गुरुवार, १९ एप्रिल, २०१२

शिवरायांचं मोठेपण!


छत्रपती शिवाजी महाराज हे उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. नुकताच 'राजा शिवछत्रपती' या मालिकेवरुन निर्माण करण्यात आलेल्या चित्रपटाबद्दल माझ्या एका मित्रानं फेसबुकवर हा चित्रपट पाहण्यासाठी आवाहन केलं आहे. अतिशय सुरेख आणि सळसळतं असं आवाहन आहे, त्यात त्यानं म्हटलंय की, "तलवारी तर सगळ्याच्यांच हातात होत्या. ताकत ही सगळ्याच्यांच मणगटात होती. पण स्वराज्य स्थापन करण्याची उत्तुंग इच्छा फक्त 'मराठ्यांच्या' रक्तातच भिनलेली होती. ही शक्ती छ.शिवाजी महाराजांनी जानली होती, म्हणून तर अफजल खानाच्या रक्ताने प्रतापगडाची पायरी धूतली होती... मला आहे मराठीची जाण, महाराष्ट्रात माझा जन्म झाला हाच मला अभिमान, ‘मी मराठी…’ या दोन शब्दातच माझी ओळख आहे... मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे. पहिला मराठी बाणा - "मोडेल पण वाकणार नाही" आता आमचा मराठी बाणा- "मी वाकणार तर नाहीच पण मोडणारही नाही ", "मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्रधर्म वाढवावा"
- यासाठी नुकताच प्रदर्शित झालेला “राजा शिवछत्रपती” हा चित्रपट प्रत्येक शिवभक्त मराठ्याने सहकुटुंब-मित्रपरिवारासह जाऊन आवर्जून पहावा. दबंग-बॉडीगार्ड यासारखे टुकार चित्रपट जर सुप्परहिट्ट होत असतील तर मग आपले आराध्य दैवत 'शिवछत्रपती' वरील चित्रपटाने तर विश्वविक्रम केला पाहिजे. तेंव्हा निर्धाराने बाहेर पडा...."
मित्राच्या आवाहनात सकृतदर्शनी गैर असं काही नाही. चित्रपट पाहावा आणि त्या माध्यमातून आपलं शिवप्रेम व्यक्त करावं, यालाही कुणाची हरकत असण्याचं कारण नाही. पण हा चित्रपट असो की मालिका, या दोन्ही बाबींचा शेवट शिवराज्याभिषेकाच्या प्रसंगानं करण्यात आलाय. किंबहुना, माझ्या पाहण्यात आलेल्या शिवाजी महाराजांवरील बऱ्याच चित्रपटांचा शेवट हा याच प्रसंगानं झाल्याचं मला दिसलं. हिंदी चित्रपटात जसं नायक-नायिकेच्या विवाहानं '...ॲन्ड दे लिव्ह्ड हॅप्पीली फॉरेव्हर!' असा शेवट केला जातो, तसा शिवरायांवरील चित्रपटांचा तद्दन सिनेमॅटिक शेवट केल्याचं दिसतं. पण प्रत्यक्षात शिवरायांनी राज्याभिषेकानंतरच्या कालखंडात अतिशय झंझावाती पद्धतीनं, प्रजाहिताच्या दृष्टीनं असा कारभार केलेला आहे. फक्त त्यामध्ये कुठं फारसं चमत्कृतीपूर्ण असं काही घडलं नाही. त्यामुळं त्या कारभाराशी आम्हाला काही देणंघेणं नसावं कदाचित!
पण माझ्या मते, शिवरायांचं मोठेपण त्यांच्या आयुष्यात घडलेल्या चमत्कृतीपूर्ण घटनांत नाहीयेच मुळी. स्वराज्य प्रस्थापनेबरोबरच त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात आपल्या रयतेची ज्या पद्धतीनं काळजी वाहिली, त्यामध्ये त्यांचं मोठेपण सामावलं आहे. राज्याभिषेकानंतरच्या काळात त्यांनी ज्या लोकाभिमुख पद्धतीनं कारभार केला, त्याला तोड नाही. रयतेच्या शेतातल्या पिकाच्या देठालाही धक्का न लावता जाण्याचा आदेश बजावणारा हा 'जाणता राजा', त्या काळातल्या इतर साम्राज्यविस्तारवादी राजा-बादशहांच्या मांदियाळीत वेगळा न ठरता तरच आश्चर्य!
