राजेश खन्ना
गेला.. गेले काही दिवस ज्या पद्धतीनं हॉस्पिटलमधून घरी आणि घरातून हॉस्पिटलमध्ये..
असं जे त्याचं चाललं होतं.. त्यावरुन हे आज ना उद्या होणार.. याची अटकळ मनाशी
होती. काल मृणालताई गोरे गेल्या.. त्यावेळी भुजबळ साहेबांचा शोकसंदेश तयार करत
असताना (खोटं कशाला सांगू? मन चिंती ते वैरी न चिंती!) राजेश खन्नाचाही संदेश कधी
करावा लागतो, देव जाणे! असा विचार मनात चमकून गेला होता. आणि आज दुपारीच मित्र
सुनील माने यांचा मेसेज आलाच. अतिशय वाईट वाटलं.
आमची दूरदर्शनच्या युगात वाढलेली
पिढी असल्यामुळं रविवारच्या संध्याकाळी जो कुठला असेल, तो चित्रपट पाहायचा, असा
प्रघातच (म्हणजे आईबाबांनी रागावलं तरी पिक्चर बघितल्याशिवाय सोडायचा नाही, असा,
खरं तर!) होता. तेव्हा राजेश खन्नाचा पिक्चर दूरदर्शनवर लागणं म्हणजे मोठी चैन आणि
क्रांतीच वाटायची. राजेश खन्नाचे कित्येक, नव्हे बहुतेक चित्रपट मी दूरदर्शनवरच
पाहिले. हेमा मालिनी आणि त्याच्या ‘अंदाज’मधल्या ‘जिंदगी एक सफर है सुहाना..’ या
गाण्यानं तर मनावर मोहिनीच घातली होती तेव्हा! राजेश खन्नाचा त्या बाईकवरचा
‘अंदाज’ खरोखरच अतिशय अपिलींग होता. अमर प्रेम, आराधना, आप की कसम यातली त्याची
विविध रुपंही मनाला भिडणारी होती. वय लहान असल्यामुळं मोठं झाल्यावर आपणही असंच
हिरो व्हायचं, असंही कुठंतरी वाटायचं. पण, राजेश खन्नाच्या मी प्रेमात पडलो ते दोन
कारणांनी. पहिलं म्हणजे मला गाण्याचा अतिशय नाद. त्यात किशोरदा फारच आवडीचे. आणि
किशोरदा म्हटलं की सगळ्यात जास्त देव आनंद आणि राजेश खन्नाची पॉप्युलर प्लस
सुपरहिट गाणी! त्यामुळं किशोरकुमारसाठी पहिल्यांदा ‘हिट्स ऑफ देव आनंद’ आणि ‘हिट्स
ऑफ राजेश खन्ना’ या (‘टी-सिरीज’च्या विथ झंकार बिट्स) कॅसेट्स मी घरी आणल्या होत्या.
दोन्ही कॅसेट पुढं माझ्या दोन मित्रांनी पळवल्या. पण तोपर्यंत सारी गाणी तोंडपाठ
झाल्यामुळं त्यांची गरज नव्हती उरली. वो शाम कुछ अजीब थीं, रुप तेरा मस्ताना, मेरे
सपनों की आणि ‘कटी पतंग’मधली तर जवळ जवळ सर्वच गाणी ही एकदम ‘क्लोज टू हार्ट’ आहेत
माझ्या.


राजेश खन्ना त्याच्या आजारपणाखेरीज
अलिकडं चर्चेत आला, तो दोन कारणांसाठी! एक तर खून करण्यात आलेली अभिनेत्री (?)
लैला हिनं त्याच्यासोबत ‘वफा’ या चित्रपटात काम केलं होतं. त्यामुळं न्यूज
चॅनल्सवरील तिच्या स्टोरीमध्ये ‘वफा’मधील राजेश खन्ना सोबतची तिची दृश्यं दाखवली
जात होती. दुसरं कारण म्हणजे, बऱ्याच दिवसांनंतर तो एका पंख्याच्या जाहिरातीमध्ये
झळकला. सुरकुतलेला दाढीधारी आणि लक्षात येण्याइतपत कृश झालेला राजेश खन्ना जेव्हा
त्या पंख्यांच्या खोलीमध्ये येऊन म्हणतो, ‘फॅन क्या होता है, ये मुझसे पुछिए!’
त्यावेळी त्याचं आवाहन अपील होण्याऐवजी डोळ्यात टचकन पाणीच येतं. खरंय त्याचं
म्हणणं! त्याच्या एका दर्शनासाठी देशभरातून तरुण-तरुणींचे तांडेच्या तांडे
त्याच्या मुंबईतल्या बंगल्याबाहेर रात्रंदिवस ताटकळत उभे राहायचे. त्याचा स्पर्श
झाला, तर मग विचारुच नका. त्यानं आपल्या फोटोला सिंदूर लावून पाठवावा, म्हणून
त्याच्याकडं दररोज हजारो तरुणींचे फोटो यायचे. पश्चिमेत मायकल जॅक्सनचं युग
अवतरण्यापूर्वीच ‘हिस्टेरिया’ काय असतो, याचं प्रत्यंतर राजेश खन्नाच्या रुपानं
भारतानं आधीच अनुभवलं होतं. चित्रपटसृष्टीतल्याही कित्येक नायिका त्याच्यासाठी
झुरायच्या. राजेश खन्नासोबत आपली गॉसिप कॉलममध्ये चर्चा व्हावी, यासाठी त्यांचे
प्रयत्नही चालायचे. इतकं प्रचंड फॅन फॉलोविंग असलेल्या राजेश खन्नाला उतरतीच्या
काळात सावरणं मात्र जमलं नाही. त्यानं ती घसरण स्वीकारलीच नाही. तो आपल्याच
प्रेमात राहिला, तो आपल्याच स्टाइलमध्ये राहिला, आपल्याच धुंदीत राहिला. बऱ्याच
काळानं सावध झाल्यावर त्यानं राजकारणातही दोन हात मारुन पाहिले. पण अभिनेता
राजेशमधली ‘ग्रेस’ खासदार राजेशमध्ये येणं अभिप्रेत नव्हतं आणि ती आलीही नाही.
त्याच्या ग्लॅमरचा वापर करून घेण्याचा प्रयत्न झाला, पण तोपर्यंत ग्लॅमर राहिलं
कुठे होतं?
