राजेश खन्ना
गेला.. गेले काही दिवस ज्या पद्धतीनं हॉस्पिटलमधून घरी आणि घरातून हॉस्पिटलमध्ये..
असं जे त्याचं चाललं होतं.. त्यावरुन हे आज ना उद्या होणार.. याची अटकळ मनाशी
होती. काल मृणालताई गोरे गेल्या.. त्यावेळी भुजबळ साहेबांचा शोकसंदेश तयार करत
असताना (खोटं कशाला सांगू? मन चिंती ते वैरी न चिंती!) राजेश खन्नाचाही संदेश कधी
करावा लागतो, देव जाणे! असा विचार मनात चमकून गेला होता. आणि आज दुपारीच मित्र
सुनील माने यांचा मेसेज आलाच. अतिशय वाईट वाटलं.
आमची दूरदर्शनच्या युगात वाढलेली
पिढी असल्यामुळं रविवारच्या संध्याकाळी जो कुठला असेल, तो चित्रपट पाहायचा, असा
प्रघातच (म्हणजे आईबाबांनी रागावलं तरी पिक्चर बघितल्याशिवाय सोडायचा नाही, असा,
खरं तर!) होता. तेव्हा राजेश खन्नाचा पिक्चर दूरदर्शनवर लागणं म्हणजे मोठी चैन आणि
क्रांतीच वाटायची. राजेश खन्नाचे कित्येक, नव्हे बहुतेक चित्रपट मी दूरदर्शनवरच
पाहिले. हेमा मालिनी आणि त्याच्या ‘अंदाज’मधल्या ‘जिंदगी एक सफर है सुहाना..’ या
गाण्यानं तर मनावर मोहिनीच घातली होती तेव्हा! राजेश खन्नाचा त्या बाईकवरचा
‘अंदाज’ खरोखरच अतिशय अपिलींग होता. अमर प्रेम, आराधना, आप की कसम यातली त्याची
विविध रुपंही मनाला भिडणारी होती. वय लहान असल्यामुळं मोठं झाल्यावर आपणही असंच
हिरो व्हायचं, असंही कुठंतरी वाटायचं. पण, राजेश खन्नाच्या मी प्रेमात पडलो ते दोन
कारणांनी. पहिलं म्हणजे मला गाण्याचा अतिशय नाद. त्यात किशोरदा फारच आवडीचे. आणि
किशोरदा म्हटलं की सगळ्यात जास्त देव आनंद आणि राजेश खन्नाची पॉप्युलर प्लस
सुपरहिट गाणी! त्यामुळं किशोरकुमारसाठी पहिल्यांदा ‘हिट्स ऑफ देव आनंद’ आणि ‘हिट्स
ऑफ राजेश खन्ना’ या (‘टी-सिरीज’च्या विथ झंकार बिट्स) कॅसेट्स मी घरी आणल्या होत्या.
दोन्ही कॅसेट पुढं माझ्या दोन मित्रांनी पळवल्या. पण तोपर्यंत सारी गाणी तोंडपाठ
झाल्यामुळं त्यांची गरज नव्हती उरली. वो शाम कुछ अजीब थीं, रुप तेरा मस्ताना, मेरे
सपनों की आणि ‘कटी पतंग’मधली तर जवळ जवळ सर्वच गाणी ही एकदम ‘क्लोज टू हार्ट’ आहेत
माझ्या.
राजेश खन्ना माझा फेव्हरिट झाला,
तो ‘आनंद’ चित्रपटामुळं. घरी व्हीसीआर भाड्यानं आणून पाहण्याच्या काळात एकदा नवीन
कुठल्याच पिक्चरची कॅसेट नव्हती, म्हणून बाबांनी ‘आनंद’ची कॅसेट आणली. त्यावर
बच्चन आणि राजेश खन्नाचा जुनाट फोटो पाहून मी नाकच मुरडलं होतं. पण पिक्चर जसजसा
सुरू झाला, तसतसं मी त्यात हरवतच गेलो. राजेश खन्नाची ‘बाबू मोशाय..’ ही हाक
हृदयाला इतकी भिडली, आणि शेवटच्या टेपरेकॉर्डरची कॅसेट संपते, त्या प्रसंगात तर
तिनं इतकी उच्च स्तर गाठला की, त्यानंतर व्हीसीआर भाड्यानं आणून मी कित्येकदा हाच
पिक्चर पाहिला असेल. त्यानंतर सुद्धा केबलवर जेव्हा जेव्हा ‘आनंद’ लागला, तेव्हा
तेव्हा आणि आज सुद्धा कुठल्याही चॅनलवर ‘आनंद’ लागला असले तर माझं चॅनल सर्फिंग
पुढं सरकतच नाही. आजवर शेकडो वेळा मी ‘आनंद’ पाहिलाय आणि पुढंही पाहात राहणारच
आहे. (माझ्या http://maha-movie.blogspot.com/
या ब्लॉगमधला पहिला लेख 'आनंद मरतें नहीं।' हा मी या चित्रपटाबद्दलच लिहिला, यात आश्चर्य ते काय?) यातला
राजेश खन्ना असो की अमिताभ, ते दोघंही नंतरच्या काळातल्या त्यांच्या रुपापेक्षा
भिन्न होते, अधिक जेन्युइन होते. त्यांची स्टाइल तोपर्यंत डेव्हलप झाली नव्हती.
राजेश खन्नाच्या तिरकी मान स्टाइलचा अंकुर तसा ‘आनंद’मधल्या ‘जिंदगी कैसी है पहेली
हाय..’ या गाण्यामध्ये दिसतो. पण पुढं ही स्टाइल म्हणजेच राजेश खन्ना, असं जे काही
समीकरण झालं, त्यापेक्षा ती अधिक सहज होती.
पुढं ‘अँग्री यंग मॅन’चं रुप धारण
करत अमिताभनं राजेश खन्नाच्या चॉकलेट हिरो सुपरस्टार पदाला मोठा धक्का दिला.
काळाबरोबर असे आघात आपल्याला पचवावे लागणार आहेत, सर्वोच्च ठिकाणी पोहोचल्यावर
आपल्याला उतरतीचा प्रवासही करावा लागणार आहे, हे राजेश खन्नासारख्या सुपरस्टारला
माहिती नसेल, असं मला वाटत नाही. पण हे वास्तव त्यानं कधी स्वीकारलंच नाही. स्वीकारलं
ते खूप उशीरा- ‘अवतार’च्या वेळी; पुढं एकदम ‘आ अब लौट चले’च्या वेळी! केवळ स्वतःच्या
स्टाइलच्या प्रेमात आणि लोकप्रियतेच्या कोशात गुरफटून राहिल्यामुळं देव आनंद आणि
राजेश खन्ना या दोन महान अभिनेत्यांच्या अभिनयाचे अनेकविध पैलू पाहण्यापासून
भारतीय चित्रपटरसिक वंचित राहिले, अशी खंत मला सदोदित वाटत असते.
राजेश खन्ना त्याच्या आजारपणाखेरीज
अलिकडं चर्चेत आला, तो दोन कारणांसाठी! एक तर खून करण्यात आलेली अभिनेत्री (?)
लैला हिनं त्याच्यासोबत ‘वफा’ या चित्रपटात काम केलं होतं. त्यामुळं न्यूज
चॅनल्सवरील तिच्या स्टोरीमध्ये ‘वफा’मधील राजेश खन्ना सोबतची तिची दृश्यं दाखवली
जात होती. दुसरं कारण म्हणजे, बऱ्याच दिवसांनंतर तो एका पंख्याच्या जाहिरातीमध्ये
झळकला. सुरकुतलेला दाढीधारी आणि लक्षात येण्याइतपत कृश झालेला राजेश खन्ना जेव्हा
त्या पंख्यांच्या खोलीमध्ये येऊन म्हणतो, ‘फॅन क्या होता है, ये मुझसे पुछिए!’
त्यावेळी त्याचं आवाहन अपील होण्याऐवजी डोळ्यात टचकन पाणीच येतं. खरंय त्याचं
म्हणणं! त्याच्या एका दर्शनासाठी देशभरातून तरुण-तरुणींचे तांडेच्या तांडे
त्याच्या मुंबईतल्या बंगल्याबाहेर रात्रंदिवस ताटकळत उभे राहायचे. त्याचा स्पर्श
झाला, तर मग विचारुच नका. त्यानं आपल्या फोटोला सिंदूर लावून पाठवावा, म्हणून
त्याच्याकडं दररोज हजारो तरुणींचे फोटो यायचे. पश्चिमेत मायकल जॅक्सनचं युग
अवतरण्यापूर्वीच ‘हिस्टेरिया’ काय असतो, याचं प्रत्यंतर राजेश खन्नाच्या रुपानं
भारतानं आधीच अनुभवलं होतं. चित्रपटसृष्टीतल्याही कित्येक नायिका त्याच्यासाठी
झुरायच्या. राजेश खन्नासोबत आपली गॉसिप कॉलममध्ये चर्चा व्हावी, यासाठी त्यांचे
प्रयत्नही चालायचे. इतकं प्रचंड फॅन फॉलोविंग असलेल्या राजेश खन्नाला उतरतीच्या
काळात सावरणं मात्र जमलं नाही. त्यानं ती घसरण स्वीकारलीच नाही. तो आपल्याच
प्रेमात राहिला, तो आपल्याच स्टाइलमध्ये राहिला, आपल्याच धुंदीत राहिला. बऱ्याच
काळानं सावध झाल्यावर त्यानं राजकारणातही दोन हात मारुन पाहिले. पण अभिनेता
राजेशमधली ‘ग्रेस’ खासदार राजेशमध्ये येणं अभिप्रेत नव्हतं आणि ती आलीही नाही.
त्याच्या ग्लॅमरचा वापर करून घेण्याचा प्रयत्न झाला, पण तोपर्यंत ग्लॅमर राहिलं
कुठे होतं?
कुठल्या कुठल्या कार्यक्रमांत तो अधून मधून दिसायचा. पण तो त्याच्या
कोशातून बाहेर पडलाय, असं कधीही वाटलं नाही. अक्षय कुमारच्या एका फिल्म
प्रमोशनच्या वेळी मात्र त्यानं ‘माझ्यावर जसं प्रेम केलंत, तसंच अक्षयवरही प्रेम
करा,’ असं आवाहन चाहत्यांना केलं, त्यावेळी पुन्हा एकदा त्याच्यात मला
‘आनंद’सारखाच जेन्युइननेस दिसला. बऱ्याच काळानं खरा राजेश खन्ना दिसल्याचं समाधान
वाटलं. पण हा ‘आनंद’ आता हरपला आहे. तो प्रत्यक्ष कधीच दिसणार नसला तरी त्याच्या
कलाकृती आणि त्याची अजरामर गाणी आपल्याला चिरकाळ आनंद देत राहणार आहेत, हे
आपल्यासारख्या रसिकांचं भाग्यच आहे. शेवटी ‘आनंद’च्याच डॉयलॉगनं मी राजेश खन्नाला
श्रद्धांजली वाहतो, ‘बाबू मोशाय.... ज़िन्दगी और मौत ऊपरवाले के हाथ है जहांपनाह, उसे
ना आप बदल सकते हैं और ना मैं. हम सब रंग मंच की कठपुतलियां हैं, जिनकी डोर
ऊपरवाले की उंगलियों मे बन्धी है, कब कौन कैसे उठेगा...कोई नही बता सकता. हा.. हा.. हा..हा...’ राजेश खन्ना नावाची टेप आता संपली
आहे, पण आपण ती रिवाईंड कर-करून ती पाहिली तरी पुनःप्रत्ययाचा आनंद दीर्घकाळ
आपल्याला लाभतच राहणार आहे. आम्हा रसिकांना गीत, चित्रपट, संगीताच्या दिलेल्या
अनमोल नजराण्यांबद्दल- थँक्यू काका! गुड बाय!! हॅप्पी लास्ट जर्नी!!!
BABU MUSHAY IS NO MORE IT IS VERY SAD NEWS FOR FILM INDUSTRY INDEED !
उत्तर द्याहटवाVery True, Komalarts
हटवाWonderful Lekh. Lekha cha shevat shradhhanjali ateeshay sunder zaala aahe. Hats off to u. Aanand madhlyaach gaanya che ek kadve taakle tar lekh aan khi bahaar daar hoeel.
उत्तर द्याहटवा"Kabhi Dekho Nan nahi Jaage,
Peechhe peechhe sapno ke bhaage !
Ik din sapno ka raahi,
yun chalaa jaaye kanhaa!"
कभी देखो मन नहीं जागे,
हटवापिछे पिछे सपनों के भागे,
इक दिन सपनों का राही,
चला जाए सपनों से आगे कहाँ..!
खरंय, गुरूजी, राजेश खन्ना हा सपनों का राहीच होता आणि तो पुन्हा गेला त्यांच्या शोधात!
Best !
उत्तर द्याहटवाThank you, Sir!
हटवाअलोक,
उत्तर द्याहटवाकाय लिहावं काहीच सुचत नाही.... खरं तर तू सर्वकाही लिहल आहेसच... राजेश खन्ना गेल्याची बातमी पहिली आणि डोळ्यात टचकन पाणी आले...
भावपूर्ण श्रद्धांजली...
RIP Rajesh Khanna!
हटवालेख खूप छान आहे
उत्तर द्याहटवाराजेश खन्नांना भावपूर्ण श्रद्धांजली
-जगदीश
धन्यवाद जगदीश!
हटवा