बुधवार, १८ डिसेंबर, २०१३

निखळ-24: खुर्ची डोक्यात शिरते तेव्हा..!



­­­­

काही दिवसांपूर्वीचा प्रसंग.. आमच्या घरी एक निवृत्त वरिष्ठ शासकीय अधिकारी त्यांच्या पत्नी-मुलांसह आले होते.. ते माझ्या वडिलांचे बालमित्र.. त्यांची मैत्री तेव्हापासून अगदी आजतागायत कायम.. त्यांच्याशी गप्पा मारताना मी आणि बाबा सोफ्यावर शेजारी-शेजारी बसलो होतो आणि बोलताना आमच्या दोघांमध्ये नेहमीप्रमाणं वाद-संवाद सुरू होता.. इतक्यात माझा धाकटा भाऊ बाहेरून कोठून तरी आला आणि सवयीनं लाडानं वडिलांच्या गळ्यात पडला.. आमच्यासाठी त्यात वेगळं अन् नवीन असं काही नव्हतं. पण, त्या काकांना मात्र त्याचं खूप अप्रूप (किंवा वैषम्य सुद्धा म्हणू शकता!) वाटलं. ते वडलांना म्हणाले, 'अरे, तुम्हा तिघांचं बाँडिंग पाहून मला खूप हेवा वाटतोय.. माझी मुलं अखंड आयुष्यात अशी माझ्यासोबत कधीच बसून बोलली नाहीत. मी ऑफिसातून घरी आलो तर ती एक तर त्यांच्या खोलीत निघून जात किंवा काही कारण काढून बाहेर तरी जात. आताही आमचं एकमेकांशी केवळ औपचारिक वागणं-बोलणं सुरू असतं.' यावर त्यांना जवळून ओळखणारे माझे बाबा म्हणाले, 'तू जसा सरकारी नोकरीत लागलास, अगदी तेव्हापासून तू जो 'साहेब' झालास, तो अगदी आता रिटायर्ड झाल्यानंतर सुद्धा 'साहेब' राहिलायस. मुलं जेव्हा कधी त्यांच्या वडलांकडं म्हणून तुझ्याकडं येत असतील आणि तू त्यांच्याशी 'साहेब' म्हणूनच वागत असशील, तर ही पडलेली दरी स्वाभाविकच आहे आणि त्याला तूच जबाबदार आहेस. घरात वहिनी सुद्धा तुला 'साहेब' म्हणून बोलावतात, तिथं मुलांची काय गोष्ट घेऊन बसलास?'
हा विषय आम्ही तिथं थांबवला. मात्र, माझ्या डोक्यातून काही केल्या जाईना. आपण एक माणूस म्हणून आपलं आस्तित्व का राखू शकत नाही? आपल्याला ते सिद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या पदनामावल्यांची गरज का भासते, या प्रश्नाचं उत्तर सहजगत्या देता येण्यासारखं नाहीय. शासन यंत्रणा असो किंवा कोणतंही कॉर्पोरेट ऑफिस, त्या ठिकाणी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी ही कोणत्या दर्जाची आणि कोणत्या महत्त्वाची आहे, यावरुन त्या-त्या पदनामावल्या निश्चित केलेल्या असतात. श्रमविभागणी लक्षात येण्यासाठी केलेली ती योजना आहे. संबंधित काम मार्गी लावण्यासाठी आपल्याला ते पद आणि खुर्ची दिलेली असते. त्या कामापुरतं, त्या आस्थापनेपुरतं ते पद आणि ती खुर्ची मर्यादित असते, असावी, याचं भान राहिलं नाही की मग आमच्या त्या काकांसारखी लोकं गल्लत करू लागतात. ऑफिसातली खुर्ची आणि पद, हे जिथं आहे, तिथं सोडून आपण इतर जगात वावरु शकलो, तर असे कित्येक प्रश्न आहेत, की जे निर्माणच होणार नाहीत. मोटारींवर लाल दिवे वापरण्याचा प्रश्न त्यातलाच. सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा अशा कित्येक प्रकरणांत हस्तक्षेप करावा लागतो, यासारखं दुर्दैव नाही.
याचं मूळ कारण एकच आहे ते म्हणजे आपल्या ऑफिसातली खुर्ची ही आपल्या डोक्यात शिरते.. आणि एकदा ती डोक्यात शिरली की तिथून फारच क्वचित ती बाहेर पडते. मग, आपली सारी धडपड ही स्वतःच्या आस्तित्वासाठी नाही, तर त्या खुर्चीच्या आस्तित्वासाठी सुरू राहते. हे खूप वाईट आहे. बरं, ही गोष्ट केवळ राजकीय नेते, अधिकारी यांनाच लागू होते, असं नाही. आमच्या पत्रकारितेसारख्या अभ्यासक्रमाला ॲडमिशन घेतल्याच्या पहिल्या दिवसापासून ती हवा अशी काही डोक्यात शिरते की, जणू काही त्या क्षणापासून सर्वज्ञ झाल्याचा साक्षात्कार विद्यार्थ्यांना होतो आणि कॅम्पसभर ते त्याच आविर्भावात वावरू लागतात.
शिक्षक किंवा प्राध्यापक झाल्यानंतर सुद्धा संबंधिताची काही फारशी वेगळी गत नसते, तिथंही सर्वज्ञतेचा आविर्भाव असतोच. मग आपली प्रतिमा विद्यार्थ्यांवर लादण्याचा प्रयत्न सुरू होतो. आपण गुरू होण्याचा प्रयत्न करता स्वतःवर देवत्व लादून घेतो आहोत आणि ते झेपणारं आहे, इतकी पुसटशीही जाणीव मनाला होऊ नये, म्हणजे काय? 'विद्या विनयेन् शोभते' खरी, तथापि, अशा लोकांच्या बाबतीत मात्र त्या विनयाची जागा अहंकारानं घेतलेली असते आणि त्यालाच ते अलंकाराप्रमाणं आपल्यासोबत सर्वत्र मिरवत बसतात, हे त्याहून मोठं दुर्दैव!
विद्यार्थी, शिक्षक या दोन गोष्टी आपल्या सामाजिक जीवनात खूप मूलभूत आणि महत्त्वाच्या असतात, म्हणून उदाहरणादाखल घेतली. मात्र अन्य क्षेत्रांमध्येही कमी-अधिक प्रमाणात हे असं खुर्ची डोक्यात शिरणं असतंच. एखादं पद आपल्याला मिळालं की ते मिळाल्याचा किंवा मिळवल्याचा आनंद होणं स्वाभाविक आहे. तो झालाच पाहिजे. पण तेच एकमेव सर्वस्व मानून जीवनातल्या इतर आनंदांना, आपल्याला साथ देणाऱ्या कुटुंबियांना त्याच्या तुलनेत तुच्छ मानणं हे चुकीचं आहे. जिथं जाऊ तिथं ते पद बरोबर घेऊन फिरणं बरोबर नाही. आणि आपल्या अगदी जवळच्या माणसांवर ते लादणं, मिरवणं हा तर मला शुद्ध मूर्खपणाच वाटतो. आपला माणूस कोण आहे, कुठल्या पदावर आहे, याची जाणीव घरच्यांना असतेच. त्याचा मान-सन्मान सांभाळण्यासाठी तेही कसोशीनं प्रयत्न करीत असतातच. पण, आपण त्यांच्याशीही त्याच अहंमन्यतेनं वागणं आपल्याला शोभादायक नाही, हे या लोकांच्या लक्षात येत नाही. ज्या आईबापाच्या अंगाखांद्यावर खेळलो, त्यांच्यावरच आपल्या पदाचा रुबाब मारणाऱ्याला काय म्हणावं? ज्या बायको-मुलांसाठी म्हणून तुम्ही सारं करताय, त्यांच्याशी दोन शब्द प्रेमानं बोलू शकत नसाल, तुमच्या खुर्चीमुळं जर आयुष्यभरात त्यांच्याशी संवादही प्रस्थापित करण्यात तुम्हाला यश येत नसेल, तर त्या खुर्चीला आणि पदाला अर्थ काय?
ज्या व्यक्ती खरोखरीच आपल्या कर्तृत्वानं मोठ्या झाल्या आहेत, त्यांच्या ठायी असा अनाठायी मोठेपणा आपणाला औषधालाही सापडणार नाही. उलट त्यांच्या मोठेपणामुळं त्यांच्यावर पडलेल्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्यानं वाकून जाता विनम्रतेनं त्यांची उंची अधिकच वाढलेली आपल्याला दिसून येते. ते अधिक महनीय, वंदनीय बनतात. याउलट कर्तृत्व अथवा पात्रता नसताना एखादं पद मिळालं की त्याचा परिणाम अगदी उलट झाल्याचं आपल्याला पाह्यला मिळतं. त्यातून निर्माण झालेल्या अहंकारामध्ये त्यांच्यातला 'माणूस' हळूहळू भस्मसात होत जातो आणि मागं उरते ती केवळ खुर्ची.. ज्यावर आता अन्य कोणी दुसराच बसलेला असतो..!

४ टिप्पण्या:

  1. अनेक मित्रांनाही साहेब होताना आपण पाहिलंय. आता आणखी एक मित्र साहेब झालाय म्हणे.

    उत्तर द्याहटवा