रविवार, २८ जानेवारी, २००७

वंशवादाचा बळी?

(आज, रविवार, दि. २८ जानेवारी २००७ रोजी दै. सकाळच्या साप्ताहिक सप्तरंग पुरवणीत प्रकाशित झालेला लेख माझ्या ब्लॉगवाचकांसाठी पुनर्प्रकाशित करीत आहे.)





जानेवारीच्या मध्यात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा 'सेलिब्रिटी बिग ब्रदर' या इंग्लंडमधील एका दूरचित्रवाणी वाहिनीवरील रिअॅलिटी शोमध्ये ब्लडी पाकी (युरोपात आशियाई नागरिकांसाठी वापरले जाणारे अवमानकारक संबोधन), डॉग आदी अवमानास्पद विशेषणे वापरून सहभागी सहकलाकारांनी तेजोभंग केला. वर्णभेदाच्या या वर्तणुकीचा भारतीयांबरोबरच ब्रिटनमधील प्रेक्षकांनी तीव्र निषेध केलाच; पण त्याचे पडसाद ब्रिटनच्या संसदेतही उमटले. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही त्याचा निषेध केला.

तब्बल साडेतीन कोटी रुपये घेऊन या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेलेल्या शिल्पाला हा प्रकार अगदीच अनपेक्षित असावा, अशातला भाग नाही. किंबहुना या सेलिब्रिटीजनी एकमेकांशी गुडीगुडी बोलणे किंवा वागणे यात प्रेक्षकाला काय रस असणार? त्यापेक्षा त्यांच्यातील भांडणे, तणावाचे संबंध आणि त्यातून निर्माण होणारे नाट्य हाच या कार्यक्रमाच्या टीआरपीचा आत्मा आहे. त्यात आपली शिल्पाही कसलेली (की कसली का असेना!) अभिनेत्री आहे. तिनं छान रडून वगैरे या कार्यक्रमातील अन्य कलाकारांच्या तुलनेत आपली लोकप्रियता बळकट केली आहे. त्याबद्दल तिला मानायलाच हवं. आता झाल्या प्रकाराबद्दल घूमजाव करीत शिल्पाने व्यावसायिकतेची प्रचिती दिली आहे. असे असले तरी आम्ही तिच्याशी सहमत आहोत, असे मात्र नाही. कोणत्याही भारतीयाची किंवा कोणत्याही नागरिकाच्या राष्ट्रीयत्वाची खिल्ली, कुचेष्टा ही बाब निषेधार्हच आहे. या ठिकाणी केवळ या एकूण प्रकरणामागची व्यावसायिकता अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे.

मुळात शिल्पा शेट्टी प्रकरणातून, त्यापूर्वी काही दिवसच अगोदर घडलेल्या एका गंभीर घटनेकडे वाचकांचे लक्ष वेधायचे आहे. रायगड जिल्ह्यातील रोह्यानजीक माळसाई या खेड्यात गेल्या अकरा डिसेंबरला स्टीफन बेनेट या ब्रिटन पर्यटकाचा मृतदेह झाडाला फाशी दिलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर या घटनेविषयी अनेक तर्कवितर्क लढविले गेले. परस्पर विसंगत माहिती सामोरी येत गेली. गावातील एका महिलेची छेड काढल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी त्याला बदडून अखेर झाडावर फाशी दिले, असे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी सहा ग्रामस्थांना अटकही झाली आहे. पोलिस तपासात स्टीफनविषयी काही संशयास्पद बाबी उजेडात आल्या आहेत. तो अमली पदार्थ घ्यायचा, गोव्यात सारखी हॉटेल बदत बदलायचा. अशा माहितीमुळे स्टीफनच्या मृत्यूभोवतीचे गूढ वाढलेय.

मुळात तो मुंबईहून गोव्याला जाताना मध्ये रोझातच का उतरला आणि चालत माळसाई गावाकंडे का गेला. या प्रश्नाचे उत्तर सांपडलेले नाही. त्याच्या आई-वडिलांच्या आणि बहिणीच्या म्हणण्याप्रमाणे मात्र स्टीफन अत्यंत सुस्वभावी होता. मादक पदार्थांच्या सेवनाच्या सवयीचाही त्यांनी इन्कार केलाय. त्याच्या मित्रांच्या म्हणण्यानुसार तो एक चांगला पर्यटक होता. पोलिसांना आढळलेल्या काही संशयास्पद बाबी आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू आणि त्याच्या नातेवाईक, मित्रांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवू. त्या दिशेने आपण विचार केला तर या परदेशी पर्यटकाच्या खून प्रकरणाचे गांभीर्य आणखीचं वाढते, जरा स्टीफनच्या जागी स्वतःला ठेवून पाहू. पर्यटनाची हौस असलेला स्टीफन रोह्यात मध्येच गाडी थांबलेली पाहून उतरला. कोकण रेल्वे मार्गाच्या निसर्गसौंदयनि भारावलेला स्टीफन त्याचा आस्वाद घेत चालू लागला, असाच चालत तो एका गावात पोहोचला. हे गाव कोणते, पुढे काय लागते, परिसरात आणखी काय काय पाहण्यासारखे आहे, या विषयी किंवा आपण चुकून स्टेशनपासून फारच दूर आलो आहोत, आता परत कसे जायचे, या विषयी त्याला माहिती हवी असेल, त्यासाठी एखाद्या ग्रामस्थाला विचारणे क्रमप्राप्त होते; पंण विचारणार कसे? भाषेचा मोठा अडसर त्याच्या आणि ग्रामस्थांच्या दरम्यान होता. त्यातच त्याला एक महिला दिसली. आपले प्रश्न त्याला हातवारे करून विचारण्याखेरीज दुसरे गत्यंतरच नव्हते. आता त्याच्या हातवाऱ्यांचा त्या महिलेने आणि ग्रामस्थांनी काय अर्थ घेतला. याला स्टीफन जबाबदार कसा? आपल्या परिसरातल्याच जंगलातला एखादा दुर्मिळ प्राणी (किंवा बिबट्या जरी) गावात आला तर त्याला लाठ्या-काठ्या आणि दगडांनी ठेचून मारणाऱ्या आपल्या अडाणी जनतेसाठी स्टीफन हा एखाद्या एलियनसारखाच (परग्रहावरचा मानव) होता. त्याच्याही वाट्याला तेच आले. पोलिस तपासात जर स्टीफन हा वंशवादाचा बळी उरल्याची वस्तुस्थिती निदर्शनास आल्यास त्याच्या मृत्यूला जबाबदार कोण असेल? आज शिल्पा शेट्टीसाठी आपली अस्मिता जागृत झाली आहे. उद्या स्टीफनच्या मृत्यूबद्दल आपण तितक्याच पोटतिडकीने ब्रिटनवासीयांची क्षमायाचना करू शकू का? जागतिक वंशवादाबद्दल ओरड करण्यापूर्वी एकदा आपल्या देशातील अठरापगड जातीधर्माच्या भिंतीत बंदिस्त सामाजिक परिस्थितीकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे, असे नाही वाटत? शेवटी परमपूज्य राजकुमार यांच्या शब्दांत या साऱ्या गोष्टीचे सार सांगायचे म्हणजे 'जिनके खुदके घर शिशे के होते हैं, वो दुसरोंके घरोंपर पत्थर नही फेंका करते!'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा