Great Communicator लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Great Communicator लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ३० जून, २०१९

शाहू- आंबेडकर स्नेहबंध: मर्मबंधातली ठेव

माणगाव परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज. (हे छायाचित्र प्रतिकात्मक आहे, अस्सल नाही.)

(राजर्षी शाहू जयंतीच्या निमित्ताने सन्मित्र प्रकाश लिंगनूरकर यांच्या साप्ताहिक 'वार्ता-सम्राट'च्या  दि. २६ जून २०१९ रोजी प्रकाशित झालेल्या विशेषांकासाठी लिहीलेला लेख माझ्या ब्लॉग वाचकांसाठी साभार सादर करीत आहे.)

महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर ही त्रयी म्हणजे या देशामध्ये समता प्रस्थापनेचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. फुले आणि राजर्षींची भेट झालेली नसली तरी त्यांच्या सत्यशोधकी कार्याचा वसा आणि वारसा मात्र महाराजांनी अत्यंत सजगपणे पुढे चालविला. मात्र, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या उभय नेत्यांच्या परस्पर स्नेहभावाचा मी चाहता आहे. या दोघांच्या मोजक्या गाठीभेटी आणि त्यांचा परस्परांशी पत्रव्यवहार यातून त्यांच्या स्नेहबंधाची जाणीव झाल्याखेरीज राहात नाही. त्याचप्रमाणे यंदा माणगाव परिषदेचा शतकमहोत्सव साजरा केला जात असताना राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्नेहबंधांना उजाळा मिळणे, ही एक स्वाभाविक बाब आहे. राजर्षींच्या अकाली जाण्याने बाबासाहेबांचा प्रचंड मोठा आधार नाहीसा झाला तरी राजर्षींचे कार्य पुढे राज्यघटनेच्या माध्यमातून देशभरात चिरंतन करण्याचे महत्कार्य बाबासाहेबांनी केले.
बडोदा संस्थानच्या शिष्यवृत्तीची मुदत संपल्याने विलायतेतील विद्याभ्यास अर्धवट सोडून भारतात परतलेल्या बाबासाहेबांनी तो पूर्ण करण्यासाठी पुंजी साठवावी म्हणून सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकी पत्करली होती. शिक्षण पूर्ण केल्याखेरीज सामाजिक अगर राजकीय जीवनात प्रविष्ट न होण्याचा त्यांचा संकल्प होता. मात्र, साऊथबरो कमिशनसमोर अस्पृश्यांच्या राजकीय व सामाजिक हक्कांच्या संबंधाने जर बाजू मांडली नाही, तर या समाजाचे घोर नुकसान होण्याच्या चिंतेने त्यांना ग्रासले. त्यातून त्यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये द महार या नावाने त्यांची बाजू मांडणारा लेख लिहीला. त्याचप्रमाणे थेट व्हॉइसरॉय कार्यालयाशी पत्रव्यवहार करून कमिशनसमोर साक्ष नोंदविण्यासाठी आपली निवड करवून घेतली. बाबासाहेबांचा टाइम्स ऑफ इंडियामधील लेख राजर्षींच्या वाचनात आलेला होता. त्या लेखाने ते प्रभावितही झालेले होते. आपले विश्वासू दत्तोबा पोवार यांच्याकडून त्यांनी बाबासाहेबांची माहिती मिळविली. महार समाजातील एक युवक विलायतेला जाऊन उच्चविद्याविभूषित होतो, ही बाबच मुळी राजर्षींना अभिमानास्पद वाटली. आपण अंगिकारलेल्या कार्याला अशीच फळे येण्याची स्वप्ने ते पाहात असत. दत्तोबांना सांगून त्यांनी बाबासाहेबांना भेटीला बोलावले. तोपर्यंत भारतातील संस्थानिकांबद्दल, त्यांच्या लहरी वर्तणुकीबद्दल बाबासाहेबांच्या मनात एक प्रकारची अढी होती. मात्र, राजर्षींच्या पहिल्या भेटीतच ती गळून पडली. परळच्या चाळीत आणि त्यानंतर कोल्हापूरमध्ये त्यांच्या या भेटी झाल्या. अस्पृश्यांची बाजू मांडण्यासाठी बाबासाहेबांना वृत्तपत्राची निकड जाणवू लागलेली होती. ती त्यांनी राजर्षींना बोलून दाखविली. त्यांचा हा विचार पसंत पडून राजर्षींनी लगोलग त्यांना अडीच हजार रुपयांचा धनादेश प्रदान केला. राजर्षींच्या या मदतीमधूनच ३१ जानेवारी १९२० पासून मूकनायक प्रकाशित होण्यास सुरवात झाली. सरकारी नोकरीत असल्याने बाबासाहेबांचे त्यावर नाव नव्हते. पांडुरंग भटकर यांचे नाव संपादक म्हणून लागले. मात्र, अग्रलेखासह बहुतांश लेखन बाबासाहेबच करीत असत.
याच वेळी कागल संस्थानातल्या माणगाव येथे अस्पृश्यांची परिषद भरविण्याचे नियोजन दत्तोबा पोवारांसह निंगाप्पा ऐदाळे वगैरे मंडळी करीत होती. या परिषदेचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेबांना निमंत्रण देण्यात आले. २० व २१ मार्च १९२० रोजी माणगाव येथे झालेली ही परिषद अनेकार्थांनी ऐतिहासिक स्वरुपाची ठरली. बाबासाहेबांच्या सामाजिक कार्याच्या दृष्टीने त्यांचे नेतृत्व प्रस्थापित करणाऱ्या या पहिल्या परिषदेस राजर्षींची उपस्थिती आणि त्यांचे भाषण फार महत्त्वपूर्ण ठरले. शिकारीहून परत जाता जाता या परिषदेस उपस्थित राहात असल्याचे राजर्षींनी दर्शविले असले, तरी त्यामागे त्यांचे धोरणीपण अधोरेखित होते. अस्पृश्य समाजाला आंबेडकरांच्या रुपाने त्यांच्यातीलच नेता लाभला असून भविष्यात ते या देशाचे पुढारी होतील, असे भाकितच राजर्षींनी वर्तविले. त्याचबरोबर परिषदेनंतर त्यांना रजपूतवाडीच्या कँपवर भोजनाचे निमंत्रणही दिले. या परिषदेत झालेल्या इतर ठरावांबरोबरच शाहू महाराज यांचा जन्मदिवस हा उत्सवाप्रमाणे साजरा करण्याचा ठरावही करण्यात आला.
माणगाव परिषदेनंतर दोनच महिन्यांत नागपूर येथे झालेल्या अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेचे अध्यक्षस्थान राजर्षींनी स्वीकारले. माणगाव परिषद ही जणू या नागपूर परिषदेची बीजपरिषद होती. आक्कासाहेबांची प्रकृती खालावल्यामुळे या परिषदेला राजर्षी उपस्थित राहतील की नाही, याविषयी साशंकता निर्माण झाली होती. त्यावेळी बाबासाहेबांनी त्यांना पाठविलेले पत्र हृदयास भिडणारे आहे. या पत्रात बाबासाहेबांनी म्हटले की, नागपूरच्या परिषदेस हुजुरांचे येणे झाले नाही तर आमचा सर्वनाश होणे अटळ आहे. ही आणीबाणीची वेळ आहे. या प्रसंगी आपला आधार व टेकू नाही मिळाला, तर काय उपयोग. घरी अपत्य आजारी असताना आपणास सभेस गळ घालणे हे कठोरपणाचेच लक्षण. पण काय करावे? आक्कासाहेबांप्रमाणे आम्ही आपली लेकरे नव्हे काय? आपल्याशिवाय आमचा कोण वाली आहे? आम्ही कालपर्यंत किती आजारी आहोत, हे आपणास सांगायला नको. आमचा परामर्ष यावेळी आपण घेतलाच पाहिजे. नाही तर आपल्यावर बोल नाही, रुसवा राहील. म्हणून माझी सविनय प्रार्थना आहे की, अन्य सर्व गोष्टींकडे काणाडोळा करून सभेचे अध्यक्षस्थान मंडित करून या आपल्या लडिवाळ अस्पृश्य लेकास वर येण्यास हात द्यावा. यावेळी जर त्यांची उपेक्षा केली तर ते कायमचे खाली जातील. मग त्यांना वर काढणे अशक्य होईल. बाबासाहेबांचे हे शब्द वाचून राजर्षींच्या हृदयाला पाझर फुटला नसता तरच नवल. ते नागपूर परिषदेला उपस्थित राहिले आणि त्यांनी देशभरातून आलेल्या अस्पृश्य बांधवांना प्रेमभराने संबोधितही केले. श्रीपतराव शिंदे यांनी महाराजांचे भाषण वाचून दाखविले. त्यात महाराजांनी जातिनिर्मूलनामध्ये शिक्षण, रोटीव्यवहार आणि बेटीव्यवहाराचे महत्त्व सांगितले. त्याशिवाय जातिनिर्मूलनाचे आणखी एक महत्त्वाचे सूत्र सांगताना महाराज म्हणतात की, लग्नकार्यात निरर्थक पैसा खर्च करण्यापेक्षा शिक्षणासारख्या उपयुक्त कामाकडे तो लागला पाहिजे. ज्याप्रमाणे जपानमधील उच्चवर्णीय सामुराई यांनी पुढाकार घेऊन जसा तेथील जातिभेद संपवला, त्याचप्रमाणे येथील उच्चवर्णीयांची जातिभेद निर्मूलनातली भूमिका महत्त्वाची आहे. खालील जातींनी आपली सुधारणा करून, दर्जा वाढवून घेण्याचा व वरील पायऱ्यांवर चढण्याचा प्रयत्न चालूच ठेवला पाहिजे. आणि वरील जातींनीही जरुर तर काही पायऱ्या खाली येऊन त्यांना हात देऊन वर घेतले पाहिजे. असे झाले म्हणजे सुरळीतपणे व सलोख्याने हे जातिभेद मोडण्याचे बिकट काम सिद्धीस जाण्याचा संभव आहे. आम्हासारख्या मराठ्यांना सुद्धा जात मोडून एकी करण्यास भाग पाडले पाहिजे, अशी भावना महाराजांनी व्यक्त केली. या परिषदेतही महाराजांचा जन्मदिन उत्सवासारखा साजरा करण्याचा ठराव झाला.
याच कालावधीत बाबासाहेबांनी राजर्षींना लिहीलेल्या एका पत्रात २६ जूनचा आपला वाढदिवस सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने मूकनायकचा विशेषांक प्रकाशित करण्याचा मानस आहे. असे महाराजांना कळविले होते. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे दरबारकडून उपलब्ध करून द्यावीत, अशी विनंतीही केली होती. बाबासाहेबांचे हे पत्र म्हणजे राजर्षींच्या जन्मतारखेचा एक अस्सल पुरावा आहे, यात शंका नाही.
नागपूर परिषदेनंतर बाबासाहेब महाराजांच्या मदतीनेच उर्वरित विद्याभ्यास पूर्ण करण्यासाठी इंग्लंडला रवाना झाले. यावेळी माझी भगिनी रमाबाईला मी कोल्हापूरला तिच्या माहेरी घेऊन जातो, असे भावोद्गार महाराजांनी काढले होते. बाबासाहेबांना त्यांनी त्यांचे मित्र सर अल्फ्रेड पीज यांच्यासाठी बाबासाहेबांचा गौरवपूर्ण परिचय करून देणारे व गरज भासल्यास त्यांना मदत करण्याचे आवाहन करणारे पत्र दिले होते.
बाबासाहेब तिकडे असताना इकडे टिळकांनी महार ही गुन्हेगार जमात असल्याचे उद्गार काढले होते. त्याचप्रमाणे त्यांनी जमविलेल्या सार्वजनिक फंडातील गैरव्यवहाराचे प्रकरणही त्यावेळी चर्चेत आले होते. या दोन प्रकरणांमध्ये टिळकांवर दिवाणी अगर गुन्हेगारी स्वरुपाचा खटला दाखल करता येईल का, याविषयी इंग्लंडमधील मे. लिटल् आणि कंपनीकडे चौकशी करावी, असे पत्रही राजर्षींनी बाबासाहेबांना लिहीले होते. त्यावर अशा खटल्यातून त्रासाखेरीज काहीच निष्पन्न होणार नाही, असे बाबासाहेबांनी महाराजांना कळविले. त्यावर, महाराज पुन्हा त्यांना पत्र पाठवून सांगतात की, अशी केस दाखल करा. बाकी काही नाही झाले तरी, त्यामुळे ही केस कोणी दाखल केली, याची चर्चा होईल आणि तुम्ही साऱ्या इंग्लंडास माहिती व्हाल.
बाबासाहेब इंग्लंडमधील घडामोडींची फर्स्ट हँड माहिती पत्राद्वारे महाराजांना अवगत करीत असत. माँटेग्यू यांच्याशी झालेल्या भेटी आणि त्यातून मुंबई प्रांतिक विधिमंडळात त्यांनी दिलेली सदस्यपदाची ऑफर याविषयीही बाबासाहेब कळवितात. इंग्लंडमधील मजूर पक्षाशीही संवाद प्रस्थापित करीत असल्याचे त्यांनी कळविल्याचे दिसते.
४ सप्टेंबर १९२१चे बाबासाहेबांनी महाराजांना पाठविलेले पत्रही असेच हृदयाला भिडणारे आहे. या पत्रात त्यांनी महाराजांकडे दोनशे पौंडांच्या कर्जाची मागणी केली आहे. चलनाचे दर वाढल्यामुळे माझी लॉ ची फी १०० पौंड आणि भारतात परतण्यासाठी म्हणून १०० पौंड असे दोनशे पौंडांचे कर्ज द्यावे. ते परतल्यानंतर व्याजासह परतफेड करेन, असे बाबासाहेब कळवितात. याच पत्राच्या अखेरीस तुमची आम्हाला नितांत गरज आहे. कारण भारतात उदयास येऊ घातलेल्या सामाजिक लोकशाहीच्या चळवळीचे आपण महान आधारस्तंभ (Pillar of the great movement towards social democracy)आहात, असे गौरवोद्गार बाबासाहेबांनी काढले आहेत. राजर्षींच्या समग्र कार्याचे एका वाक्यात यथोचित मूल्यमापन करणारे असे हे बाबासाहेबांचे उद्गार आहेत.
६ मे १९२२ रोजी महाराजांचे निधन झाल्याची वार्ता समजताच बाबासाहेबांचे हृदय विदीर्ण झाले. अत्यंत दुःखी आणि उद्विग्नावस्थेत त्यांनी राजाराम महाराजांना सांत्वनाची तार पाठविली. त्यामध्ये महाराजांच्या निधनाने व्यक्तीगत पातळीवर माझी अपरिमित हानी झाली आहेच, पण अस्पृश्य समाजाने आपला महान तारणहार गमावला, अशा शोकभावना त्यांनी व्यक्त केल्या.
महाराजांच्या निधनानंतरही राजाराम महाराज, कोल्हापूर संस्थान यांच्याशी बाबासाहेबांचा स्नेह राहिला, तरी शाहू महाराजांइतकी जवळीक मात्र त्यात प्रस्थापित होऊ शकली नव्हती. महाराजांच्या निधनानंतर कोल्हापूर दरबारच्या दिवाणांना आर्थिक मदतीची विनंती करण्यासाठी लिहीलेल्या पत्रात बाबासाहेब लिहीतात की, शाहू महाराज हयात असते तर आपल्याकडे मदतीसाठी याचना करण्याची वेळ आली नसती. पण, आपले नवीन महाराजही शाहू महाराजांसारखेच कृपाळू आहेत. त्यामुळे आमची निकड त्यांच्या कानी घालून काही मदत देता आली, तर पाहावे, असे बाबासाहेब लिहीतात. महाराजांच्या जाण्याने हा फरक निश्चितपणे पडला होता. बाबासाहेबांचा अर्धपुतळा त्यांच्या हयातीमध्येच कोल्हापूरच्या बिंदू चौकात बसविण्यात आला, हा नगरीने त्यांच्या कार्याला केलेला मानाचा मुजरा आहे.
बाबासाहेब महाराजांना माय डियर महाराजासाहेब असे संबोधन लिहीत, तर महाराज त्यांना माय डियर डॉ. आंबेडकर असे लिहीत. एका पत्रात मात्र महाराजांनी बाबासाहेबांना लोकमान्य डॉ. आंबेडकर असे संबोधले आहे. महाराजांच्या लेखी डॉ. आंबेडकर हे सच्चे लोकमान्य व्यक्तीमत्त्व होते. पुढे बाबासाहेबांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने महाराजांना अभिप्रेत असणारे आपले लोकमान्यत्व सिद्ध केले.

(लेखक फुले, शाहू, आंबेडकर विचारांचे अभ्यासक आहेत.)

गुरुवार, १४ एप्रिल, २०१६

महान संज्ञापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर




(भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीच्या निमित्ताने दै. सकाळच्या कोल्हापूर आवृत्तीने आज विशेष पुरवणी प्रसिद्ध केली आहे. या पुरवणीत प्रसिद्ध झालेला माझा लेख दै. सकाळच्या सौजन्याने ब्लॉग वाचकांसाठी पुनर्प्रकाशित करीत आहे. )

विसाव्या शतकामध्ये भारतात होऊन गेलेले महान संज्ञापक (कम्युनिकेटर) कोण?, असा प्रश्न संवादशास्त्राचा एक विद्यार्थी म्हणून माझ्यासमोर उभा राहतो, तेव्हा दोन नावे अग्रक्रमाने नजरेसमोर येतात. त्यामध्ये एक महात्मा गांधी आणि दुसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर!
महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेमधील त्यांच्या चळवळींपासून ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यापर्यंत त्या काळात उपलब्ध असलेल्या संज्ञापनाच्या विविध साधनांचा उत्तम वापर केला. त्या काळात आपले विचार जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी वृत्तपत्र माध्यम सर्वाधिक प्रभावी ठरत असे. ही बाब लक्षात घेऊन गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये 'इंडियन ओपिनियन' नावाचे वृत्तपत्र सुरू केले आणि त्या माध्यमातून तेथील भारतीयांना संघटित करण्याचा यशस्वी प्रयोग केला. स्वच्छता, शिक्षण, स्वयंशासन आदींबाबतचे लेखनही ते करीत. दक्षिण आफ्रिकेमधील वास्तव्यादरम्यान 'इंडियन ओपिनियन' हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला होता, असे त्यांनी आपल्या आत्मचरित्रात नमूद केले आहे. तत्पूर्वी सुद्धा बॅरिस्टरीचे शिक्षण घेत असताना इंग्लंडमधील 'व्हेजिटेरियन' या वृत्तपत्रात शाकाहाराचे महत्त्व सांगणारे लेखन गांधीजींनी केले होते. भारतात आल्यानंतर आणि सार्वजनिक जीवनात सक्रिय झाल्यानंतर येथेही त्यांनी 'यंग इंडिया' आणि 'नवजीवन' ही वृत्तपत्रे चालविली. आपल्या चळवळीसाठी जनमत संघटित करण्याबरोबरच गांधीजींच्या सत्याग्रहाची भूमिका लोकांमध्ये रुजविण्याच्या कामी या वृत्तपत्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अस्पृश्यता निवारण हा गांधीजींच्या चिंतनाचा विषय होता. हिंदू धर्माच्या चौकटीत राहून हा विषय मार्गी लावण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आणि चातुर्वर्ण्याची चौकट भेदल्याखेरीज जातिअंताची चळवळ कदापि यशस्वी होऊ शकणार नाही, असा डॉ. आंबेडकर यांचा ठाम विश्वास होता. तरीही, गांधी त्यांच्या परीने या प्रश्नाकडे पाहात होते. अस्पृश्यांना हरिजन असे ते संबोधत. या विषयाला समर्पित अशी 'हरिजन' (इंग्रजी), 'हरिजनबंधू' (गुजराती) आणि 'हरिजन सेवक' (हिंदी) अशी तीन वृत्तपत्रे प्रकाशित करण्यास त्यांनी १९३३मध्ये सुरवात केली. अस्पृश्यता निवारण, ग्रामस्वराज्य आदी विषयांसंदर्भातील गांधींची मते या वृत्तपत्रांतून प्रकाशित होत. गांधीजींचे नाव जोडले असल्यामुळे जाहिराती न घेताही मोठ्या वितरणाच्या बळावर ही वृत्तपत्रे सर्वदूर पोहोचत. लोकमान्य टिळक यांच्यानंतर राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्याचे नेतृत्व महात्मा गांधी यांच्याकडे आल्यामुळे आणि हे नेतृत्व अहिंसा तत्त्वाच्या प्रयोगशीलतेमुळे सर्वमान्यतेला पोहोचल्यामुळे त्यांचे विचार पोहोचविणाऱ्या वृत्तपत्रांसाठीही देशात मोठी जागा निर्माण झाली. जी भूमिका 'केसरी'ने लोकमान्य टिळकांचे जहाल विचार आणि लोकप्रियता प्रस्थापित करण्यात बजावली होती, ती भूमिका वृत्तपत्रांनी महात्मा गांधी यांच्या बाबतीतही बजावली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतीत मात्र सारी परिस्थितीच प्रतिकूल होती. हजारो वर्षे सामाजिक गुलामगिरीच्या विळख्यात पिचलेल्या दलित समाजाची या जोखडातून मुक्तता करण्यासाठी हरेक प्रकारची धडपड त्यांना करावयाची होती. जातीपातीच्या कल्पनांचा मोठा पगडा, रुढी-परंपरांचा घट्ट विळखा आणि चातुर्वर्ण्याच्या संकल्पनेतून लादण्यात आलेले अडाणीपणाचे ओझे आणि या सर्व बाबींमुळे दारिद्र्याचे जीणे वाट्याला आलेल्या दीनदलितांचा उद्धार करण्यासाठी बाबासाहेब सिद्ध झाले होते. एकीकडे राजकीय स्वातंत्र्याच्या मागणीचा झंझावात इतका प्रचंड प्रमाणात वाढला होता की, त्यापुढे बाबासाहेबांची सामाजिक स्वातंत्र्याची मागणी फिकी ठरत होती. या देशातील सामाजिक गुलामगिरी संपुष्टात आल्याखेरीज मिळणारे राजकीय स्वातंत्र्य कोणत्या वर्गाचे हितरक्षण करण्यासाठी वापरले जाईल, याची साधार भीती बाबासाहेबांना होती. त्यामुळेच त्यांनी 'मूकनायक' या वृत्तपत्राच्या माध्यमातून यासंदर्भातील जनजागृती करण्यासाठी अग्रलेखांची मालिका लिहीली. ज्या समाजघटकांसाठी काम करावयाचे होते, ज्यांच्यात जागृती घडवून आणावयाची होती, त्याचे अक्षरशत्रुत्व ही बाबासाहेबांसमोरील मोठी समस्या होती. त्यामुळे केवळ वृत्तपत्राचे साधन वापरून संबंधितांपर्यंत आपले विचार पोहोचविता येणार नाहीत, याची जाणीव त्यांना होती, पण तरीही या महत्त्वपूर्ण जनसंज्ञापन साधनाचे महत्त्व ते जाणून होते. ३१ जानेवारी १९२० साली प्रकाशित झालेल्या 'मूकनायक'च्या पहिल्याच अंकात त्यांनी आपली या संदर्भातील भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणार्‍या अन्यायावर चर्चा होण्यास तसेच त्यांच्या भावी उन्नतीच्या मार्गांची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी भूमी नाही. पण अशा वर्तमानपत्राची उणीव असल्याने ती भरुन काढण्यासाठी या पत्राचा जन्म आहे.' सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यामधील संज्ञापन साधनांचे महत्त्व बाबासाहेबांनी ओळखले होते. त्यामुळेच अत्यंत विपरित आणि बिकट परिस्थितीतही वृत्तपत्रे चालविली. 'मूकनायक'नंतर १९२७मध्ये 'बहिष्कृत भारत', १९३०मध्ये 'जनता' आणि १९५६मध्ये 'प्रबुद्ध भारत' अशी वृत्तपत्रे बाबासाहेबांनी चालविली. या वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपली भूमिका निःसंदिग्धपणे मांडण्याचे काम त्यांनी केले. विशेषतः महाडच्या समता संगराच्या संदर्भात 'बहिष्कृत भारत'मधील बाबासाहेबांचे अग्रलेख, वार्तालेख आणि या सत्याग्रहाला वेगळे वळण लावून देण्याच्या विरोधी वृत्तपत्रांच्या कारस्थानी वृत्तांचा बाबासाहेबांनी घेतलेला परखड समाचार या बाबी मुळातूनच वाचण्यासारख्या आहेत. याशिवाय, नंतरच्या काळात वेगवेगळ्या विषयांवरील आपली भूमिका विषद करण्यासाठीही बाबासाहेबांनी इतर वृत्तपत्रांतूनही लेखन केले.
वृत्तपत्रांखेरीज तत्कालीन परिस्थितीत पुस्तके हे एक महत्त्वाचे संज्ञापनाचे साधन होते. बाबासाहेबांनी विलायतेमधील शिक्षणादरम्यान अर्थशास्त्रीय व सामाजिक संशोधनावरील आपली बैठक पक्की केली होती. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक प्रकारच्या लेखनाला संशोधनाची जोड होती. विविध दाखले, पुरावे यांच्यानिशी ते आपले म्हणणे जास्तीत जास्त ठामपणे मांडण्याचा प्रयत्न करीत. त्यांच्या 'कास्ट्स इन इंडिया' या भारतीय जातिव्यवस्थेचा शोध घेणाऱ्या पहिल्या संशोधनापासून अगदी अखेरच्या 'बुद्धा ॲन्ड हिज धम्मा' या ग्रंथापर्यंत बाबासाहेबांच्या या चिकित्सक, संशोधकीय दृष्टीकोनाचा प्रत्यय येतो. 'द प्रॉब्लेम ऑफ रुपी', 'शूद्र पूर्वी कोण होते?', 'अस्पृश्य मूळचे कोण?,' 'बुद्ध की कार्ल मार्क्स?', 'थॉट्स ऑन पाकिस्तान' असा बाबासाहेबांचा प्रत्येक ग्रंथ त्यांच्या संशोधन दृष्टीची प्रचिती देणारा आणि प्रत्येक प्रश्नाची मूलगामी मांडणी करणारा आणि द्रष्टेपणाने विविध समस्यांचा वेध घेऊन त्यांवर दूरगामी उपाय सुचविणाराही आहे. आजही त्यांची प्रस्तुतता किंवा उपयोजन कमी झालेले नाही. 'ॲनिहिलेशन ऑफ कास्ट' अर्थात 'जातिनिर्मूलन' या लाहोरमधील जातपात तोडक मंडळाच्या अधिवेशनासाठी १९३६मध्ये लिहीलेल्या आणि तथापि आयोजकांच्या दुराग्रहामुळे होऊ न शकलेल्या भाषणाचे पुस्तक रुप आज ७५ वर्षांनंतरही बाबासाहेबांच्या अत्युच्च प्रतिभेचे दर्शन घडविते. जातिअंताची चळवळ यशस्वी व्हावयाची असेल तर आंतरजातीय विवाह, स्त्री-पुरूष समानता, उपलब्ध संसाधनांचे फेरवाटप, व्यापक शिक्षण-लोकशिक्षण आणि धर्मचिकित्सा (धर्मांतर) या पंचसूत्रीचा स्वीकार करणे आणि ती अंमलात आणणे अपरिहार्य असल्याचे प्रतिपादन बाबासाहेबांनी यात केले आहे. त्या प्रतिपादनामधील प्रस्तुतता आजही कमी झालेली नाही, किंबहुना अधिकच वाढलेली आहे.
याशिवाय, बाबासाहेबांनी आपल्या मित्र, सुहृदांबरोबर तसेच कार्यालयीन स्तरावर केलेला पत्रव्यवहार हा सुद्धा त्यांच्या संवाद कौशल्याची साक्ष देताना दिसतो.
लिखित माध्यमाच्या मर्यादा सुरवातीला म्हटल्याप्रमाणे बाबासाहेबांच्या संज्ञापनाला जरुर होत्या, पण खरा कम्युनिकेटर तोच, जो अशा अडचणींवर मात करूनही आपली मते व्यापक समाजापर्यंत पोहोचवितो. नेमके हेच कार्य बाबासाहेबांनी जाणीवपूर्वक केले. विविध समाजघटकांपर्यंत पोहोचण्यासाठी अप्रत्यक्ष संवादाबरोबरच प्रत्यक्ष संवादावरही त्यांनी मोठ्या प्रमाणावर भर दिला. समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी विविध आयोगांसमोरील साक्षी, विधिमंडळातील, संसदेमधील भाषणे या व्यासपीठांचा त्यांनी गांभीर्यपूर्वक वापर केला. साऊथबरो कमिशनसमोर दलितांच्या प्रश्नांसंदर्भात साक्ष देण्यासाठी बाबासाहेबांनी केलेल्या प्रयत्नांतून खरे तर त्यांच्या संवेदनशीलतेची साक्ष मिळते. शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न यांच्यासंदर्भातील आंदोलनांचे नेतृत्व, युवक, महिला यांच्यासह देशभरात ठिकठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सभा आणि त्यांच्यासमोर केलेल्या भाषणांतून बाबासाहेबांनी केलेले प्रबोधन यातूनही त्यांच्यातील संज्ञापक झळाळून सामोरा येतो. येवला येथे १९३५मध्ये त्यांनी केलेली धर्मपरिवर्तनाची घोषणा आणि तिथपासून १९५६मध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनापर्यंत या संदर्भात केलेली विचारांची घुसळण ही सुद्धा त्यांच्यातील महान संज्ञापकाचा गुणधर्म अधोरेखित करते. बाबासाहेबांच्या लेखन व भाषणांचे २२ खंड प्रकाशित होऊन अद्यापही बरेचसे साहित्य अप्रकाशित आहे, यातूनही त्यांच्या संज्ञापन कौशल्याची प्रचिती येते.
संज्ञापनाच्या संदर्भात बाबासाहेब हे सच्चे ओपिनियन लीडर होते. त्यांनी या देशामध्ये ओपिनियन मेकर्सची भली मोठी फौज निर्माण केली, ज्यांच्या माध्यमातून या देशात स्वातंत्र्य, समता व बंधुतेचा, नवसमाज निर्मितीचा, सामाजिक क्रांतीचा संदेश तळागाळातल्या समाजघटकांपर्यंत पोहोचला. त्यातून वंचित, शोषितांच्या मनात आत्मोन्नतीचे स्फुल्लिंग चेतविले. आणि अशा समाजघटकांमधील शिक्षणापासून वंचित घटक प्रथमच शिक्षणाच्या प्रवाहात सामील होऊ शकले. आजही बाबासाहेबांच्या विचारांबरहुकूम वाटचाल करणारे, लोकांपर्यंत पोहोचविणारे अनेक ओपिनियन मेकर कार्यरत आहेत. अनेक वृत्तपत्रे त्यांच्या विचारांचा आजही प्रसार करीत आहेत. बाबासाहेबांचे द्रष्टेपण असे की, त्यांच्या विचारांची प्रस्तुतता आजही कमी होत नाही, उलट वृद्धींगतच होते आहे. खऱ्या संज्ञापकाचे हेच तर लक्षण असते.