मंगळवार, २ मे, २०२३

नितळ-९: विरासत को नजरअंदाज न कर...


अजिंठा येथील १७व्या क्रमांकाच्या लेणीमधील इंद्र (सन २००८ मध्ये घेतलेले छायाचित्र)

अजिंठा येथील १७व्या क्रमांकाच्या लेणीमधील इंद्र (सन २०२२ मध्ये घेतलेले छायाचित्र)

अजिंठा येथील १० व्या क्रमांकाच्या लेणीमधील स्तंभांवरील चित्रे. (सन २०१२)

अजिंठा येथील १० व्या क्रमांकाच्या लेणीमधील स्तंभांवरील चित्रे. (सन २०२२)

('दै. नवशक्ति'मध्ये सुरू असलेल्या माझ्या 'नितळ' या मालिकेमधील पुढील भाग माझ्या ब्लॉग वाचकांसाठी पुनर्मुद्रित करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)



भारताला समृद्ध कला-संस्कृतीचा इतिहास लाभला आहे. तो या देशाच्या कानाकोपऱ्यात विखुरला आहे. मात्र, आपण भारतीय लोक आपला समृद्ध वारसा जतन करण्याच्या बाबतीत करंटे आहोत, हे या आधीही कित्येकदा सिद्ध झाले आहे आणि यापुढेही आपण ते हिरीरीने सिद्ध करीत राहणार आहोत. आपल्यात जाणिवांचा अभाव इतका तीव्र आहे की, आपल्या शेजारी असलेल्या वारशाचे जतन, संवर्धन करण्याची आवश्यकता आपल्या मनाला स्पर्शदेखील करीत नाही.

गेल्या तीन दशकांत सरासरी दहा वर्षांच्या अंतरानं अजिंठ्याच्या लेण्यांना भेट दिली. अजिंठा लेण्यांमधील शिल्पकला तर अप्रतिम आहेच, पण येथील भित्तीचित्रे ही या लेण्यांना इतर लेण्यांहून वेगळी आणि सर्वश्रेष्ठ ठरवितात. म्हणूनच त्यांचा समावेश युनेस्कोच्या महत्त्वाच्या जागतिक वारसास्थळांमध्ये करण्यात आला आहे. अजिंठ्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी भारतीय पुरातत्त्व खात्याकडे आहे. त्याचप्रमाणे परिसरातील वनसंपदेचे जतन व संवर्धन वन विभागाकडे आहे. अजिंठ्याला दर वर्षी जगभरातील लाखो पर्यटक भेट देत असतात. दिवाळी आणि उन्हाळी सुटीच्या कालावधीत तसेच डिसेंबर-जानेवारीमध्ये या लेण्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांची तसेच विविध शालेय, महाविद्यालयीन सहलींची संख्या मोठ्या प्रमाणात असते. तथापि, पर्यटकांमधील जाणिवांच्या अभावाचा फटका अजिंठ्याच्या वारशाला जबर बसतो आहे, हे लक्षात आणून देण्यासाठी हा लेखन प्रपंच आहे.

प्रस्तुत लेखकाने डिसेंबर २०१२ आणि डिसेंबर २०२२ आणि तत्पूर्वी मार्च २००८मध्ये या लेण्यांना भेट दिली. अवघ्या दशक-दीडदशकाच्या कालावधीमध्ये या लेण्यांमधील भित्तीचित्रांची अपरिमित हानी झाल्याची बाब यावेळी लक्षात आली. पुरातत्त्व विभाग आपल्या मनुष्यबळाच्या मर्यादेमध्येही संवर्धनाचे काम करीत असल्याचे दिसत असले तरी बेफिकीर पर्यटकांमुळे आणि अनास्थेमुळे अजिंठ्याचा हा अनमोल वारसा आणखी काही वर्षांत पूर्णतः लुप्त होऊन जाईल, अशी साधार भीती वाटते.

दशकभरापूर्वी अजिंठ्याच्या कन्व्हेन्शन सेंटरपासून लेण्यांपर्यंत पर्यावरणपूरक बसने पर्यटकांना वाहून नेले जात असे. ही बस प्रदूषणविरहित होती. मात्र, डिसेंबर २०२२मध्ये मात्र त्यांच्या जागी एसटीच्या डिझेलचा धूर ओकणाऱ्या बस पाहून आश्चर्यात भर पडली. अनास्थेची सुरवात इथंपासूनच. लेण्यांच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर पर्यटकांच्या गर्दीचा महापूर. त्यात शालेय सहलींचे प्रमाण तर विचारता सोय नाही. अजिंठ्याची भित्तीचित्रे ही पूर्णपणे नैसर्गिक माती, चुना आणि पानाफुलांच्या भुकटीच्या रंगलेपनातून साकारलेली आहेत. श्वासोच्छवासामुळे गुहांमधील आर्द्रतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे वातावरण दमट, ओलसर होऊन त्या चित्रांमध्ये बुरशीसह वेगवेगळे विषाणू वाढतात आणि चित्रांची हानी होण्यास सुरवात होते. म्हणून या गुहांमधील पर्यटकांची संख्या ही मर्यादित करण्याची मोठी आवश्यकता आहे. दिवसाला ठराविकच पर्यटक लेण्यांकडे सोडले जावेत. त्यातही निवडक गंभीर, अभ्यासक पर्यटकांनाच सोडले जावे. बाकीच्यांना पायथ्याशी उभारलेल्या लेण्यांच्या प्रतिकृती दाखवून वाटेला लावायला हवे. शालेय सहली घेऊन येणाऱ्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांनाही या लेण्यांचे फारसे गांभीर्य दिसत नाही. मोठमोठ्याने दंगा करीत, आरडाओरड करीत पळापळ करत लेणी पाहतात. परतण्याचीही घाई असते. त्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांमागे नुसती गडबड करीत असतात. यामुळे साहजिकच श्वासोच्छवास आणि गुहांमधील आर्द्रता यांचे प्रमाण वाढते. तशात पावसाळ्यामध्ये आर्द्रतेचे प्रमाण अत्यधिक वाढते. त्यामुळे भित्तीचित्रे ओली होतात. उन्हाळ्याचा तडाखा वाढत जाईल, तसतसे या भित्तीचित्रांमधील बाष्प बाहेर पडण्यासाठी वाट शोधते आणि अचानक वाळल्याने या चित्रांचे पोपडे पडू लागतात. या भित्तीचित्रांच्या ऱ्हासाला ही नैसर्गिक बाब कारणीभूत असली तरी मानवी हस्तक्षेप अधिक जबाबदार आहे.

या भित्तीशिल्पांवर कॅमेऱ्यांच्या फ्लॅशचाही विपरित परिणाम होतो. त्यामुळे येथे फ्लॅश न वापरता फोटो काढणे अभिप्रेत असते. मात्र, लेण्या पाहण्यापेक्षा हल्ली सेल्फीश लोकांचे प्रमाण वाढल्याने या बाबीकडेही दुर्लक्ष होताना दिसते. याचा परिणाम असा झाला आहे की, या अवघ्या दशकभरातच या भित्तीशिल्पांची खूप हानी झाली आहे. दहा वर्षांपूर्वी जी चित्रे बऱ्यापैकी दिसून येत होती, ती आता शोधावी लागत आहेत. छतांवर केलेले अप्रतिम नक्षीकाम आणि चित्रे ही आज धुसर, धूरकट होत निघाली आहेत. आणखी दशकभराने ती दिसतील किंवा कसे, याविषयी साशंकता वाटण्यासारखी परिस्थिती आहे. चैत्यगृहामधील स्तंभांवरील आणि छतावरील चित्रांचीही स्थिती काही वेगळी नाही. अजिंठ्यातील ही सारी भित्तीचित्रे आज अस्तंगत होण्याच्या सीमारेषेवर आहेत. इसवी सन पूर्व दुसरे शतक ते पाचवे- सहावे शतक अशा दोन कालावधींमध्ये हा बौद्ध वारसा साकार झाला. काळाच्या उदरात गडप होऊनही पुन्हा झळाळून या देशाला त्याच्या समृद्ध बौद्ध परंपरेची जाणीव करून देता झाला. हा वारसा आता पुन्हा एकदा कायमस्वरुपी काळाच्या उदरात गडप करण्याची सिद्धता जणू आपण सारे मिळून करतो आहोत. अशा वेळेला त्याचे जतन, संवर्धन व संरक्षण करण्यासाठी कोणी तरी पुढे सरसावेल, याच्या प्रतीक्षेत अजिंठ्याची भित्तीचित्रे आहेत. या मृत्यूच्या छायेतून कोणी वाचवेल का त्यांना?

अपनी विरासत को नजरअंदाज न कर आलोक,

आगे चलकर तुझे भी तो इतिहास रचना है।



(सर्व छायाचित्रे डॉ. आलोक जत्राटकर यांनी फ्लॅश न वापरता नियम पाळून काढलेली आहेत.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा