गणपतदादा मोरे |
प्राचार्य डॉ. विलास पोवार यांनी लिहीलेल्या ‘कर्मवीर रावसाहेब डी.आर. भोसले: चरित्र व कार्य’ या एका अत्यंत महत्त्वपूर्ण चरित्रग्रंथाचे काल कोल्हापुरात प्रकाशन झाले. महात्मा जोतीराव फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याने प्रभावित झालेल्या आणि त्यांच्या प्रेरणेतून सामाजिक कार्यासाठी झपाटलेल्या सत्यशोधकांची एक मोठी फळी बृहन्महाराष्ट्राच्या व्यापक पटलावर उदयास आली. सामाजिक जागृतीचे, प्रबोधनाचे वारे या लोकांनी प्रवाहित केले. त्यातील काही नावे आपल्या नजरेसमोर आहेत, तर कित्येक विस्मृतीत गेली आहेत. त्यापैकीच एक नाव म्हणजे सत्यशोधक कर्मवीर रावसाहेब डी.आर. भोसले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पावन स्पर्शाने जी सोन्यासारखी मंडळी कार्यप्रवण
झाली आणि अगदी राजर्षींच्या माघारीही त्यांचे कार्य चालू राखण्याचे आव्हान त्यांनी
पेलले, आयुष्य वेचले;
त्यात कर्मवीर भोसले यांचे योगदान अमूल्य स्वरुपाचे राहिले. पुरोगामी, सत्यशोधक
विचार व कार्याचा वारसा प्रमाण मानून सामाजिक सुधारणेचे व प्रबोधनाचे पर्व केवळ
कोल्हापुरातच नव्हे, तर नाशिकसारख्या ठिकाणीही त्यांनी निर्माण केले. ब्रिटीश
पोलीस खात्यात फौजदार म्हणून नाशिक येथे कार्यरत असताना तेथे सत्यशोधक समाजाची
स्थापना केली. समाजाचे कार्य सर्वदूर पसरविले. तेथे त्यांनी मराठा विद्या प्रसारक
मंडळाची स्थापना करून बहुजन समाजाच्या दारी शिक्षणाची गंगा आणली. कोल्हापूरचा
आदर्श घेऊन नाशिक येथे त्यांनी उदाजी मराठा बोर्डिंग हाऊस स्थापन केले.
प्रतिगाम्यांचा प्रचंड विरोध पत्करून सर्व जातीधर्मांच्या विद्यार्थ्यांना तेथे
मुक्त प्रवेश दिला. सामाजिक कार्य की नोकरी, असा प्रश्न उभा ठाकला असताना थेट
राजीनामा देऊन रिकामे होणारे हे मनस्वी व्यक्तीमत्त्व.
कोल्हापूर विभागात शिक्षणाधिकारी असताना त्यांनी
स्काऊट चळवळीच्या रुजवातीचे व प्रसाराचे मोठे काम केले. शेतकरी स्काऊटिंगची अभिनव संकल्पना
राबविली. शेतकऱ्यांतील अज्ञान दूर करून त्यांच्यामध्ये आरोग्यविषयक जाणीवजागृती
व्हावी. बालवीरांतही त्यांच्याविषयी कार्य करण्याची सजगता असावी, अशा दुहेरी
हेतूने त्यांनी या चळवळीला गती दिली. कोल्हापुरात दि मराठा को-ऑप. बँक, सेंट्रल
सहकारी स्टेशनरी स्टोअर्स, दि कोल्हापूर गव्हर्नमेंट सर्व्हंट को-ऑप. बँक, दि
प्राथमिक शिक्षक सहकारी बँक, शेतकरी सहकारी संघ, दि कोल्हापूर न्यूजपेपर असोसिएशन
इत्यादी अनेक संस्थांच्या पायाभरणीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान राहिले.
प्राचार्य डॉ. पोवार यांच्या सदर चरित्रग्रंथामुळे
कर्मवीर भोसले यांच्या कार्याशी जसा परिचय झाला, तसा राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रखर
सामाजिक जाणिवेचा एक प्रसंगही या पुस्तकाद्वारे प्रथमच माझ्या वाचनात आला. तो असा-
उदाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या कोनशिला समारंभासाठी
१५ एप्रिल १९२० रोजी राजर्षी शाहू महाराज उपस्थित राहिले. या वसतीगृहास त्यांनी १५
हजार रुपयांची देणगी सुद्धा दिली. नाशिकमधल्याच शाहू बोर्डिंग व डोंगरे
वसतीगृहाचेही भूमीपूजन त्यांनी याच दौऱ्यात केले. महाराज नाशिक येथे आले आहेत,
म्हटल्यानंतर परिसरातल्या अनेक गावांची इच्छा होती की महाराजांनी आपल्या गावाला
भेट द्यावी. महाराजांनी मात्र आमंत्रण नसतानाही पिंपळगाव बसवंत या गावाला भेट
देण्याचे निश्चित केले. काय कारण होते बरे त्यामागे?
याचे कारण असे की, नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक
समाजाच्या स्थापनेमध्ये रावसाहेब डी.आर. भोसले यांच्यासमवेत काकासाहेब वाघ आणि
पिंपळगाव बसवंतचे गणपतदादा मोरे हे सत्यशोधक चळवळीचे खंदे कार्यकर्ते होते. मोरे
यांच्याविषयी महाराजांना मोठे ममत्व वाटत होते. कर्मवीर भोसले पोलीस नोकरीच्या
निमित्ताने जिल्हाभर फिरत व त्यासोबतच लोकांमध्ये अंधश्रद्धा व धार्मिक
रुढींद्वारे नाडणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध जागे करत. गणपतदादांनीही त्यांच्या
प्रेरणेने सत्यशोधक समाजाच्या प्रचाराचे मोठे काम उभारले. शाहू महाराजांनी प्रबोधनाच्या
कार्यात सत्यशोधक जलशांचे महत्त्व ओळखून कोल्हापुरात सर्व जलशांचे संमेलन भरविले
होते. त्यावेळी गणपतदादा मोरे हेही आपल्या जलशासमवेत सहभागी झाले होते आणि
महाराजांची शाबासकीही मिळविली होती. मोरे यांनी १९१६ ते १९२० या कालखंडात नाशिक
जिल्ह्यात सत्यशोधक जलश्यांचे कार्यक्रम करून मोठी शैक्षणिक जागृती घडवून आणण्याचे
काम केले. २०-२५ मैलांवरुन लोक बैलगाड्या करून येत. दहा हजारांपेक्षा अधिक लोकांची
गर्दी असे त्या जलश्यांना. त्याचप्रमाणे रामनवमीच्या दिवशीच त्यांनी
उच्चवर्णीयांच्या ताब्यातून श्रीरामाची मुक्तता करून बहुजनांच्या दर्शनासाठी तो
खुला केला होता. त्यावेळी गणपतदादा मोरे सामाजिक शांततेचा भंग करतात, असा आरोप
उच्चवर्णीयांनी त्यांच्यावर केला. त्यातून त्यांना अटक करण्यात येऊन बेड्या घालून पिंपळगावच्या
रस्त्यांवरुन फिरवून त्यांचा मोठा अपमान करण्यात आला होता. हे प्रकरण कोर्टात
गेले. त्यावेळी महाराजांनी त्यांना मदत केली होती.
महाराजांनी पिंपळगावला जाण्यामागे दुसरेही एक कारण
होते. उदाजी मराठा बोर्डिंगच्या नावात मराठा असले तरी ते सर्व जातीधर्मांच्या
मुलांसाठी खुले होते. त्यामुळे नाशकातील सनातनी मंडळी बोर्डिंग बंद पाडण्यासाठी वेगवेगळ्या
प्रकारे त्रास देत. एकदा तर कहर करीत त्यांनी मुलांसाठी स्वयंपाक करणाऱ्या
बायकांनाच पळवून लावले. त्यावेळी गणपतदादांनी आपल्या पत्नी सारजाबाई यांनाच थेट
बोर्डिंगमध्ये आणून ठेवले आणि सर्व मुलांसाठी स्वयंपाक करण्याची जबाबदारी
त्यांच्यावर सोपविली. सारजाबाईंनी ती आनंदाने पेलली. त्यांच्या या कष्टाचीही
माहिती शाहू महाराजांपर्यंत पोहोचलेली होती.
या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांनी पिंपळगाव बसवंत या
गावची भेट ठरविलेली होती. गणपतदादांच्या थेट घरीच जाऊन त्यांची भेट
घेण्याचे त्यांनी निश्चित केले होते. गावकऱ्यांना प्रचंड आनंद झालेला. गावची
स्वच्छता करून, रंगीबेरंगी पताका, केळीचे खांब अशी सारी जय्यत स्वागताची तयारी
सुरू झालेली. अस्पृश्य समाजाच्या तर उत्साहाला भरते आलेले. आपल्या तारणहाराचे याचि
देही, याचि डोळा दर्शन होणार, या कल्पनेनेच ते भारावलेले. अशी एकीकडे तयारी सुरू
असताना दुसरीकडे उच्चवर्णीय मंडळी महाराजांनी अन्य दुसऱ्या गावाला भेट द्यावी,
म्हणून प्रयत्नरत झालेले. अगदी पोलीस सुपरिटेडंटला भेटून महाराजांच्या या भेटीने
सामाजिक शांतता कशी भंग होईल, हे पटवून सांगण्यात येत होते. त्यावर विश्वास ठेवून
पोलीस अधिकारीही महाराजांचे या भेटीविषयी मन वळविण्याच्या मागे लागलेले. शाहू
महाराजांसमोर त्यांनी एक प्रस्ताव मोठ्या खुबीने ठेवला. तो असा की, महाराजांनी
पिंपळगाव बसवंतला जाण्याऐवजी नाशिकच्या सुप्रसिद्ध काळाराम मंदिरात जाऊन
श्रीरामाचे दर्शन घ्यावे. पण महाराज थोडेच ऐकणार? ते म्हणाले, नाशिकच्या रामाचे दर्शन घेण्यापेक्षा
पिंपळगावच्या गणपतदादांचे दर्शन घेणे मला अधिक आवडते. ते महत्त्वाचे आहे. त्यामुळे
मी तेथे जाणारच. त्यासाठी मग मला वाटेल ते सहन करावे लागले तरी हरकत नाही.
अखेर महाराज आडगाव, ओझर, कोकणगाव मार्गे पिंपळगावला
पोहोचले. गणपतदादा मोरे त्यांच्या स्वागतासाठी आघाडीवर होते. महाराजांची गावातून
भव्य मिरवणूक काढण्यात आली. शाहू महाराजांनी गणपतदादांना मोटारीत आपल्याशेजारी
बसवून घेतले आणि आपल्या गळ्यातील हार त्यांच्या गळ्यात घातला. साऱ्या गावातून
मिरवणूक निघाली. गणपतदादांवरील अन्यायाचे परिमार्जन महाराजांनी अशा प्रकारे केले.
ज्या पोलीस अधिकाऱ्याने सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचा आरोप ठेवून गणपतदादांना
अटक करून बेड्या घालून पिंपळगावातून मिरविले होते, त्याच अधिकाऱ्याला आज
महाराजांच्या समवेत गणपतदादांच्या मिरवणूक सोहळ्याला बंदोबस्त करावा लागला होता.
मिरवणुकीनंतर महाराज गणपतरावांच्या घरी गेले.
गणपतदादांचे घर अगदी लहानच- कौलाच्या पडवीसारखे होते. घराचा दरवाजाही लहानच होता.
या लहान दरवाजातून महाराज कसे येणार म्हणून गणपतदादांनी आपल्या घराची भिंतच पाडली
होती. महाराज गणपतदादांच्या घरात आले. गणपतदादा आणि सारजाबाईंचा संसार त्यांनी
पाहिला. स्वतःची गरीबी असूनही ज्या हिंमतीने या दाम्पत्याने समाजाची सेवा केली,
त्याचा महाराजांना अभिमान वाटला. यावेळी गणपतदादा महाराजांना म्हणाले, ‘महाराज, आपण मला नाशिकला बोलावले
असते, तर मी आपल्या आपल्या भेटीस आलो असतो. आपण कशासाठी कष्ट घेतले?’ त्यावर महाराज उत्तरले, ‘भक्त देवाच्या दर्शनाला देवळात जात
असतो. देव येत नसतो.’ महाराजांनी असे म्हणताच
गणपतदादांच्या डोळ्यांतून अश्रूधारा लागल्या. भक्ताला देवत्व देणारा असा पुरोगामी लोकराजा, राजर्षी पुन्हा होणे नाही.
महाराज एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी
सारजाबाईंचेही कौतुक केले. त्यांना बोलावून साडीचोळीसाठी म्हणून ५०० रुपये बक्षीस
दिले. ‘तू बोर्डिंगमध्ये
मुलांसाठी केलेल्या कामाचे हे बक्षीस आहे. त्यावर केवळ तुझाच अधिकार आहे. ते तू
कोणासही देऊ नको,’
असेही आवर्जून सांगितले.
अशा प्रकारे शाहू महाराजांनी निरलस भावनेने सामाजिक
कार्य करणाऱ्या सच्च्या कार्यकर्त्याचा सन्मान केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा