![]() |
| लोकसत्ता (२४-१-२००७) |
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या परीक्षा अर्जाच्या स्वरूपात तसेच ते भरून घेण्याच्या पद्धतीत बदल केले आहेत. आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांची सर्वंकष माहिती देणारी तसेच त्यातच सर्व परीक्षांसाठी सामायिक अर्ज असणारी माहितीपुस्तिका दि. २२ जानेवारी २००७ पासून राज्यातील सर्व पोस्ट कार्यालयात कायमस्वरूपी उपलब्ध करण्यात आली आहे. त्याविषयी दै. लोकसत्तामध्ये आज, दि. २४ जानेवारी २००७ रोजी प्रकाशित झालेला लेख...
सध्या देशात सुशिक्षित तरुणांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत उपलब्ध रोजगार आणि नोकरीच्या संधी यांचे प्रमाण व्यस्त असल्याचे दिसत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे स्वयंरोजगार सुरू करण्याची ऐपत किंवा क्षमता असेल, असेही नाही. या पार्श्वभूमीवर शासकीय नोकरीच्या संधीही कमी असल्या तरी हमखास आणि विश्वासाची म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. स्पर्धा परीक्षा हा त्याचा मार्ग. त्यामुळेच शहरांतील विद्यार्थ्यांबरोबरच आपल्या ग्रामीण भागातील गरिबाघरची मुलेही मग शासकीय नोकरी मिळविण्यासाठी स्पर्धा परीक्षांचा मार्ग चोखाळतात. महाराष्ट्रात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. लाखो विद्यार्थी आयोगाच्या भरवशावर आपले उमेदीचे आयुष्य स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यात घालवतात. प्रिलीम पास होईपर्यंत प्रिलीम, ती झाली की मेन्स, मेन्स उडाली तर पुन्हा प्रिलीम, मग पुन्हा मेन्स आणि ती सुटली तर मग इंटरव्ह्यु, असा या परीक्षांचा प्रवास म्हणजे या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एकेक आंदोलनच असते. जो पुढे गेला तो गेला, मागे राहिलेल्यांच्या धडका पुन्हा नव्या जोमाने सुरूच.
या तमाम परीक्षार्थीच्या अभ्यासातील एक मोठा अडथळा असतो, तो म्हणजे योग्य मार्गदर्शकाचा अभाव. प्रत्येक विद्यार्थ्यालाच भरमसाट फी भरून शहरांतील क्लासेसमध्ये प्रवेश घेणे परवडते, असेही नसते. त्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अल्टिमेट मार्गदर्शक हा त्याच्या आधी एक दोन वर्षे अभ्यास करणारा विद्यार्थीच असतो. आता त्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा ट्रॅक कितपत योग्य, हे ज्या त्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे पाहण्याच्या गांभीर्यावर अवलंबून असते.
नेमकी हीच बाब हेरून आयोगाने आता या विद्यार्थ्यांसाठी एक परिपूर्ण माहितीपुस्तिका तयार केली आहे. आयोगाच्या वेबसाइटवर यातील बहुतेक माहिती वेळोवेळी प्रदर्शित होत असली तरी फारच कमी विद्याथ्यर्थ्यांना इंटरनेट सेवेचा लाभघेता येत असतो. त्यामुळे एकत्रित स्वरूपात असलेल्या या माहितीपुस्तिकेला महत्त्व आहे. या पुस्तिकेतच आयोगाने आता परीक्षा अर्ज उपलब्ध केला आहे. आता प्रत्येक परीक्षेसाठी वेगवेगळा अर्ज असे स्वरूप न ठेवता सर्व परीक्षांसाठी एकच सामायिक अर्ज असे नवे स्वरूप प्राप्त करून दिले आहे. साधारण आठ भागांत विभागलेल्या या पुस्तिकेच्या पहिल्या भागात आयोगाविषयी, आयोगाच्या कार्यभाराविषयी, आयोगामार्फत नाही. घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा, त्यांची केंद्रे यांची माहिती आहे. दुसऱ्या भागात विविध स्पर्धा परीक्षांची योजना, अर्हता, अभ्यासक्रम, निवडीचे स्वरूप यांची माहिती आहे. तिसऱ्या भागात हा अर्ज मिळण्याची व भरण्याची ठिकाणे, अर्ज करण्याची पद्धत, शुल्क, अर्हता, सर्वसाधारण पात्रता, वयोमर्यादा यांची माहिती आहे. चौथ्या भागात मागासवर्ग, महिला, अपंग, माजी सैनिक, अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडू आदींसाठी आरक्षणाविषयी विस्तृत माहिती आहे. तर पाचव्या भागात लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, संगणक हाताळणी, परीक्षेतील गैरप्रकार, उमेदवारीसंदर्भातील बदल, पदग्रहण, परीविक्षा कालावधी वेतन, सेवा प्रवेशोत्तर शर्ती तसेच गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांवर कारवाई आदी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी सर्वसाधारण माहिती देण्यात आली आहे. सहाव्या भागात विविध आवेदनपत्रांसोबत सादर करावयाच्या कागदपत्रांसंदर्भात सांगण्यात आले आहे. यामध्ये वय, शैक्षणिक अर्हता, मागासवर्गीय असल्याचा पुरावा, मराठी भाषेचे ज्ञान, अपंगत्व, माजी सैनिक, पूर्व पाकिस्तानातील खरा स्थलांतरित असल्याचा दाखला, विवाहितांच्या नावात बदल, छायाचित्र, अनुभव आदीविषयी पुराव्यादाखल सादर करावयाच्या कागदपत्रांची माहिती दिली आहे. पुस्तिकेच्या सातव्या भागात अर्जाची छाननी, अर्ज नाकारण्याची कारणे, विविध परीक्षांच्या गुणांची सीमारेषा, त्यांच्या पडताळणीची पद्धत, समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांची प्राधान्यक्रमवारी या विद्यार्थ्यांना सातत्याने भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. आठव्या भागात प्रवेश अर्ज भरण्याविषयी मार्गदर्शन केले आहे तसेच वय, राष्ट्रीयत्व, मागासवर्गीय, अनुभवाचा दाखला आदी विविध अर्जाचे नमुनेही देण्यात आले आहेत.
आयोगाने अत्यंत परिश्रमपूर्वक तयार केलेली ही पुस्तिका राज्यातील सर्व प्रधान डाकघर तसेच जिल्हा व तालुका मुख्यालयांच्या पोस्ट कार्यालयामध्ये पोस्टाच्या कार्यालयीन वेळेत २२ जानेवारी, २००७ पासून कायमस्वरूपी विक्रीसाठी शंभर रुपयांत उपलब्ध करण्यात येणार आहे. आयोगाने एखाद्या परीक्षेसाठी जाहिरात दिल्यानंतर त्या परीक्षेसाठी लागू असलेली माहिती तसेच आवेदनपत्रामध्ये सर्व उमेदवारांसाठी लागू असलेली परिपूर्ण माहिती भरून प्रवेश फी व आवश्यक कागदपत्रांसह माहितीपुस्तिकेत नमूद केलेल्या पोस्ट कार्यालयांत विहित कालावधीत स्वीकारण्यात येणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज मिळविणे तसेच अर्ज भरणे यासाठी अधिक यातायात करावी लागणार नाही.
या प्रक्रियेतील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे कोर्ट फी स्टॅम्पच्या स्वरूपात परीक्षा शुल्क भरून घेण्याची पद्धत आयोगाने बंद केली आहे. आवश्यक किमतीचा कोर्ट फी स्टॅम्पची उपलब्धता असणे, तो मिळविण्यासाठी रांगा लावणे या। गोष्टी आता बंद होतीलच. त्याशिवाय हे स्टॅम्प चुकून लावायचे राहून गेले किंवा मध्येच गहाळ झाल्यास संबंधित परीक्षार्थीला परीक्षेच्या आदल्या दिवशी अर्ज नाकारले गेल्याचे समजायचे आणि त्याच्या संपूर्ण तयारीवर पाणी फिरायचे. यापुढे असा प्रकार होणार नाही. आता संबंधित पोस्ट खात्यात विद्यार्थ्याने रोखीने प्रवेश शुल्क भरावयाचे आहेत. त्याला त्याची पोचही तात्काळ मिळेल. महत्त्वाचे म्हणजे अर्ज करण्यासाठी जो निर्धारित अंतिम दिनांक असेल, त्या दिवसापर्यंत पोस्टात अर्ज भरून घेण्यात येतील. त्यामुळे अर्ज मुदतीत भरला नाही म्हणून होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान यापुढे होणार नाही.
गेल्या डिसेंबरमध्ये कार्बनलेस कार्बन पेपरचा आपल्या परीक्षांसाठी वापर करण्यास सुरुवात करून अधिक पारदर्शी धोरण स्वीकारलेल्या एमपीएससीने नव्या वर्षात अधिकाधिक विद्यार्थीभिमुख धोरण स्वीकारल्याची प्रचीती या माहितीपुस्तिका छापण्याच्या निर्णयातून आली आहे.
ठळक वैशिष्ट्ये
आयोगाच्या सर्व परीक्षा, अभ्यासक्रम, नियम, अर्हता, पात्रता यांची माहिती एकत्रित
सर्व परीक्षांसाठी एकच सामायिक परीक्षा अर्ज
राज्यातील सर्व पोस्ट कार्यालयांत कायमस्वरूपी उपलब्ध
कोर्ट फी स्टॅम्पऐवजी रोखीने परीक्षा शुल्क स्वीकारणार
विद्यार्थ्यांना तात्काळ पोच मिळणार
- आलोक जत्राटकर
सहायक संचालक (माहिती)
मंत्रालय, मुंबई

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा