(सोन्याचा दिवस : 2)
(हा लेख वाचण्यापूर्वी शुक्रवार, दि. 6 मे 2011 रोजी अपलोड केलेला 'सोन्याचा दिवस' हा लेख वाचावा. त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
http://priydarshan.blogspot.in/2011/05/blog-post_06.html)
आज पुन्हा अक्षय्य तृतीया… गेल्या वर्षी या दिवशी मी केवढा खूष होतो. पण आज वर्षानंतर माझा प्रिय मित्र प्रशांत आंबोले याच्या आठवणीनं दुःखाचा उमाळा दाटून येतो आहे. अक्षय-तृतीया ते अक्षय तृतीया… हा एक वर्षाचा कालावधी फारसा काही मोठा नसला तरी गेल्या वर्षी माझा मित्र (हयात) होता.. तो आनंदात होता… मात्र आज एक वर्षानंतर तो आपल्यात नाहीय.. आणि मी दुःखात आहे.
गेल्या वर्षी या दिवशी प्रशांतनं मला त्याचं (दुसरं) लग्न ठरल्याची बातमी दिली आणि त्याच्या आयुष्यातल्या संघर्षाला आता तरी पूर्णविराम मिळेल आणि त्याचं उर्वरित आयुष्य सुखात जाईल, या विचारानं मी आनंदून गेलो होतो. पण, नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. आम्हा दोघांवर ती अधिक खदखदून हसत होती. मला मात्र त्याची काहीच कल्पना नव्हती.
प्रशांतचं लग्न ठरल्याप्रमाणं झालं. माझ्या सर्व मित्रांनीच पुढं होऊन त्याचं लग्न लावून दिलं. सांगावकर बंधूंचं योगदान त्यामध्ये अधिक महत्वाचं होतं. जयू, गजा, संतोष, बबलू अशा सर्वांनीच प्रशांतचं भलं व्हावं, म्हणून कोणतीही परतफेडीची अपेक्षा न ठेवता लग्नाच्या जेवणासह सर्व खर्च केला. त्या सर्वांच्या पत्नी सुद्धा प्रशांत भाऊजीच्या लग्नात नुसत्या सहभागीच झाल्या नाहीत, तर घरचं कार्य असल्यासारखं सर्व कामं पुढाकार घेऊन केली. सर्वांची एकच भावना होती की, प्रशांतचं भलं व्हावं. त्या लग्नाला मी जाऊ शकलो नाही, पण आई, बाबा आणि भाऊ अनुप आवर्जून सहभागी झाले.
त्यानंतरच्या रविवारी मी घरी गेलो, तेव्हा प्रशांतला त्याच्या नूतन पत्नीसह घरी जेवायला बोलावलं. त्यावेळी, प्रशांतनं माझ्यावर बॉम्बच टाकला. तो म्हणजे, त्याच्या या नव्या पत्नीला पूर्वीच्या विवाहातून दोन-तीन वर्षांची एक मुलगी होती. काहीतरी कारणानं पहिल्या नवऱ्याशी फारकत घेऊन ती माहेरीच राहात होती. प्रशांतनं तिच्या मुलीसह तिला स्वीकारण्याएवढं मन मोठं केलं होतं. हे त्यानं मला आधी सांगितलं नव्हतं. पण, आता ही गोष्ट समजल्यानंतर मात्र माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. "तू एक अतिशय धाडसी निर्णय घेतला आहेस. दुसऱ्याच्या मुलाचं पितृत्व स्वीकारण्यासाठी फार मोठं काळीज असावं लागतं. पण तू आता निर्णय घेतलाच आहेस, तर तो निभावण्याचं बळ तुला लाभो," असं मी त्याला स्पष्ट सांगितलं.
जेवणानंतर त्याच्या बायकोलाही प्रशांतनं आजवर सोसलेल्या यातना, त्याच्या आईच्या आजारपणाचं गांभिर्य आणि त्या दोघांच्या दृष्टीनं असलेलं तिचं महत्त्व व जबाबदारी या दोन्ही गोष्टींबद्दल अगदी पोटतिडकीनं समजावून सांगितलं. एक मुलगी होऊनही ती तशी अल्लडच वाटली. त्यामुळं माझ्या मनातली शंका आणखीच दाट झाली. पण कुठंतरी आशेचा किरण होताच!
पुढच्या वेळी गावी गेलो, तेव्हा प्रशांतच्याच रिक्षातून घरी निघालो होतो. वाटेत, त्यानं भाजीपाला विकत घेतला. मनात म्हटलं, पठ्ठ्याच्या संसाराची 'रिक्षा' चांगली मार्गाला लागलेली दिसतेय. तो आनंदातही दिसला.
मात्र, हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. महिना- दीड महिन्यानंतर पुन्हा एकदा काही कारणानं मी गावी गेलो, तर तेव्हा मला बबल्या भेटला. प्रशांतच्या घरी बायकोशी कुरबुरी सुरू झाल्याचं त्यानं सांगितलं. मी प्रशांतला भेटलो, त्याला थेटच विचारलं, काय झालं ते सांग, म्हणून. ब्रेन हॅमोरेजनं आंधळ्या-लुळ्या झालेल्या त्याच्या आईला ती अजिबातच पाहात नव्हती. प्रशांत घरातून बाहेर पडण्यापूर्वी तिचं सारं आवरत होताच. पण तो रिक्षा घेऊन बाहेर पडल्यापासून ते संध्याकाळी जेवायला परतेपर्यंत आईकडं अजिबातच लक्ष दिलं जात नव्हतं- तिचं खाणं, पिणं, औषधपाणी आणि स्वच्छता- कशाकशाकडंही! आईचं बोलणंही अस्पष्ट झाल्यानं घशातून चित्रविचित्र आवाज काढून ती काही सांगायचा प्रयत्न करायची, पण सून अजिबात ऐकतच नव्हती. एकदा तर वैतागून तिनं सासूच्या कमरेतच लाथ घातली. ही गोष्ट प्रशांतला समजली मात्र, त्याच्या मनानं पुन्हा हाय खाल्ली.
आईसाठी म्हणून पुन्हा लग्न करायचा निर्णय घेतल्याचा त्याला पश्चाताप होऊ लागला होता. बायकोला समजून सांगायचा प्रयत्न त्यानं केला तरी ती काही ऐकतच नव्हती. तिच्याबद्दलच्या आपुलकीचा प्रशांतच्य मनातला झरा आपोआप आटू लागला. त्याचा स्वभाव हा कधी मनमोकळं बोलण्याचा नव्हताच. पुन्हा मनातल्या मनात कुढणं सुरू झालं. पुन्हा त्याची पावलं ड्रिंक्सकडं वळू लागली. बबल्याचे अधूनमधून फोन यायचे. मी फोनवरुनच प्रशांतची समजूत काढायचा प्रयत्न करायचा. पण सारं व्यर्थ ठरत होतं. 'तुझ्या बायकोला आपण माघारी पाठवू; मात्र, तू स्वतःला सावर,' इथंपर्यंत समजावून सांगितलं. पण विकल हसण्यापलिकडं त्याच्याकडून काहीच प्रतिसाद नव्हता.
दि. 29 सप्टेंबर 2011… सायंकाळी साडेसहा-पावणेसातचा सुमार असेल… मंत्रालयात माझ्या ऑफिसमध्ये बसून मी एक भाषण तयार करत होतो. एवढ्यात माझा भाऊ अनुपचा फोन आला. तो निपाणीपासून जवळच असलेल्या शेंडूरला त्याच्या मित्राकडं गेला होता. तिथनंच तो बोलत होता. "दादा, अरे प्रशांतदादानं घरात कोंडून घेऊन फास लावून घेतलाय म्हणे. मला नितीनचा आताच फोन आला होता." अनुपचा स्वर रडवेला झाला होता. मी त्याला म्हटलं, "घाबरु नको. तसं काही नसेल. तू लगेच तिकडं जा आणि नक्की काय झालंय ते मला सांग. टेन्शन घेऊ नको." अनुपला तसं सांगत असताना, माझ्या मनाची घालमेल मात्र प्रचंड वाढली होती.
कसंबसं भाषणाचा मजकूर मी पुढं रेटत राहिलो. पंधरा ते वीस मिनिटांतच अनुपचा पुन्हा फोन आला. "दादा, आपला प्रशांतदादा गेला रे.." असं मला सांगतानाच त्याला रडू आवरेना. आता त्याला मी आवरणार तरी कसा होतो? प्रशांतही त्याला माझ्याइतकाच प्रिय होता. अशा प्रिय व्यक्तीनं घरातल्या पंख्याला गळफास लावून घेतल्याचं भीषण दृष्य जर त्याला खिडकीतून दिसलं असेल तर सावरणं कदापि शक्य नव्हतं. तरीही मी त्याला विचारलं, "काही आशा आहे का रे?" "दादा, सगळं संपलंय रे…" माझ्या मनातली उरलीसुरली आशाही संपली. अंगातलं त्राणच संपलं. बसल्या जागी मी सुन्नबधीर झालो. किती तरी वेळ मी तसाच बसून होतो. भाषणावर यांत्रिकपणे अखेरचा हात फिरवला. पीएसना फोन केला. त्यांना परिस्थिती सांगितली आणि त्यासाठी गावी जात असल्याचं सांगितलं. आता एकच आशा होती, मित्राच्या 'अंत्यदर्शनाची'! ट्रॅव्हलवाल्या मित्राला फोन करून एक जागा ठेवायला सांगितली आणि निघालो. दरम्यानच्या काळात घरी बाबा, अनुप आणि इतर मित्रांशीही बोलणं सुरू होतं. या अखेरच्या क्षणीही पुन्हा सांगावकर बंधू धावून आले. त्यांच्या दबदब्यामुळं पंचनामा, पोस्ट मॉर्टेम या गोष्टी पटापट पार पडल्या आणि रात्री साडेबाराच्या सुमारास मला बाबांचा फोन आला- अंत्यसंस्कार झाल्याचं त्यांनी सांगितलं. दुसऱ्या दिवशीच राख सावरण्याचा कार्यक्रम ठेवला होता. मित्राचं अंत्यदर्शन नसलं तरी त्याची राख पाहावी लागणार होती मला!
सकाळी घरी पोहोचलो. सकाळी साडेआठची वेळ ठरली होती, पण प्रशांतचं दुर्दैव पाहा. त्याच्या भाच्यानं जाऊन पाहिलं, तर प्रेत व्यवस्थित जळालेलं नव्हतं. त्यामुळं पुन्हा चिता पेटवावी लागली. आयुष्यभर जळल्यानंतर मेल्यावरही दोनवेळा जळणं, माझ्या मित्राच्या नशिबी आलं होतं.
स्मशानात गेलो, राख अजूनही धुमसत होती. प्रशांतनं ज्यांच्यावर आणि ज्यांनी त्याच्यावर जिवापाड प्रेम केलं, असे त्याचे सारे मित्र या वेळी त्याच्या राखेभोवती गोळा झाले होते. आतल्या खोलीत आपल्या मुलानं फास लावून आत्महत्या केली आहे, याची बाहेरच्या खोलीत असलेल्या त्याच्या अधू आईला काहीच कल्पना नव्हती. बाहेरचं काहीच तिच्या आतपर्यंत पोहोचत नव्हतं. ज्या आईसाठी प्रशांतनं आयुष्यभर आटापिटा केला, त्या आईला आपला मुलगा गेल्याचं समजलंच नव्हतं, हे सुद्धा माझ्या मित्राच्या नशिबी आलेलं आणखी एक प्राक्तन! त्याची बहीण आणि भाचा, नात्यामुळं केवळ पर्याय नव्हता, म्हणून तिथं उपस्थित होते, इतकंच. स्मशानातल्या विधी दरम्यान, त्याच्या बायकोनं बांगड्या फोडायला नकार दिला. तिला सक्ती करण्यात काहीच अर्थ नव्हता. आमचा मित्र गेला आणि आमच्या दृष्टीनं सारंच संपलं होतं. अक्षयतृतीयेपासून प्रशांतच्या आयुष्यात आलेल्या त्या मुलीनं त्याला त्या वर्षीचा दसराही पाहू दिला नव्हता, असं माझ्या मनानं घेतलं. दोन सोन्याच्या दिवसांदरम्यान माझा मित्र होत्याचा नव्हता झाला होता.
माझ्या मुलाच्या बारशाच्या नियोजनात त्याला महत्त्वाची जबाबदारी पार पाडायची होती. अनुपनं त्याच्या मृत्यूच्या दिवशीच त्याला ही गोष्ट सांगितली होती. प्रशांत अनुपशी, बबलूशी दुपारी बोलला होता आणि सायंकाळी घरी जाऊन शांत चित्तानं त्यानं आत्महत्या केली होती. एका शब्दानंही कुणाला काही बोलला नव्हता. कदाचित, त्यानं मला फोन केला असता तर.. मी त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न तरी केला असता. पण, या जर - तर ला काहीच अर्थ नसतो.
माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक घटना, घडामोडींचा, माझ्या पहिल्या लेखाचा, कथेचा, कवितेचा, कादंबरीचा, प्रेमाचा, प्रेमभंगाचा, पहिल्या नंबरचा, विजयाचा, पराजयाचा अशा सर्वच गोष्टींचा साक्षीदार असलेला प्रशांत आज माझ्यासोबत नाही. एखादा लेख लिहिताना त्याचं पहिलं वाचन करणारा प्रशांत आता नाहीय, ही कल्पनाच सहन होत नाही. आजही निपाणी स्टॅन्डवर पोहोचण्यापूर्वी "आहेस का स्टॅन्डवर?" असं त्याला विचारण्यासाठी माझा हात मोबाईलकडं जातो. मग अचानक, प्रशांत आता आपल्याला कधीही पिकअप करणार नाही, ही गोष्ट लक्षात येऊन मी स्टॅन्डला उतरून रिक्षा स्टॉपकडं न जाता सरळ चालायला सुरवात करतो.
प्रशांतचा मृत्यू म्हणजे भीमराव पांचाळे यांच्या गझलेतल्या 'जगण्याने छळले होते, मरणाने सुटका केली', या जळजळीत वास्तवाचं प्रत्यंतरच ठरला. प्रशांतनं त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रश्नाला आपल्या आत्महत्येनं एक 'मास्टर' उत्तर देऊन टाकलं होतं. त्याच्यापुरते सारे प्रश्न सुटले होते; नव्हे, मागच्यांचेही कित्येक प्रश्न त्यानं जाता जाता सोडविले होते. आता ताईला त्या संपूर्ण घराचा ताबा मिळेल, आई मरेपर्यंत तिला ती पाहील, बायकोला पुन्हा माहेरी जाऊन पुढचा निर्णय घेण्यासाठी मोकळीक, भाच्याला कायमस्वरुपी रिक्षा, असे किती तरी प्रश्न सुटले होते. त्यामुळं आता त्याच्या जाण्याचं कुणाला दुःख वाटण्याचंही कारण नव्हतं.
त्या दिवशी स्मशानातून परत फिरल्यानंतर गेल्या आठ महिन्यांत आजतागायत मी प्रशांतच्या घरी गेलेलो नाही. जाण्याचं कारणच संपलं होतं. परवा आत्याच्या घरून स्कूटरवर परतताना वाटेत त्याचं घर लागलं. भर ग्रीष्मातल्या दुपारी आभाळ भरून आलं आणि पावसाचे टपोरे थेंब माझ्या अंगावर पडले. जणू, प्रशांत मला त्याच्या आईचा हालहवाला विचारण्यासाठी जायला सुचवत होता. मी मनातल्या मनात त्याची माफी मागितली. माझ्या मित्राचा काळ ठरलेल्या त्या घरात पाऊल न ठेवण्याचा माझा निश्चय मी मोडणार नाही, असं त्याला स्पष्ट बजावलं. पावसाची तीव्रता वाढली. घरी पोहोचेपर्यंत चिंब भिजलो होतो- वरुनही आणि आतूनही!

बापरे, किती भयानक आहे हे. देव तुमच्या मित्राच्या आत्म्यास शांती देवो :(
उत्तर द्याहटवाखरंय इंद्रधनू. आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
हटवा