My Father: Dr. N.D. Jatratkar |
आज एक जून… माझ्या बाबांसह
त्यांच्या पिढीतील कित्येक लोकांची ऑन रेकॉर्ड जन्मतारीख.. शिक्षणाच्या प्रवाहात
नव्यानं सामील झालेल्या, देशातल्या पहिल्या पिढीचे हे खंदे शिलेदार.. अडाणी,
मोलमजुरी करून जगणाऱ्या गरीब आईबापाच्या पोटी जन्मलेल्या या पोरांना आणि त्यांच्या
आईबापाला किंवा त्यांनाही कधी आपली जन्मतारीख नोंद करून ठेवावी, असं वाटलं नाही
किंवा त्यांना त्यापूर्वी त्याची गरजही भासत नसे. यातली दुसरी गोष्ट अशी की,
आरोग्याबद्दलच्या जाणीवांविषयी अज्ञान, आरोग्य सुविधांची वानवा, पैशांची चणचण आणि
डॉक्टरकडं जाण्याची भिती या कारणांमुळं मुलं जगण्याचा दरही कमी होता. चार-चार,
पाच-पाच वर्षांची मुलंही छोट्या-मोठ्या आजारांनी दगावत. माझ्या वडलांची मोठी
भावंडंही अशी चार-सहा वर्षांची होऊन दगावली. शेवटी नवसानं जगलेल्या (अशी आजीची
भावना!) माझ्या वडलांना आजीनं अगदी तळहातावरच्या फोडासारखं जपलं.
अशा परिस्थितीत कोण कशाला
मुलांच्या जन्माच्या नोंदी करत बसेल? पण या पिढीला शिक्षणाची संधी मिळाली.
त्यांच्या गावातले गुरूजी, गावात फेरफटका मारून जी मुलं इकडंतिकडं नुसतीच खेळत
किंवा उनाडक्या करत बसत, त्या मुलांना कधी हटकून, तर कधी बखोटीला पकडूनच शाळेत
घेऊन जात. अशी मारुन मुटकून मिळालेली ही संधी असली तरी ती किती मोलाची होती, याची
जाणीव ज्यांना झाली, त्यांनी शिक्षणाची कास कधीही सोडली नाही आणि शक्य तेवढी
प्रगती साधली. ज्यांना झाली नाही, त्यांचंही काही नुकसान झालं नाही. शिक्षकांच्या
दबावाखाली जितकं शिकले, तितका त्यांचा फायदाच झाला. असो! विषय जन्मतारखेच्या
नोंदींचा होता. जी मुलं शाळेत ज्या वर्षी दाखल करून घेतली जात, त्याच्या आधी
अंदाजे पाच सहा वर्षं वजा करून त्यांच्या जन्माचं वर्ष शाळेच्या रेकॉर्डमध्ये
नोंदलं जाई; सर्वांची जन्मतारीख मात्र असे- 1 जून! (शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस!)
ह्या जन्मतारखेला अनुसरूनच या
विद्यार्थ्यांचं पुढचं प्रत्येक रेकॉर्ड निर्माण होत गेलं. माझे बाबा, दोन
वर्षांमागं रिटायर सुद्धा त्याच अनुषंगानं झाले. म्हणजे त्यांनीही ते रेकॉर्ड
ॲक्सेप्ट केलं, असं म्हणता येईल. (दुसरा पर्याय तरी कोणता होता?) मात्र, साधारण
सात-आठ वर्षांपूर्वी एक असा प्रसंग घडला की, आम्ही त्यांची अस्सल जन्मतारीख
शोधण्याच्या अगदी जवळपास पोहोचलो, म्हणजे अगदी पुराव्यानिशी, मात्र आम्हाला त्यात
सपशेल अपयश आलं आणि आमची मोठी निराशा झाली, त्याची ही कथा!
तसं, माझ्या आजीच्या सांगण्याप्रमाणं,
‘गांधीबाबाला मारलं त्येच्या फुडच्या सालात, आखितीनंतर दोन मासानं आवशेनंतर
चार-पाच रोजानं’ असा कधी तरी माझ्या बाबांचा जन्म झाला. तिच्या माहितीवरनं जन्मसाल
1949 एवढं फिक्स झालं तरी तारीख-महिना शोधायच्या नादाला काही आम्ही लागलो नव्हतो.
पण, एकदा उन्हाळ्याच्या सुटीत आम्ही सवयीप्रमाणं स्टोअर रूममध्ये जुनी कागदपत्रं,
मासिकं असं सॉर्टिंग करत होतो. काही रद्दी करावी आणि महत्त्वाची जपून ठेवावी, असा
हेतू होता. त्याचबरोबर लगे हाथों, बाकीचंही साहित्य तपासत होतो. (अशाच एका मोहिमेत
मला बाबांचा मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनामधला ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या
पहिल्या पानावर छापून आलेला फोटोही सापडला होता.) या वेळी बाबांच्या हाती माझ्या
आजोबांचे काही दस्तावेज असलेला एक छोटा बॉक्स आला. तो त्यांनी जपून ठेवला होता.
पण, मी त्यातली कागदपत्रं पाहण्याचा हट्ट धरला. बाबांनीही अलगद उघडून मला एकेक
कागद दाखवायला सुरवात केली. त्यात आजोबांच्या मोडी हस्ताक्षरातली एक पानं पिवळी
पडलेली पॉकेट डायरीही होती. आजोबांचं मोडी हस्ताक्षर अतिशय सुरेख होतं. त्या डायरीत कित्येक नोंदी होत्या. आजोबा बँड
पथकात कलाट (क्लॅरोनेट) वाजवायचे. कंत्राटंही घ्यायचे. बहुतेक नोंदी त्याच्याशी
संबंधितच होत्या. कुणाकडून रुपाया ॲडव्हान्स घेतल्याच्या, साथीदारांना त्यांचा वाटा
दिल्याच्या, तर कुणाकडून पावली उसनी घेतल्याच्या तर कुणाची उधारी भागवल्याच्याही
नोंदी त्यात होत्या. त्यावेळी त्यातली एक तारीख पाहून अचानक एक गोष्ट माझ्या
लक्षात आली की ती डायरी बाबांच्या जन्माच्या वर्षाचीच होती. मग आम्ही अगदी एकेक
पानावरच्या नोंदी बारकाईनं पाहायला सुरवात केल्या. पानापानाला आमची अधीरता वाढत
होती. कुठंतरी आजोबांनी अगदी पानाच्या कोपऱ्यात का असेना, काही तरी लिहून ठेवलं
असेल, असं अगदी शेवटचं पान पलटेपर्यंत वाटत राहिलं. पानागणिक बाबांची आणि माझी,
अशी दोघांचीही अस्वस्थता वाढत गेली. डायरीत आम्हाला अगदी विडीकाडीचा, चुरमुऱ्याचा अगदी
पै-पै चा हिशेब पाहायला मिळाला, पण आम्हाला हवी असलेली नोंद मात्र मिळाली नाही. या
क्षणी डोळ्यांत पाणीच येणं बाकी राहिलं. कधीही उद्विग्न न होणारे माझे बाबाही
म्हणाले, ‘काय बघ आमचा बाबा! बिडीचा सुद्धा हिशोब ठेवणाऱ्या या माणसाला एवढं
लिहायला येत असूनही एक तारीख लिहायचं जमलं नाही.’ आणि आम्ही जड अंतःकरणानं ती
डायरी त्या पेटीत पुन्हा बंदिस्त केली. हा प्रसंग माझ्या मनाच्या कोपऱ्यात कायमचा
बंदिस्त होऊन गेला. दर एक जूनला त्या प्रसंगाची आठवण झाल्याखेरीज राहात नाही. आणि
त्याचवेळी माझ्या बर्थ सर्टिफिकेटच्या फाइलमध्ये मागच्या पॉकेटमध्ये सापडलेल्या
चिठोऱ्यावर बाबांच्या सुंदर हस्ताक्षरात लिहिलेली माझी जन्मतारीख आणि अगदी
जन्मवेळेचाही मला उलगडा होतो.
बाबांची जन्मतारीख न सापडल्यानं
फारसा काही फरक पडला नाही, पण सापडली असती तर निश्चितपणे पडला असता. मनुष्यामध्ये
आपल्या मुळांचा शोध घेण्याची प्रवृत्ती अगदी
जन्मजात असते. प्रत्येक जण आपापल्या परीनं हा शोध घेत असतो. या शोधाच्या वाटा
वेगवेगळ्या असतात. कुणाचा धार्मिक, कुणाचा आध्यात्मिक, कुणाचा शास्त्रीय, कुणाचा
सामाजिक, कुणाचा मानववंशशास्त्रीय तर कुणाचा सांस्कृतिक! असा प्रत्येकजण या
मुळाचा, स्वत्वाचा, ‘को अहं’चा शोध घेतच असतो. आम्ही आमच्या वैयक्तिक पातळीवर तो
घेण्याचा प्रयत्न केला. निश्चितपणे तो भौतिक स्वरुपाचा होता, पण त्यातून आम्हाला मिळणारा
आनंद हा अवर्णनीय स्वरुपाचा असता. पण, तसं झालं नाही. यात आम्हाला आजोबांना दोष
देण्याचं काही कारणही नाही. मुलाचा जन्म ही काही त्या काळात फार काही मोठी
साजरीकरणाची बाब नव्हती. एक नैसर्गिक किंवा नित्याची सांसारिक बाब म्हणून त्यांनी
त्या गोष्टीकडं पाहिलं असेल. असं पाहणारे त्या काळातले ते काही एकटेच नव्हते.
म्हणून तर रेकॉर्डवर एक जून हा वाढदिवस असणाऱ्या सर्वाधिक व्यक्ती आपल्या देशात
आहेत. त्या सर्वांचंच त्यांच्या वाढदिवसाबद्दल मनःपूर्वक अभिष्टचिंतन!
Great ALOK....! Gahivarun gelo.....! BABAns Vsdhsdivsachya kokoti koti shubhechha...! Wish You all the best...!
उत्तर द्याहटवाबाबांच्या वतीनं आपल्या शुभेच्छांचा मी नम्रपणे स्वीकार करतो. धन्यवाद!
हटवाइंटरेस्टिंग... तुमच्या शोध मोहिमेला सलाम. आणि हो, बाबांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा...
उत्तर द्याहटवा- सुनील घुमे
धन्यवाद सुनील. मनापासून आभार!!
हटवाव्वा आलोक.. आतापर्यंत तू अनेक फर्स्टपर्सन लिहीली असशील हे मात्र.. बेस्ट ऑफ द बेस्ट किंवा याहून सुंदर नाहीच...क्या बात है.. आमच्या काकांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा...योगायोग म्हणजे माझ्या आई-वडीलांचा आज लग्नाचा पन्नासावा वाढदिवस..
उत्तर द्याहटवाअजय, मित्रा मनापासून धन्यवाद! तुझ्या आई-वडिलांचेही सुवर्णमहोत्सवी अभिनंदन आणि शतकमहोत्सवासाठी शुभेच्छा!
हटवाअलोक,
उत्तर द्याहटवासर्वात प्रथम सरांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!!
माझ्या वडिलांचीही कागदोपत्री नोंद असलेली जन्मतारीख ‘१ जुनच’ आहे... पण तुझ्यासारखेच ४-५ वर्षांपूर्वी त्यांची जुनी पेटी चाळत असताना माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांची जन्मानंतर लगेचच बनविलेली व मोडीलिपीत लिहिलेली जन्मकुंडली सापडली. त्यावर त्यांची जन्मतारीख होती..”२२ फेब्रुवारी १९४८” सर्वांनाच खूप आनंद वाटला. तेंव्हापासून आम्ही त्यांचा वाढदिवस २२ फेब्रुवारीलाच साजरा करतो...
व्वा! शंतनू!! तुझा आनंद अगदी स्वाभाविक आहे. खरं सांगू, तुझा हा किस्सा ऐकला आणि बँकेत किंवा घरी भेटणारे दाढीधारी आणि सदैव हसतमुख काका जसेच्या तसे डोळ्यासमोर आले. तुझं अभिनंदन आणि धन्यवाद!
हटवाप्रिय अलोक,
उत्तर द्याहटवासर्वप्रथम काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा....
मित्रा खूप छान ... खूपच छान... १ june आणि असंख्य जन्म तारखा हा विषय मलाही नेहमीच भुरळ घालत होता ..म्हणूनच या विषयावर काहीतरी लिहावं असा विचार आजच सकाळी डोक्यात आला होता ... सकाळीच या विषयावर चर्चा करत होतो आणि आता तुझा ब्लॉग वाचून बरं वाटलं... तुझ्या कडे सांगण्यासारख बरंच काही होत... खूप सहज आणि एकदम इंटरेस्टिंग अश्या पद्धतीनं तू या तारखेची गम्मत तर सांगितलीच शिवाय त्यामागचं सामाजिक विश्लेषण हि खूप छान मांडलस .... खूप छान मित्रा ... keep it up ....
कमलेश मित्रा,
हटवातुम्हासारख्या मित्रांच्या सदिच्छा आणि सहकार्य या बळावरच काही लिहिण्याचं आणि शेअर करण्याचं धाडस करतोय. आपल्या प्रेमाची साथसंगत अशीच राहो, ही कामना. हो, आणि शुभेच्छांबद्दल बाबांच्या वतीनं धन्यवाद!
बाबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बाबांना खरी जन्मतारीख माहीत नाही, याची खंत वाटण्याची गरज नाही. इतिहास, भूगोल, काळ, वेळ प्रगतीच्याआड येत नाही, हेच खरे आहे. त्यासाठी बाबांना लाख लाख सलाम.
उत्तर द्याहटवाजगदीश मोरे
खरंय, जगदीश. पण खंत जन्मतारखेची नाहीयेच मुळी. शोधाच्या इतक्या जवळ जाऊनही पदरी आलेल्या अपेक्षाभंगाचं ते खरं दुःख आहे. धन्यवाद!
हटवाbhava, tuze mhanne agadi 100% khare ahe. vishesh bab mhanje mazi kagdopatri birth date 1 june ahe. ani tyathi mahtvache mhnje mala 6,7 varshapurvi mazya babachi ashich ek dairy sapdali hoti. tyat mazya jnmachi node hoti 19 sept. tavvhapasun yach divshi birthday sajara karto.
उत्तर द्याहटवाpan mahapalikcha shalet node 1 june aslyne tich saglikade laglai ahe.
aso tuzya lakhamule ya gostila uajala milala
जमीर, तुझा किस्सा ऐकून खरंच बरं वाटलं. तुला त्यावेळी काय वाटलं असेल, याचा मी निश्चित अंदाज लावू शकतो. त्या क्षणाच्या जवळ जाऊन मी परत फिरलो आहे. तुझी आठवण शेअर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद!
हटवाबाबांच्या जन्माची कहाणी......सुंदर...हृद्यस्पर्शी........खर तर भारतात १ जून हा फादर्स दे म्हणून साजरा करण्याची सुरवात करायला हवी,....अस हा लेख वाचल्यानंतर वाटत............
उत्तर द्याहटवाबाबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...
निलेश बनसोडे
सर, आपल्या प्रेमळ प्रतिक्रियेबद्दल आणि शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
हटवा