेदनामध्ये सांगितलं. (इथं आणखीही एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर सिनिअर बुश असोत, ज्युनिअर बुश असोत, क्लिंटन असोत की ओबामा, त्यांच्या आंतरराष्ट्रीय धोरणामध्ये फारसा फेरफार होत नाही, केला जाऊ शकत नाही!) त्यामुळं आता आशिया खंडात अमेरिकन वर्चस्ववादाच्या हिटलिस्टमध्ये पुढचं टारगेट हे भारत किंवा चीन असणार आहे. त्यातही चीनची भिंत भेदणं, अमेरिकेला सहजशक्य नसल्यानं हे टारगेट भारतच असेल, अशी अधिक शक्यता वाटते. इथल्या बाजारपेठेमध्ये मोठया प्रमाणावर शिरकाव करून त्यांनी याची सुरवात फार आधीच केली आहे. आता त्याला नवे आयाम ते कुठल्या पध्दतीनं लावतात, याकडं भारतानं फार सजगतेनं पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
लादेनचा मृत्यू पाकिस्तानात झाल्यानं आणि ते थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या तोंडूनच जगजाहीर झाल्यानं भारतानं वेळोवेळी पाकिस्तानच्या दहशतवादी लिंक्सचा आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरुन उच्चार केला आहे, त्याला बळकटी मिळाली आहे. दहशतवादी आणि माफिया-डॉन यांना पाकिस्तान फार आधीपासून आश्रय देत आला आहे. अद्यापही भारताचा मोस्ट वाँटेड डॉन दाऊद इब्राहिम सुध्दा तिथंच आहे. एक बरं झालं, आपले केंद्रीय मंत्री चिदंबरम यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत असताना, पाकिस्तानच्या या दहशतवाद्यांना आश्रय देण्याच्या प्रवृत्ती जगासमोर आल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. त्याचप्रमाणं मुंबईवर 26 नोव्हेंबर, 2008 रोजी करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपींना भारताच्या हवाली करण्याची पाकिस्तानकडं मागणीही केली.
पंजाब, काश्मीर इथं फोफावलेला दहशतवाद हा पाकिस्तान पुरस्कृत होता किंवा आहे, हे एक आता खुलं रहस्य आहे. त्याचबरोबर मुंबईसह भारतातल्या कित्येक शहरांनी बाँबस्फोटांच्या रुपानं या दहशतवादाचं उग्र रुप पाहिलं आहे. मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यामधल्या कसाबला जिवंत पकडून भारतानंच सर्वप्रथम दहशतवादाचा चेहरा जगासमोर आणला. लक्षात घ्या, लादेनला जिवंत पकडण्यासाठी दहा वर्षे आंतरराष्ट्रीय मोहीम चालवणाऱ्या अमेरिकेला सुध्दा ही गोष्ट शक्य झालेली नाही. (किंवा त्याला जिवंत पकडणं हे त्यांच्या हिताचं नसेलही कदाचित! त्यांनाच ठाऊक!!) त्यामुळं भारतानं कसाबवर चालविलेल्या खटल्याचा शक्य तितक्या लवकर निकाल लावून त्याचा सोक्षमोक्ष लावणं, ही बाब आता अधिक निकडीची झालेली आहे.
लादेनच्या मृत्यूनं एक दहशतवादी आणि दहशतवादाला खतपाणी घालणारा, तो जगभर फोफावण्यासाठी कारणीभूत ठरलेला व्यक्ती नाहीसा झाला असला तरी, त्यामुळं दहशतवाद संपुष्टात आला किंवा येईल, असं समजणं हास्यास्पद ठरेल. दहशतवाद हा व्यक्तीमध्ये कधीच नसतो, तो असतो त्या व्यक्तीला फशी पाडणाऱ्या एक्स्ट्रिमिस्ट (अतिरेकी) विचारसरणीमध्ये! कोणताही मूलतत्त्ववाद हा अशा प्रकारच्या अतिरेकी विचारसरणीला अधिक पोसत असतो. आणि या विचारसरणीच्या मुळावर घाव घालून ती नष्ट करणं, हे महाकर्मकठीण काम असतं. कारण त्या मानसिकतेतून बाहेर पडण्यास लवचिकता या विचारसरणीत कधीच नसते. सारासार विचार, विवेक या गोष्टींपासून हे अतिरेकी कोसों दूर असतात. भगवान बुध्दाचा मध्यममार्ग किंवा महात्मा गांधींचा अहिंसा विचार स्वीकारणं हे तसं फारसं अवघड नाही, पण तितकंसं सोपंही नाही. कारण मध्यममार्ग स्वीकारण्यासाठी विवेकानं विचार करणं आवश्यक असतं. त्यापेक्षा अशा अतिरेक्यांना एक बाजू घेणं अधिक सोपं वाटत असतं. कट्टर मूलतत्त्ववादी लोक आपला वापर करून घेत आहेत, ही गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही. आणि एकदा वापर करून घेतल्यानंतर पुढं त्यांचं काहीही झालं तरी या चळवळीचं काहीही नुकसान होत नसतं कारण असे 'प्रभावित' झालेले, परिस्थितीनं गांजलेले तरुण त्यांच्याकडं येतच असतात. वापर होऊन गेल्यानंतर पश्चाताप झाला तरी त्याचा फारसा उपयोगही नसतो.
लादेनच्या मारल्या जाण्यानं दहशतवादी 'चळवळी'ला धक्का बसलाय, ही गोष्ट खरी असली तरी तो जगातल्या तमाम दहशतवादी संघटनांसाठी 'हुतात्मा' ठरणार नाही, असं थोडंच आहे? त्यामुळंच नजीकच्या काळात दहशतवाद अधिक भीषण स्वरुप धारण करेल, याचीच अधिक शक्यता आहे. त्यामुळंच साऱ्या जगानं या दहशतवादाला तोंड देण्यासाठी अधिक सजगतेनं सज्ज झालं पाहिजे. भारतानं तर अधिकच सज्ज झालं पाहिजे- कारण दहशतवादाबरोबरच साऱ्या जगासाठी आपण सॉफ्ट टारगेट असतो- नेहमीच!

३ टिप्पण्या:

  1. लेखकाचे आभार. असेच विचार आजच्या युवकांचे असावे. अतिरेकी आणि डास सारखेच वाटतात. डास जसे संपत नाहीत, तसेच काहीसे अतिरेक्यांचेही वाटते. दोघांमुळे रक्तपात होतोच. दोन, तीन, चार, खोलीभर डास मारले तरीही डास संपत नाहीत, अतिरेकी सुद्धा असंख्य असल्याचे पुरावे आहेत. मिळेल तिथून डास आत येतात, अतिरेकीही मिळेल त्या मार्गाने देशात प्रवेश करतात. भारताने आता काही ना काही कृती करणे आवश्यक आहे. समस्त देशबांधव शासनाच्या पाठीशी आहेत.

    उत्तर द्याहटवा