‘विनर, विनर; चिकन डिनर!’ ही आरोळी आज आपल्या भोवतालच्या अनेक युवा
तरुणांच्या भावविश्वाला, मेंदूला विळखा घालून बधीर करून सोडते आहे. ‘प्लेअर अननोन्स
बॅटलग्राऊंड’ असं जीभेला जडशीळ असं नाव घेतलं तर कदाचित
कोणाच्याच लक्षात येणार नाही; पण ‘पबजी’ (PUBG) असं म्हटलं की
लग्गेच लक्षात येईल. या पबजीनं केवळ आपल्याच देशात नव्हे, तर संपूर्ण जगभरात मोठा
गहजब माजविला आहे. गेल्या आठवड्यात, नव्हे अगदी पाचच दिवसांपूर्वी बेळगावमधल्या एका
२१ वर्षांच्या तरुणानं ‘सारखं पबजी खेळत जाऊ नकोस,’ असं सांगणाऱ्या आणि
सशस्त्र सैनिक दलातून निवृत्त असलेल्या आपल्या बापाचा अत्यंत निर्घृणपणे खून केला.
रात्रभर गेम खेळणाऱ्या या मुलानं सकाळी सकाळी आपल्या गेम खेळू नको, असं सांगणाऱ्या
बापाचं शीर कोयत्यानं धडावेगळं केलं आणि पायही तोडला. काल कोल्हापूर परिसरातल्याच
एका गावातल्या तरुणावर ‘पबजी’ खेळल्यानं मनोरुग्ण
होण्याची वेळ आली. उपचारासाठी दाखल केल्यानंतरही तेथून तो हळूच पळूनही गेला.
काही दिवसांपूर्वी एका मुलाला आईनं ‘उद्या दहावीच्या परीक्षेचा
पेपर आहे, पबजी खेळू नको,’ असं सांगितलं, तर त्या मुलानं आत्महत्याच केली.
दुसरीकडं एकानं याच कारणासाठी बहिणीच्या नियोजित पतीवरच हल्ला केला. एका ठिकाणी
सलग आठ आठ तास मोबाईलवर गेम खेळणाऱ्या मुलाला बेशुद्ध झाल्यानं उपचारांसाठी दाखल
करण्याची वेळ आली होती. तर आणखी एका तरुणाची बोटं गेम खेळताना मोबाईल ज्या
पोझिशनमध्ये धरतात, तशीच वाकडीच्या वाकडीच राहिली होती.
दोनेक वर्षांपूर्वी ब्लूव्हेल गेम तयार करून अनेक
तरुणांना शारिरीक-मानसिक इजा करून घेण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या आणि अगदी उंचावरुन
उडी मारुन आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या कंपनीचंच ‘पबजी’ हे सुद्धा अपत्य
आहे. रुथलेस किलींग, अंदाधुंद गोळीबार, त्यातून उन्मादी विजय आणि मग ‘चिकन डिनर’ असं एका वाक्यात
वर्णन करता येत असलं तरी ते तितकं सरळसोपं नाही.
या गेमच्या विळख्यात टीनेजर्स ते नुकतीच त्यातून
पुढं सरकलेली तरुणाई अडकलीय. त्यातून निर्माण होणाऱ्या मनोविकृतीचे दुष्परिणाम
आपल्याला आता लक्षणीय स्वरुपात दिसू लागले आहेत. या गेमवर बंदी घाला, अशी सरधोपट
मागणी करता येणं शक्य आहे. पण, त्याचा काही उपयोग होणार नाही. ‘ब्लूव्हेल’वर बंदी
घातल्यानंतरच ‘पबजी’ पुढं आलंय. आणखीही ‘फ्री फायर’सारख्या गेम्स आहेत
आणि त्यात आपली मुलं गुंतत चाललीयत- प्रमाणाबाहेर...
मित्रांनो, इथं पुन्हा मी आपली जबाबदारी अधोरेखित
करतो. गेम्सवर बंदी घालण्यापेक्षा त्या खेळणाऱ्या आपल्या मित्र-मैत्रिणींना
त्यांच्या मनावर परिणाम होण्यापूर्वीच आपण सावध करू या, त्यातून बाहेर काढू या...
माझे जे तरुण मित्र अशा गेम्स खेळत असतील, त्यांनी त्यापासून दूर व्हावं...
प्रयत्न करा, निश्चित जमेल... ज्या मित्र-मैत्रिणींची मुलं-मुली सतत तुमचा मोबाईल
घेऊन आतल्या खोलीत बसत असतील, त्यांना मोबाईलपासून प्रयत्नपूर्वक दूर करा... याचा
अर्थ लगेच टीव्हीच्या पडद्यासमोर बसवा, असा मात्र नाही. त्यांना काही क्रिएटीव्ह
चॅलेंजिस द्या... जे मित्र-मैत्रिणी, आपलं लहानगं कसं मोबाईल अनलॉक करून युट्यूबवर
जाऊन त्याला हवा असणारा व्हिडिओ लावतंय, याचं कौतुक करत असतील, किंवा मोबाईलवर
अमूक एक व्हिडिओ लावल्याशिवाय जेवण भरवूनच घेत नाही, असं कौतुकानं सांगत असतील, त्यांनी
वेळीच सावध व्हावं... तुम्ही भविष्यातला मनोरुग्ण घडवताय, एवढं लक्षात घ्या...
थोडक्यात, आयुष्याचाच गेम करणाऱ्या अशा गेम्सना
तुमच्या अगर तुमच्या मुलांच्या आयुष्यात थारा देऊ नका, एवढंच माझं कळकळीचं सांगणं!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा