शुक्रवार, ६ मे, २०११

'सोन्याचा' दिवस!

आज अक्षयतृतीया... हिंदू मान्यतेनुसार साडेतीन मुहूर्तांमधला एक श्रेष्ठ मुहूर्त... माझा कल निर्मिकाचं अस्तित्व मानून नास्तिकतेकडे झुकणारा असल्यानं या दिवसाबद्दलचं माझं आकर्षण यथातथाच! पण आज सकाळी सकाळी माझा जीवलग मित्र प्रशांतचा फोन आला, त्याचं लग्न जुळत असल्याची बातमी त्यानं मला दिली आणि आजचा आपला दिवस खऱ्या अर्थानं 'सोन्याचा' झाला, अशी भावना मनात दाटून आली.
आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की, मित्राचं लग्न ठरलं, हे ठीक आहे. पण त्यात अगदी माझा दिवस सोन्याचा होण्यासारखं काय विशेष? सांगतो. याठिकाणी एक खुलासा करतो, तो म्हणजे प्रशांतचं लग्न पुन्हा (म्हणजे दुसऱ्यांदा) ठरतं आहे. पहिलं लग्न (सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं!) मोडलं. तो काडीमोड व्यवस्थित मिळवून देण्यात मलाच मोठी भूमिका पार पाडावी लागली होती. त्यानंतरचा मधला दोन वर्षांचा काळ माझ्यासाठी तर जड गेलाच, पण प्रशांतसाठी सुध्दा त्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक जड गेला.
काही व्यक्तींच्या आयुष्यात संघर्ष हा पाचवीलाच पुजलेला असतो. त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे माझा हा मित्र! तो लहान असतानाच वडिल वारलेले, घरची ना शेती ना अन्य काही उत्पन्न! आई निपाणीत विडया वळायची. त्यातून मिळणारी तुटपुंजी पेन्शन हाच काय तो घरखर्चाचा स्रोत. मधली बहिण आणि भावोजी हायवेवर चहाचा गाडा चालवायचे. त्या दोघांची चंद्रमौळी झोपडी, (चंद्रमौळी हा शब्द ऐकायला भारी वाटतो, पण प्रत्यक्षात ऊन्हापावसात त्या झोपडीची आणि त्यात राहणाऱ्यांची काय अवस्था होते, हे मी जवळून पाहिलंय.) तिथंच ही दोघं मायालेकरंही राहायची.
आठवीपर्यंत प्रशांत आपल्या मोठया बहिणीकडं जयसिंगपूरमध्ये शिकायला असायचा. अर्जुननगरच्या मोहनलाल दोशी विद्यालयात नववीत नवीन ऍडमिशन घेणारे तो आणि मी असे दोघेच होते. त्यामुळं साहजिकच जुन्यांपेक्षा आमच्या दोघांची ओळख, मैत्री आधी झाली. एक वेगळा जिव्हाळा निर्माण झाला, तो अगदी आजतागायत कायम आहे. अभ्यासात हुशार, अत्यंत प्रामाणिक, मित व मृदू भाषी, अतिशय सुंदर हस्ताक्षर (इतकं की त्या दोन वर्षांत शाळेतर्फे देण्यात आलेलं प्रत्येक प्रशस्तीपत्र त्याच्याच हस्ताक्षरातलं आहे.), रिंगटेनिस, क्रिकेट या खेळांमध्ये गती अशी अनेक वैशिष्टयं प्रशांतमध्ये होती. तसंच तो राहायलाही आमच्या घरापासून थोडयाच अंतरावर होता. आम्ही दोघं एकमेकांच्या घरी जायचो. त्याच्या घरची परिस्थिती मी माझ्या आई बाबांना सांगितली. त्याची हुशारी वाया जाऊ द्यायची नाही, असा निर्धार करून मी तेव्हापासूनच त्याला आमच्या घरी अभ्यासाला बोलवायला सुरवात केली. नववीपासून ते अगदी फायनल इयर (माझी बीएस्सी आणि त्याचं बीए) यात खंड पडला नाही.
तोपर्यंत प्रशांतची घरची परिस्थिती हळूहळू सुधारतेय, असं चित्र निर्माण झालं. बीएस्सीला मी फर्स्ट क्लास कव्हर करायच्या मागं असताना प्रशांतनं बीए इकॉनॉमिक्समध्ये डिस्टींक्शन मिळवलं. त्यानं एमए करावं, यासाठी माझ्या बाबांनी त्याला पूर्ण पाठबळ द्यायचं ठरवलं. (एक उत्कृष्ट प्राध्यापक होण्याच्या क्वालिटीज् त्याच्यामध्ये आहेत, असं आमचं ठाम मत होतं.) शिवाजी विद्यापीठात ऍडमिशनही घेतलं. नेमक्या त्याचवेळी त्याच्या कौटुंबिक अडचणींनी तोंड वर काढायला सुरवात केली. हायवेच्या चौपदरीकरणाच्या कामात चहाचा गाडा गेला, भावोजी परागंदा झाले, आईला अर्धांगाचा मायनर झटका आला, तिच्या औषधोपचाराचा आणि भाच्याच्या शिक्षणाचा खर्च भागवण्याचं आव्हान होतं. आमचं त्याला पाठबळ होतंच, पण त्याच्यासारख्या स्वाभिमानी व्यक्तीनं अशा परिस्थितीत घरची जबाबदारी टाळणं शक्यच नव्हतं. त्याला शिक्षण सोडावं लागलं. तत्पूर्वी, टेलिफोन बूथवर काम करणारा प्रशांत आता निपाणीत रिक्षा चालवू लागला. (तुम्ही कधी निपाणीत आलात, तर एक से एक 'टकाटक' रिक्षावाले दिसतील, इतकं या व्यवसायाला इथं ग्लॅमर आहे. आम्ही 1991मध्ये इथं राहायला आलो तर स्टँडवर मोजून पाच दहा रिक्षा असतील. आता स्टँडभोवतीच पाच स्टॉप आहेत. रिक्षांची तर गणतीच नाही.) दुसऱ्याची रिक्षा रोजंदारीवर चालवता चालवता एक दिवस स्वत:ची रिक्षा घेण्यापर्यंत प्रशांतची प्रगती झाली. स्वत:चं चार खोल्याचं घरही बांधून झालं. ज्या भाच्याच्या शिक्षणासाठी प्रशांत डे-नाईट डयुटी करत होता, त्या भाच्याला दहावी होण्याआधीच शिक्षणापेक्षा मामाचा रिक्षाचा धंदाच अधिक ग्लॅमरस वाटू लागला. त्याला आम्ही किती समजावलं, पण तो ऐकायला तयार होईना. शेवटी प्रशांतनं आपली रिक्षा त्याला चालवायला दिली.
दरम्यानच्या काळात त्याला मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये ओळखीनं वसुलीचं काम मिळालं. तेही त्यानं स्वीकारलं. इथं वर्षभर काढलं सुध्दा! पण इतकी वर्षं रिक्षा चालवल्यानंतर त्याची मानसिकता बदलली होती. त्याच्याच शब्दांत सांगायचं तर,
'आम्हाला रोजच्या रोज ताजा पैसा लागतो, महिनाभराचा एकदम शिळा पैसा आता नकोसा वाटतो.'
त्याच्या या एका वाक्यानं मला निपाणीतल्या तमाम रिक्षाचालक मित्रांच्या या व्यवसायातल्या वावराचं स्पष्टीकरण मिळून गेलं. प्रशांत पुन्हा निपाणीत परतला. भाच्यासह डे-नाइट असा आलटून पालटून रिक्षा चालवू लागला.
याच दरम्यान, आईला पुन्हा ब्रेन-हॅमोरेजचा झटका आला. त्यात तिची दृष्टी गेली. पण उपचारानं चालता बोलता येऊ लागलं. याचं श्रेय प्रशांतनं केलेल्या सेवेला होतं.
पुढं कोल्हापूरजवळच्या एका गावातल्या मुलीशी त्याचं लग्न ठरलं, झालं. आणि तिथंच त्याच्या कौटुंबिक संघर्षाचा नवा अंक सुरू झाला. लग्नानंतर ती मुलगी मोजून दोन ते तीन दिवस त्याच्या घरी राहिली असेल. 'आपण कोल्हापुरात राहू', 'मी जॉब करते', 'तू सुध्दा रिक्षा सोडून नोकरी कर', 'आई नको', असे एक ना अनेक नखरे सुरू झाले. यावरुनच बहिणीशीही खटके उडू लागले. अखेर जड मनानं प्रशांतनं कोल्हापुरात भाडयानं घर घेतलं. बहिणीनं टोकाची भूमिका घेतल्यानं आईला सुध्दा बरोबर घेणं आवश्यक होतं. तरीही त्याच्या बायकोला काय हवं होतं, कोण जाणे! तिनं त्याच्याशी अजिबात जुळवून घेतलं नाही. त्याच्या विनवण्यांना काडीची किंमत न देता ती माहेरी निघून गेली. मोजून महिनाभरही हा संसार झाला नाही.
प्रकरण माझ्यापर्यंत आलं. समजावून सांगून, रागावून काहीही उपयोग झाला नाही. प्रकरण सामोपचारानं मिटवण्याचा खूप प्रयत्न केला. पण आता तिच्या माहेरचे लोकही फारच टोकाची भूमिका घेऊ लागले. मऊ स्वभावाच्या प्रशांतला कोपरानं खणायचे, त्यांचे प्रयत्न सुरू झाले. पै न् पै जमवून प्रशांतनं मोठया हौशेनं तिला केलेले दागिने सुध्दा त्यांनी घरातून गायब केले. ज्या खोलीचं भाडं हा भरत होता, त्या खोलीला यानं लावलेल्या कुलुपावर तिच्या घरच्यांनी दुसरं कुलूप आणून लावण्यापर्यंत मजल गेली. घरातले स्वत:चे कपडेही त्याला घेता येणार नाहीत, अशी सारी व्यवस्था केली गेली. आणि याला कारण काय? तर ठोस असं कोणतंही कारण दिलं जात नव्हतं. एकूणच ही गंभीर परिस्थिती पाहता मलाही टोकाची भूमिका घेण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. प्रशांतला घटस्फोटासाठी राजी केलं. त्याशिवाय त्याची या दुष्टचक्रातून सुटका नसल्याचंही पटवून दिलं. माझ्यासारखंच अन्य मित्रांचंही मत पडलं. त्यानंतर माझे सर्व सोर्सेस वापरून पध्दतशीरपणे प्रशांतला या बंधनातून रितसर सोडवला. दरम्यानच्या काळात वर्षभर गेलं.
प्रशांतवर ओढवलेली परिस्थिती स्पष्टीकरणापलिकडची होती. आम्हा साऱ्यांनाच वाईट वाटलं. तो आईसह पुन्हा निपाणीत आला. मी मुंबईत राहून फार काही करू शकत नसलो तरी त्याला सावरण्यासाठी माझ्या साऱ्या मित्रांनी कंबर कसली. गजू, बबलू, संतोष या सांगावकर बंधूंनी तर त्याला खूप आधार दिला. संतोषनं स्वत:ची रिक्षा चालवायला देऊन त्याला आर्थिक आधार दिला. बबलू गरज पडेल त्यावेळी जेवण देत होता. प्रशांतच्या मनातल्या दु:खावर मात्र आमच्याकडं समजावणीची फुंकर घालण्यापलिकडं दुसरा उपाय नव्हता. घराच्या वाटण्या झाल्यानं आईची जबाबदारी त्याच्यावरच आलेली. यातून दु:ख विसरण्यासाठी अखेर ड्रिंक्सवरचा त्याचा भर वाढला. अधूनमधून मित्रांसोबत बसणारा प्रशांत दररोज एकटाच जाऊ लागला. मित्रांच्या समजावण्यांच्याही पलिकडं गेला. ही गोष्ट माझ्या कानावर आली. त्याला भेटून मी त्याला बरंच समजावलं. त्याला सांगितलं, `यापुढं तुझं हे प्रमाण कमी झाल्याशिवाय मी तुला फोन करणार नाही`, आणि त्यासाठी मी त्याला आठवडयाची मुदत दिली होती. मला माहित होतं, पुढच्या आठवडयात त्याचा फोन येणार नाही. तसंच झालं! चार महिने उलटल्यानंतर गेल्या महिन्यात त्याचा फोन आला.
'मी आता माझ्यावर बऱ्यापैकी कंट्रोल मिळवलाय. तू नाराज होऊ नको.'
माझ्या डोळयात टचकन् पाणी आलं. तो माझ्याशी खोटं बोलणार नाही, याची मला खात्री होती. त्याला पुन्हा पंधरा मिनिटं समजावलं.
आणि आज पुन्हा प्रशांतचा फोन आला. मुलीकडच्यांनीही त्याला पसंत केलं आहे. आता येत्या महिन्याभरात त्याचं (रेकॉर्डनुसार) दुसरं लग्न होईल. पण तसं हे पहिलंच लग्न असेल कारण पहिला संसार मांडलाच कुठं होता? नुसताच आयुष्याचा खेळखंडोबा! आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे, ही मुलगी पाहायला त्याची बहीणसुध्दा सोबत गेली होती. म्हणजे घरच्या आघाडीवरही आता चांगलं वातावरण निर्माण होतंय. आता मात्र प्रशांतला सुख मिळू दे. यापुढं कोणतंही संकट त्याच्यावर येऊ नये, अशी मनापासून इच्छा आहे. त्यासाठी आज सकाळीच मी त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत. तसं झालं तर, अक्षयतृतीया हा खरंच चांगला मुहूर्त आहे, योग आहे, असं मानायला मी अजिबात मागंपुढं पाहणार नाही.
गुड लक माय फ्रेंड...गुड लक...!
--
आलोक जत्राटकर

२ टिप्पण्या:

  1. Alok, baryach divsapasun Prashant ch sadhya kay chalalay ha vichar karaycho, vachun dole bharun ale...tu khup sundar lihilays...tyacha number asel tar mala pathav, tyachyashi bolaychay...

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. प्रिय भालू, तू माझा कालचा "जगण्याने छळले होते; मरणाने सुटका केली" हा ब्लॉग वाचलेला दिसत नाहीस. Prashant is no more now. Pray for his soul to RIP.

      हटवा