सोमवार, १५ जुलै, २०१३

निखळ-१३: काळप्रहर!


('दै. कृषीवल'मध्ये 'निखळ' सदराअंतर्गत सोमवार, दि. १५ जुलै २०१३ रोजी प्रसिद्ध झालेला माझा लेख...)
मनुष्यस्वभाव गुंतागुंतीची गोष्ट आहे. छोट्या-छोट्या आनंदानं मोहरणारं आपलं मन त्यापेक्षाही छोट्या-छोट्या गोष्टींनी काहीबाही विचार करायला लागतं. म्हणतात ना, मन चिंती, ते वैरी न चिंती. हां,  आता चांगलं न् वाईट या गोष्टीही आपल्या मानण्यावरच अवलंबून आहेत म्हणा. काही दिवसांपूर्वी माझ्या बाबतीत असाच एक प्रसंग घडला.
सर्दी-तापाबरोबरच छाती प्रचंड भरून आल्यामुळं खोकल्यानं बेजार झालो होतो. अवस्था अशी की, त्या दोन-चार दिवसांत मी तोंड उघडलं असेल ते केवळ खोकण्यासाठीच. इतका प्रचंड त्रास. उपचार सुरू होतेच. जुनेजाणते, अनुभवी डॉक्टर असल्यामुळं अँटीबायोटिक्स देण्याची घाई न करता ज्वराला उतार पडल्यानंतरच मूळ उपचारांना त्यांनी सुरवात केली. त्यात खोकल्यासाठी कधी नव्हे इतकं स्ट्राँग औषध त्यांनी दिलं. प्रिस्क्रिप्शनवर त्याची मात्राही काळजीपूर्वक लिहून दिली. पण, आम्ही कसचे वाचतो? अडुळशाची चव आवडते म्हणून थेट तोंडाला बाटली लावून औषध घ्यायची सवय असणारे. इथंही त्याच प्रचलित सवयीनं साधारण दहा-बारा मिली एवढं सिरप रात्री झोपताना तोंडात टाकलं. अंथरुणावर आडवा झालो मात्र, अगदी काही क्षणांतच छातीची धडधड प्रचंड म्हणावी इतकी वाढली. आतला आवाज डॉल्बीसारखा कानातून येऊ लागला. माझ्या आजारपणानं बेजार झालेली बायको-मुलं नुकतीच झोपलेली. मी हळूच उठून प्रिस्क्रिप्शन पाहिली, तर त्यावर फक्त अडीच मिली इतकी मात्रा स्पष्ट लिहीलेली. त्याच्या जवळजवळ चार ते पाच पट जादाचं औषध या पठ्ठ्यानं घेतलं होतं. ते बघितल्यावर मात्र टेन्शन आलं. अंथरुणावर पुन्हा आडवा होऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागलो, तर ही धडधड वाढल्यासारखी वाटायची. या धडधडीनं मनात वेगवेगळे विचार येऊ लागले. वाटलं, ही आता आपली शेवटचीच रात्र! त्या पाठोपाठ दुसरा विचार, रात्री दोन आणि पहाटे चारच्या प्रहरास मरणाचं प्रमाण अधिक असतं. तेव्हा झोपेतच अगदी आपल्याही नकळत जाणं काही बरोबर नाही. तो येतो कसा, नेतो कसा, हे जाणून घेण्याची, समजून घेण्याची कदाचित ही आपल्या आयुष्यातली पहिली आणि शेवटचीच संधी असेल. ती वाया कशी बरं जाऊ द्यावी? हा विचार मनात येताच मी उठून बाहेर हॉलमध्ये आलो. लाइट न लावताच अंगावर शाल टाकून डोळे मिटून सोफ्यावर बसून राहिलो.
धडधड सुरूच होती आणि डोक्यातलं विचारचक्रही. वाजले होते रात्रीचे साडेअकरा. म्हणजे साधारणपणे आणखी काही तास विचार करण्यासाठी माझ्याकडं होते. दुसरं काही करण्यासारखी अवस्था आणि वेळही नव्हती. पण म्हटलं कित्येकांना इतका अवधीही मिळत नसेल. वीज चमकल्यासारखे अनेक प्रसंग, दुर्घटना इतक्या झटपट घडून जातात की माणूस क्षणात होत्याचा नव्हता होऊन जातो. काय झालं, कसं झालं, त्यांचं त्यांनाही समजत नसेल. सो, इन दॅट वे, आय वॉज लकी. जन्म अनुभवता आला नसेल कदाचित.. पण मृत्यू अनुभवण्याचं सौख्य मला लाभणार होतं. फार थोड्या लोकांना ते लाभत असेल ना? काय परिस्थिती असते पाहा. माझ्या आजीचा मृत्यू मी खूप जवळून पाहिला- अगदी लहानपणी. सांगलीच्या सिव्हीलमध्ये ॲडमिट होती. तिच्याकडं अगदी थोडा वेळ होता. त्या थोडक्या वेळात तिनं आम्हा नातवंडांना, तिच्या मुलांना डोळेभरून पाहिलं. नंतर आम्हा छोट्यांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर काही क्षणांतच माझ्या मावशीच्या हातून घोटभर पाणी घेऊन तिनं अगदी शांतपणानं प्राण सोडला होता. तिनं मृत्यू अनुभवला पण तो शब्दांत सांगण्यासाठी उरली नाही. किंबहुना, जगात मृत्यू ही एकच गोष्ट अशी असावी की जी फक्त अनुभवण्यासाठीच आहे. एक ओवी अनुभवावी म्हणतात, पण ती सुद्धा शब्दबद्ध असते. मृत्यूचं मात्र तसं नाही. दुसऱ्याच्या मृत्यूला शब्द आहेत, असतात; पण स्वतःच्या मृत्यूचा फक्त अन् फक्त अनुभवच घेता येऊ शकत असतो. तर त्या अनुभवाच्या समीप मी जात होतो. छातीतली धडधड आणि विचारचक्र सुरूच होतं.
पहिला विचार आला- आई-बाबांचा. म्हटलं, खूप वाईट वाटेल त्यांना. तरुण मुलाचा डोळ्यांसमोर मृत्यू व्हावा, यापेक्षा मोठ्ठं दुःख त्यांच्यासाठी दुसरं कोणतं असेल? आता त्याला इलाज नव्हता. धाकटा भाऊ आहे, नातवंडं आहेत. सावरतील दुःखातून सारे मिळून हळूहळू. बायकोचंही वाईट वाटलं. बिचारी! आता मुलांची जबाबदारी तिलाच उचलावी लागणार. त्यालाही इलाज नव्हता. मी मरतोय, पण त्यांना जगरहाटी थोडीच सुटणार आहे? सांभाळेल ती सारं यशस्वीपणे. नाही तरी तसा घरच्या जबाबदारीत माझा कुठं एवढा मोठा रोल असतो? मुलांना मात्र माझ्याविना आता इथून पुढचं आयुष्य काढावं लागणार. पण काढतील ती- आयुष्यही आणि नावही, याची त्या क्षणी सुद्धा खात्री पटली.
स्वतःबद्दलही मला जरा बरंच वाटलं. जे काही थोडं आयुष्य वाट्याला आलं, त्यात बऱ्याचशा गोष्टी साध्य करता आल्या होत्या. बऱ्याचशा राहूनही जाणार होत्या, पण.. पुन्हा इलाज नव्हता. लोकांशी बऱ्यापैकी चांगला वागलो होतो, त्यामुळे बऱ्याच चांगल्या लोकांशी जोडला गेलो होतो. वागलो असेन काहीवेळा वाईट.. पण आता चूक दुरुस्त करण्यासाठी वेळ नव्हता. तरीही माघारी बहुतांश लोक आपल्याबद्दल चांगलं बोलतील, असा विश्वास वाटला. काही इच्छा-आकांक्षा बाकी आहेत का, याचीही चाचपणी केली. अहो, तशा चिक्कार होत्या. पण वेळ नसल्यानं जेवढं काही मिळालं, त्याबद्दलही समाधान होतं. कित्येकांना तेही मिळत नाही. त्यांच्या तुलनेत मी सुदैवीच. त्यामुळं आता त्या क्षणाचा अनुभव घेण्यास पुरेपूर तयार आहोत आपण..
अरे, पण हे काय?.. विचारचक्र सुरूच आहे आणि छातीतली धडधड मात्र नॉर्मल झालीय, हे लक्षातच आलं नाही. घड्याळ पाहिलं तर अडीचचा काटा ओलांडला होता. म्हटलं, छे, आपल्याही नशीबातच नाही वाटतं, तो क्षण कवेत घेणं! भौतिक सुखांतच समाधान मानणाऱ्या मला, इतक्यातच एकदम बुद्धत्वप्राप्ती कशी शक्य असणार होती? उठलो नि पुन्हा अंथरुणात शिरुन गुडूप झोपून गेलो; असा की, जणू काही ते तीन तास माझ्या आयुष्यात कधी आलेच नव्हते.

४ टिप्पण्या:

  1. आलोक सर, नमस्कार!!
    तुमचा ‘‘काळप्रहर’’ हा लेख आत्ताच वाचला. मला राहवलं नाही म्हणून लगेच तुम्हाला प्रतिक्रिया देण्यासाठी दोन शब्द लिहिले आहेत.. तुमचा लेख मनाला एकदम चटकाच लावून गेला. क्षणभर धक्काच बसला.. तुम्ही या लेखात मांडलेले सर्व मुद्दे मला पटले.... कारण, दोन महिन्यांपूर्वी माझाही मोटारसायकलवरुन अपघात झाला होता... त्यावेळी माझी काहीच चूक नव्हती. समोरच्या गाडीवाल्याच्या चुकीमुळे माझा अपघात झाला होता. त्यावेळी माझ्या अंगावर दोन मोटारसायकली पडल्या होत्या. रहदारीच्या रस्त्यावर माझ्या मागून येणार्‍या इतर सर्व गाडीवाल्यांनी प्रसंगावधान दाखवत आपापल्या गाड्या क्षणात थांबविल्यामुळे मी अपघातातून बचावलो. तुमच्या या लेखामुळे त्या आठवणी ताज्या केल्या. त्यावेळी मलाही ‘‘मृत्यू’’ समोर दिसत होता. पण....
    सर, आपल्या तब्येतीची काळजी घ्या. आणि हो, औषधं वेळेवर घ्या.... आणि, असेच छान लेख आम्हाला, आपल्या ‘कृषीवल’च्या वाचकांसाठी लिहा. धन्यवाद सर!
    - राकेश (कृषीवल)

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. प्रिय राकेश जी,
      आयुष्यामध्ये असे introspection चे काही प्रसंग येणं फार गरजेचं असतं. त्या परिस्थितीमध्ये आपण आपल्या आयुष्याचं अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि महत्त्वाचं म्हणजे तटस्थ-त्रयस्थपणानं अवलोकन करू शकतो. त्यातून पुढची वाटचाल अधिक सुस्पष्ट आणि सुकर होण्याची चांगली शक्यता निर्माण होत असते. त्यावेळी माझ्या मनात आलेले विचार प्रांजळपणानं मांडले इतकंच. पण आपणासारख्या मित्रांमुळं ही लिहीण्याची ऊर्जा अधिक सक्रिय होते, हे मात्र शंभर टक्के खरंय.
      आपल्या प्रेमळ प्रतिक्रियेबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.

      हटवा
  2. मुळात का वाईट विचार करतो, असे! काळजी घे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. मित्रा, धन्यवाद. पण ते विचार वाईट नव्हते बरं का.. उलट एका गोष्टीची जाणीव झाली की.. येस्स.. आय एम रेडी फॉर दॅट मोमेंट हॅप्पीली..एनी टाइम!

      हटवा