गुरुवार, २६ जुलै, २०१८

जागर ‘गुरू’ आठवणींचा!



(दर गुरूपौर्णिमेला एका गुरूची आठवण हमखास येते आणि त्या गुरूच्या निर्व्याज प्रेमाच्या आठवणींनी आजही हृदय उचंबळून येते. त्या गुरूला यंदाच्या गुरूपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला वाहिलेली शब्दसुमनांजली!)

Picture for representation purpose only


गुरुपौर्णिमा आली की, अनेक गुरूंच्या आठवणी मनात येतात; मात्र, गुरूपौर्णिमा शब्दाचा कधीही उच्चार किंवा आठव झाला तरी एका गुरूची आठवण मनात सदैव दाटून येते, हे गुरू म्हणजे माझे गायनाचे गुरू मधुकर लकडे गुरूजी.
गाण्याचा कीडा लहानपणापासूनच मला चावलेला. बाथरुमपासून ते शाळेचे वर्ग आणि त्या वर्गापासून गॅदरिंगपर्यंत असा हा गायन प्रवास झालेला. किशोरदा, कुमार सानु, रफी वगळले, तर रितसर गुरू असा कधी नव्हताच. नाही म्हणायला कागलमध्ये शौकतमामांच्या (शौकत शेख) गायनाचा प्रभाव होताच. गॅदरिंगमधल्या गाण्याची तयारीही शौकतमामाच्या देखरेखीखालीच व्हायची माझी. त्या अर्थानं शौकतमामा माझा पहिला गायनगुरू. मेघा रे मेघा रे.. म्हणावं तर त्यांनीच. हे गाणं कधीही ऐकताना सुरेश वाडकरांच्याही आधी माझ्या डोळ्यांसमोर शौकतमामाच उभा राहतो, आजही! एरव्ही बोलताना अडखळणारा शौकतमामा गायला लागला की, नुस्तं ऐकत राहावंसं वाटायचं.
पुढं आम्ही निपाणीला शिफ्ट झालो. गाण्याचा प्रवास कॉलेजच्या स्टेजपर्यंत झालेला होता. परिसरातल्या एक-दोन अंताक्षरीच्या स्पर्धाही आम्ही मारलेल्या. त्यामुळं गावातल्या स्थानिक ऑर्केस्ट्रामध्ये सहभागी व्हायची संधी मिळाली. गायन स्पर्धांतून भाग घेतला. कोल्हापूरच्या झंकारच्या साथीनं आम्ही आधी दांडियाच्या आयोजनापासून एकदम रंगारंग सुरवात केली. मग पुढं चॅरिटी शो वगैरे सुरू झालेलं. तिथं खऱ्या अर्थानं गायनाचं नेमकं व रितसर प्रशिक्षण घेण्याची जाणीव निर्माण होऊ लागली. उल्हासकाका आणि सुजातादीदी (जोशी) यांनीही तसा सल्ला दिलेला. तिथून गुरूचा शोध सुरू झाला. सोबतीला मित्रवर्य नामादा पण होते. दोघांनाही गुरूची निकड होती. हा आमचा शोध राममंदिरातल्या एका खोलीत शिकविणाऱ्या मधुकर लकडे (मूळ यरनाळचे) गुरूजींपर्यंत येऊन थांबला. आम्ही गुरूजींकडं गेलो, त्यांना आम्हा शिष्य करून घेण्याची विनंती केली. दोघांनाही सुगम संगीतात रस होता, पण बैठक तयार करावयाची होती, शास्त्रीय पद्धतीची. सुरांची, स्वरांची जाणीव निर्माण होण्यासाठी गुरूजींनी पेटीबरोबर व्होकल शिकायचा सल्ला दिला. आम्ही होकार दिला आणि आमची संगीत साधना सुरू झाली अगदी सारेगमपधनीसापासून. गुरूजींनी महिनाभर तेच घोटून घेतले. म्हणता म्हणता एकेक सूर समजू लागला. गळ्याला जरा वळण लागू लागले. पुढे महिनाभरानंतर मग पहिल्या भूप रागात आम्ही प्रविष्ट झालो. मंगलमय जय वाणी गजानन... म्हणताना सारेगमच्या पुढे सरकल्याचा आनंद व्हायचा, पण अजून मोठा पल्ला गाठायचाय, याची जाणीवही होती. पुढे मग मालकंस, बागेश्री, जयजयवंती असा टप्प्याटप्प्याने प्रवास सुरू झाला. गुरूजी घोटून घोटून तयारी करून घेत होते. कधीही रागावणं नाही की ओरडणं. चुकलं तरी स्वतः गाऊन दाखवायचं, स्वर कसा लावायचा, लावून धरायचा ते सांगायचं, मात्र कधीही रागावल्याचं स्मरत नाही.
गुरुपौर्णिमा जवळ आलेली. नामादानं गुरूजींना यंदा गुरूपौर्णिमा साजरी करू या का, म्हणून थोडं घाबरतच विचारलं. आम्ही चार पाच विद्यार्थीही होतोच. गुरूजींनी नकार दिला नाही, पण थोड्या साशंकतेनंच आम्हाला नाराज करायचं नाही, म्हणून त्यांनी होकार दिला की काय, असं आम्हाला वाटून गेलं. तोपर्यंत गुरूजींनी आणि आम्हीही तशा पद्धतीचा कार्यक्रम कधी केलेला नव्हता. पण, आम्हाला तेवढाही होकार पुरेसा होता. आम्ही रियाज आणि कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू केली. गुरूंप्रती आपल्या गायनातून कृतज्ञता अर्पण करायची, असं आम्ही ठरवलं. भाड्यानं स्टेज आणण्यापासून ते गुरूजींना विचारून निवडक दर्दी रसिक श्रोत्यांना प्रत्यक्ष भेटून आमंत्रित करणं, अशी कामं केली.
राम मंदिराच्या आवारातली ती सायंकाळ गुरूंना वंदन म्हणून जशी अविस्मरणीय ठरली, तशीच आम्हा विद्यार्थ्यांनाही जबाबदारीची जाणीव करून देणारी ठरली. जमलेल्या निवडक जाणकार श्रोत्यांसमोर आपल्या गुरूंना अजिबात उणेपणा येऊ द्यायचा नाही, उलट परिसरात त्यांचा लौकिक पसरला पाहिजे, हा हेतू समोर ठेवून आम्ही विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलं. कार्यक्रमाच्या अखेरीस गुरूजींनीही अतिशय बहारदार सादरीकरण केलं, आम्हा विद्यार्थ्यांनाही शुभेच्छा दिल्या.
साधारण वर्षभराच्या या गायन शिक्षणानंतर माझी बीएस्सी फर्स्टची परीक्षा जवळ आली, तेव्हा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. पुढं पुन्हा सुरू करण्याचं ठरवलं. पण, फर्स्ट इयरला मार्कांची गाडी अपेक्षेपेक्षा खाली घसरल्यानं पुढं केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं ठरवून गायन बॅकसीटलाच नव्हे, तर डिक्कीतच बंद झालं. त्यामुळं गुरूजींच्या समोरुनही जायला कसं तरीच वाटायचं. तरीही कुठं बाजारात किंवा रस्त्यात भेट झाली तर तू गाणं कधी सोडू नकोस, हे एवढंच वाक्य अगदी मनापासून सांगायचे. पण, माझ्या प्रायोरिटीज तोपर्यंत वेगळ्या झाल्या होत्या. पत्रकारितेचा रस्ता मी धरलेला होता. पण, कधी खुशियों में, खामोशियों में, तनहाईयों में गाणं गुणगुणताना गुरूजींचं वाक्य सदैव आठवायचं. आजही आठवतंय. आज गुरूजी हयात नाहीत, पण, त्यांचा संदेश मन पोखरत राहतो. गाणं म्हणताना पेटीवर लयदार बोटं फिरवीत शिकविणारी गुरूजींची विठूसावळी बैठी मूर्ती नजरेसमोर तरळत राहते. जणू काही आजही माझ्यासोबत असल्याचा भास निर्माण करीत राहते. त्या एका गुरुपौर्णिमेनंतर पुन्हा कधी तशा पद्धतीने गुरूपौर्णिमा साजरी केली नाही, मात्र तिच्या आठवणी दर गुरूपौर्णिमेला मनात रुंजी घालतात आणि बरोबरीने गुरूजींच्या आठवणीही मनात दाटून येतात.

४ टिप्पण्या:

  1. Nak देवराया... अंत असा पाहू... हे गाणे तू गायलेले मला आठवते. माझे गुरुजी आनंदा तुरंबेकर यांची तबल्याची साथ होती... राम मंदिर... निपाणी...

    १९९५ ची गुरु पौर्णिमा

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. तुझ्या स्मरणशक्तीचा हेवा वाटतो योगेश... ते दिवसच वेगळे होते... या आठवणीबद्दल धन्यवाद!

      हटवा