मंगळवार, ३० जुलै, २०१३

निखळ-१४: गुरूजी, तुम्ही होता म्हणून..!

('दै. कृषीवल'मध्ये 'निखळ' या पाक्षिक सदराअंतर्गत सोमवार, दि. २९ जुलै २०१३ रोजी प्रकाशित झालेला लेख...)
नुकतीच गुरूपौर्णिमा झाली. यानिमित्तानं साऱ्यांनीच आपापल्या गुरूंना वंदन करण्याची, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी घेतली. माझ्या आयुष्यातही अशा अनेक मार्गदर्शक गुरूंचं फार मोठं आणि मोलाचं स्थान आहे. त्यातीलच आद्य म्हणता येतील असे एक म्हणजे कागल (जि. कोल्हापूर) इथले ढोले गुरूजी. आजही माझ्या आयुष्यात गुरूजींचं स्थान खूप महत्त्वाचं आहे. गुरूपौर्णिमेनिमित्त त्यांना माझं वंदन...
Dhole Guruji
माणसाच्या आयुष्याला योग्य वळण लागण्यासाठी (माझ्या दृष्टीनं) तीन लोक फार महत्त्वाची भूमिका बजावतात. पहिले आई-वडिल, दुसरे गुरू आणि तिसरे म्हणजे मित्र-मैत्रिणी. (यात बायको नावाचा चौथा लोकही ॲड होतो, पण तो फार पुढे- आणि फारच इन्फ्युएन्शियल!) माझ्या बाबतीत बोलायचं झाल्यास वाह्यातपणाची आणि वाया जाण्याची बरीच लक्षणं माझ्यात होती; पण, वरील तीन घटकांच्या स्वतंत्र आणि कणखर प्रयत्नांच्या सामूहिक परिणामामुळं ही शक्यता बरीचशी निवळली. (अधून-मधून जुनी लक्षणं डोकं वर काढतात, हा भाग वेगळा.)
असाच एक जगावेगळा आणि अपरंपार प्रेम करणारा गुरू माझ्या आयुष्याच्या सुरवातीच्या टप्प्यातच मला लाभला. भूपाल ढोले गुरूजी त्यांचं नाव! सन १९८५मध्ये सांगलीच्या केसीसी प्राथमिक शाळेतून मी कागल (जि. कोल्हापूर) च्या हिंदूराव घाटगे विद्यामंदिरात तिसरीत प्रवेश घेतला. तिसरी-चौथी अशी दोनच वर्षं तिथं होतो. दोन्ही वर्षी ढोले गुरूजी माझे वर्गशिक्षक होते. वर्गाला एकच शिक्षक असल्यानं सगळे विषय तेच शिकवत. विषय सोपा करून, मनोरंजक करून सांगण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. चौथीला त्यांनी मला स्वतःहून शिष्यवृत्ती परीक्षेला बसवलं. शाळा सुटल्यानंतर वर्गात तासभर आणि त्यानंतर संध्याकाळी त्यांच्या घरी तासभर (कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता) असा दररोज ते माझा अभ्यास घेत. अंगणातल्या पेरुच्या झाडावर मी माकडासारखा लोंबकळत असे आणि खाली कट्ट्यावर बसून गुरूजी प्रश्न विचारत. कित्येकदा शाळेतून माझ्या घरी न जाता मी थेट त्यांच्याच घरी जाई तेव्हा काकू पहिल्यांदा मला हात-पाय धुवून नाष्टा, दूध देत असत. गुरूजींच्या त्या अंगणातच माझा मराठी भाषेचा आणि बुद्धिमत्ता चाचणीचा पाया तयार झाला. 
गुरूजींनी आत्मविश्वास तर इतका दिला की, दैनंदिन प्रार्थनेच्या वेळी तिसरीचा हा विद्यार्थी राष्ट्रध्वजाच्या पायरीवर उभा राहून सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना न अडखळता, न चुकता 'भारत माझा देश आहे..' ही प्रतिज्ञा सांगत असे. वक्तृत्व स्पर्धांत, निबंध स्पर्धांतही गुरूजी परस्पर माझं नाव नोंदवत असत आणि आईबाबांच्या बरोबरीनं माझी तयारी करवून घेण्यालाही हातभार लावत असत. एकदा तर सुटीच्या दिवशी मी मित्रांसोबत ग्राऊंडवर खेळत होतो, त्यावेळी आत कुठलीशी सहावी, सातवीच्या गटाची निबंध स्पर्धा सुरू होणार होती. गुरूजींना खिडकीतून मी दिसलो आणि त्यांनी हाक मारली. आत बोलावून थेट स्पर्धेला त्या सर्व 'दादा' लोकांसोबत बसवलं. अर्ध्या तासात निबंध स्पर्धा झाली. पुढच्या तासाभरात निकाल लागला आणि त्या 'दादां'च्या स्पर्धेत पहिला नंबर घेऊन मी घरी परतलो.
चौथीच्या तालुकास्तरीय केंद्र परीक्षेत केवळ एका मार्कानं माझा पहिला क्रमांक हुकला तर माझ्या आईवडिलांइतकंच किंबहुना त्यांच्यापेक्षा अधिक वाईट गुरूजींना वाटलं होतं. त्या निकालानंतर ते साधारण तासभर माझी समजूत घालत होते. त्यावेळी मला फारसं काही वाटलं नाही. पहिल्या नंबराचं ग्लॅमर त्या वयात असण्याचं कारण नव्हतं. पण आज जेव्हा तो प्रसंग अंधूक आठवतो, तेव्हा गुरूजी माझ्याइतकीच स्वतःच्या मनाचीही समजूत घालत होते, असं मला आज जाणवतं. माझ्याबद्दल इतका आत्मविश्वास त्यांच्या मनात असल्याचं ते द्योतक आहे.  
अभ्यासू विद्यार्थी म्हणून गुरूजींचं माझ्यावर प्रेम होतंच. आणि त्या प्रेमाच्या तीव्रतेचाही अनुभव मी घेतला. एकदा वर्गात काही आगाऊपणा केला म्हणून गुरूजींनी हिरव्यागार वेताच्या छडीचा प्रसाद माझ्या हातावर दिला. एकच छडी बसली होती, पण अस्सा काही वळ उठला होता की बस्स! रात्री माझा हात सुजला. आईबाबांना सांगितलं, गुरूजींनी मारलं म्हणून; तर दोघांनीही मलाच माझ्या आगाऊपणाबद्दल रागावलं. पुन्हा तसा वागलास तर गुरूजींना पुन्हा चोप द्यायला सांगू, असंही बजावलं. दुसऱ्या दिवशी ताप भरून मी शाळेत जाऊ शकलो नाही. तिकडं मला जितक्या यातना झाल्या नसतील, त्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त गुरूजींच्या मनाला झाल्या. त्यांनाच अपराधी वाटू लागलं. माझी आई माध्यमिक शिक्षिका तर वडिल प्राध्यापक. त्यांच्या मुलाला आपण मारलं म्हणून त्यांना माझ्यासारख्या प्राथमिक शिक्षकाबद्दल काय वाटलं असेल, असा विचार त्यांच्या मनाला कुरतडत होता. त्यात दुसऱ्या दिवशी मी गैरहजर! त्यामुळं गुरूजींचं टेन्शन अधिकच वाढलं. त्या दिवशी शाळा सुटल्यावर ते तडक माझ्या घरी आले. आईही नुकतीच शाळेतून आलेली. मी अंथरुणातच होतो. गुरूजी माझ्याजवळ बसले, मला कुरवाळलं, तेव्हा त्यांच्या डोळ्यांत पाणी उभं होतं. एवढ्या गुणी पिल्लाला कसं काय बरं मी मारू शकलो?’ असा स्वगत प्रश्न त्यांनी स्वतःलाच विचारला. पण आईनं त्यांना सांगितलं, तुम्ही केलंत, ते योग्यच केलंत. केलेल्या चुकीची शिक्षा ही ज्या-त्या वेळीच झालेली योग्य असते. त्यामुळं अजिबात वाईट वाटून घेऊ नका. तोपर्यंत बाबाही आले, त्यांनीही गुरूजींना, पुन्हा हा असा आगाऊपणानं वागला तर बिनधास्त शिक्षा करा. आम्ही तुम्हाला अजिबात विचारणार नाही, दोष देणार नाही, असं सांगितलं. तिसरीमधला हा प्रसंग मी केव्हाच विसरून गेलो होतो. पण आजही जेव्हा गुरूजींना मी जेव्हा भेटतो, तेव्हा मला मारलेल्या त्या छडीची आठवण होऊन गुरूजी आजही कळवळतात. तेव्हा गुरूजींच्या माझ्यावरील अतीव प्रेमाची जाणीव होऊन मन गहिवरुन येतं.
अलीकडचा एक प्रसंग तर त्याहून हृदयद्रावक. गेल्या वर्षी गुरूजींवर अँजिओप्लास्टी करावी लागली. तेव्हा मी मुंबईत होतो. गुरूजींना जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं जात होतं, नेमक्या त्या क्षणी त्यांनी माझी आठवण काढली. काकूंनी ऑपरेशन झाल्यावर माझ्याशी बोलणं करून देतो, असं सांगितल्यावर मग कुठे ते आत गेले. ऑपरेशननंतर काकूंनी फोन करून मला हा प्रकार सांगितला. पोटची मुलं सोबत असताना त्या क्षणी गुरूजींना माझी आठवण व्हावी, यापेक्षा त्यांच्या माझ्यावरील प्रेमाचा आणखी कोणता मोठा दाखला असू शकतो. त्यानंतर मी गुरूजींशीही बोललो, त्यांना काळजी घ्यायला सांगितलं. आता तर काय, कोल्हापुरात आल्यामुळं निपाणीला येता जाता अधून-मधून कागलमध्ये त्यांना भेटायला जाणं होतं.
माझा माझ्या साऱ्याच गुरूजनांच्या बाबतीत एक प्रॉब्लेम होतो, तो म्हणजे मी इतरांसारख्या त्यांच्याशी अगदी खुलून बोलू शकत नाही. त्यांच्या गुरू असण्याचा एक प्रभाव (दबाव नव्हे!) आपसूकच माझ्यावर असतो. मी त्यांच्यासमोर त्यांचा विद्यार्थीच असतो आणि मग त्यांच्याशी संवादात एक प्रकारची तांत्रिकता येते, असं मला वाटतं. ढोले गुरूजींच्या बाबतीत मात्र ही तांत्रिकता, का कोणास ठाऊक पण कधीच जाणवली नाही. त्यांच्या वात्सल्याचा झरा इतका निर्मळ आणि प्रामाणिक आहे, की अन्य कोणतीही कृत्रिमता निर्माण व्हायला तिथं काही संधीच नाही. नुसतं त्यांच्या शेजारी बसलो आणि त्यांच्या प्रेमाचा हात पाठीवर फिरला तरी त्या आश्वासक संवादाला शब्दांची गरज भासतच नाही. त्यांच्या वयोमानाने क्षीण झालेल्या नजरेतला आपुलकीचा भाव खूप काही सांगून जातो. त्या नजरेत मी तो चौथीतलाच त्यांचा विद्यार्थी असतो आणि माझ्याही मनात ते बाल्य, मनाचं निरागसपण जागृत ठेवण्याचं काम त्यांची ती नजर करते. जमिनीशी नातं न तुटू देता भराऱ्या मारण्याचं बळ त्यातून मिळतं. आज आयुष्यात जेवढंही काही छोटंमोठं यश मिळवता आलं आहे, ते केवळ गुरूजी, तुम्ही होता म्हणूनच शक्य झालं आहे, एवढंच जाहीरपणे सांगावंसं वाटतं.

४ टिप्पण्या: