शिवाजी विद्यापीठाच्या एम. ए. मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक आणि माझे मित्र डॉ. शिवाजी जाधव यांनी लिहिलेल्या 'शाहूपूर्व आणि शाहूकालीन वर्तमानपत्रे' या एका अत्यंत महत्त्वाच्या पुस्तकाचे उद्या शनिवारी, दि. ५ एप्रिल २०२५ रोजी विद्यापीठात प्रकाशन होते आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्यांनी आपल्या वृत्तपत्रीय कारकिर्दीमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पत्रकारितेमध्ये एक सजग आणि जाणिवा समृद्ध पत्रकार-संपादक म्हणून मोठा लौकिक प्राप्त केला आहे असे, 'दि हिंदू' या राष्ट्रीय वृत्तपत्राचे सीनियर डेप्युटी एडिटर आणि आमचे मित्र डॉ. राधेश्याम जाधव यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे, ही आणखी एक आनंदाची आणि अभिमानाची बाब! 'शाहूकालीन पत्रकारितेची मूल्यमीमांसा' या विषयावर राधेश्याम बोलणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के असणार आहेत.
डॉ. शिवाजी जाधव यांनी लिहिलेल्या या पुस्तकामध्ये माध्यमांचा इतिहास, लेखनकलेचा विकास, भारतातील प्रसारमाध्यमांचा तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील पत्रकारितेचा उदय आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या कालखंडापर्यंत झालेला या पत्रकारितेचा प्रवास असा एक सर्वंकष आढावा घेण्याचा महत्त्वपूर्ण संशोधकीय प्रयत्न करण्यात आल्याचे दिसते. डॉ. जाधव यांनी पुस्तकाची मांडणी करीत असताना कोल्हापूर आणि राजर्षी शाहू महाराज यांचा कालखंड हा केंद्रस्थानी ठेवला आहे. तथापि, यामध्ये केवळ पत्रकारितेचा इतिहास आहे, असे नव्हे; तर, त्या समकाळामध्ये घडणाऱ्या विविध घटनांचाही समर्पक आणि विषयोचित वेध जाधव यांनी घेतला आहे. त्यामध्ये कोल्हापूरचा प्राचीन आणि मध्ययुगीन काळ, कोल्हापूरमधली एजंटांची कारकीर्द, कोल्हापूरच्या अल्पवयीन राजांचा कालखंड, छत्रपती घराण्याचा थोडक्यात इतिहास, कोल्हापूर प्रकरण या नावाने गाजलेले चौथ्या शिवाजी महाराजांची दुर्दैवी कारकीर्द, राजर्षी शाहू पूर्व आणि शाहूकालीन स्थिती आदी महत्त्वाच्या घटनांचा विशेष संदर्भ घेत घेत कोल्हापूरमध्ये विकसित होत गेलेली पत्रकारितेची परंपरा, त्याचप्रमाणे संबंधित वृत्तपत्रांमध्ये कोल्हापूरचे उमटलेले प्रतिबिंब, त्यांनी हाताळलेले विविधांगी विषय यांचाही अतिशय उचित वेध या पुस्तकामध्ये डॉ जाधव यांनी घेतलेला आहे. ठिकठिकाणी आवश्यक तेथे योग्य संदर्भ त्यांनी दिल्यामुळे या पुस्तकाचे संशोधन आणि संदर्भ मूल्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे. लेखनास विश्वासार्हता प्राप्त झाली आहे. त्यासाठी डॉ. जाधव यांनी राज्य शासनाच्या पुराभिलेख संचालनालय कार्यालयासह शिवाजी विद्यापीठाचे बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्र आदी ठिकाणी उपलब्ध ऐतिहासिक संदर्भांचा योग्य वापर केलेला आहे. पुस्तक वाचत असताना पानोपानी डॉ. जाधव यांनी लेखनासाठी घेतलेल्या कष्टाची जाणीव होते. महत्त्वाचे म्हणजे कोल्हापूरच्या पत्रकारितेच्या अनुषंगाने अनेक प्रकारची नवी माहिती प्रथमच या पुस्तकाच्या माध्यमातून सामोरी येत आहे, हे फार महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे केवळ पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनाच नव्हे; तर इतिहासाचे अभ्यासक, माध्यम संशोधक, शाहू पूर्व आणि शाहूकालीन वर्तमान पत्रांविषयी किंवा त्या काळातील वृत्तपत्रसृष्टीविषयी ज्यांना जाणून घ्यायचे आहे, अशा सर्वच घटकांसाठी जाधव यांचे हे पुस्तक माईलस्टोन ठरणार आहे. यासाठी घेतलेल्या परिश्रमांबद्दल मित्र म्हणून शिवाजीरावांचे अभिनंदन करणे हे माझे कर्तव्य तर आहेच; पण एक अतिशय महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तावेज त्यांनी अभ्यासकांसाठी निर्माण केला, याबद्दल त्यांना धन्यवाद देणेही मला अगत्याचे वाटते. या पुढील काळातही त्यांच्याकडून अशाच मौलिक, दर्जेदार साहित्याची निर्मिती होत राहील, यांची मला खात्री आहे. उद्याच्या प्रकाशन समारंभासाठी अनेकानेक शुभेच्छा!
मी उपस्थित राहणार आहेच; ज्यांना शक्य आहे त्यांनीही यावे!!