सोमवार, १० फेब्रुवारी, २०२५

गारगोटीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत आणि सुहृदांच्या सान्निध्यात...

गारगोटी येथील श्री शाहू ग्रंथालयाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत व्याख्यान देताना डॉ. आलोक जत्राटकर. मंचावर श्री. वसंत देसाई

गारगोटी येथे श्री शाहू ग्रंथालयात महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन प्रसंगी डॉ. डी. के. पाटील,  वसंत देसाई, अनिता भोईटे, मिलींद प्रधान आणि डॉ. अस्मिता प्रधान आदी


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन प्रसंगी शामराव देसाई, वसंत देसाई, टी.बी. पाटील यांच्यासमवेत

दै. सकाळमधील कार्यक्रमाचे वार्तांकन

लाडक्या चव्हाण कुटुंबियांसमवेत अस्मादिक आणि डॉ. यादव सर.

प्रधान दांपत्याने त्यांच्या घरी पुष्पगुच्छ, अनुबोधचा ताजा अंक आणि डॉ. प्रधान मॅडम यांचे पुस्तक देऊन स्वागत केले.


साधारणपणे महिनाभरापूर्वी गुरूवर्य डॉ. राजन गवस सरांचा फोन आला, ‘गारगोटीच्या श्री शाहू ग्रंथालयाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत तुम्हाला यायचंय... विषय आणि दिवस सांगा.गवस सरांचा फोन म्हणजे आदेशच तो. त्यानुसार मग कालच्या रविवारी या व्याख्यानमालेत तरुणांचे भवितव्य आणि वास्तवया विषयावर व्याख्यान दिलं. आजच्या तरुणाईचा समकाळाच्या आणि भविष्याच्या अनुषंगानं मी जो विचार करतो आहे, त्याचंच सारस्वरुप मांडलं श्रोत्यांसमोर.

शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाच्या उंबरठ्यावर असलेल्या श्री शाहू वाचनालयानं गेली २८ वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला चालविलेली आहे. अनेक दिग्गज वक्त्यांनी यामध्ये व्याख्यानं दिलेली आहेत. यंदाही ज्येष्ठ संपादक डॉ. श्रीराम पवार, डॉ. दीपक पवार यांच्या बरोबरीने मला बोलण्याची संधी लाभली, यासाठी खरे तर गवस सरांना धन्यवादच द्यायला हवेत. त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्याचा माझा प्रयत्न यशस्वी झाल्याचे श्रोत्यांच्या व्याख्यानानंतरच्या भेटीमध्ये स्पष्ट झालेच. त्याशिवाय, व्याख्यानमालेचे प्रणेते माजी आमदार बजरंग देसाई अण्णा यांनी पहिल्या रांगेत बसून अगदी सुरवातीपासून शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐकलं आणि शेवटी खूप महत्त्वाचा विषय वेगळ्या पद्धतीनं मांडलात’, असं सांगून समाधान व्यक्त केलं, ही बाब महत्त्वाची. त्याखेरीज प्राचार्य सुभाष देसाई, शामराव देसाई, वसंत देसाई, आमची लाडकी दीक्षा आणि तिचे वडील, मित्रवर्य अनुबोधकार मिलींद प्रधान आणि डॉ. सौ. अस्मिता प्रधान मॅडम, डॉ. डी.के. पाटील यांनीही व्याख्यानाला आत्मियतेने उपस्थिती दर्शविली. त्याशिवाय, महिला आणि तरुणांची लक्षणीय उपस्थिती आणि त्यांनी शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐकणे हे सुद्धा या व्याख्यानमालेचे वेगळेपण म्हणून नोंदविण्याजोगे. असे क्षण व्याख्यात्यांच्या आयुष्यात अलिकडे दुर्मिळच, म्हणून त्यांची नोंद अगत्याची. ग्रंथपाल प्रवीण गुरव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले नेटके आयोजन हे सुद्धा दखलपात्र.

व्याख्यानानंतर प्रधान सरांच्या घरचे चहापान हे जितके अगत्याचे; तितकेच या दिवसाचा माझ्या लाडक्या चव्हाण दांपत्याच्या सहवासात दिवसाचा झालेला समारोपही संस्मरणीय. डॉ. जयश्री चव्हाण आणि डॉ. राजीव चव्हाण हे दांपत्य म्हणजे त्यांच्या वैद्यकीय व्यवसायाखेरीजही सामाजिक-सांस्कृतिक कार्यामुळे महाराष्ट्राच्या समाजजीवनात लक्षवेधक ठरलेले. बंधू अनुप यांच्यामुळे परिचय झालेल्या या दांपत्याशी त्यांच्या या कार्यामुळे माझा कधी अकृत्रिम स्नेह जडला, हे लक्षातही आले नाही. जयश्री मॅडमशी तर थोरल्या भगिनीप्रमाणे नाते जुळलेले. त्यामुळे गारगोटीमध्ये जाणे आणि त्यांना न भेटणे, अशक्यातीलच बाब. तशात डॉक्टर साहेबांनी त्यांच्या स्टाफच्या कुटुंबियांसाठी नजीकच्या पाली येथील एका निसर्गरम्य ठिकाणी छानशी मेजवानी आयोजित केलेली. यादव सरांसह या सर्व विस्तारित परिवारासमवेत त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची आणि स्नेहभोजन करण्याची संधी या निमित्ताने लाभली. जयश्री मॅडमसमवेत खूपच छान गप्पा झाल्या. खूप दिवसांनी पोटभरून बोलता आले, हे या गारगोटी भेटीचे महत्त्वाचे फलित...


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा