गुरुवार, ५ डिसेंबर, २०१३

निखळ-23:वेड्यांचे संस्कारमित्र हो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात अगदी सुरवातीच्या म्हणजे लहानपणीच्या काळात भेटलेल्या किंवा पाहिलेल्या, खूप वर्षं झाली तरीही स्मृतींच्या खणात कुठं तरी खोलवर स्थान करून राहिलेल्या दोन वेड्यांची गोष्ट सांगणार आहे. हो, ते दोघे वेडे होते, ते तमाम जगात प्रचलित असलेल्या वेडेपणाच्या व्याख्येनुसार. म्हणून मीही त्यांना वेडा समजायचो. पण, आज जेव्हा कधी त्यांचा विचार मनात येतो, तेव्हा खरे वेडे कोण, असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहात नाही.
मी बालवाडीत होतो. कागलमध्ये सोमवार पेठेतल्या कागले वाड्यात आम्ही भाड्यानं राहायचो. वाड्याच्या पायरीवर दररोज संध्याकाळी एक माणूस पुस्तक घेऊन वाचत बसायचा ते थेट अगदी काळोखून येईपर्यंत. त्याठिकाणी बसण्याचं त्याचं प्रयोजन असं असायचं की त्या पायरीवर शेजारच्या विजेच्या खांबाचा प्रकाशही चांगला यायचा. त्यामुळं कधी वाटलं तर तसंच रात्री उशीरापर्यंतही त्याला वाचता येऊ शकायचं. पेहराव म्हणाल, तर तुम्ही संगीतकार .पी. नय्यर यांना पाहिलं असेल. सेम तसा कोट आणि हॅट. पण, ओपींकडंचा टापटीपपणा त्याच्याकडं असण्याचं कारण नव्हतं. विटलेला कोट, हॅट, विजार कधीतरी दोनेक महिन्यांतून स्वच्छ केलेलं दिसायचं. पण, त्याचं पेहरावाकडंही फारसं लक्ष नव्हतंच. एक गोष्ट मात्र माझ्या लक्षात यायची की, दर दोन-तीन दिवसांनी त्याच्या हातातलं पुस्तक मात्र वेगळं असायचं. स्थानिक लायब्ररीचा सभासद असावा बहुधा. इंग्रजी पुस्तकंही खूपदा असायची. कधी कधी मला ते रस्त्यानं चालत जाताना दिसायचे. हातात पुस्तक असायचं आणि तोंडानं पुटपुटणं सुरू असायचं. कधी वाड्याच्या पायरीवर बसल्या बसल्याही ते पुटपुटायचे. त्याकाळी मला अगम्य असणाऱ्या इंग्रजी भाषेतही ते सुरू असायचं. मला गंमत वाटायची. लोकही त्यांच्याकडं वेडा म्हणूनच पाह्यचे. पण, हा वाचनवेडा स्वतःच्या आणि पुस्तकांच्या विश्वातच खूप दंग असायचा. इतर काही काम करताना ते कधी दिसले नाहीत. नाही म्हणायला, उन्हाळ्याच्या दिवसात भर दुपारच्या उन्हातही शेजारच्या गैबीत चिंचेच्या गाढ सावलीतही त्यांचा वाचनक्रम सुरू असायचा. आम्ही पलीकडं खेळत असायचो. कधी त्यांच्याशी काही बोलण्याचा प्रसंग आला नाही. पण, या व्यक्तीबद्दल माझ्या मनात खूप कुतूहल निर्माण झालेलं होतं. एकदा घरात त्यांच्याबद्दल विचारायचाही प्रयत्न केला. तेव्हा आई नुसती चुकचुकली आणि बाबांनी 'तुला आत्ताच काही कळणार नाही,' असं सांगून गप्प केलं होतं. त्यानंतर मी त्याच्याविषयी कधी कुणाला विचारलं नाही, पण मनात एक सहानुभूतीची भावना कायम घर करून राहिली. कदाचित काही फॅमिली ट्रॅजिडी असेल, माहीत नाही. पण, त्यातून केवळ वाचनामध्येच आपलं मन रमवू पाहणारा तो 'वाचनवेडा' माझ्या कायम स्मरणात राहिला. लहानपणी मलाही वाचनाचं खूप वेड होतं, तेव्हा माझी आजी गंमतीनं मला 'लई वाचत जाऊ नको बाबा, त्या कोटवाल्यासारखा हुशील,' म्हणून सावध करायची. पण, मला त्या गोष्टीची कधी भिती वाटली नाही कारण वाचन हा त्याच्या जीवनाचा आधार आहे, याची जाणीव तेव्हाच कुठंतरी मनात निर्माण झाली होती आणि आपल्याला गरज पडली तर वाचनाचाच आधार असेल, असंच तेव्हा कुठंतरी वाटून गेलं होतं. आज तो वेडा कदाचित हयात नसण्याचीच शक्यता जास्त आहे. त्यानं त्याच्या वाचनानं जगाला काय दिलं, याची चिंता आपण करण्याचं कारण नाही, पण वाचनानं मात्र त्याचं उर्वरित संपूर्ण आयुष्य सुकर होण्यास मदत केली, हे नाकारता येणार नाही.
माझ्या आयुष्यातला दुसरा वेडा हा त्याच काळात माझ्या पाहण्यात आलेला. वाचनवेड्याचं नाव मला आजतागायत माहीत नाही; मात्र, या दुसऱ्या वेड्याचं नाव 'महादू' होतं. हा महादू म्हणजे आज आपण ज्या मुलांना मतिमंद किंवा गतिमंद म्हणतो, तसा होता. आज या मुलांविषयी समाजात थोडी तरी जाणीव जागृती आहे, सहानुभूती आहे. तेव्हाही होती, पण आजच्या इतकी नव्हती. महादूचं घर आमच्या पलिकडच्या गल्लीत होतं. लौकिकार्थानं सातवीच्या मुलाइतकं त्याचं वय असलं तरी मेंदू पहिलीच्या मुलाइतकाच विकसित होता. महादूचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला लहान मुलं जाम आवडायची. एकदा आमच्या घराचं दार उघडं होतं. माझा सहा-आठ महिन्यांचा भाऊ पाळण्यात झोपलेला होता. महादू घरात आला आणि त्या बाळाला घेऊन जाऊ लागला. तेव्हा मी रडून प्रचंड अकांडतांडव केला होता. महादूच्या आईनं येऊन कसंबसं बाळाला त्याच्या हातून घेतलं आणि आमच्या आजीच्या स्वाधीन केलं. आणि आमच्या दारापासून ते त्यांच्या घरापर्यंत हिरव्या फोकानं तिनं महादूला असा बेदम चोपला होता की आजही ते दृष्य माझ्या डोळ्यांसमोर जसंच्या तसं उभं राहातं आणि महादूविषयी नकळत सहानुभूती वाटू लागते. त्याची आई बिचारी त्याला खूप नेटनेटका ठेवायची. दररोज स्वच्छ पांढरा शर्ट आणि खाकी हाफ चड्डी घातलेला, चांगलं तेल लावून छान भांग पाडलेला आणि नाम ओढलेला महादू प्रसन्न वाटायचा. दिवसभर भूक लागेपर्यंत तो त्याला वाटेल तिथं भटकायचा. दुपारी भूक लागली की त्याला आईची आठवण यायची नि तो घरी परतायचा. खूष असला की, काही तरी गाणं म्हणत, बडबडत तो रस्त्यानं फिरायचा. महादूची खूप भीती माझ्या मनात बसलेली होती. त्याचा आवाज आला म्हटलं की, मी घराचे दरवाजे लावून घ्यायचो आणि आमच्या बाळाच्या जवळच बसायचो, महादूचा आवाज खूप दूरवर जाईपर्यंत.
महादूनंही तसं मुद्दामहून कधी कुणाला त्रास दिला नाही. तो निरागस होता, त्याला त्याच्यासारखी निरागस, निष्पाप मुलं आवडायची. हा काही त्याचा दोष नव्हताच. पण, त्यापायी त्यानं कितीवेळा आईचा मार खाल्ला असेल, तोच जाणे. त्या माऊलीच्या जीवालाही आपल्या पोटच्या गोळ्याला मारताना किती यातना होत असतील, याची कल्पनाच करवत नाही. आई मारत असताना तिचं त्याच्यावरचं ओरडणं आणि महादूचं गयावया करणं, आजही मला अधूनमधून आठवतं. त्या आठवणीनं कासावीस व्हायला होतं. ज्याला मी आणि माझ्यासारख्या अनेकांनी महादूला वेडा ठरवलं होतं, ते सारेच निरागसपणाच्या बाबतीत त्याच्या पासंगालाही पुरणार नव्हतो. कागल सुटल्यानंतर महादूही पुन्हा कधी दिसला नाही, केवळ आठवत राहिला.
या दोन वेड्यांनी मात्र आयुष्य सरळसोट जगण्याचे संस्कार त्यांच्याही नकळत माझ्यावर केले. सरळमार्गीपणा, निरागसपणा आणि वाचनाचे ते संस्कार होते. निरागसपणा किती उरलाय, याविषयी मी स्वतःबद्दल साशंक आहे, मात्र लोकांशी जास्तीत जास्त चांगली वर्तणूक करण्याचा प्रयत्न करायला मी महादूकडूनच शिकलो, हे कबूल करावंच लागेल.

1 टिप्पणी: