बुधवार, २३ एप्रिल, २०२५

‘निष्पर्ण...’मधून अनुप जत्राटकर यांच्या सृजनशील प्रतिभेची प्रचिती: बाबासाहेब सौदागर

दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन; अभिवाचनासही श्रोत्यांचा प्रतिसाद


लेखक-दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांच्या 'निष्पर्ण पिंपळाच्या छायेत' या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करताना बाबासाहेब सौदागर आणि डॉ. शरद भुथाडिया. सोबत डॉ. शिवाजी जाधव, अनुप जत्राटकर आणि डॉ. आलोक जत्राटकर

'निष्पर्ण पिंपळाच्या छायेत' या एकांकिकेचे अभिवाचन करताना (डावीकडून) 'अभिरुची'चे जितेंद्र देशपांडे, अश्विनी टेंबे आणि चंद्रशेखर फडणीस.



कोल्हापूर, दि. २२ एप्रिल: निष्पर्ण पिंपळाच्या छायेत या एकांकिका संग्रहातून लेखक-दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांच्या सृजनशील प्रतिभेची प्रचिती येते. भविष्यातही त्यांच्याकडून अशा उत्तमोत्तम साहित्यकृतींची अपेक्षा वाढली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ गीतकार, साहित्यिक बाबासाहेब सौदागर यांनी आज येथे केले.

अनुप जत्राटकर यांच्या निष्पर्ण पिंपळाच्या छायेत या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन येथील शाहू स्मारक भवनामध्ये झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सौदागर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक डॉ. शरद भुथाडिया होते. शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी झालेल्या एकांकिकेच्या अभिवाचनासही श्रोत्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.

श्री. सौदागर म्हणाले, गाभ हा चित्रपट पाहिल्यानंतर अनुप यांच्याशी परिचय करून घेण्याची उत्सुकता वाढली. त्यातून स्नेह निर्माण झाला. कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीचा वारसा मोठा आहे. तो वारसा पुढे चालविण्याची क्षमता लेखक-दिग्दर्शक म्हणून अनुप यांच्यामध्ये जाणवते. त्यामुळे त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. त्यांची पूर्ती करण्यासाठी आवश्यक असणारे परिश्रम ते निश्चितपणे करतील, याची खात्री आहे. लेखक म्हणूनही त्यांनी निष्पर्ण...सारख्याच प्रयोगशील साहित्यकृतींची निर्मिती करीत राहणे फार आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

मराठी भाषेच्या अस्तित्वाच्या अनुषंगानेही सौदागर यांनी यावेळी भाष्य केले. ते म्हणाले, जोपर्यंत आपण आईला आई म्हणतो, तोपर्यंत मराठी भाषेचे अस्तित्व कायम राहील. मराठीच्या अस्तित्वाची चिंता करण्यापेक्षा तिचा वापर करीत राहणे, तिचा शिक्षणातून प्रसार करणे महत्त्वाचे आहे. हिंदी ही मराठीची मावशी आहे, तर इंग्रजी ही आण्टी आहे. त्यामुळे त्यांचा द्वेष करण्याऐवजी त्याही आत्मसात करायला हव्यात.

यावेळी सौदागर यांनी कोल्हापूरशी त्यांचे असणारे बंधही उलगडले. ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबूडकर हे आपले गुरू होते. त्यांच्या सूचनेवरुन यशवंत भालकर यांनी त्यांच्या चित्रपटासाठी गीतलेखनाची पहिली संधी दिली आणि पहिले गीत हे डॉ. शरद भुथाडिया यांच्यावर चित्रित झाले. तेथून खऱ्या अर्थाने माझ्या कारकीर्दीला सुरवात झाली, असे कृतज्ञ उद्गार त्यांनी काढले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. शरद भुथाडिया म्हणाले, निष्पर्ण...मधील सर्वच एकांकिका आशयगर्भ आहेत. अनुप यांचे लेखन आणि चित्रपट यांमधील संकल्पना खूप वेगळ्या असतात. एकूणच मानवाच्या भावभावना, त्याचं जगणं, अस्तित्व याविषयी त्याच्या जाणीवा खूप सजग आणि समृद्ध आहेत. मनोरंजनापलिकडे मानवी वर्तन आणि जगणे याविषयी त्यांचे लेखन नेमके भाष्य करते. म्हणून ते लोकांना भावते.

यावेळी डॉ. शिवाजी जाधव यांचेही शुभेच्छापर मनोगत झाले. मान्यवरांच्या हस्ते निष्पर्ण पिंपळाच्या छायेतच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. आलोक जत्राटकर यांनी सूत्रसंचालन केले, तर अनुप जत्राटकर यांनी आभार मानले.

कार्यक्रमास डॉ. रणधीर शिंदे, डॉ. बी.एम. हिर्डेकर, डॉ. रघुनाथ कडाकणे, डॉ. शरद बनसोडे, डॉ. रामचंद्र पोवार, मयूर कुलकर्णी, प्रसाद जमदग्नी, दीपक बीडकर, संग्राम भालकर यांच्यासह कला, साहित्य इत्यादी क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निष्पर्ण…’च्या अभिवाचनाने वातावरण धीरगंभीर

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात अभिरुची या संस्थेच्या वतीने निष्पर्ण पिंपळाच्या छायेत या एकांकिकेचे अभिवाचन करण्यात आले. जितेंद्र देशपांडे यांनी तिचे दिग्दर्शन केले. देशपांडे यांनी सिद्धार्थ, अश्विनी टेंबे यांनी यशोधरा आणि चंद्रशेखर फडणीस यांनी छंद या व्यक्तीरेखांचे वाचन केले. राजपुत्र सिद्धार्थ राजवैभव त्यागून दुःखनिवारणाचा मार्ग शोधण्यासाठी बाहेर पडला, त्या रात्री पत्नी यशोधरेसोबतचा त्याचा संवाद, अशा संकल्पनेवर आधारित या एकांकिकेच्या अभिवाचनाने सभागृहामध्ये मोठे धीरगंभीर वातावरण निर्माण केले. त्याला अवकाळी पावसाच्या ढगांच्या गडगडाटाचे नैसर्गिक पार्श्वसंगीत आणि नेपथ्य लाभल्याने या गांभिर्यात भरच पडली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा