माणसाच्या आयुष्यात काही स्मृती अशा असतात की
त्या पुढे आयुष्यात कधीही आठवू नयेत, असे वाटत असते; मात्र, प्रत्यक्षात त्या आठवणी कधीही न विसरण्यासारख्या
असतात. या स्मृती चांगल्या, गोड असतील तर हरकत नसते; मात्र त्या आठवू नयेत, असे वाटण्याचेही कारण
नसते. कटु आठवणी मात्र कधी अचानक सामोऱ्या आल्या, तर पुनःपुन्हा अंगावर शहारे
आल्याखेरीज राहात नाहीत. आज गुगलनेही १३ वर्षांपूर्वीचा असाच एक क्षण माझ्यासमोर
आणून टाकला. गुगलने फक्त फोटो समोर ठेवले. आमच्या स्मृती त्याला माहिती असण्याचे कारण
नव्हते.
तर, १३ वर्षांपूर्वी
आजच्या दिवशी झाले होते ते असे की, तेव्हा मी कल्याणमध्ये राहात होतो. मुलगी
स्विनी तीन वर्षांची होती आणि सम्यक वर्षाच्याही आतला. आज जशी कोल्हापूरमध्ये लंडन
ब्रिजची प्रतिकृती असणारी फेअर आली आहे, तशीच त्यावेळी कल्याणच्या बैलबाजार मैदानावर
ताज महालची भव्य प्रतिकृती असणारी फेअर आली होती. आता आग्र्याला नेऊन ताजमहाल
दाखविण्यापेक्षा शहरात आपसूक दाखल झालेला ताजमहाल दाखवायचा म्हणून बायको-मुलांना
तेथे घेऊन गेलो. खरोखरीच भव्य अशी ती प्रतिकृती होती. अगदी तिला फेरफटका मारुन
तिच्या गवाक्षात बसून फोटो काढण्याइतकी. त्यामुळे आम्ही तेथे मनसोक्त बसून गप्पा
मारुन पुढे फेअरमध्ये दाखल झालो. स्विनीला तिथला उंच उंच गोलाकार भिरभिरणारा लाइटिंगवाला
आकाशपाळणा दुरूनच खुणावत होता. तो होता एकदम दुसऱ्या टोकाला. तिला तर तिथे जाईपर्यंत
दम निघत नव्हता. वाटेत आम्ही आइसक्रीम वगैरे खात फेअरमधल्या दुकानांत वस्तू पाहात
पुढे पुढे निघालो होतो.
मध्येच विविध खेळांचे
स्टॉल सुरू झाले. तिथे थोडा टाइमपास करायचं ठरवलं. एके ठिकाणी रायफल शूटिंगवर काही
वस्तू भेट मिळत होत्या. एक तर रायफल शूटिंग हा माझा आवडता खेळ आणि त्यातही त्यावर
भेटवस्तू मिळणार म्हटल्यावर लगोलग तिथं पोहोचलो. तोवर स्टॉलवर फारशी गर्दी नव्हती.
सर्व नेम लागले की भेट मिळणार होती. ते अवघे दहा शॉट मारण्यापुरताच मी स्विनीचा
हात सोडलेला. सम्यक दीपाच्या काखेत कांगारु बॅगमध्ये होता. माझं होईपर्यंत त्या
स्टॉलवर इतकी गर्दी जमली की विचारू नका. माझी नेमबाजी पक्की झाली आणि तिथं आम्हाला
एक टी-सेट भेट मिळाला. दुकानचालकाकडून तो ताब्यात घेऊन इकडं तिकडं पाहतो तर काय,
स्विनी कुठेच दिसेना. काळजाचा ठोका चुकणं, म्हणजे काय, हे त्या वेळेला आयुष्यात
पहिल्यांदा समजलं. बायकोला तर रडूच कोसळलं. तिला सावरावं की लेकीला शोधावं, अशी
माझी अवस्था झालेली. त्यावेळी मोबाईलही एकच होता आमच्याकडं. त्यामुळं दीपाला आणि
सम्यकला तिथंच एका बाजूला थांबायला सांगितलं.
आता लेकीला शोधयचं कुठं
आणि कसं?, असा प्रश्न माझ्यासमोर ठाकलेला. तेव्हा वाटलं की, आकाश पाळण्याकडं तर
गेली नसेल? मी लिटरली वेड्यासारखा त्या प्रचंड गर्दीतनं वाट काढत, इकडं तिकडं बघत
त्या दिशेनं पळायला सुरवात केली. कडेपर्यंत जाऊन पाहून आलो. लेकीचा कुठेही थांगपत्ता
नाही. दिसणारा प्रत्येक चेहरा संशयास्पद, अपहरणकर्ता वाटायला लागला. मनात सगळ्या
वाईटात वाईट विचारांचा कल्लोळ माजला. आता मी पुन्हा उलट्या दिशेनं म्हणजे फेअरच्या
एंन्ट्री-एक्झिट गेटच्या दिशेनं पळायला सुरवात केली. वाटेत पुन्हा रडत उभ्या
असलेल्या बायकोला कोरडा दिलासा देण्याचा प्रयत्न केला. तिच्याभोवती काही सांत्वन
करणाऱ्या महिलाही आता गोळा झालेल्या.
मी गेटपर्यंत पोहोचलो,
तरीही कुठेच काही पत्ता लागेना! मी हताश होऊन जागेवर थिजून उभा राहिलो. तेव्हा कुठे माझे बराच वेळ सुरू
असलेल्या उद्घोषणेकडे लक्ष गेले. एक दोन-तीन वर्षांची मुलगी सापडली असून कोणाचे
मूल हरवले असल्यास पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याबाबत आवाहन केले जात
होते. मी इकडेतिकडे पाहिले. थोड्या अंतरावर पोलीस नियंत्रण कक्ष होता. परिसरात खासगी
सिक्युरिटी गार्ड्ससह पोलीस प्रशासनाकडूनही बंदोबस्त तैनात होता. मी नियंत्रण
कक्षाकडे पोहोचलो, तेव्हा एक पोलीसकाका स्विनीला कडेवर घेऊन उभे होते. पोर रडत
होती, तिला ते शांत करण्याचा प्रयत्न करत होते. जीव भांड्यात पडणे म्हणजे काय असू
शकतं, हेही तेव्हाच समजलं मला. माझा जीव
तर थेट बॅरलमध्येच पडला लेकीला बघून. डोळ्यातनं घळाघळा पाणी वाहायला लागलं. मला
पाहताच स्विनीनं त्या पोलीसकाकांकडून थेट माझ्याकडं झेपच घेतली. पाच मिनिटं आम्ही
दोघंही एकमेकांना घट्ट मिठी मारुन रडत राहिलो. पोलीसकाकाही स्तब्ध झाले. त्यांनाही
थोडं गहिवरुन आलं असावं.
थोड्या वेळानं स्विनीनं तिच्या
बोबड्या बोलात विचारलं, ‘बाबा, तुमी कुटं हरवला होता? आई कुटाय?’ तिच्या प्रश्नानं मला हसू फुटलं. मनावरचं दडपण हलकं झालं. तेव्हा ते
पोलीसकाकाही म्हणाले, ‘अहो, ही आम्हाला भेटल्यापासून माझे आई-बाबा हरवलेत, असं सांगून रडतेय.’ मी त्यांना ती कशी भेटली, हे विचारलं. तेव्हा हे बाळ चुकून एका काका-काकूंच्या
पाठीमागे रडत चाललं होतं. तेव्हा त्यांनी तिला नाव वगैरे विचारलं तर रडण्यामुळं
त्यांना काही समजेना. तेव्हा त्यांनी तिला पोलीस नियंत्रण कक्षात आणून सोडल्याचं
सांगितलं. तेव्हापासून गेली १५-२० मिनिटं आम्ही उद्घोषणा करतो आहोत, असं त्यांनी
सांगितलं. मी त्यांना मनापासून धन्यवाद म्हटलं. ते नसते आणि कोणी तरी चुकून मुलीला
बाहेर घेऊन गेलं असतं, तर काय झालं असतं, कुठे शोधलं असतं मी?, असा प्रश्न मी स्वगतच
विचारला. पण, त्यांनी मात्र आम्ही येथे अत्यंत दक्ष असून गेटमधून कोणीही असा
आमच्या नजरेतून सुटून जाऊ शकणार नाही, असं सांगितलं.
आता पुढं, जेव्हा मी
स्विनीला तिच्या आईकडं घेऊन गेलो, तेव्हाचा आलम काय शब्दांत सांगायला हवा? शेवटी, स्विनीला तिचे
हरवलेले आई-बाबा सापडले होते. प्रकरणाचा शेवट गोड झालेला. नाही तर सोबतचे फोटो
किती कटु आठवांचे स्मरण करून देणारे ठरले असते, कल्पना करवत नाही...