बुधवार, १२ एप्रिल, २०१७

"दीज आर माय स्टुडंट्स!"


(काही दिवसांपासून आमचे मॅथ्सचे शिक्षक प्रा. अजित पंगू सरांची आठवण येत होती. परवाच एका विशेषांकात त्यांचा लेख वाचला. त्यात सरांचा मोबाईल नंबर होता, तो घेतला. परवा घरी थोडा वेळ होता म्हणून एक कपाटातलं एक पुस्तक वाचायला घेतलं. त्यातून काही तरी खाली पडलं. उचलून पाहतो, तर सोबतचा, जवळजवळ बारा वर्षांपूर्वी (दि. २६ जानेवारी २००५ रोजी) पंगू सरांच्या एका अविस्मरणीय भेटीनंतर लिहीलेला तो लेख होता. लेख कसला? ओथंबलेल्या भावनांचा तो एक छोटासा ओहोळच होता म्हणा ना! मग, या आपल्या हक्काच्या प्लॅटफॉर्मवर तो शेअर करायला हवाच ना! आमच्या पंगू सरांमध्ये तुम्हालाही तुमचे कोणी शिक्षक दिसतील, हे नक्की! वाचा, तर मग...)
 
Prof. Ajit Pangu
26 जानेवारीचा दिवस... मी, विऱ्या (वीरेंद्र बाऊचकर) आणि सागर (कुलकर्णी) 'अजब'मधून बाहेर पडलो...
तेव्हा मी आणि सागर कोल्हापुरात अभय मिराशींच्या रुमवर भाड्यानं राहात होतो, तर विऱ्या सांगलीत. तिघेही बॅचलर.. मात्र, विऱ्याच्या आयुष्यात एक महत्त्वाची घडामोड झालेली.. त्याचा साखरपुडा झालेला... अगदी अचानक! या गोष्टीची आम्हाला तो भेटेपर्यंत काहीच कल्पना नव्हती. रुमवर आल्यानंतर त्याने थेट साखरपुड्याच्या समारंभाचे फोटोच आमच्या हातात ठेवले. ते पाहून आम्ही चाटंचाटच पडलो. काही प्रतिक्रिया देण्यापलिकडे आमची अवस्था झाली. सागऱ्याच्या डोक्यावरचे उरले-सुरले केसही उभे राहिले. मग, विऱ्याच्या फिरक्या घेण्यात रात्र गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी विऱ्याच्या वाङ्दत्त वधूला, तिच्या परीक्षेसाठी आवश्यक पुस्तके घेण्यासाठीच आम्ही 'अजब'मध्ये गेलो होतो. त्या प्रसन्न मूडमध्येच आम्ही दुकानातून बाहेर पडलो. पुन्हा विऱ्या आमच्या टारगेटवर होताच.
थोडं अंतर पुढं गेलो असू, इतक्यात मागून 'जत्राटकर' अशी हाक कानी आली. कुणी हाक मारली असावी, हे पाहण्यासाठी आमच्या तिघांच्याही नजरा तिकडं वळल्या. हाक मारणारा चेहरा दिसला आणि प्रचंड आनंद झाला. ते पंगू सर होते- प्रा. अजित पंगू! अर्जुननगरच्या (व्हाया निपाणी) देवचंद कॉलेजमध्ये मॅथ्स शिकवायचे. पण, केवळ एवढीच त्यांची ओळख सांगता यायची नाही. अतिशय प्रेमळ व्यक्तीमत्त्व. जितकं प्रेम मॅत्सवर करायचे, कदाचित तितकंच प्रेम या माणसानं आमच्यावर केलं. म्हणूनच बी.एस्सी. होऊन आज आठ वर्षं उलटली, तरी सरांना आम्ही विसरलो नव्हतो. आणि आम्हाला अगदी पाठमोरं असतानाही ओळखणारे सरही आम्हाला विसरलेले नव्हते, ही गोष्ट आम्हा विद्यार्थ्यांना सुखावून गेली.
आम्ही काही क्षण सरासमोर तसेच स्तब्ध उभे राहिलो. सरांसोबत एक व्यक्ती होती. त्या व्यक्तीला त्यांनी आमची ओळख करून दिली, 'दीज आर माय स्टुडंट्स फ्रॉम देवचंद कॉलेज.' सरांनी आम्हा तिघांचीही आपुलकीनं चौकशी केली. 'तुझे लेख वाचतो बरं का!' (तेव्हा मी 'कोल्हापूर सकाळ'मध्ये उपसंपादक होतो.) अशी मनाला सुखावणारी प्रतिक्रिया त्यांनी मला दिली. तर, विऱ्या 'चाटे'मध्ये शिकवतो, हे समजल्यानंतर 'फायनली, हि हॅज कन्व्हर्टेड टू अ टीचर!' अशी मार्मिक प्रतिक्रिया दिली. सागर एमपीएससी करतोय, हे समजल्यावर त्यालाही 'व्हेरी गुड, कीप इट अप!' असा शेरा दिला. आणि सर निरोप घेऊन निघून गेले.
अवघ्या काही मिनिटांचीच ही भेट. पण, आम्हाला ती पुन्हा आमच्या कॉलेज जीवनात घेऊन गेली. त्यानंतर संपूर्ण दिवसभर आणि रात्रीही पुन्हा सरांच्या या भेटीचीच चर्चा आम्ही करीत राहिलो. विशेषतः 'दीज आर माय स्टुडंट्स!' या एका वाक्यानं हृदयात खोलवर कुठंतरी घर केलं- कायमचंच!
तसं पाह्यला गेलं तर एक मनू (मृणाल) सोडल्यास मॅथ्स हा आमच्या ग्रुपमध्ये कुणाच्याच फारसा जिव्हाळ्याचा विषय नव्हता. पण, केवळ पंगू सर आहेत, या एकाच विश्वासावर आम्ही 'बी' ग्रुपला बिनदिक्कतपणे रामराम ठोकला होता. कॉलेजमध्ये सेकंड इयरपर्यंत मॅथ्स होतं. साहजिकच पंगू सर होते, म्हणूनच आम्ही मॅथ्स ठेवलेलं.. टी.वाय.ला जर कॉलेजमध्येच मॅथ्स असतं आणि पंगू सरच जर ते शिकवणार असते, तर आम्ही टी.वाय.ला जे लोक केमिस्ट्रीकडं वळलो, त्यातले काही जण तरी नक्कीच मॅथ्सला नक्कीच गेलो असतो. पण, तसं झालं नाही. कारण आमचं मॅथ्स म्हणजे पंगू सरच होते. 'सग्गळं कसं अगदी मॅकॅनिकल आहे!' अशा या एकाच वाक्यात ते मॅथ्सचं सारं मॅकॅनिझम स्पष्ट करायचे. त्यांचं ते मॅथ्सवरचं प्रेमच, त्यांच्या शिकवण्यातून आमच्या हृदयापर्यंत उतरायचं. आता सध्या आमचा मॅथ्सशी तसा थेट संबंध उरला नसल्यानं त्यातलं बरचंसं विस्मरणात गेलं असलं तरी, सरांचं ते प्रेम आजही आमच्या हृदयात जसंच्या तसं आहे.
सरांनी या भेटीत आणखी एक वाक्य उच्चारलं होतं, 'मला तुम्ही तिघेही देवचंदच्या वर्गात एका बेंचवर बसलेले दिसताय,' असं ते म्हणाले. हे खरं होतं. त्यांच्या तासाला आम्ही तिघंही पहिल्या बेंचवर बसायचो. सरांनी ते लक्षात ठेवलं होतं, हे पाहून आम्हालाही भरून आलं. वैशिष्ट्य म्हणजे कितीतरी महिन्यांनी आम्ही तिघे असे एकत्र आलो होतो आणि फिरायला बाहेर पडलेलो. त्याचवेळी सरांची भेट झाली, या योगायोगाचंही आम्हाला अप्रूप वाटलं.
वर्गात सर आम्हाला नेहमी म्हणायचे की, 'रिमेंबर, यू आर द स्टुडंट्स ऑफ मॅथ्स!', पण, आम्हाला माहीत होतं की आम्ही मॅथ्सचे नव्हे, तर पंगू सरांचे विद्यार्थी होतो. त्यांच्याखेरीज मॅथ्सची कल्पनाच करणं आम्हाला अशक्य होतं. कारण ते आम्हाला शिकवायला येईपर्यंत आधीच्या शिक्षकांनी हा क्लिष्ट विषय आमच्यासाठी अधिकच रुक्ष आणि भितीदायक करून ठेवला होता. एक गोष्ट बरी होती की, जीएनके (जी.एन. कुलकर्णी) सरांनी हायस्कूल जीवनात या विषयाची आमची चांगली तयारी करून घेतली होती. त्यामुळं थोडीफार आस्था बाकी होती, तिला पंगू सरांनी प्रेमाचं स्वरुप प्राप्त करून दिलं. कुठल्याही विषयावर प्रेम केलं, तर तो किती का अवघड असे ना, आपल्या आवाक्याबाहेर जाणार नाही, हा विश्वास मॅथ्सबाबत आमच्या मनात जागृत करण्यात ते यशस्वी झाले होते. आम्ही मॅथ्समध्ये कधीच आऊटस्टँडिंग नव्हतो. (आम्ही कुठल्याच विषयात तसे नव्हतो म्हणा!) पण, त्या विषयाबद्दल अढी मात्र पुढच्या काळात आमच्या मनात राहिली नाही- याचं श्रेय संपूर्णपणे पंगू सरांनाच होतं. तथापि, विषयापेक्षाही ज्या आपुलकीनं सरांनी आम्हाला तो शिकवला, तो जिव्हाळा, त्याचा ओलावा विसरता येणं कधीच शक्य नाही. एक शिक्षक- तोही गणिताचा- इतका मृदूभाषी, प्रेमळ असू शकतो, यावर विश्वास ठेवणं कदाचित अवघड जाईल, पण पंगू सरांच्या बाबतीत मात्र ते तंतोतंत लागू पडतं.
'तुमच्यासारखी बॅच मला परत कधीच मिळाली नाही,' अशी खंत सरांनी आम्हाला वेळोवेळी बोलून दाखविली होती. मात्र, सर, तुमच्यासारखा गणित शिकविणारा शिक्षकही आम्हाला भेटलेला नव्हता. किंवा तो भेटला असता किंवा नसता, याविषयी आम्हाला शंका आहे, ही सुद्धा वस्तुस्थितीच आहे. कारण 'आमचं मॅथ्स तुमच्यापासून सुरू होतं आणि तुमच्यापर्यंतच संपतं,' हे कबूल करायला आम्हाला अजिबात संकोच वाटत नाही (तुम्हाला राग येणार, हे माहीत असून सुद्धा!) आणि म्हणूनच आम्हाला आजही अभिमान वाटतो की, 'वुई आर युवर स्टुडंट्स, सर- वुई आर युवर स्टुडंट्स!!'

(दि. 26 जानेवारी 2005/ रात्रौ 12.45 वा.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा