मंगळवार, १० सप्टेंबर, २०१३

महाराष्ट्राची ‘पुरोगामी’ प्रतिमा बळकट करणारा डॉक्टर!



 ('शेती प्रगती' मासिकाच्या सप्टेंबर २०१३च्या ताज्या अंकात प्रकाशित झालेला माझा लेख...)

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. जिथं विचारांचा सामना विचारांनी करता येणं अशक्य होऊन जातं, तिथं ते विचार मांडणाऱ्या डोक्यालाच उडविण्याची परंपरा (?) आपल्याला नवी नाही. त्यातून त्या तथाकथित शक्तींचं इप्सित साध्य होतं अशातला भाग नाही, परंतु संबंधित चळवळीला करकचून ब्रेक लावण्याचे काम त्यांनी साधलेलं असतं. मग अशा गतिमंद झालेल्या चळवळीवर टप्प्याटप्प्याने आघात करून संपविण्याचे पद्धतशीर प्रयत्न त्यानंतर सुरू होतात.
दाभोळकर सरांच्या हत्येमागे जादूटोणा कायद्याचे विरोधक असावेत, असा कयास सार्वत्रिकरित्या व्यक्त केला जातो आहे. तथापि, जोपर्यंत त्यांचे मारेकरी हाती लागत लागत नाही, तोपर्यंत त्या कयासाला अर्थ नाही. अलीकडेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दाभोळकरांच्या नेतृत्वाखाली हाती घेतलेल्या जात पंचायत विरोधी आंदोलनामुळे अशा दुखावलेल्या, डिवचल्या गेलेल्या प्रवृत्तींचाही त्यामागे हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आणि तत्सम सर्वच शक्याशक्यतांच्या अनुषंगाने पोलीस यंत्रणा तपास करीत असतील, अशी अपेक्षा आपण व्यक्त करू या. दाभोळकरांच्या मारेकऱ्यांना पकडून त्यांच्यासह त्यांच्या हत्येमागे असणाऱ्या तमाम कट-कारस्थान्यांना कडक शासन केले जाईल, अशी अपेक्षा आम्हासारखे सर्वच दाभोळकर चाहते व्यक्त करत आहेत.
दाभोळकर यांच्या मृत्यूमुळे पुरोगामी महाराष्ट्राचे जे नुकसान झाले आहे, ते कधीही भरून न निघणारे आहे. किंबहुना, फुले, शाहू, आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र ही राज्याची प्रतिमा कायम राखण्यामध्ये डॉक्टरांचे योगदान फार मोठे होते. गेल्या ३० वर्षांच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या वाटचालीकडे जेव्हा मी दृष्टीक्षेप टाकतो, तेव्हा त्या कालखंडातून दाभोळकर आणि त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून चालविलेले कार्य वगळले, तर महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला केव्हाच हरताळ फासला गेला असता, असे मला राहून राहून वाटते. कारण देवाधर्माच्या नावाखाली महाराष्ट्रात किंवा शेजारच्या राज्यांत कुठेही सर्वसामान्य, गोरगरीब जनतेचे शोषण, लुबाडणूक सुरू असल्याचे प्रकार सुरू होत, तिथं तिथं दाभोळकर प्रकट होत असत आणि त्या जनतेसमोरच अशा शोषण करणाऱ्या, फसवणाऱ्या बुवाबाजीच्या प्रकारांना उघडे पाडत असत. त्यामुळं तिथल्या लोकांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं की त्या बुवा, बाबाचं प्रस्थ तिथल्यापुरतं संपुष्टात यायचं. मात्र, पुन्हा नव्या ठिकाणी कोणीतरी नवा बाबा उपटलेला असायचा आणि लोक त्याच्याही भजनी लागलेले असायचे की पुन्हा तिथं अंनिसची टीम दाखल व्हायची. अशा पद्धतीनं अखंडितपणे दाभोळकरांनी आणि अंनिसनं पुरोगामी महाराष्ट्रात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपलं काम रेटलं. अंधश्रद्धेचा आणि लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत देवाच्या नावानं मध्यस्थ दलालांनी जो बाजार मांडला, त्या बाजाराला वेळोवेळी चाप लावण्याचं काम दाभोळकरांनी केलं. मात्र, हे करत असताना त्यांनी देवाधर्मावरील श्रद्धेला मात्र कधीही विरोध केला नाही. लोकांच्या श्रद्धांचा गैरफायदा उठवत त्यांची देवाच्या नावानं जी फसवणूक चालायची, शोषण केलं जायचं, त्याला मात्र त्यांनी कसोशीनं आणि सबळ पुराव्यांनिशी विरोध केला. अशा लोकांना थेट आव्हान देत भिडण्याचं साहस डॉक्टरांनी अंनिसच्या प्रत्येक कार्यकर्त्यात निर्माण केलं. त्यामुळं तमाम भक्तगणांसमोरच ज्या बाबाकडून ते नाडले जाताहेत, त्यांना त्याचा मुखवटा फाडून खरा चेहरा दाखवून दिला आणि त्यामुळं अंनिसच्या कार्याला लोकप्रियतेचं अधिष्ठान लाभलं.
डॉक्टरांनी आणखी एक गोष्ट केली ती म्हणजे ज्या ज्या ठिकाणी अंनिसची शाखा सुरू झाली, त्या त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांमध्ये अशा बुवाबाजी करणाऱ्यांना थेट भिडण्याचं धाडस निर्माण केलं, भिडण्याचं स्वातंत्र्य दिलं. त्यातून या कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वासाचं स्फुल्लिंग चेतवलं गेलं आणि म्हणूनच अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ व्यापक प्रमाणात यशस्वी होऊ शकली. असं असतानाही अंनिसनं कधीही अतिरेकी अथवा दुराग्रही भूमिका घेतली नाही, याचं कारण डॉक्टरांच्या संयमी, समंजस आणि सर्वसमावेशक धोरण स्वीकारण्याच्या स्वभावामध्ये होतं, असं मला वाटतं. म्हणून जेव्हा ज्ञानोबा-तुकारामांचा वारसा सांगणाऱ्या वारकऱ्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाला विरोध केला, तेव्हा दाभोळकरांनी दोन पावलं मागं जाणं सुद्धा पसंत केलं, संतांचा पुरोगामी वारसा सांगणाऱ्या वारकऱ्यांचं नेतृत्व त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून वार करणाऱ्यांनी हायजॅक केलं आहे, याची जाणीव असून सुद्धा. व्यापक समाजभावनेची दखल घेण्याचा हा डॉक्टरांचा स्वभावविशेषही वेगळाच म्हणायला हवा. पण, त्यांनी माघार घेतली असं मात्र नव्हे; गांधीजींच्या मार्गानं त्यांनी आपला विधेयकासाठीचा सत्याग्रह सुरूच ठेवला, त्यासाठी गांधीजींसारखाच हौतात्म्याचा मार्गही पत्करला. डॉक्टरांच्या या बलिदानानंतर १८ वर्षे रखडलेले विधेयक त्यांच्या मृत्यूनंतरच्या १८ तासांच्या आत मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आणि १८ दिवसांच्या आतच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, २०१३ चा वटहुकूम मा. राज्यपालांनी जारी केला. या वटहुकुमाचे येत्या हिंवाळी अधिवेशनात कायद्यात अधिकृत रुपांतर होण्याच्या दृष्टीने राज्यातल्या सर्वच लोकप्रतिनिधींनी त्याला पाठिंबा देऊन डॉ. दाभोळकरांना खरी श्रद्धांजली अर्पण करावी, अशी भावना व्यक्त करावीशी वाटते. त्या योगे देशाला आणखी एक नवा कायदा देणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची पुरोगामी प्रतिमा पुन्हा झळाळून उठेल. आज ना उद्या, केंद्र सरकारलाही देशाला एकविसाव्या शतकातील माहिती तंत्रज्ञान युगात अधिक सक्षम वाटचाल करण्यासाठी या कायद्याचा अंगिकार करून देशाच्या प्रगतीत कोलदांडा घालणाऱ्यांना प्रतिगामी शक्तींना चाप घालावाच लागणार आहे.
----
काय आहे महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, २०१३मध्ये?
उपरोक्त अधिनियमानुसार खालील १२ कलमांनुसार अघोरी, जादूटोणा प्रकारांचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष समर्थन, चालना, सहाय्य, अपप्रेरणा, सहभाग किंवा सहकार्य तसेच प्रचालन, जाहिरात, प्रचार किंवा आचरण करण्यास वा करायला भाग पाडण्यास प्रतिबंध करण्यात आला असून, तसे आढळल्यास संबंधित व्यक्तीला सहा महिन्यांपासून सात वर्षांपर्यंत कारावास आणि पाच हजार रुपये ते ५० हजार रुपयांपर्यंतच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. हे अपराध दखलपात्र व अजामीनपात्र ठरविण्यात आले आहेत.
या विधेयकातील अनुसूचीत देण्यात आलेली १२ कलमे अशी:
१)      भूत उतरविण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीला, दोराने किंवा साखळीने बांधून ठेवून तिला मारहाण करणे, काठीने किंवा चाबकाने मारणे, तिला पादत्राणे भिजवलेले पाणी प्यायला लावणे, मिरचीची धुरी देणे, त्या व्यक्तीला छताला टांगणे, त्याला दोरानो किंवा केसांनी बांधणे किंवा त्या व्यक्तीचे केस उपटणे, व्यक्तीच्या शरीरावर किंवा अवयवांवर तापलेल्या वस्तूंचे चटके देऊन इजा पोहचविणे, व्यक्तीला उघड्यावर लैंगिक कृत्य करण्याची जबरदस्ती करणे, व्यक्तीवर अमानुष कृत्य करणे, व्यक्तीच्या तोंडात जबरदस्तीने मूत्र किंवा विष्ठा घालणे किंवा यांसारख्या कोणत्याही कृती करणे.
२)      एखाद्या व्यक्तीने तथाकथित चमत्कारांचा प्रयोग प्रदर्शित करुन, त्याद्वारे आर्थिक प्राप्ती करणे; आणि अशा तथाकथित चमत्कारांचा प्रचार व प्रसार करून लोकांना फसविणे, ठकविणे आणि त्यांच्यावर दहशत बसविणे.
३)      अलौकिक शक्तीची कृपा मिळविण्याच्या हेतूने, ज्यामुळे जीवाला धोका निर्माण होतो किंवा शरीराला जीवघेण्या जखमा होतात, अशा अमानुष. अनिष्ट व अघोरी प्रथांचा अवलंब करणे; आणि अशा प्रथांचा अवलंब करण्यास इतरांना प्रवृत्त करणे, उत्तेजन देणे किंवा सक्ती करणे.
४)      मौल्यवान वस्तू, गुप्तधन आणि जलस्रोत यांचा शोध घेण्याच्या बहाण्याने वा तत्सम कारणाने करणी, भानामती या नावाने कोणतेही अमानुष, अनिष्ट व अघोरी कृत्य आणि जादूटोणा करणे, आणि जरणमारण यांच्या नावाने व त्यासारख्या अन्य कारणाने नरबळी देणे किंवा देण्याचा प्रयत्न करणे किंवा अशी अमानुष कृत्ये करण्याचा सल्ला देणे किंवा त्याकरिता प्रवृत्त करणे अथवा प्रोत्साहन देणे.
५)      आपल्या अंगात अतिंद्रिय शक्ती असल्याचे भासवून अथवा एखाद्या व्यक्तीत अतिंद्रिय शक्ती संचारली असल्याचा आभास निर्माण करून इतरांच्या मनात भिती निर्माण करणे किंवा त्या व्यक्तीचे सांगणे न ऐकल्यास वाईट परिणाम होतील, अशी इतरांना धमकी देणे, फसवणे व ठकवणे.
६)      एखादी विशिष्ट व्यक्ती करणी करते, जादूटोणा करते किंवा भूत लावते किंवा मंत्रतंत्राने जनावरांचे दूध आटवते, असे सांगून त्या व्यक्तीबाबत तसा संशय निर्माण करणे, किंवा त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती अपशकुनी आहे किंवा रोगराई पसरण्यास कारणीभूत ठरणारी आहे, असे भासविणे, अशा व्यक्तीचे जगणे मुश्कील करणे, त्रासदायक करणे वा कठीण करणे; एखादी व्यक्ती सैतान असल्याचे किंवा ती सैतानाचा अवतार असल्याचे जाहीर करणे.
७)      जारणमारण, करणी किंवा चेटूक केल्याच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीला मारहाण करणे, तिची नग्नावस्थेत धिंड काढणे, किंवा तिच्या रोजच्या व्यवहारांवर बंदी घालणे.
८)      मंत्राच्या सहाय्याने भूत पिशाच्चांना आवाहन करून, किंवा भूत पिशाच्चांना आवाहन करीन, अशी धमकी देऊन सर्वसामान्य जनतेच्या मनात घबराट निर्माण करणे, एखाद्या व्यक्तीला शारिरीक इजा होण्यास भुताचा किंवा अतिंद्रिय शक्तीचा कोप असल्याचा समज करून देणे आणि तिला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून, त्याऐवजी तिला अमानुष, अनिष्ट अघोरी कृत्य वा उपाय करण्यास प्रवृत्त करणे, जादूटोणा अथवा अमानुष कृत्ये करून किंवा तसा आभास निर्माण करून एखाद्या व्यक्तीला मृत्यूची भीती घालणे, शारिरीक वेदना करण्याची किंवा तिचे आर्थिक नुकसान करण्याची धमकी देणे.
९)      कुत्रा, साप किंवा विंचू चावल्यास एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून, त्याऐवजी मंत्रतंत्र, गंडेदोरे किंवा यांसारखे उपचार करणे.
१०)  बोटाने शस्त्रक्रिया करून दाखवितो, असा दावा करणे किंवा गर्भवती स्त्रीच्या गर्भाचे लिंग बदल करून दाखवितो, असा दावा करणे.
११)   (क) स्वतःत विशेष अलौकिक शक्ती असल्याचे अथवा कुणाचा तरी अवतार असल्याचे वा स्वतःच पवित्र आत्मा असल्याचे भासवून किंवा त्याच्या नादी लागलेल्या व्यक्तीस पूर्वजन्मी तू माझी पत्नी, पती वा प्रेयसी, प्रियकर होता, असे सांगून, अशा व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवणे;
(ख) मूल न होणाऱ्या स्त्रीला अलौकिक शक्तीद्वारा मूल होण्याचे आश्वासन देऊन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवणे.
१२) एखाद्या मानसिक विकलांग व्यक्तीमध्ये अलौकिक शक्ती असल्याचे भासवून त्या व्यक्तीचा वापर धंदा व व्यवसाय यांसाठी करणे.

२ टिप्पण्या:

  1. खरं म्हणजे फार मोठा माणूस आपण गमावला आहे. त्या माणसासाठी रस्त्यावर असंख्य लोक उतरले. यातल्या अर्ध्या लोकांनी जरी त्यांचे विचार अंमलात आणले तर बरंच परिवर्तन घडू शकतं.

    उत्तर द्याहटवा
  2. खरं आहे मित्रा म्हणणं तुझं.. पण.. आम्ही एक वेळ रस्त्यावर उतरू, विचारांचं पाहू पुढच्या पुढे... अशीच आपली मानसिकता आहे. ती सहजी बदलणं शक्य आहे का?

    उत्तर द्याहटवा