(दैनिक 'कृषीवल'मध्ये 'निखळ' या पाक्षिक सदराअंतर्गत सोमवार, दि. २३ सप्टेंबर २०१३ रोजी प्रकाशित झालेला माझा लेख...)
एका जवळच्या पत्रकार
मित्राचा नुकताच फोन येऊन गेला. तो बीजेसी परीक्षा पास झाला होता. ही आनंदाची
बातमी शेअर करण्यासाठीच त्यानं फोन केलेला. त्याच्या या आनंदाला अनेक कारणं होती.
या परीक्षेमुळं त्याचं काही अडलं होतं, अशातला भाग नाही कारण जवळजवळ गेली १८ वर्षं
तो पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे आणि एका मोठ्या दैनिकात संपादकीय टेबलवरच्या
साऱ्या जबाबदाऱ्या तो समर्थपणे सांभाळतोय. पण आपल्याकडं पत्रकारितेची पदवी नाही,
याचा सल त्याच्या मनी होता. अधूनमधून तो तसं बोलूनही दाखवायचा. मग त्यानं
प्रत्यक्ष प्रयत्न करायला सुरवात केली. तो यंदा पास झाला असला तरी गेली पाच वर्षं
नित्यनेमानं तो परीक्षेचा फॉर्म भरायचा आणि नेमका परीक्षेच्या काळातच ऑफिसचं काही
काम निघायचं आणि तो परीक्षा देऊ शकायचा नाही. यंदा मात्र तो परीक्षेला बसला अन्
पास झाला. हे आनंदाचं एक कारण होतं.
बोलता बोलता त्यानं
आणखीही एक गोष्ट सांगितली, की ज्यामुळं खरं तर मी त्याच्या पास होण्याच्या
आनंदापेक्षा अधिक भारावलो. ती गोष्ट म्हणजे, जेव्हा त्यानं आपण पास झाल्याचं
त्याच्या वडिलांना फोन करून कळवलं, तेव्हा त्यांनी त्याचं तोंडभरून कौतुक केलंच,
पण लगोलग त्याला पाच हजार रुपयांचं बक्षीसही देणार असल्याचं जाहीर केलं. हे त्यानं
सांगताच, मी म्हटलं, क्या बात है..! मुलगा गेल्या २० वर्षांपासून चांगल्या नोकरीत आहे, पन्नासेक
हजार रुपये पगारही मिळवत असेल, अशा परिस्थितीत वडिलांनी जाहीर केलेलं बक्षीस ही
फार मोठी गोष्ट वाटली मला. मी मित्राला म्हटलं, तुझ्या पास होण्यापेक्षा मला तुझी
वडिलांसोबतची इतकी वर्षं कायम असलेली केमिस्ट्री खूप मोलाची आणि महत्त्वाची वाटते.
इतर कुठलाही मोठ्यात मोठा पुरस्कार मिळवलास तरी वडिलांच्या या बक्षीसाची सर त्याला
येणार नाही. या गोष्टीसाठी खरंच तुझं मनापासून अभिनंदन!
वडिलांनी किती
रुपयांचं बक्षीस दिलं, याला इथं काहीच महत्त्व नाही; महत्त्व आहे ते भावनेला आणि हळूवार जपल्या
गेलेल्या रिलेशनशीपला! बाप-लेकामध्ये असं निर्व्याज प्रेम फार क्वचित पाह्यला
मिळतं. (निदान माझा इतरांच्या बाबतीतला अनुभव तसा आहे.) बापाच मुलीवर आणि आईचं
मुलावर असणारं प्रेम सर्वश्रुत आहे, पण बाप-लेकाचं पटण्यापेक्षा, न पटण्याचे
प्रसंगच अधिक असल्याचे दिसतात. माझ्या एका जवळच्या नातेवाइकांचंच उदाहरण सांगतो.
बाप गरीब परिस्थितीतून मोठ्या कष्टानं शिकला. त्यातून पुढं मोठा सरकारी अधिकारी
झाला. मुलांसाठी हयातभर खस्ता खात राहिला; पण मुलांच्या दृष्टीनं मात्र तो केवळ पैसा
पुरविण्याचं साधन मात्र बनून राहिला. गरीबीची झळ आपण सोसली, ती आपल्या मुलांना
सोसायला लागू नये, म्हणून बाप कष्टतच राहिला आणि कोणतीही झळ न पाहिलेली ती मुलं
मात्र त्याच्या अंतरीची तळमळ जाणूच शकले नाहीत, किंबहुना तशी त्यांना गरजच भासली
नाही. उलट, घरातल्या कोणत्याही चर्चेचा शेवट ‘ह्यांना काही समजतच नाही’, असं त्या बापावरच थोपवून
होत असे. बाहेरच्या जगात सर्वार्थानं ‘बाप’ असणाऱ्या ह्या बापाला समजून घेण्यात त्याची मुलं मात्र कमी
पडली होती. हा बापही खरा ‘बापमाणूस’च असल्यानं आपल्या मुलांकडून होणारी खिल्लीही तो एन्जॉय
करायचा; उलट माझे पाय जमिनीवर राहण्यासाठी मला बाहेर कुठं जावं लागत नाही, असं
त्यांचं याविषयी म्हणणं असायचं. असा विचार एक बापच करू शकतो.
याच्या उलट दुसरं
उदाहरण माझ्या वडलांचंच देता येईल. मला का कोणास ठाऊक ‘मम्माज् सन’ म्हणवून घेण्यापेक्षा ‘पापाज् ब्वॉय’ म्हणवून घ्यायला खरंच
आवडतं. माझ्या बाबांनीही खडतर परिस्थितीतून शिक्षण घेतलं. कधी कधी घरात अन्नाचा कण
नसायचा. तेव्हा आजी जाऊ द्यायची नाही, म्हणून तिला न सांगताच दिवसभर शेतात कामाला
जायचे आणि रात्री पसाभर शेंगा आणि मिळालेल्या कमाईतनं ज्वारी घेऊन घरी परतायचे. मग
आजी डोळ्यांत पाणी आणून त्याच ज्वारीचं पिठलं आणि त्याचीच भाकरी करून पोराला खाऊ
घालायची. अशा परिस्थितीतून आमचा बाप प्राध्यापक झाला, पीएच.डी. डॉक्टर झाला. या
गोष्टीचा मला निश्चितपणानं अभिमान आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी मला
दिली ती म्हणजे परिस्थितीची जाणीव. आपल्या मुलांना कुठल्याही बाबतीत काही कमी पडू
नये, याची दक्षता घेत असतानाच सभोवतालच्या सामाजिक परिस्थितीचं भान त्यांनी माझ्या
मनात पेरलं. कुठल्याही मोहापासून अलिप्त राहण्याची ताकत मला त्यांच्याकडं पाहून
मिळते. मला आजही माझ्याकडं असलेल्या कोणत्याही वस्तूंबद्दल वृथा अभिमान वाटत नाही
कारण त्याचं मूळ माझ्या आईबापाच्या कष्टांत आहे, हे मी सदोदित मनी जाणून असतो. जेव्हाही
कधी माझ्यावर प्रार्थना करायची वेळ येते, तेव्हा, ‘अधिक काही नाही मिळालं तरी चालेल, पण आईबापानं
शून्यातून निर्माण केलेलं हे छोटंसं विश्व सांभाळण्याचं सामर्थ्य मात्र माझ्या
अंगी येऊ दे’, एवढंच माझं मागणं असतं. आणि आतापावेतो तेवढं माझ्याकडून साध्य झालं आहे.
कोणताही निर्णय
घेण्यापूर्वी जेव्हा मी बाबांना विचारतो, तेव्हा ‘तुला जे योग्य वाटेल ते कर.’ असं त्यांचं मला सांगणं
असतं. त्यामुळं आपल्याकडून काही अविचार होणार नाही, चुकीची कृती घडणार नाही, याची
जबाबदारीही आपोआपच माझ्यावर येते. त्यामुळं सारासार विचार करण्याची सवयच लागून
गेली. हां, आता कधी कधी भावनेच्या भरात काही अविचारी कृत्य घडून जातं, पण ते
निस्तरण्याची जबाबदारी मी झटकून देत नाही, ही सुद्धा त्यांचीच देणगी. चांगल्या
कृतीला ॲवॉर्ड आणि वाईटाला फटके, अशा वडिलांच्या वर्तणुकीमुळं आमच्या बेशिस्त
आयुष्याला काही तरी वळण लागलं, हे नाकारण्यात काय हशील?
i relate myself closely to this piece. highly emotional...तो ‘बाप’च असतो!
उत्तर द्याहटवाVery true Dharam ji. Thanx a lot.
हटवाExtremely well written and high emotional quotient. It is emotional but not sentimental. That's quite a feat!
उत्तर द्याहटवाDear Abhijit, Thank you so much for your kind appreciation.
हटवा