('दै. पुढारी'च्या साप्ताहिक बहार पुरवणीमध्ये बहुचर्चित 'द सोशल डायलेमा' या माहितीपटाविषयीचा लेख रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२० रोजी प्रसिद्ध झाला आहे. दै. पुढारीच्या सौजन्याने तो येथे माझ्या ब्लॉग वाचकांसाठी पुनर्प्रकाशित करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)
'द सोशल डायलेमा' माहितीपटातील एक दृष्य. |
“तंत्रज्ञानामुळे
समस्त मानवी समुदायाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.”
“आपण इन्फॉर्मेशनच्या नव्हे, तर मिसइन्फॉर्मेशन (चुकीची माहिती) आणि डिसइन्फॉर्मेशनच्या (माहितीचा विपर्यास) युगात प्रविष्ट झालो आहोत.”
“ट्विटरवरील
फेक न्यूज (बनावट बातम्या) व खोटी माहिती खऱ्या माहितीपेक्षा सहा पट गतीने पसरते.
लोकांना फेक न्यूज आवडतात कारण त्या रंजक असतात, त्या तुलनेत सत्य हे फारच बोअरिंग
असते.”
“कोरोना
व्हायरसपेक्षा त्या संदर्भातील फेक न्यूज, मिसइन्फॉर्मेशन अधिक गतीने पसरते आहे.
दिवसाकाठी यामध्ये ५२ दशलक्ष लोक एंगेज असल्याचे दिसतात.”
“कॉन्स्पिरसी सिद्धांताच्या आधारे निवडणूक जिंकणेही सहजशक्य आहे, हे अलिकडच्या काळात सिद्ध झाले आहे.”
उपरोक्त विधाने आजघडीला सर्वांच्या परिचयाची आहेत. कधी ना कधी, कुठे ना कुठे ती वाचनात, ऐकण्यात आलेली आहेत. मग यात नवीन ते काय? नवीन हे की, आजवर ही विधाने समाजमाध्यमांच्या वापरकर्त्यांकडून अगर अभ्यासकांकडून केली गेलेली आहेत. उपरोक्त विधाने मात्र आली आहेत ती, समाजमाध्यमे आणि इंटरनेट क्षेत्रांतील दिग्गज कंपन्यांमध्ये वरिष्ठ, अतिवरिष्ठ पातळीवर काम केलेल्या महत्त्वाच्या तंत्रज्ञांकडून- ज्यांना या माहिती तंत्रज्ञानाचा भांडवली लाभापायी मानवाच्या अहितासाठी केला जात असलेला दुरुपयोग खुपला. त्या विरोधात त्यांनी बड्या पगाराच्या नोकऱ्या, पदांवर पाणी सोडले आणि मानवी तंत्रज्ञानासाठी कार्य प्रारंभले.
‘नेटफ्लिक्स’वर गेल्या ९ सप्टेंबरला रिलीज झालेल्या जेफ
ऑर्लोवस्की दिग्दर्शित ‘दि सोशल डायलेमा’ या ‘डॉक्यु-ड्रामा’मेंटरीमध्ये अॅपल, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, गुगल,
युट्यूब, फायरफॉक्स, मोझिला लॅब्ज, पिंटरेस्ट, उबर इत्यादी कंपन्यांत डेव्हलपर
लेव्हलपासून व्हाईस प्रेसिडेंट पदापर्यंत महत्त्वाच्या पदांवर काम केलेल्या जेफ
सिबर्ट, बॅले रिचर्डसन, जो टॉस्कॅनो, सॅन्डी पॅरेकिलास, गिल्युम चॅस्लॉट, लिन
फॉक्स, अझा रस्किन, अलेक्स रॉटर, टिम केंडॉल, जस्टीन रोझेनस्टिन, रॅन्डी फर्नांडो,
जेरॉन लॅनिअर, रॉजर मॅकनमी या जगद्विख्यात तंत्रज्ञांच्या मुलाखतींचा समावेश आहे.
त्यांच्याबरोबरच हार्वर्ड बिझनेस स्कूल, स्टॅनफॉर्ड युनिव्हर्सिटी, म्यानमार
युनिव्हर्सिटी आदी ठिकाणच्या शॉस्ना झुबॉफ, डॉ.एना लॅम्बके, मेरी व जेम्स फेटर,
जोनाथन हैड, कॅथी ओ’निल, रशिदा
रिचर्डसन, रिनी डिरेस्ता, सिंथिया वाँग आदी तज्ज्ञांच्याही मुलाखती आहेत. गुगलचे
माजी डिझाईन एथिसिस्ट व सध्या सेंटर फॉर ह्युमन टेक्नॉलॉजीचे संस्थापक ट्रिस्टन
हॅरिस यांनी डॉक्युमेंटरीचे सूत्रसंचालन केले आहे.
माहिती तंत्रज्ञान, इंटरनेट क्षेत्रांतील आघाडीच्या कंपन्यांची
राक्षसी नफेखोरीसाठीची स्पर्धा, त्यांनी वापरकर्त्यांभोवती घट्ट विणलेले
अल्गॉरिदमचे जाळे, त्यांच्या कॉन्स्पिरसी थिअरीज, डाटा आणि भांडवलशाही यांचे
घनिष्ट सहसंबंध आदी अनेक बाबींवर थेट भाष्य केल्याने आणि असे भाष्य एका
माहितीपटाद्वारे प्रथमच सामोरे आल्याने या माहितीपटाची जगभरात मोठी चर्चा आहे.
महान ग्रीक नाटककार सोफोकल्सच्या “मर्त्यांच्या
दुनियेत शापाच्या संगतीशिवाय महानत्व अवतरत नाही.” या
विधानाने या माहितीपटाची सुरवात होते आणि तेथून अखेरच्या “लेट्स हॅव व कॉन्व्हर्सेशन अबाऊट फिक्सिंग इट!” या मानवी समुदायात सुसंवादाची गरज अधोरेखित
करणाऱ्या विधानापर्यंत सुमारे ९४ मिनिटांचा हा माहितीपट आपल्याला सद्यस्थितीचे,
भोवतालाचे विदारक, अस्वस्थ करणारे वास्तव अत्यंत संयतपणे दर्शवितो. भीषण सत्याचा
अगदी अलगद, एकेक पदर उलगडत आपल्याला अंतर्मुख करीत जातो. आपल्या अस्तित्वासमोरील
धोके दाखवून देतानाच आशेच्या जागाही दाखवून देतो. आजघडीला मानवी संवेदनांच्या बोथटपणाला
बऱ्याच प्रमाणात समाजमाध्यमे कारणीभूत असल्याचे स्पष्ट करीत, एका टप्प्यावर मानवी
पद्धतीने जर या बाबींची संवेदनशीलपणाने फेररचना केली तर, त्यात अखिल मानवी
समुदायाचे कल्याण साधण्याची असलेली सुप्त शक्तीही अधोरेखित करतो.
याला पूरकता प्रदान करण्यासाठी दिग्दर्शकाने एका अमेरिकन कुटुंबाचे
चित्रणही दर्शविले आहे. कुटुंबातील विविध वयोगटातील सदस्य समाजमाध्यमांद्वारे कसे
वेगवेगळ्या पद्धतीने प्रभावित केले जातात, हे तो दाखवितो. कुटुंबातील आई एकदा
भोजनावेळी आपल्या कुटुंबियांचे स्मार्टफोन टायमर असलेल्या कंटेनरमध्ये ठेवते. नुकतीच
पौगंडवयात पदार्पण केलेल्या घरातील सर्वात लहान मुलीला दोन मिनिटेही हा दुरावा सहन
होत नाही. हाताने उघडत नाही म्हणून थेट हातोड्याने कंटेनर फोडून आपला फोन घेऊन
भोजनही न करता निघून जाते. या झटापटीत घरातील तरुण मुलाच्या फोनची स्क्रीन फुटते.
त्यावर आई त्याला आठवडाभर फोनला हात न लावल्यास नव्या फोनचे आश्वासन देते. तो
कसेबसे तीन दिवस काढतो. इकडे एक नियमित वापरकर्ता फोनपासून दूर असल्याचे पाहून
स्मार्टफोन कंपन्या त्याला भुलविणाऱ्या नोटिफिकेशन्स पाठवू लागतात. त्यातून चौथ्या
रात्रीच संयम सुटून तो रात्रभर फोन घेऊन सर्फिंग करीत राहतो. कंपन्यांचा विजय
होतो, मात्र दुसरीकडे आई आणि एका कुटुंबाचा मात्र पराभव होतो. जगभरातले घरोघरीचे
हे चित्र. याद्वारे स्मार्टफोन वापरणाऱ्यांबरोबर त्यांना सावध करू इच्छिणाऱ्यांची त्यांच्यासोबतच
कशी ससेहोलपट होते, हेही माहितीपटात प्रत्ययकारीपणे दाखविले आहे.
या साऱ्यांचा हेतू मानवी संवेदनांना आवाहन करणे हाच असल्याचे स्पष्ट
होते. जर तुम्ही एखाद्या उत्पादनासाठी पैसे मोजत नसाल, तर तिथे तुम्ही स्वतःच
उत्पादन असता. तुमचे लक्ष वेधले जाऊन तुम्ही ते पाहण्यासाठी अगर खरेदीसाठी
उद्युक्त होणे, हेच इथे उत्पादनाचे महत्त्वाचे लक्षण. समस्त सोशल मीडिया व्यासपीठे
व अॅप्लीकेशन्स
यांचा तो व्यवच्छेदक हेतू असल्याचे दाखविले जाते. वापरकर्त्यांच्या लक्षातही येणार नाही, अशा
हळुवार पद्धतीने त्यांचे वर्तन आणि ग्रहणक्षमता यांच्यात बदल करीत जाणे, हे
उत्पादन आहे. वापरकर्ता काय करतो, कोणता विचार करतो, याच्या नोंदी घेऊन त्यानुसार
त्याच्या या पद्धतींमध्ये आपल्याला अनुकूल असे बदल करणे, हे नव्या बाजाराचे
उत्पादन आहे. याद्वारे उत्पादन खपण्याची निश्चितता निर्माण केली जाते.
यासाठी मोठ्या प्रमाणात डाटा लागतो कंपन्यांना. आणि काही पैशांच्या
मोबदल्यात आपल्या ग्राहकांच्या व्यक्तीगत माहितीचा, सवयींचा, आवडीनिवडींचा डाटा
विविध कंपन्यांना उपलब्ध करून देण्यासाठी सोशल मीडिया कंपन्या आनंदाने तयार असतात.
फेसबुकचे केंब्रिज अॅनालिटिका प्रकरण हे याचे महत्त्वाचे उदाहरण. डाटा आणि भांडवलशाही
यांचे सहसंबंध अशा प्रकारे वृद्धिंगत होताहेत. साहजिकच नफेखोर गुंतवणूकदारांनी मानवाच्या वर्तमानावर प्रभाव
टाकणाऱ्या आणि भविष्यावर दूरगामी परिणाम घडवून, त्यांना कह्यात आणू शकणाऱ्या
इंटरनेट कंपन्यांमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे. मानवी समुदायाच्या इतिहासात
ती अभूतपूर्वच आहे.
आपल्याला पैसा मिळवायचाय, या प्रमुख हेतूपुढे समस्त मानवता वगैरे बाबी
झुगारून या कंपन्या आपल्या वापरकर्त्यांना गिनिपिगप्रमाणे वापरतात. अॅप्लीकेशन्स वापरणाऱ्याला ‘आपण ती वापरतो आहोत’, असे केवळ वाटते. प्रत्यक्षात या
कंपन्याच त्याला वापरत असतात. वापरकर्ता आपल्या अॅपवर किती वेळ घालवितो, याची नोंद घेऊन त्याचा
जास्तीत जास्त वेळ तिथेच वेळ कसा वाढविता येईल, या दिशेने सर्व कंपन्या काम करीत
असतात. त्यासाठी एन्गेजमेंट कोड्स, ग्रोथ कोड्स आणि अॅडव्हर्टायझिंग कोड्स अशा तिहेरी
प्रकारांचा संयुक्तपणे वापर करून वापरकर्त्याला त्यात गुंगवून टाकण्याचे काम बॅकएंडला
सातत्याने सुरू असते. जाहिरातींमधून जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळत राहील, हेच यामागचे
कंपन्यांचे अंतिम ध्येय असते. महसूलवृद्धीचे एकमेव ध्येय बाळगून
त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अल्गॉरिदम वापरून त्याद्वारे वापरकर्त्यांना या
कंपन्यांनी वेठीला धरलेले असते. महसुलाचा आकडा वाढण्यासाठी तुम्हाला काय दाखवायचे,
तुम्ही काय पाहायचे, तुम्ही काय खरेदी करायचे, यासाठी सातत्याने वापरकर्त्यावरील
पकड हळूहळू मजबूत करीत नेली जाते. आपल्या सवयी, आवडीनिवडी या साऱ्यांची नोंद हरघडी
या कंपन्या घेत असतात. त्यानुसारच तुमच्या स्क्रीनवर काय दिसले पाहिजे, दाखविले
पाहिजे, याचा पूर्ण अंदाज घेऊन त्यानुसार वापरकर्त्याला गिऱ्हाईक केले जाते.
या समाजमाध्यमांच्या गदारोळामुळे जगभरातील लोकशाहीची विश्वासार्हता
धोक्यात आलेली आहे. अमेरिकेसह इटली, स्पेन, ब्राझिल, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया
अशा प्रत्येक प्रगत राष्ट्रामध्ये कॉन्स्पिरसी थिअरीचा वापर करून समाजमाध्यमांनी
मतदारांना विचलित करण्याचे, संभ्रम निर्माण करण्याचे आणि त्यांची मते प्रभावित
करण्याचे काम केले. निवडणुकीतील बहुतांश प्रचार समाजमाध्यमांनीच नियंत्रित
केल्याचे दिसून आले. ही गंभीर बाब असून एका नव्या संस्कृती संघर्षाची आणि लोकशाही
अस्तंगतीकरणाची सुरवात आहे, असा धोक्याचा इशारा हे समस्त तज्ज्ञ देतात. वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी व त्यावर उपाययोजना
करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरजही अधोरेखित करतात.
या समस्यांवर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स उत्तर असल्याचा दावा करणाऱ्यांना
व्हर्चुअल रिएलिटीचे जनक जेरॉन लॅनिअर मूर्खात काढतात, “आर्टिफिशिअल इंटेलिजन्स कोणत्याही प्रकारच्या
तंत्रज्ञानात्मक समस्येवर किंवा फेक न्यूजवरसुद्धा उपाय असू शकत नाही. कंपन्यांना ‘ए.आय.’च्या
आडाने त्यांच्या कॉन्पिरसी थिअरीपासून पळून जाता येणार नाही.”
सत्य नेमके काय, हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण करीत नाही, म्हणूनच
असे घडते. तंत्रज्ञानच मानवासाठी शाप ठरते आहे, हे लाजीरवाणे आहे. कारण तंत्रज्ञान
समाजाच्या भल्यासाठी असले पाहिजे, ही त्याची महत्त्वाची पूर्वअट आहे. समाजमानसातील
घातक गोष्टी वर काढणे, हे तंत्रज्ञानाचे काम कसे असू शकते? असा प्रश्न ट्रिस्टन हॅरिस उपस्थित करतात, “जर तंत्रज्ञानच सामूहिक गोंधळ, संभ्रम, गदारोळ,
सामाजिक विसंवाद, परस्परांबद्दल अविश्वास निर्माण करते आहे; अधिक ध्रुवीकरण करते आहे; निवडणुकांमध्ये हॅकिंग करते आहे; सत्याभास निर्माण करून प्रत्यक्ष सत्यापासून
समाजाला दूर नेते आहे. अशा परिस्थितीत समाज स्वतःला तंदुरुस्त करण्यासाठी अक्षम
बनला आहे. हे थांबविले नाही तर, नागरी युद्धे होतील, मानवी संस्कृती नष्ट होतील,
लोकशाही संपतील, जागतिक अर्थकारण संपुष्टात येईल आणि मानवी समुदाय नष्टचर्याच्या
सीमेवर असेल,” असा इशाराही इथे दिला आहे.
समाजमाध्यमे व इंटरनेट कंपन्यांची एकाधिकारशाही वाढून त्यांनी एखाद्या
सरकारप्रमाणे जगावर राज्य करावे, हे घातक आहे. लोकांच्या भावनांशी न खेळता त्यांनी
स्वयं-नियंत्रणरेखा आखून घेणे गरजेचे आहे. स्वतःच्या लाभासाठी लोकांच्या खाजगी
माहितीचा, जीवनाचा वापर व विध्वंस करणे गैर आहे, असा सूर सर्व तज्ज्ञ व्यक्त
करतात. आणि यावर एकच उपाय सुचवितात, तो म्हणजे, आपण निष्क्रियपणे केवळ स्क्रीनच्या
जंजाळात अडकून या कंपन्यांना आपला वापर करू देण्यापेक्षा अधिक कृतीशील, उपयुक्त
आणि भरीव असे योगदान देण्यासाठी सिद्ध होणे, हाच होय. अन्यथा, आपली ध्येये, मूल्ये
आणि जीवन या कंपन्यांच्या वेठीला असेल. मानवीय पद्धतीने या गोष्टींची फेररचना
करण्याची गरज आहे. त्यासाठी या तंत्रज्ञानाच्या मागील न दिसणाऱ्या चेहऱ्यांनी
तंत्रज्ञानाचा बुरखा नव्हे, तर मानवी चेहरा व मूल्ये घेऊन आपल्या वापरकर्त्यांना
भिडले पाहिजे, भेटले पाहिजे. त्यांच्या मानव म्हणून असणाऱ्या मूलभूत गरजांचे
संरक्षण व संवर्धन पुढे येऊन केले पाहिजे. मानवी समुदायाचा परस्परांमधील अस्तंगत
होत चाललेला सुसंवाद पुनश्च प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत,
ज्यासाठीच खरे तर त्यांचा जन्म झालेला आहे.
चला तर मग, लेट्स हॅव अ कॉन्व्हर्सेशन अबाऊट फिक्सिंग इट!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा