बुधवार, २९ जून, २०११

`महालक्ष्मी`ची लूट!

गेल्या सोमवारी (दि. 26 जून) सकाळी महालक्ष्मी एक्स्प्रेसनं मी कोल्हापूरहून कल्याणला आलो. मध्यंतरी या रेल्वेवर दरोडा पडण्याच्या, लुटीच्या घटना घडलेल्या. पण या रात्री मी प्रवास करत असलेल्या रेल्वेमध्ये आणि माझ्या बोगीमध्ये मोठ्या प्रमाणात लूट झाल्याची घटना घडली. त्याची ही कथा!
झालं असं की, माझी आठवड्याची रजा संपवून मी रविवारी रात्री `महालक्ष्मी`ला बसलो. एकटा असलो की मी नेहमी अप्पर बर्थ बुक करतो. एकदा वर `ढगात` गेलं की निवांत. सॅक उशाला घेतली आणि दुसऱ्या दिवशी कल्याणला पोहोचण्याच्या टायमिंगच्या आधी पंधरा मिनिटांचा गजर मोबाईलवर सेट केला की झोपायला चिक्कार वेळ! मग मस्त गाणी ऐकत किंवा `इंटरेस्टींग` (सहप्रवाशी किंवा त्यांच्या गप्पा) असतील तर त्यांच्या गप्पा ऐकत आरामात झोपी जायचं, असा माझा रेल्वेतला `रात्रक्रम` असतो. त्या दिवशीही मी असाच ढगात गेलो होतो. लोअर बर्थवरचे सहप्रवासी `इंटरेस्टींग` होते, पण दिसत नव्हते. शेजारच्या कंपार्टमेंटमध्ये कॉलेज तरुणांचा ग्रुप होता. त्यातल्या एकानं नवा मोबाईल घेतला होता. त्याचं गुणगान सुरू होतं. जयसिंगपूरमध्ये गाडीत चढलेल्या विक्रेत्याकडून घरगुती बिर्याणीच्या जवळजवळ पंधरा प्लेट (आठ जणांत) संपण्याच्या मार्गावर होत्या. त्या वासानं पुन्हा एकदा जेवण्याची इच्छा उफाळून आली, बट आय कंट्रोल्ड! कारण एकदा घरातून जेऊन निघालो होतो. असो!
मिरजला साइड बर्थवर आणखी एका `इंटरेस्टींग` चेहऱ्याचा प्रवेश झाला. मी कूस बदलून गाणी ऐकत आणि समोरचं `चित्र` पाहात झोपेची `आराधना` करू लागलो. तिचं एकीकडं लॅपटॉपवर काम आणि दुसरीकडं मोबाईलवर बोलणं सुरू होतं. अशा मस्त वातावरणात मला अगदी छान झोप लागली.
सकाळी सहा वाजता गजर झाला. खाली उतरलो तर गाडी अजून कर्जतला पोहोचायची होती. म्हणजे किमान अर्धा ते पाऊण तास गाडी लेट. आता झोपणंही शक्य नव्हतं. माझं लक्ष साइड बर्थच्या `इंटरेस्टींग` चेहऱ्याकडं गेलं. तो कोमेजला होता. कोमेजला नव्हे, रडवेला झाला होता. पाचेक मिनिटांत तिनं साऱ्या बोगीभर काहीशी धावपळ केली. थोड्या वेळानं पुन्हा जागेवर येऊन बसली. तिला `काय झालं?` म्हणून विचारलं तर लॅपटॉप ठेवलेली तिची बॅग कुणीतरी चोरली होती. असं पूर्वी कधीच झालं नव्हतं, असंही वर तिनं मला सांगितलं. `बाई, पूर्वी कधीही न झालेली गोष्ट, पुढं कधी होणारच नाही, असं आपण गृहित धरणं चुकीचं असतं,` असं तिला मला सांगावंसं वाटलं, पण तिच्या चेहऱ्याकडं पाहून मी माझे शब्द मनातच ठेवले. तिला कोरडा दिलासा दिला. एवढ्यात पलिकडच्या मोबाईलवाल्या तरुण मित्राचाही मोबाईल गेल्याचा आवाज ऐकू आला. मला शंका आल्यानं बोगीत चक्कर मारली तर कुणाच्या पर्सपासून बॅगपर्यंत असं बरंचसं साहित्य चोरीला गेलं होतं.
कल्याण आलं, मी उतरलो. आणि अन्य बोगींमधून उतरलेल्या प्रवाशांतही त्यांच्या किंवा त्यांच्या सहप्रवाशांकडं झालेल्या चोरीविषयीच चर्चा कानी पडू लागली. म्हणजे कुणाला मारहाण झाली नाही, म्हणूनच केवळ दरोडा म्हणायचा नाही, असं या चोरीचं मोठं स्वरुप होतं. ही बातमी मी नंतर माझ्या मुंबईतल्या काही पत्रकार मित्रांना सांगितली. त्यांनी तसंच नंतर मीही रेल्वे पोलिसांत फोन करून चौकशी केली तर त्या दिवसभरात त्यांच्याकडं एकाही चोरीची तक्रार दाखल झाली नव्हती. आता याबद्दल आश्चर्य व्यक्त करावं, चिंता व्यक्त करावी की आपल्याच यंत्रणेबद्दल आपल्या मनात किती अविश्वास भिनला आहे, याबद्दल खेद करावा, अशी माझ्या मनाची संदिग्ध अवस्था झाली आहे. पोलिसांना सांगूनही काही होणार नाही, त्यापेक्षा झालेलं नुकसान सोसण्याची प्रवाशांची मानसिकता दुसरं काय सांगते? अशा किती चोऱ्या या रेल्वेमध्ये होत असतील. पण प्रवाशांनीच मनावर घेतलं नाही, तर हे प्रकार पुढं गंभीर स्वरुप धारण करतील आणि प्रवाशांच्या जीवावरही बेतू शकतील, एवढाच सावधानतेचा इशारा मला या निमित्तानं द्यावासा वाटतो.
ता.क. : मी माझ्या डोक्याशी घेतलेल्या सॅकमध्ये माझा `आऊटडेटेड` का असेना, पण लॅपटॉप होता. एखाद्या लुटारूनं माझ्या डोक्यात दांडकं हाणलं असतं तर जीव वाचवण्यासाठी माझी बॅग त्याच्या ताब्यात देण्यापलिकडं मी काही करू शकलो नसतो. रेल्वेतून उतरल्यावरही `लॅपटॉप गेला तरी हरकत नाही, पण जीव वाचला` असाच आनंद व्यक्त केला असता. रेल्वे पोलिसांकडं जाण्याचा विचारही केला नसता. ते तरी बिचारे काय करू शकणार होते? पण ते जर काही करू शकले असते, तर साईड बर्थच्या `इंटरेस्टींग` चेहऱ्यावरचं हसू निश्चित परत आणू शकले असते!
(वाचक मित्रांना सूचना : विषय फुलवण्याच्या दृष्टीनं विशेषणं वापरली असली तरी आशय मात्र शंभर टक्के खरा आहे, बरं!)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा