सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१३

भुजबळ नावाचा ‘माणूस’!


(राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री श्री. छगन भुजबळ यांचा उद्या मंगळवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी वाढदिवस! जनसंपर्क अधिकारी म्हणून भुजबळ साहेबांसोबत सुमारे साडेतीन वर्षे काम करण्याचा योग आला. मुलुखमैदानी तोफ, झंझावात अशी विशेषणे लाभलेल्या भुजबळ साहेबांची कार्यपद्धती या काळात अगदी जवळून पाहता आली. वादळं तर नेहमीच त्यांच्याभोवती निर्माण होत राहिली, पण तरीही एक 'माणूस' म्हणून त्यांचं मोठेपण वादातीत आहे. हेच त्यांच्या लोकप्रियतेचं रहस्य मला जाणवतं. माझ्या या ब्लॉग रुपी व्यासपीठावरुन भुजबळ साहेबांचं वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिष्टचिंतन!- आलोक जत्राटकर)
हा प्रसंग आहे साधारण सन १९८४-८५मधला. त्यावेळी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांच्या प्रचाराचं वारं जोरात वाहात होतं. आणि त्या काळात टीव्ही या माध्यमाचं नव्यानंच आगमन झालेलं असल्यानं आजच्यासारखं घरोघरी टीव्ही असं चित्र नव्हतं. आमच्या घरी सुद्धा फक्त रेडिओ होता. मी तेव्हा दुसरी-तिसरीत होतो आणि टीव्हीच्या सेटचं कधी दुरुनही दर्शन घेतलेलं नव्हतं. अशा परिस्थितीत मी वडिलांसोबत कोल्हापूरला त्यांच्या एका मित्राच्या घरी गेलो होतो. त्यांच्या घरी टेबलवर विराजमान झालेला टीव्ही मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला. त्या आयताकार बुश कंपनीच्या ब्लॅक ॲन्ड व्हाइट टीव्हीच्या स्क्रीनवर निळी काच लावून रंगीत बनविलेला आणि त्या घरासाठी तो एक अतिशय (साहजिकच) प्रेस्टीजचा मुद्दा बनलेला होता. त्याविषयी ते बाबांना सांगत असताना माझं लक्ष स्वाभाविकपणे त्या टीव्हीच्या पडद्यावरुन हटत नव्हतं. बाहेर थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणं माहीत असलेल्या मला त्या घरातल्या थिएटरची भुरळ पडली. त्याचवेळी त्या पडद्यावर शिवसेनेचे निवडणूक प्रचारक-प्रवक्ता म्हणून एका नेत्याचं भाषण सुरू झालं. गोल चेहरा, कमावल्यासारखी देहयष्टी आणि भेदक डोळे अशी वैशिष्ट्यं नजरेत भरली. त्याच वेळी पडद्यावर त्यांचं नाव झळकलं- श्री. छगन भुजबळ! माणसाच्या वक्तृत्वासारखाच त्यांच्या नावातही फोर्स होता. त्यापूर्वी हे नाव माझ्या ऐकण्यात येण्याचं कारण नव्हतं. पण आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलेला टीव्ही आणि त्या टीव्हीवर प्रथमच पाहिलेला भारदस्त व्यक्तिमत्त्वाचा आणि तितक्याच भारदस्त नावाचा व्यक्ती या दोन्ही गोष्टी माझ्या कायम स्मरणात कोरल्या गेल्या. पुढं याच व्यक्तीचा जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करण्याची, त्यांच्यासोबत राहण्याची, वावरण्याची संधी आपल्याला मिळणार आहे, याची त्यावेळी माझ्या बालमनाला कल्पना असण्याची सुतराम शक्यता नव्हती. पण.. तसं झालं खरं..!
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागामध्ये सन २००५ साली मी सहाय्यक संचालक (माहिती) या पदावर रुजू झालो. आणि २००९च्या जुलैमध्ये उप-मुख्यमंत्री कार्यालयाचा जनसंपर्क अधिकारी म्हणून माझी नियुक्ती झाली आणि तेव्हापासून मी छगन भुजबळ साहेबांच्या प्रत्यक्ष संपर्कात आलो. त्यापूर्वी विविध बैठका, कार्यक्रम तसेच विधीमंडळाची अधिवेशनं यांच्या कव्हरेजच्या निमित्तानं भुजबळ साहेबांची भाषणं ऐकण्याचा योग आलेला होता; पण, प्रत्यक्ष बातचीत वगैरे अशी काही झाली नव्हती. मात्र, जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करत असताना या माणसाच्या विविध पैलूंचा मला खूप जवळून अनुभव घेता आला. उप-मुख्यमंत्री आणि अधिकारी म्हणून आमच्या दोघांमध्ये मी नेहमीच अंतर राखून राहात होतो; पण, एक चांगला व्यक्ती म्हणून, सहृदयी माणूसम्हणून माझं त्यांच्याशी जे बाँडिंग झालं, ते माझ्या दृष्टीनं खूप मोलाचं आहे.
भुजबळ साहेबांच्या विषयी लोकोपवाद, मतप्रवाह बरेच आहेत. त्यांच्या आक्रमक आणि संघर्षशील स्वभावामुळं त्यांच्याविषयी सातत्यानं नवनवे वाद-प्रवाद जन्माला येत असतात, घातले जात असतात. पण, इतक्या साऱ्या संघर्षांच्या प्रसंगांना तोंड देऊन, अनेक जीवघेण्या प्रसंगांतून वाचून, अनेक आरोप-प्रत्यारोप पचवून हा माणूस पुनःपुन्हा फिनिक्स पक्ष्याप्रमाणं यशस्वीपणानं आकाशात उड्डाण करीत राहिला आहे. साहेबांसोबतच्या उण्यापुऱ्या साडेतीन वर्षांच्या सहवासात मला त्यांच्या या संघर्षशील वृत्तीचा अनेकदा प्रत्यय घेता आला. माझ्या मते, या साऱ्याचं रहस्य त्यांच्या माणूसपणातच दडलेलं आहे.
भाजी मंडईत भाजी विकून शालेय शिक्षण पूर्ण करून पुढं इंजिनियर होण्यापर्यंत मजल मारणाऱ्या, चाळीस-पन्नास वर्षांची राजकीय कारकीर्द यशस्वीपणे घडविणाऱ्या, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या छगन भुजबळांनी आजही आपल्या रुट्सचा विसर पडू दिलेला नाही. कितीही भराऱ्या ते मारत असले तरी जमिनीशी नातं आणि इमान त्यांनी सुटू दिलेलं नाही. जिथून ते आले, जिथं घडले त्या माझगावला तिथल्या लोकांना आजही साहेबांच्या मनात आणि परिवारात अगदी घरच्यासारखं स्थान आणि मान आहे. तिथली गोकुळाष्टमी, गणेशोत्सव असो की कुठलाही छोट्यात छोटा कार्यक्रम असू दे, साहेब आपला सारा मानपान विसरून त्यात सहभागी झाल्याचं मी पाहिलं आहे. सकाळी साडेसहा- सात वाजल्यापासूनच परिसरातल्याच नव्हे, तर राज्याच्या आणि अलिकडे तर देशाच्या विविध ठिकाणांहून भुजबळ साहेबांना भेटण्यासाठी बंगल्यावर लोकांची रीघ असते. या लोकांना अगत्यानं बसवून चहापाणी देण्याचा रिवाज त्यांनी अगदी सुरवातीपासून कटाक्षानं सांभाळला आहे. आलेल्या माणसाचं काम होईल न होईल, पण तो समाधानानं परत गेला पाहिजे, याकडं साहेबांचा कटाक्ष असतो आणि त्यांनी तो अखंडपणे सांभाळला आहे. पडणाऱ्याला सावरणं, रडणाऱ्याला सांभाळणं आणि विनाकारण रडणाऱ्याला खडसावणं या साऱ्याच गोष्टी भुजबळ साहेबांना एकाच वेळी कशा काय जमू शकतात, याचं मला नेहमीच आश्चर्य वाटतं. पण माणसांची कदर आणि पारख करणाऱ्या या माणसाचं हेच वैशिष्ट्य तर लोकांना आवडतं, ही गोष्ट लक्षात घेतली की त्यांच्याविषयी मग कोणताच प्रश्न पडत नाही.
भुजबळ साहेबांच्या बाबतीत त्यांच्या ज्येष्ठ पत्रकार मित्रांचा एक आक्षेप नेहमी असतो की, त्यांना माणसं कळत नाहीत आणि ती माणसं त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेतात आणि काम झालं की निघून जातात. ही गोष्ट साहेब हसण्यावारी घालवत असले तरी त्यात तथ्य आहे. तथ्य हे आहे की, साहेब त्यांच्यासोबत असणाऱ्या साऱ्यांवरच खूप मनापासून प्रेम करतात. जो आला तो आपला, आणि गेला तोही आपलाच!’ असं त्यांचं त्यांच्याभोवतीच्या लोकांच्या बाबतीतलं सरळसोट समीकरण आहे, हे मला अनुभवांती लक्षात आलं. राजकीय विरोध सोडला तर भुजबळ साहेब हे अजातशत्रूच म्हणायला हवेत. अगदी शत्रू जरी दारी आला, तरी त्याचं हसतमुखानं स्वागत करण्याइतक्या दर्यादिल स्वभावाचा हा माणूस आहे. एखादा माणूस त्यांच्यापासून दूर गेला, जाऊ लागला तर आजही ते कासावीस होतात. हा माणूस दुरावण्यात आपला तर काही दोष नाही ना?, असं ते स्वतःला पुनःपुन्हा विचारतात; संबंधितालाही विचारतात. मग जाणाऱ्या व्यक्तीचाच त्यात काही अन्य हेतू असला तर तो समजून घेऊन अगदी मनापासून शुभेच्छा देतात. याचा अनुभव प्रत्यक्ष मलाही आला. माझी जेव्हा शिवाजी विद्यापीठात सहाय्यक कुलसचिव पदी निवड झाली, तेव्हा मी त्यांना माहिती व जनसंपर्क विभाग सोडत असल्याचं सांगितलं, तेव्हा ते क्षणभर स्तब्ध झाले. पण लगेच खरंच जाणार का?’ या त्यांच्या प्रश्नानं माझं मनही क्षणभर विचलित झालं. पण ही नवी संधी माझ्या शैक्षणिक क्षेत्रातल्या कारकीर्दीसाठी मला महत्त्वाची वाटत असल्याचं सांगितल्यानंतर त्यांनी तितक्याच मोकळ्या मनानं परवानगी दिली.
भुजबळ साहेबांच्या माझ्यावरील प्रेमाचं एक उदाहरण दिल्यावाचून राहावत नाही. मध्यंतरी काही राजकीय घडामोडींमुळं अजितदादा पवार उप-मुख्यमंत्री झाले आणि भुजबळ साहेबांकडं सार्वजनिक बांधकाम व पर्यटन विभागांच्या मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली, तेव्हा त्यांनी मला रामटेकवर बोलावलं आणि तू माझ्यासोबत काम करावंस, अशी माझी इच्छा आहे, असं म्हणाले. वसंत पिटके साहेब आणि हरी नरके सर साक्षीदार आहेत, या प्रसंगाचे! 'तू माझ्याबरोबर काम कर रे', असा आदेशही ते देऊ शकले असते, पण त्यांच्या या अतिशय सौहार्दपूर्ण वाक्यानं मी हेलावलो. मी तसा कोण होतो त्यांच्यासमोर? चाळीस वर्षांहून अधिक- अतिशय संस्मरणीय आणि वादळी राजकीय कारकीर्द असलेल्या भुजबळ साहेबांसमोर तसं माझं काय मोठं आस्तित्व होतं? जेमतेम सहा वर्षांची पत्रकारितेतली आणि चार वर्षांची शासनातली नोकरी. पण त्यांच्या सन्मानपूर्वक बोलण्यामुळं मी त्यांना होकार दिला. खोटं सांगत नाही, दुसऱ्या दिवशी 'रामटेक'वर जेव्हा पर्यटन सचिव, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक, सह-व्यवस्थापकीय संचालक यांची बैठक झाली, त्यावेळी 'एमटीडीसी'वर व्यवस्थापक (जनसंपर्क) या पदावर माझी नियुक्ती करण्याबाबतच्या पत्रावर साहेबांनी पहिली सही केली. इतकं त्यांचं प्रेम होतं.
भुजबळ साहेबांसोबत काम करताना खूप मजा आली. रात्री बारा बारा वाजेपर्यंत कित्येकदा भाषणं तयार करत बसलो मंत्रालयात. पण त्यावेळीही ऑफिसबाहेर पडताना एक उत्तम भाषण आपल्या हातून तयार झाल्याचं समाधान असायचं. भुजबळांसारख्या वक्तृत्वावर प्रचंड प्रभुत्व असणाऱ्या मुलुखमैदानी तोफेला शब्दरुपी दारुगोळ्याची रसद पुरवण्याची संधी मला मिळाली आणि माझे शब्द त्यांच्यासारख्या मास-लीडरच्या तोंडून लाखोंच्या जनसमुदायाला नादावून सोडताहेत, हे दृश्य कित्येकदा पाहण्याचं भाग्य मला मिळालं. भुजबळ साहेबांशी कामाचं ट्युनिंगही खूप उत्तम प्रकारे जमलं होतं. एखाद्या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर केवळ 'जत्राटकर' असं लिहून खाली सही करून ती माझ्याकडं आली, की त्याचं काय करायचं ते मला क्लिअर व्हायचं. अगदी महत्त्वाचा विषय असला की मी त्यांना काय मुद्दे अपेक्षित आहेत, त्याची चर्चा करायचो आणि त्यांच्या सूचनेनुरुप भाषण तयार करायचो. कित्येकदा वेळेअभावी सभेच्या मंचावर गेल्यावरच साहेबांना भाषणाची कॉपी वाचायला मिळायची आणि ते डायरेक्ट भाषण करायचे. इतका त्यांचा विश्वास माझ्यावर होता. भुजबळ साहेबांचा हा विश्वास मला जिंकता आला आणि त्याला कधीही धक्का देण्याचं काम माझ्याकडून झालं नाही, ही त्यांच्यासोबतच्या कारकीर्दीतली फार मोठी उपलब्धी वाटते मला. विश्वास जिंकणं सोपं असतं, पण त्याला क्षणात तडा जाऊ शकतो. सुदैवानं माझ्या विश्वासार्हतेला कधीही तडा जाणार नाही, याची सातत्यानं दक्षता घेतली. 'डीजीआयपीआर'मधून रिलिव्ह होत असताना मी भुजबळ साहेबांसोबत आणि त्यांच्यासाठी केलेल्या कामाचा जेव्हा आढावा घेतला, तेव्हा मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशी मिळून सुमारे साडेतीनशे भाषणं, साधारण तितक्याच बातम्या आणि त्याखेरीज सप्लीमेंटरी आर्टिकलच्या स्वरुपातल्या सतराशेहून अधिक फाइल्स इतका डाटा रेकॉर्ड मला आढळून आला. एरव्ही ठरवलं असतं तरी इतक्या वैविध्यपूर्ण विषयांवर लिखाण होणं, ही अशक्यप्राय गोष्ट होती माझ्यासाठी! ती भुजबळ साहेबांसारख्या बहुआयामी व्यक्तीमत्त्वाच्या सान्निध्यामुळं शक्य झाली.
दि. 21 जून 2012 रोजी मी रायगडच्या जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. दुर्दैवानं त्याच दिवशी दुपारी मंत्रालयाला अग्नीप्रलयानं वेढलं. त्यामुळं इमर्जन्सी ड्युटी म्हणून दोन दिवसांत पुन्हा भुजबळ साहेबांसोबत दाखल झालो. त्यांच्या कामाचा झपाटा, प्रचंड आवाका, आत्मविश्वास आणि ठरवलं ते तडीस नेण्याच्या वृत्तीचा अनुभव मला या काळात घेता आला. संपूर्ण मंत्रालयाच्या इमारतीमध्ये त्यांनी तीन दिवसांत संपूर्ण मजले किती वेळा चढून-उतरून पाहणी केली, याची गणतीच नाही. ठरवल्याप्रमाणं तीन दिवसांत मंत्रालय पूर्ववत सुरू करून त्यांनी त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीची प्रचितीच साऱ्या जगाला आणून दिली. त्यावेळी मनोमन मी त्यांना शेकडो सलाम केले असतील.
व्यापक सामाजिक हिताची जाणीव हा सुद्धा भुजबळ साहेबांचा मला भावलेला वैशिष्ट्यपूर्ण गुण आहे. समाजाच्या तळागाळातल्या माणसांच्या प्रश्नांकडं संवेदनशीलपणानं पाहण्याची दृष्टी आज राज्यात शरद पवार यांच्या बरोबरीनं केवळ भुजबळ साहेबांमध्येच आहे, असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा वारसा आणि वसा घेऊन राजकारणातून समाजकारणाचं जे ध्यासपर्व भुजबळ साहेबांनी आरंभलं आहे, त्याला तोड नाही.
नातेसंबंधांच्या बाबतीत भुजबळ साहेब हे अतिशय भावनाप्रधान, हळवे व्यक्ती आहेत. त्यांचं व्यक्तिमत्त्व नारळासारखं आहे- वरुन कठोर आणि आतून मऊ अन् मधुर. म्हणूनच तर जो त्यांच्या सान्निध्यात आला, तो त्यांचाच होऊन गेला. कुटुंबियांच्या बाबतीत त्यांचं हळवेपण पराकोटीचं आहेच, पण जोडलेल्या माणसांच्या बाबतीतही ते तितकंच टोकाचं आहे. साहेब उप-मुख्यमंत्री असताना त्यांचे एक खूप जवळचे पत्रकार मित्र निवृत्त झाले, त्यावेळी त्यांना बंगल्यावर बोलावून साहेब त्यांचा सत्कार करू शकले असते. पण, तसं न करता त्यांच्या घरी जाऊन त्यांनी त्यांना निवृत्तीनिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यांच्या सहृदयतेचे असे अनेक प्रसंग माझ्या पाहण्यात आले.
भुजबळ साहेबांना प्रसारमाध्यमांचीही खूप तीव्र जाण आहे. आपली कारकीर्द घडविण्यामध्ये प्रसारमाध्यमांचा आणि माध्यम प्रतिनिधींचा मोलाचा वाटा आहे, याची जाणीव त्यांच्या मनात नेहमीच असते. त्यामुळंच मिडियामध्ये त्यांचे अनेक मित्र आहेत. बरं, हे मित्र आहेत म्हणून भुजबळांच्या विरोधात लिहायचे नाहीत, असं नव्हतं. ते लिहीत असत आणि साहेब त्यांचं लिखाण गांभिर्यानं वाचून त्यावर आत्मपरीक्षण करत असत. आजही त्यांची ही चिंतनाची प्रक्रिया नेहमी सुरूच असते. पण, विनाकारण आणि आपली बाजू समजून न घेता माध्यमांतून केल्या जाणाऱ्या आरोपांनी मात्र ते अस्वस्थ होतात. केलं असेल तर केलं म्हणून सांगण्याची, स्वीकारण्याची तयारी असणाऱ्या माणसाला अशा गोष्टींची चीड येणं स्वाभाविक आहे. पण, शेवटी या मिडियाची अपरिहार्यता लक्षात घेण्याचीही सक्षमता त्यांच्याकडं आहे. त्यामुळं या गोष्टी ते मोठ्या प्रयत्नपूर्वक पाठीवर टाकून रिकामे होतात. ही सोपी गोष्ट नाहीय. त्यामुळंच साहेबांसोबत जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करत असताना प्रसारमाध्यमांनाही अधिक वेगळ्या पद्धतीनं मला समजावून घेता येऊ शकलं.
भुजबळ साहेबांच्या बाबतीत सांगण्यासारखं बरंच आहे. नुकतेच एका स्थानिक निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं कोल्हापूरच्या विमानतळावर ते उतरले, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी मी जेव्हा गेलो, तेव्हा मला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं स्मितहास्य मी कधीच विसरू शकणार नाही. आपुलकीनं कसं चाललंय तुझं? खूष आहेस ना  इथं?’ अशी त्यांनी विचारपूस केली.आपला माणूस आठवण ठेवून भेटायला आला, याचं समाधान त्यातून झळकत होतं. नाही तर, त्यांच्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीमधलाच मी एक होतो. त्यांच्यासारखंच यंत्रवत त्यांनी माझ्या स्वागताचा स्वीकार केला असता तरी बिघडलं नसतं. पण आफ्टरऑल ते भुजबळ आहेत.
दातृत्व, गरजू व्यक्तीला सढळ हस्ते आणि निरपेक्ष भावनेनं मदत करण्याची वृत्ती, पराकोटीची सहृदयता बाळगून असणाऱ्या या माणसानं आयुष्यात अनेक चढउताराचे प्रसंग पाहिले, निराशेचे अनेक प्रसंग त्यांच्या आयुष्यात आले, पण कोणत्याही परिस्थितीसमोर ते हतबल झाले नाहीत, डगमगले नाहीत. साऱ्या आघातांचा अतिशय निर्धारानं, धीरोदात्तपणे सामना करत, ते संकटांवर सातत्यानं मात करीत आले आहेत. इतक्या प्रचंड संघर्षामध्ये दुसऱ्या एखाद्याच्या काळजाचा पत्थर झाला असता. पण भुजबळांनी मात्र आपल्या हृदयातला माणुसकीचा निर्मळ झरा आटू दिलेला नाही, हे त्यांचं सर्वात मोठं स्वभाववैशिष्ट्य आहे. कोट्यवधींच्या गर्दीत तेच त्यांचे वेगळेपण आहे. मला जर कोणी सहा वर्षांच्या शासकीय नोकरीत मी काय मिळवलं, असं विचारलं, तर भुजबळ साहेबांच्या डोळ्यांमध्ये तरळलेले आपुलकीचे भाव आणि दोन थेंब अश्रू मिळवून आलो आहे, असं मी कृतज्ञतापूर्वक सांगेन.

११ टिप्पण्या:

  1. मित्रा, खूपच भावूकतेनं लिहिलं आहेत. समृद्ध करणारे असे अनुभव आहेत. काही दिवस मलाही साक्षिदार होता आलं, याचा आनंद वाटतो. साहेबांची बराक ओबामा यांच्या भेटीच्या दिवसाची बातमी, अमेरिकेच्या राजदुतांनी साहेबांची घेतलील भेट व त्यानंतर केलेली प्रेसनोट, त्यावरील विविध अँगल्सने आलेल्या बातम्या आजही आठवतात.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. हो, तुझ्यासोबतचे दिवस तर सोनेरी होते, जगदीश! कामही भरपूर केलं आणि त्या कामाचा आनंदही पुरेपूर लुटता आला आपल्याला!

      हटवा
  2. अत्यंत सुंदर.. तुम्हा दोघांनाही साक्षीदार होता आलं, परंतु मला नाही याचं दु:ख मला आहे मित्रांनो..


    उत्तर द्याहटवा
  3. lekh khup khup aavadala sir,
    shabdcha surekha vapar, bhavanik aadhar, barik nirikshan ............... sarvach babatit No. 1

    उत्तर द्याहटवा
  4. खूप छान सर या लेखाचा निमित्ताने भुजबळ साहेबांचे व्यक्तिमत्व व प्रेमळ वृत्ती जी तुम्हांला अनुभवायला मिळाली ती तुम्ही शब्दरुपी मांडल्याने आमच्यासारख्या लोकांना खरे भुजबळ साहेब समजले धन्यवाद 🙏🏻

    उत्तर द्याहटवा
  5. अलोकजी अत्यंत उत्कृष्ट असा लेख झाला आहे

    उत्तर द्याहटवा