छत्रपती शिवाजी महाराज हे खरं तर अतिशय महान असा 'लोकराजा' होते. तसं पाहता, त्या काळातील राजकीय गरजेपोटी त्यांना काही धाडसी पावलं उचलावी लागली. स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, तोरण्याची जीत, अफझलखानाचा वध, शाहिस्तेखानाची बोट छाटणी, मिर्झाराजे जयसिंहांशी तह, आग्र्याहून सुटका, सूरतेची लूट या आणि अशासारख्या घटनांनी त्यांच्या जीवनचरित्राला एक वेगळं क्षात्रतेज प्रदान केलं. वीररसानं भारलेलं असल्यानं सर्वसामान्य जनतेलाही ते आजतागायत भारावून टाकणारं ठरतंय. पण या घटना म्हणजेच शिवरायाचं मोठेपण, असं मानणं यासारखा दुसरा कोतेपणा नाही. खरं तर, या घटनांना समांतर आणि शिवराज्याभिषेक झाल्यानंतरही शिवरायांनी ज्या पद्धतीनं आपल्या रयतेची काळजी वाहिली आणि सर्वसामान्य, गोरगरीब जनतेच्या मनात जे आदराचं स्थान प्राप्त केलं, ते अढळस्थान हेच शिवरायांचं खरं सिंहासन ठरलं.
ज्येष्ठ विचारवंत ॲड. गोविंद पानसरे यांनी 'शिवाजी कोण होता?' या छोटेखानी पुस्तिकेत शिवरायांचं खरं मोठेपण आणि राजेपण कशात आहे, याचा अतिशय सुरेख आणि वस्तुनिष्ठ आढावा घेतला आहे.
छत्रपतींविषयी समाजात वेगवेगळ्या प्रकारचे गैरसमज पसरवण्याचं काम सातत्यानं आणि गेली अनेक वर्षं केलं जात आहे. शिवरायांच्या हयातीतच त्याला प्रारंभ झाला होता, ही बाब तर सर्वश्रुतच आहे. पण पानसरे यांनी त्या सर्व समज-गैरसमजांना सज्जड पुराव्यानिशी छेद देत, त्यातून हा `जाणता राजा' कसा सर्व समाजाचा आणि विशेषत: `आम आदमी'चा राजा होता, ते दाखवून दिलं आहे.
शिवाजी महाराजांविषयी प्रसृत केलेला सर्वात मोठा गैरसमज म्हणजे `महाराज हे केवळ हिंदूंचे राजे होते आणि त्यांच्या मनात मुसलमानांविषयी तिरस्काराचीच भावना होती.' अर्थात हा असा गैरसमज समाजात पसरवण्यामागचं 'राजकारण' काय आहे, ते सांगण्याची गरज नाही. पानसरे यांनी आपल्या लेखनातून हा गैरसमज ठामपणे खोडून काढला आहे.
पानसरे लिहितात : "शिवाजी हा हिंदू होता किंवा हिंदू धर्मरक्षक होता म्हणून तो यशस्वी झाला असं म्हणावं, तर मग राणा प्रताप वा पृथ्वीराज चौहान हे यशस्वी का झाले नाहीत?... शौर्य, त्याग, जिद्द, कष्ट इत्यादी बाबतीत राणा प्रताप आणि पृथ्वीराज शिवाजीपेक्षा कमी नव्हते... मग असं का व्हावं?...''
त्याचं उत्तरही पानसरे यांनी देऊन टाकलं आहे. त्यांच्या मते 'हिंदू धर्मावरील निष्ठेमुळे शिवाजी महाराजांना यश प्राप्त झालं, हे खरं नाही. धर्मरक्षणाखेरीज शिवाजी महाराज आणखी काहीतरी चांगलं करायला निघाले होते, असं दिसतं...'' काय होतं हे चांगलं काम?
तर, महाराजांच्या मनात आपलं राज्य, सत्ता वा अंमल प्रस्थापित करायची गोष्ट आली, त्याचं कारण त्या काळातले, वतनदार, जमीनदार, सुभेदार आणि पातशहा यांच्याबरोबरच पाटील-कुलकर्णी आदी मंडळींनी गोरगरीब रयतेवर चालवलेले अत्याचार हे होतं. त्या अत्याचाराच्या विरोधात महाराजांनी मोठा लढा दिला आणि आपला अंमल प्रस्थापित केला. असा लढा देऊन उभ्या राहिलेल्या सत्तेला दुसऱ्या कोणावर अन्याय करण्याचा नैतिक हक्क तर नव्हताच शिवाय, या लढ्यासाठी समाजाच्या तळागाळातून उभी राहिलेली जनताही, त्या सत्तेला म्हणजेच- महाराजांना सोडून गेली असती.
अर्थात, केवळ राज्य जाईल म्हणून महाराजांनी रयतेला प्रेमानं वागवलं, असं नाही तर त्यांच्या मनातच `आम आदमी'विषयी कशी जिव्हाळ्याची भावना होती, ते अनेक उदाहरणांनिशी पानसरे यांनी दाखवून दिलं आहे. महाराजांच्या सैन्यात केवळ मुस्लिम सरदारच नव्हे तर सैनिकही होते. त्यांच्या मनात मुसलमानांविषयी तिरस्काराची भावना असती, तर असा धोका त्यांनी पत्करला असता का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
याचा अर्थ शिवाजी महाराज हे धर्मच मानत नव्हते वा ते निधर्मी होते किंवा त्यांनी आपलं राज्य निधर्मी म्हणून घोषित केलं होतं, असा मात्र नाही. महाराज हिंदू होते. त्यांची धर्मावर श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेप्रमाणे ते वागत होते... पण याचा अर्थ ते मुस्लिम धर्माच्या विरुद्ध होते, असा मात्र घेता उपयोगाचा नाही. सभासदाच्या बखरीत बखरकार म्हणतात : ``मुलखात देव-देवस्थाने जागोजागी होती. त्यास दिवाबत्ती, नैवेद्य, अभिषेक स्थान पाहून यथायोग्य चालवले. मुसलमानांचे पीर, मशिदी, त्यांचे दिवाबत्ती, नैवेद्य स्थान पाहून चालवले...'' यावरुनच त्यांची धर्मनिरपेक्षता सिद्ध होते.
महाराजांविषयी असलेला किंवा काही मतलबी मंडळींनी पसरवलेला आणखी एक गैरसमज म्हणजे महाराज हे फक्त मराठ्यांचेच राजे होते. प्रत्यक्षात चित्र काय होतं? शिवाजीच्या सहकाऱ्यांमध्ये सर्व जातिधर्माचे लोक होते. न्हाव्यांपासून मराठ्यांपर्यंत आणि ब्राह्मणांपासून प्रभू-शेणवींपर्यंत सर्वांचा गोतावळा शिवाजी महाराजांनी उभा केला होता... शिवाजी महाराजांच्या यशाचे रहस्य या सर्वसमावेशकतेत आहे.
शेतकऱ्यांच्या हिताची शिवरायांनी घेतलेली काळजी सुद्धा त्यांच्या मोठेपणाचं द्योतक आहे. राजांनी प्रभावळीचे सुभेदार रामाजी अनंत यांना लिहिलेले ५ सप्टेंबर १६७६ चे पत्र आजही मार्गदर्शक ठरावे असेच आहे. "पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना गरजेप्रमाणे कर्ज द्यावे. पीक आल्यावर त्यांच्याकडून मुद्दल तेवढे घ्यावे, व्याज घेऊ नये. यासाठी सरकारी खजिन्यातून दोन लाखांपर्यंत रक्कम खर्च पडली तरी हरकत नाही. शेतकऱ्याला जर मुद्दलही फेडणे शक्य नसेल तर त्याला तेही माफ करावे," असे शिवाजी महाराजांनी त्या पत्रात म्हटले होते. याचा अर्थ शेतकऱ्यांची गरज बघून त्याला शून्य टक्के व्याजदराने कर्ज द्यावे आणि प्रसंगी त्याला कर्जमाफी द्यावी, असा हुकूम शिवाजी महाराजांनी केला होता. महाराजांचा जयजयकार करत असताना त्यांच्या या प्रजाहित दक्ष कारभाराचा आदर्श आपण घेण्याची गरज आहे.
याच कारणामुळं महात्मा जोतीराव फुले यांनी छत्रपतींचा जो पोवाडा लिहिला, त्यामध्ये 'कुळवाडी भूषण' असा त्यांचा सार्थ गौरव केला आहे.
हे होतं शिवरायांचं खरं मोठेपण; पण आपण अफझलखानाचा वध आणि शाहिस्तेखानाच्या फजितीमध्ये ते शोधतो आणि इथंच खरी गल्लत होते, असं माझं स्पष्ट मत आहे.

४ टिप्पण्या: