विसाव्या शतकामध्ये भारतात
होऊन गेलेले महान संज्ञापक (कम्युनिकेटर) कोण?, असा प्रश्न संवादशास्त्राचा एक विद्यार्थी
म्हणून माझ्यासमोर उभा राहतो, तेव्हा दोन नावे अग्रक्रमाने नजरेसमोर येतात.
त्यामध्ये एक महात्मा गांधी आणि दुसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर!
महात्मा गांधी यांनी दक्षिण
आफ्रिकेमधील त्यांच्या चळवळींपासून ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यापर्यंत त्या काळात
उपलब्ध असलेल्या संज्ञापनाच्या विविध साधनांचा उत्तम वापर केला. त्या काळात आपले
विचार जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी वृत्तपत्र माध्यम सर्वाधिक प्रभावी ठरत असे. ही
बाब लक्षात घेऊन गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये 'इंडियन ओपिनियन' नावाचे वृत्तपत्र सुरू केले आणि त्या
माध्यमातून तेथील भारतीयांना संघटित करण्याचा यशस्वी प्रयोग केला. स्वच्छता,
शिक्षण, स्वयंशासन आदींबाबतचे लेखनही ते करीत. दक्षिण आफ्रिकेमधील
वास्तव्यादरम्यान 'इंडियन ओपिनियन' हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला होता, असे त्यांनी
आपल्या आत्मचरित्रात नमूद केले आहे. तत्पूर्वी सुद्धा बॅरिस्टरीचे शिक्षण घेत असताना
इंग्लंडमधील 'व्हेजिटेरियन' या वृत्तपत्रात शाकाहाराचे महत्त्व सांगणारे लेखन
गांधीजींनी केले होते. भारतात आल्यानंतर आणि सार्वजनिक जीवनात सक्रिय झाल्यानंतर
येथेही त्यांनी 'यंग इंडिया' आणि 'नवजीवन' ही वृत्तपत्रे चालविली. आपल्या चळवळीसाठी जनमत संघटित करण्याबरोबरच
गांधीजींच्या सत्याग्रहाची भूमिका लोकांमध्ये रुजविण्याच्या कामी या वृत्तपत्रांनी
महत्त्वाची भूमिका बजावली. अस्पृश्यता निवारण हा गांधीजींच्या चिंतनाचा विषय होता.
हिंदू धर्माच्या चौकटीत राहून हा विषय मार्गी लावण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आणि
चातुर्वर्ण्याची चौकट भेदल्याखेरीज जातिअंताची चळवळ कदापि यशस्वी होऊ शकणार नाही,
असा डॉ. आंबेडकर यांचा ठाम विश्वास होता. तरीही, गांधी त्यांच्या परीने या
प्रश्नाकडे पाहात होते. अस्पृश्यांना हरिजन असे ते संबोधत. या विषयाला समर्पित अशी
'हरिजन' (इंग्रजी), 'हरिजनबंधू' (गुजराती) आणि 'हरिजन सेवक' (हिंदी) अशी तीन वृत्तपत्रे प्रकाशित करण्यास
त्यांनी १९३३मध्ये सुरवात केली. अस्पृश्यता निवारण, ग्रामस्वराज्य आदी
विषयांसंदर्भातील गांधींची मते या वृत्तपत्रांतून प्रकाशित होत. गांधीजींचे नाव
जोडले असल्यामुळे जाहिराती न घेताही मोठ्या वितरणाच्या बळावर ही वृत्तपत्रे
सर्वदूर पोहोचत. लोकमान्य टिळक यांच्यानंतर राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्याचे
नेतृत्व महात्मा गांधी यांच्याकडे आल्यामुळे आणि हे नेतृत्व अहिंसा तत्त्वाच्या
प्रयोगशीलतेमुळे सर्वमान्यतेला पोहोचल्यामुळे त्यांचे विचार पोहोचविणाऱ्या
वृत्तपत्रांसाठीही देशात मोठी जागा निर्माण झाली. जी भूमिका 'केसरी'ने लोकमान्य टिळकांचे जहाल
विचार आणि लोकप्रियता प्रस्थापित करण्यात बजावली होती, ती भूमिका वृत्तपत्रांनी
महात्मा गांधी यांच्या बाबतीतही बजावली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्याबाबतीत मात्र सारी परिस्थितीच प्रतिकूल होती. हजारो वर्षे सामाजिक
गुलामगिरीच्या विळख्यात पिचलेल्या दलित समाजाची या जोखडातून मुक्तता करण्यासाठी
हरेक प्रकारची धडपड त्यांना करावयाची होती. जातीपातीच्या कल्पनांचा मोठा पगडा,
रुढी-परंपरांचा घट्ट विळखा आणि चातुर्वर्ण्याच्या संकल्पनेतून लादण्यात आलेले
अडाणीपणाचे ओझे आणि या सर्व बाबींमुळे दारिद्र्याचे जीणे वाट्याला आलेल्या
दीनदलितांचा उद्धार करण्यासाठी बाबासाहेब सिद्ध झाले होते. एकीकडे राजकीय
स्वातंत्र्याच्या मागणीचा झंझावात इतका प्रचंड प्रमाणात वाढला होता की, त्यापुढे
बाबासाहेबांची सामाजिक स्वातंत्र्याची मागणी फिकी ठरत होती. या देशातील सामाजिक
गुलामगिरी संपुष्टात आल्याखेरीज मिळणारे राजकीय स्वातंत्र्य कोणत्या वर्गाचे
हितरक्षण करण्यासाठी वापरले जाईल, याची साधार भीती बाबासाहेबांना होती. त्यामुळेच
त्यांनी 'मूकनायक' या वृत्तपत्राच्या माध्यमातून यासंदर्भातील जनजागृती करण्यासाठी अग्रलेखांची
मालिका लिहीली. ज्या समाजघटकांसाठी काम करावयाचे होते, ज्यांच्यात जागृती घडवून
आणावयाची होती, त्याचे अक्षरशत्रुत्व ही बाबासाहेबांसमोरील मोठी समस्या होती.
त्यामुळे केवळ वृत्तपत्राचे साधन वापरून संबंधितांपर्यंत आपले विचार पोहोचविता
येणार नाहीत, याची जाणीव त्यांना होती, पण तरीही या महत्त्वपूर्ण जनसंज्ञापन
साधनाचे महत्त्व ते जाणून होते. ३१ जानेवारी १९२० साली प्रकाशित झालेल्या 'मूकनायक'च्या पहिल्याच अंकात
त्यांनी आपली या संदर्भातील भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणार्या अन्यायावर
चर्चा होण्यास तसेच त्यांच्या भावी उन्नतीच्या मार्गांची चर्चा होण्यास
वर्तमानपत्रासारखी भूमी नाही. पण अशा वर्तमानपत्राची उणीव असल्याने ती भरुन काढण्यासाठी
या पत्राचा जन्म आहे.' सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यामधील संज्ञापन साधनांचे
महत्त्व बाबासाहेबांनी ओळखले होते. त्यामुळेच अत्यंत विपरित आणि बिकट परिस्थितीतही
वृत्तपत्रे चालविली. 'मूकनायक'नंतर १९२७मध्ये 'बहिष्कृत भारत', १९३०मध्ये 'जनता' आणि १९५६मध्ये 'प्रबुद्ध भारत' अशी वृत्तपत्रे बाबासाहेबांनी चालविली. या
वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपली भूमिका निःसंदिग्धपणे मांडण्याचे काम त्यांनी
केले. विशेषतः महाडच्या समता संगराच्या संदर्भात 'बहिष्कृत भारत'मधील बाबासाहेबांचे अग्रलेख, वार्तालेख आणि या
सत्याग्रहाला वेगळे वळण लावून देण्याच्या विरोधी वृत्तपत्रांच्या कारस्थानी
वृत्तांचा बाबासाहेबांनी घेतलेला परखड समाचार या बाबी मुळातूनच वाचण्यासारख्या
आहेत. याशिवाय, नंतरच्या काळात वेगवेगळ्या विषयांवरील आपली भूमिका विषद
करण्यासाठीही बाबासाहेबांनी इतर वृत्तपत्रांतूनही लेखन केले.
वृत्तपत्रांखेरीज तत्कालीन
परिस्थितीत पुस्तके हे एक महत्त्वाचे संज्ञापनाचे साधन होते. बाबासाहेबांनी
विलायतेमधील शिक्षणादरम्यान अर्थशास्त्रीय व सामाजिक संशोधनावरील आपली बैठक पक्की
केली होती. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक प्रकारच्या लेखनाला संशोधनाची जोड होती.
विविध दाखले, पुरावे यांच्यानिशी ते आपले म्हणणे जास्तीत जास्त ठामपणे मांडण्याचा
प्रयत्न करीत. त्यांच्या 'कास्ट्स इन इंडिया' या भारतीय जातिव्यवस्थेचा शोध घेणाऱ्या पहिल्या
संशोधनापासून अगदी अखेरच्या 'बुद्धा ॲन्ड हिज धम्मा' या ग्रंथापर्यंत बाबासाहेबांच्या या चिकित्सक,
संशोधकीय दृष्टीकोनाचा प्रत्यय येतो. 'द प्रॉब्लेम ऑफ रुपी', 'शूद्र पूर्वी कोण होते?', 'अस्पृश्य मूळचे कोण?,' 'बुद्ध की कार्ल मार्क्स?', 'थॉट्स ऑन पाकिस्तान' असा बाबासाहेबांचा
प्रत्येक ग्रंथ त्यांच्या संशोधन दृष्टीची प्रचिती देणारा आणि प्रत्येक प्रश्नाची
मूलगामी मांडणी करणारा आणि द्रष्टेपणाने विविध समस्यांचा वेध घेऊन त्यांवर दूरगामी
उपाय सुचविणाराही आहे. आजही त्यांची प्रस्तुतता किंवा उपयोजन कमी झालेले नाही. 'ॲनिहिलेशन ऑफ कास्ट' अर्थात 'जातिनिर्मूलन' या लाहोरमधील जातपात तोडक
मंडळाच्या अधिवेशनासाठी १९३६मध्ये लिहीलेल्या आणि तथापि आयोजकांच्या दुराग्रहामुळे
होऊ न शकलेल्या भाषणाचे पुस्तक रुप आज ७५ वर्षांनंतरही बाबासाहेबांच्या अत्युच्च
प्रतिभेचे दर्शन घडविते. जातिअंताची चळवळ यशस्वी व्हावयाची असेल तर आंतरजातीय
विवाह, स्त्री-पुरूष समानता, उपलब्ध संसाधनांचे फेरवाटप, व्यापक शिक्षण-लोकशिक्षण आणि धर्मचिकित्सा (धर्मांतर) या पंचसूत्रीचा
स्वीकार करणे आणि ती अंमलात आणणे अपरिहार्य असल्याचे प्रतिपादन बाबासाहेबांनी यात
केले आहे. त्या प्रतिपादनामधील प्रस्तुतता आजही कमी झालेली नाही, किंबहुना अधिकच
वाढलेली आहे.
याशिवाय, बाबासाहेबांनी आपल्या
मित्र, सुहृदांबरोबर तसेच कार्यालयीन स्तरावर केलेला पत्रव्यवहार हा सुद्धा
त्यांच्या संवाद कौशल्याची साक्ष देताना दिसतो.
लिखित माध्यमाच्या मर्यादा
सुरवातीला म्हटल्याप्रमाणे बाबासाहेबांच्या संज्ञापनाला जरुर होत्या, पण खरा
कम्युनिकेटर तोच, जो अशा अडचणींवर मात करूनही आपली मते व्यापक समाजापर्यंत
पोहोचवितो. नेमके हेच कार्य बाबासाहेबांनी जाणीवपूर्वक केले. विविध
समाजघटकांपर्यंत पोहोचण्यासाठी अप्रत्यक्ष संवादाबरोबरच प्रत्यक्ष संवादावरही
त्यांनी मोठ्या प्रमाणावर भर दिला. समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी विविध
आयोगांसमोरील साक्षी, विधिमंडळातील, संसदेमधील भाषणे या व्यासपीठांचा त्यांनी
गांभीर्यपूर्वक वापर केला. साऊथबरो कमिशनसमोर दलितांच्या प्रश्नांसंदर्भात साक्ष
देण्यासाठी बाबासाहेबांनी केलेल्या प्रयत्नांतून खरे तर त्यांच्या संवेदनशीलतेची
साक्ष मिळते. शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न यांच्यासंदर्भातील आंदोलनांचे
नेतृत्व, युवक, महिला यांच्यासह देशभरात ठिकठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सभा आणि
त्यांच्यासमोर केलेल्या भाषणांतून बाबासाहेबांनी केलेले प्रबोधन यातूनही
त्यांच्यातील संज्ञापक झळाळून सामोरा येतो. येवला येथे १९३५मध्ये त्यांनी केलेली धर्मपरिवर्तनाची
घोषणा आणि तिथपासून १९५६मध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनापर्यंत या संदर्भात केलेली
विचारांची घुसळण ही सुद्धा त्यांच्यातील महान संज्ञापकाचा गुणधर्म अधोरेखित करते.
बाबासाहेबांच्या लेखन व भाषणांचे २२ खंड प्रकाशित होऊन अद्यापही बरेचसे साहित्य
अप्रकाशित आहे, यातूनही त्यांच्या संज्ञापन कौशल्याची प्रचिती येते.
संज्ञापनाच्या संदर्भात
बाबासाहेब हे सच्चे ओपिनियन लीडर होते. त्यांनी या देशामध्ये ओपिनियन मेकर्सची भली
मोठी फौज निर्माण केली, ज्यांच्या माध्यमातून या देशात स्वातंत्र्य, समता व
बंधुतेचा, नवसमाज निर्मितीचा, सामाजिक क्रांतीचा संदेश तळागाळातल्या
समाजघटकांपर्यंत पोहोचला. त्यातून वंचित, शोषितांच्या मनात आत्मोन्नतीचे
स्फुल्लिंग चेतविले. आणि अशा समाजघटकांमधील शिक्षणापासून वंचित घटक प्रथमच
शिक्षणाच्या प्रवाहात सामील होऊ शकले. आजही बाबासाहेबांच्या विचारांबरहुकूम वाटचाल
करणारे, लोकांपर्यंत पोहोचविणारे अनेक ओपिनियन मेकर कार्यरत आहेत. अनेक वृत्तपत्रे
त्यांच्या विचारांचा आजही प्रसार करीत आहेत. बाबासाहेबांचे द्रष्टेपण असे की,
त्यांच्या विचारांची प्रस्तुतता आजही कमी होत नाही, उलट वृद्धींगतच होते आहे.
खऱ्या संज्ञापकाचे हेच तर लक्षण असते.