गेल्या सोमवारी (दि. 26 जून) सकाळी महालक्ष्मी एक्स्प्रेसनं मी कोल्हापूरहून कल्याणला आलो. मध्यंतरी या रेल्वेवर दरोडा पडण्याच्या, लुटीच्या घटना घडलेल्या. पण या रात्री मी प्रवास करत असलेल्या रेल्वेमध्ये आणि माझ्या बोगीमध्ये मोठ्या प्रमाणात लूट झाल्याची घटना घडली. त्याची ही कथा!
झालं असं की, माझी आठवड्याची रजा संपवून मी रविवारी रात्री `महालक्ष्मी`ला बसलो. एकटा असलो की मी नेहमी अप्पर बर्थ बुक करतो. एकदा वर `ढगात` गेलं की निवांत. सॅक उशाला घेतली आणि दुसऱ्या दिवशी कल्याणला पोहोचण्याच्या टायमिंगच्या आधी पंधरा मिनिटांचा गजर मोबाईलवर सेट केला की झोपायला चिक्कार वेळ! मग मस्त गाणी ऐकत किंवा `इंटरेस्टींग` (सहप्रवाशी किंवा त्यांच्या गप्पा) असतील तर त्यांच्या गप्पा ऐकत आरामात झोपी जायचं, असा माझा रेल्वेतला `रात्रक्रम` असतो. त्या दिवशीही मी असाच ढगात गेलो होतो. लोअर बर्थवरचे सहप्रवासी `इंटरेस्टींग` होते, पण दिसत नव्हते. शेजारच्या कंपार्टमेंटमध्ये कॉलेज तरुणांचा ग्रुप होता. त्यातल्या एकानं नवा मोबाईल घेतला होता. त्याचं गुणगान सुरू होतं. जयसिंगपूरमध्ये गाडीत चढलेल्या विक्रेत्याकडून घरगुती बिर्याणीच्या जवळजवळ पंधरा प्लेट (आठ जणांत) संपण्याच्या मार्गावर होत्या. त्या वासानं पुन्हा एकदा जेवण्याची इच्छा उफाळून आली, बट आय कंट्रोल्ड! कारण एकदा घरातून जेऊन निघालो होतो. असो!
मिरजला साइड बर्थवर आणखी एका `इंटरेस्टींग` चेहऱ्याचा प्रवेश झाला. मी कूस बदलून गाणी ऐकत आणि समोरचं `चित्र` पाहात झोपेची `आराधना` करू लागलो. तिचं एकीकडं लॅपटॉपवर काम आणि दुसरीकडं मोबाईलवर बोलणं सुरू होतं. अशा मस्त वातावरणात मला अगदी छान झोप लागली.
सकाळी सहा वाजता गजर झाला. खाली उतरलो तर गाडी अजून कर्जतला पोहोचायची होती. म्हणजे किमान अर्धा ते पाऊण तास गाडी लेट. आता झोपणंही शक्य नव्हतं. माझं लक्ष साइड बर्थच्या `इंटरेस्टींग` चेहऱ्याकडं गेलं. तो कोमेजला होता. कोमेजला नव्हे, रडवेला झाला होता. पाचेक मिनिटांत तिनं साऱ्या बोगीभर काहीशी धावपळ केली. थोड्या वेळानं पुन्हा जागेवर येऊन बसली. तिला `काय झालं?` म्हणून विचारलं तर लॅपटॉप ठेवलेली तिची बॅग कुणीतरी चोरली होती. असं पूर्वी कधीच झालं नव्हतं, असंही वर तिनं मला सांगितलं. `बाई, पूर्वी कधीही न झालेली गोष्ट, पुढं कधी होणारच नाही, असं आपण गृहित धरणं चुकीचं असतं,` असं तिला मला सांगावंसं वाटलं, पण तिच्या चेहऱ्याकडं पाहून मी माझे शब्द मनातच ठेवले. तिला कोरडा दिलासा दिला. एवढ्यात पलिकडच्या मोबाईलवाल्या तरुण मित्राचाही मोबाईल गेल्याचा आवाज ऐकू आला. मला शंका आल्यानं बोगीत चक्कर मारली तर कुणाच्या पर्सपासून बॅगपर्यंत असं बरंचसं साहित्य चोरीला गेलं होतं.
कल्याण आलं, मी उतरलो. आणि अन्य बोगींमधून उतरलेल्या प्रवाशांतही त्यांच्या किंवा त्यांच्या सहप्रवाशांकडं झालेल्या चोरीविषयीच चर्चा कानी पडू लागली. म्हणजे कुणाला मारहाण झाली नाही, म्हणूनच केवळ दरोडा म्हणायचा नाही, असं या चोरीचं मोठं स्वरुप होतं. ही बातमी मी नंतर माझ्या मुंबईतल्या काही पत्रकार मित्रांना सांगितली. त्यांनी तसंच नंतर मीही रेल्वे पोलिसांत फोन करून चौकशी केली तर त्या दिवसभरात त्यांच्याकडं एकाही चोरीची तक्रार दाखल झाली नव्हती. आता याबद्दल आश्चर्य व्यक्त करावं, चिंता व्यक्त करावी की आपल्याच यंत्रणेबद्दल आपल्या मनात किती अविश्वास भिनला आहे, याबद्दल खेद करावा, अशी माझ्या मनाची संदिग्ध अवस्था झाली आहे. पोलिसांना सांगूनही काही होणार नाही, त्यापेक्षा झालेलं नुकसान सोसण्याची प्रवाशांची मानसिकता दुसरं काय सांगते? अशा किती चोऱ्या या रेल्वेमध्ये होत असतील. पण प्रवाशांनीच मनावर घेतलं नाही, तर हे प्रकार पुढं गंभीर स्वरुप धारण करतील आणि प्रवाशांच्या जीवावरही बेतू शकतील, एवढाच सावधानतेचा इशारा मला या निमित्तानं द्यावासा वाटतो.
ता.क. : मी माझ्या डोक्याशी घेतलेल्या सॅकमध्ये माझा `आऊटडेटेड` का असेना, पण लॅपटॉप होता. एखाद्या लुटारूनं माझ्या डोक्यात दांडकं हाणलं असतं तर जीव वाचवण्यासाठी माझी बॅग त्याच्या ताब्यात देण्यापलिकडं मी काही करू शकलो नसतो. रेल्वेतून उतरल्यावरही `लॅपटॉप गेला तरी हरकत नाही, पण जीव वाचला` असाच आनंद व्यक्त केला असता. रेल्वे पोलिसांकडं जाण्याचा विचारही केला नसता. ते तरी बिचारे काय करू शकणार होते? पण ते जर काही करू शकले असते, तर साईड बर्थच्या `इंटरेस्टींग` चेहऱ्यावरचं हसू निश्चित परत आणू शकले असते!
(वाचक मित्रांना सूचना : विषय फुलवण्याच्या दृष्टीनं विशेषणं वापरली असली तरी आशय मात्र शंभर टक्के खरा आहे, बरं!)
बुधवार, २९ जून, २०११
मंगळवार, १४ जून, २०११
बळीराजाला जागता ठेवणारा प्रकाशक
(श्री. रावसाहेब पुजारी हे माझे अगदी `सकाळ`पासूनचे सहकारी आणि एक जीवलग मित्र. शेतीवर आणि बांधावर मनापासून प्रेम करणाऱ्या, निसर्गाच्या सान्निध्यात रमणाऱ्या आमच्या या मित्रानं आपल्या शेतीच्या प्रेमाला मासिकाचं स्वरुप देऊन या प्रेमाचा प्रसार आणि प्रचार करण्याचं ध्येय बाळगलं आणि गेल्या सहा वर्षांच्या कालावधीत `शेती-प्रगती` या त्यांनी सुरू केलेल्या मासिकानं पश्चिम महाराष्ट्र, कोकण या परिसरातील शेतकरी-वाचकांच्या मनात एक विशिष्ट स्थान मिळवलं आहे. आपल्या कृषी प्रेमाची व्याप्ती आणखी वाढवतानाच त्यांनी तेजस प्रकाशन या संस्थेच्या माध्यमातून शेती या विषयाला वाहिलेली अत्यंत उपयुक्त पुस्तकंही प्रकाशित केली. त्यांनाही वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. आमच्या या मित्राच्या `शेती-प्रगती`ला यंदा सहा वर्षं पूर्ण होताहेत. त्यानिमित्तानं आमचे आणखी एक ज्येष्ठ स्नेही, मित्र आणि मार्गदर्शक असलेले बाप्पा उर्फ सुधीर श्रीधर कुलकर्णी (सांगली, मोबा. 9420676543) यांनी रावसाहेब पुजारी यांच्या कारकीर्दीचा धावता आढावा घेतलेला आहे. तो खास माझ्या मित्रांसाठी सादर करीत आहे. मनापासून एखाद्या गोष्टीवर केलेलं प्रेम आपली आयुष्याची कारकीर्द घडविण्यास कशा प्रकारे साह्यभूत ठरू शकतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे रावसाहेब पुजारी आहेत. त्यांच्या आयुष्यापासून सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.) वाचा तर मग.. आमच्या पुजारींची यशोगाथा...!
कोल्हापूर जिल्ह्यात तमदलगेसारख्या छोटया खेडयात राहणारा एक शेतकऱ्याचा मुलगा रावसाहेब बाळू पुजारी यांनी कृषी मासिक व कृषिविषयक पुस्तक प्रकाशन व्यवसाय सुरू केला आहे. त्यांनी सहा वर्षांपूर्वी शेतकऱ्यांसाठी सुरू केलेले `शेती-प्रगती` हे मासिक देखील आता चांगले नावारूपाला आले आहे. शेती विषयांतील अनेक तज्ज्ञांना त्यांनी लिहिते केले आहे. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग अन्य शेतकऱ्यांना व्हावा या भूमिकेतून त्यांनी त्यांची पुस्तके प्रसिध्द केली आहेत. कोल्हापूरसारख्या कृषी क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या शहरातील ट्रेड सेंटर इमारतीत त्यांनी कृषिविषयक पुस्तकांचे दालन सुरू केलेले आहे. तिथे स्वतःची तसेच अन्य प्रकाशनांची पुस्तके देखील त्यांनी उपलब्ध करून ठेवली आहेत. या तीनही उपक्रमांद्वारे ते शेतकऱ्यांना शेतीबाबत व शेतीशी संबंधित अनेक प्रश्नांवर सतत जागते ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
श्री. रावसाहेब पुजारी यांनी अतिशय कष्टात शिक्षण पूर्ण केले. वडील मेंढपाळ व शेतकरी. त्यामुळे शेतीच्या कामात मदत करत व लहानसहान नोकऱ्या करीत त्यांनी एम. ए.पर्यंतचे शिक्षण घेतले. शेतातील काम करताना त्यातील प्रश्नांवर त्यांचे चिंतन सतत सुरू होते. त्याचबरोबर त्यांनी सुरुवातीला गावोगावी फिरून वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय सुरू केला. नंतर त्यांनी 16 वर्षे 'सकाळ' चे बातमीदार, उपसंपादक म्हणून काम पाहिले. या काळात त्यांनी शेती पुरवणीचे संपादन केले. या पुरवणीतून अनेक लेखमाला लिहिल्या.
हे करीत असतानाही त्यांना मातीची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. एका टप्प्यावर त्यांनी `सकाळ`च्या उपसंपादकपदाचा राजीनामा दिला. त्यांनी चक्क शेती करण्यास सुरुवात केली. पाणी अडवा, पाणी जिरवासारखे प्रयोग केले आहेत. त्यांची दहा एकर शेती आहे. त्यामध्ये ऊस, भाजीपाला, फुले, केळी ही पिके ते घेत असतात. त्यांची पेरूची बागही आहे. ऊस सोडला तर सर्व शेतमालाची विक्री त्यांचे कुटुंबीय स्वतः बाजारात करीत असतात. त्यामुळे त्यांची शेती सतत फायद्यात आहे.
एकूण शेतीच्या अभ्यासातून त्यांच्या असे लक्षात आले की, शेतीमध्ये जे नवीन तंत्रज्ञान येत आहे ते आपल्या शेतकऱ्यांनी आत्मसात केले पाहिजे. शेतकरी शेतीबाबत खऱ्या अर्थाने शिक्षित झाल्याशिवाय शेती व त्याची स्थिती सुधारणार नाही. नव्या तंत्राशिवाय शेती फायदेशीर होणारच नाही. शेतकऱ्यांध्ये जागृती व नामवंत जे शेतीमध्ये यशस्वी झाले आहेत त्या शेतकऱ्यांचे अनुभव सांगून त्यांना प्रोत्साहित करावे असे दोन प्रकारचे काम त्यांनी सुरू केले. त्यातून त्यांच्या 'समृध्द शेतीच्या पायवाटा', 'कायापालट क्षारपड जमिनीचा', 'शेतकऱ्यांचे सोबती' या तीन पुस्तकांचा जन्म झाला. या तीनही पुस्तकांना शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्या दोन पुस्तकांच्या दोन आवृत्त्या निघाल्या.
या कालावधीत त्यांना क्षारपीडित जमिनीच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी नवी दिल्लीच्या 'सेंटर फॉर सायन्स ऍन्ड एन्व्हायरमेंटस्` (सीएसई) या संस्थेची फेलोशीप मिळाली. त्यातून त्यांनी सांगली, सातारा, कोल्हापूर भागातील क्षारपड जमिनीचा अभ्यास केला. हा प्रश्न व त्यावरील उपाय असा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. पुढे त्यावर आधारित 'कायापालट क्षारपड जमिनीचा' हे पुस्तक त्यांनी प्रसिध्द केले. त्यांच्या पुस्तकांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष शेतीच्या मातीचा वास असलेले
मासिक सुरू करावे अशी कल्पना त्यांना सुचली. त्यांनी ती प्रत्यक्षात देखील आणली. त्यातूनच त्यांनी जानेवारी 2005 पासून पूर्णपणे शेतीला वाहिलेले 'शेतीप्रगती' हे मासिक सुरू केले. जवळ पुरेसे भांडवल नाही. मराठीतील अनेक नावाजलेली मासिके, साप्ताहिके आर्थिक तंगीतून बंद पडलेली असताना, आहे त्यांना पुरेसा ग्राहक नसताना त्यांनी हे धाडस केले. अनेकांनी त्यांना वेडयात काढले. काही जण त्यातूनही त्यांना धीर देत होते.
दैनिकात नोकरी केल्याने त्यांना संपादन, जाहिरात व वितरण या तिन्ही अंगांची चांगली जाण होती. चिकाटीने त्यांनी ही मासिकाची तीनही अंगे फुलवली व मासिक नावारूपास आणले. नवे तंत्रज्ञान, नवे प्रयोग, यशस्वी शेतकऱ्यांच्या गाथा, शेतीविषयक नवीन माहिती, शेतीविषयक वृत्त, चर्चेतील विषय असे अनेक महत्त्वाचे विषय ते नेहमी हाताळतात. त्याचा शेतकऱ्यांना चांगला उपयोग होतो. तांत्रिक अंगाने म्हणजे कागद, छपाई, सजावट, बांधणी या बाजूंनी देखील हे मासिक सरस आहे. या साऱ्या बळावर स्थानिकबरोबरच कार्पोरेट जाहिराती त्यांना मिळत आहेत. हे त्यांच्या कष्टाचे व मासिकाचे यश आहे.
त्यांचा हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला. आज सहा वर्षे खंड न पडता हे मासिक सुरू आहे. त्यांनी प्रसिध्द केलेले दिवाळी अंक देखील या मासिकाचे वेगळेपण आहे. पाणीप्रश्न, ग्लोबल वॉर्मिंग, मातीचा कस असे विषय घेऊन एकेका विषयांबाबत संपूर्ण जागृती करणारे दर्जेदार अंक त्यांनी दिले. त्याशिवाय प्रासंगिक केळी, ऊस, रोपवाटिका, बी-बियाणे, दुग्ध व्यवसाय आदी विषयांवरती खास अंक असतातच. अर्थसंकल्पातील शेती या विषयावर दरवर्षी अतिशय नेटका अंक करतात. शेतीविषयक सर्व प्रश्नांना स्पर्श करणारे मासिक म्हणून ते शेतकऱ्यांत वाचकप्रिय झालेले आहे. शेतीप्रगती मासिकाची प्रगती पाहून महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी शेतीविषयक मासिके सुरू झाली आहेत. पूर्वीपासून सुरू असलेल्या मासिकांनाही कात टाकायला लावली आहे.
त्यानंतर त्यांनी प्रकाशन व्यवसाय चालू केला. आज त्यांनी वेगवेगळया विषयांवरील 16 पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यामध्ये उद्यान पंडित पी. व्ही. जाधव यांचे शेतकरी अजोबाचा बटवा हे पॉकेट आकाराचे पुस्तक चांगले खपले. शेतकऱ्याला आपल्या शेतावर उपलब्ध साधनांचा वापर करून खते, औषधे, बियाणे कशी करावीत यांचे मार्गदर्शन त्यात आहे. त्याचप्रमाणे डॉ. राजेंद्र देशमुख यांचे 'अशी फुलवा परसबाग', सौ अर्चना चौगुले-करोशी यांचे 'मंथन एक विचारधारेचे', कोल्हापूरचे शेतीतज्ज्ञ प्रताप चिपळूणकर यांची 'कमी खर्चाची ऊसशेती' व 'फायदेशीर भातशेती', बी. बी. घाडगे यांचे 'स्वावलंबनासाठी शासकीय योजना', सुभाष हंड- देखमुख यांचे 'यक्ष व युधिष्ठिर संवाद', उमेश पाटील यांचे 'प्रमुख पिकांवरील रोग व कीड व्यवस्थापन', रत्नागिरीचे सर्पमित्र प्रा. ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे साप-आपला सोबती आदी पुस्तकांचा समावेश आहे. नुकतेच `ग्लोबल वॉर्मिग` या विषयावर संजय आवटे आणि जगदीश मोरे यांचे आणि `संत चोखामेळा - समग्र अभंगगाथा व चरित्र` हे डॉ. अप्पासाहेब पुजारी यांचे संशोधनपर पुस्तकही प्रकाशित केले आहे. या पुस्तकांना चांगला शेतकरी वाचक मिळाला.
नव्या तरुण शेतकऱ्यांमध्ये माहिती मिळविण्याची मोठी तहान आहे. आज द्राक्ष, ऊस, केळी, हळद आदी पिकांवर जे परिसंवाद किंवा चर्चासत्रे होतात त्याला ही तरुणाई उपस्थित असते. त्यात गांभीर्याने सहभागी होते. शंका निरसन करून घेते. त्याचबरोबर जी कृषी प्रदर्शने होतात त्यामध्ये देखील शेतकरी मोठया संख्येने सहभागी होत असतात. नवे तंत्रज्ञान आत्मसात करून भरघोस पीक काढताना दिसत आहेत. रोपवाटिकाच्या व्यवसायाने देखील चांगले मूळ धरले आहे. या सर्व बदलाचा उपयोग करून घेण्याचा एक भाग म्हणून श्री. पुजारी यांनी फेब्रुवारी 2010 पासून कोल्हापुरात ट्रेड सेंटर येथे दुकान गाळा विकत घेऊन केवळ कृषीविषयक पुस्तकांचे दालन सुरू केले आहे. या दुकानात त्यांनी त्यांच्या प्रकाशनाची पुस्तके ठेवली आहेतच, त्याचबरोबर कृषिविषयक सर्व प्रकाशकांची पुस्तके येथे आहेत. तसेच कृषिविषयक सीडीज विक्रीसाठी उपलब्ध आहे.
या एकूण प्रकाशन व कृषी पुस्तक विक्री व्यवसायात त्यांना शेतीचा अनुभव उपयोगी आला. शेतीविषयक पुस्तकांचे अनेक प्रकाशक आहेत. मात्र त्यांचा शेतीशी थेट संबंध असेलच, असे नाही. त्यापेक्षा श्री पुजारी यांचा अजूनही शेतीशी संबंध आहे.
त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांना नेके काय हवे आहे, त्यांची नेमकी गरज काय आहे, याचे गमक त्यांना अनुभवातून ठाऊक आहे. त्यामुळे ते शेतकऱ्यांना हवे ते त्यांच्या मासिकातून व त्यांच्या पुस्तकांतून देत असतात. शेतकरी, लेखक, जाहिरातदार, कृषितज्ज्ञ, संशोधक, कृषी अधिकारी, बँकांचे अधिकारी आदी सर्व संबंधित घटकांशी त्यांचा चांगला संपर्क आहे. त्या बळावर त्यांचा प्रकाशन व्यवसाय घोडदौड करताना दिसतो आहे. शेती व शेतीविषयक सर्व बाबींवर शेतकऱ्यांना माहिती देणे, त्यातील सर्व प्रश्नांवर व हक्काबाबत त्याला सतत जागे ठेवण्याचे काम श्री. पुजारी अखंडपणे करीत आहेत.
संपर्क :
रावसाहेब पुजारी, संपादक-प्रकाशक,
शेतीप्रगती मासिक, तेजस प्रकाशन,
एफ-3, ट्रेड सेंटर, स्टेशन रोड, कोल्हापूर
मोबाइल : 9881747325
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)