शुक्रवार, ९ मे, २०१४

पांडुरंग पाटील यांचे अकाली जाणे धक्कादायक



(विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांचे जनसंपर्क अधिकारी आणि माझे एक वरिष्ठ सहकारी मित्र पांडुरंग पाटील यांचं मंगळवार, दि. ६ मे २०१४ रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं अकाली निधन झालं. हा खूप मोठा धक्का आहे. त्यांच्याविषयीच्या माझ्या भावना आपणा सर्वांसोबत शेअर करीत आहे. - आलोक जत्राटकर)
 
Pandurang Patil
विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांचे जनसंपर्क अधिकारी पांडुरंग पाटील यांचं अचानक जाणं मनाला चटका लावणारं आहे. एक सहृदयी, हसतमुख आणि सदैव मदतीसाठी तत्पर असणारा कर्तव्यदक्ष अधिकारी आणि त्याहून एक चांगला माणूस म्हणून ज्या पांडुरंग पाटलांचा विधान भवन परिसरात लौकिक होता, त्यांना मॉर्निंग वॉकनंतर इतका तीव्र हृदयविकाराचा झटका यावा आणि उपचारांची थोडीही संधी न देता त्यांचे निधन व्हावे, ही खूप क्लेशदायक घटना आहे.
मंत्रालयात सहायक संचालक म्हणून रुजू झालो, तेव्हा आम्हा काही अधिकाऱ्यांना आमचे लाडके शिवाजी सोंडुलकर आणि आकाश जगधने हे आम्हाला पांडुरंग पाटील यांना भेटायला म्हणून घेऊन गेले. त्या बॅचमध्ये पश्चिम महाराष्ट्रातले आम्ही तिघे जण असल्याचे पाहून पांडुरंग पाटलांना झालेला आनंद आठवतोय आज. आपल्या भागातली मुलं बाहेर पडायला तयार नसतात, तुम्ही इथं आलात, याचा अभिमान आहे, अशा शब्दांत त्यांनी भावना मांडल्या होत्या. त्याचप्रमाणं सभापतींची वेळ घेऊन त्यांनी देशमुख साहेबांची आणि आमची भेटही घडवून आणली होती. आपल्या भागातली मुलं आहेत, असं सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहात होता. कुठलीही, काहीही अडचण आली तरी अगदी बिनधास्तपणे माझ्याकडं यायचं. काहीही काम असलं तरी बिनदिक्कतपणे सांगायचं, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं आणि या शब्दाला ते जागतही राहिले कारण आम्ही अगदी आमच्या रेल्वे रिझर्वेशनच्या फॉर्मपासून अनेक छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्यांच्याकडं जात राहिलो आणि ते सुद्धा अगदी प्रेमळपणाने मदत करत राहिले.
पांडुरंग पाटलांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या वागण्या-बोलण्यात अजिबात अभिनिवेश नसे. वागणं-बोलणं एकदम मनमोकळं आणि आपुलकीचं! कितीही कामात असले आणि तुम्ही त्यांच्याकडं गेलात तर त्यांचा चेहरा त्रासिक झालाय, असं कधीही घडत नसे. हातातलं काम बाजूला ठेवून आणि महत्त्वाचं असेल, तर तसं सांगून ते आलेल्याला वेळ देणार म्हणजे देणारच! विधान भवनात गेल्यानंतर तीन व्यक्तींची मी हमखास भेट घ्यायचो- एक म्हणजे पांडुरंग पाटील, दुसरे विधानभवनाचे जनसंपर्क अधिकारी नीलेश मदाने आणि तिसरे म्हणजे ग्रंथपाल बा.बा. वाघमारे! या सर्वांशी अनोखं मैत्र जुळलं गेलं. पांडुरंग पाटील साहेबांशी तर जरा जास्तच. याचं श्रेय आमच्यापेक्षा त्यांना जास्त होतं. कारण त्यांचा स्वभावच इतका मोकळा होता की, सिनिअर-ज्युनिअरच्या किंवा वयाच्या भिंती त्यांच्यासोबत असताना कधी विरघळल्या गेल्या, याचा पत्ताच लागला नाही.
नागपूरच्या हिंवाळी अधिवेशनादरम्यान कितीही व्यग्र असले तरी मुंबईपेक्षा एकमेकांशी सुसंवाद अधिक वाढवण्याचा तो कालखंड असे. त्यातही नागपूर विभागाचे माजी माहिती संचालक भि.म. कौशल साहेबांच्या वार्षिक स्नेहभोजनामध्ये तर हा सुसंवादाचा सोहळा अधिकच वृद्धिंगत होत असे. त्याठिकाणी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे आम्ही सारे अधिकारी-कर्मचारी सहभोजनाचा आस्वाद तर घ्यायचोच, पण त्यापेक्षाही कार्यालयापलिकडलं व्यक्तिमत्त्व त्याठिकाणी माहिती व्हायचं. अनफॉर्मल बातचीत व्हायची. जाता जाता शासनातले, शासनाबाहेरचे अपडेट्स मिळायचे.. असे एक ना अनेक लाभ तिथंत असतं. त्याठिकाणी पाटील साहेबांचं आणि माझं दरवर्षी, न चुकता बऱ्याच विषयांवर बोलणं व्हायचं. त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेकविध पैलू आपसूक समजायचे. विशेषतः प्रत्येक गोष्टीकडं पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन सकारात्मक आणि मानवतावादी असे. शिवाजीराव देशमुख यांच्याविषयीचा आदर त्यांच्या बोलण्यातून डोकावायचा. देशमुख साहेबांच्या सामाजिक जाणिवेचा आणि नागरिकांच्या प्रश्नांकडे सकारात्मक, सहानुभूतीच्या दृष्टीने पाहण्याचा अभिमान त्यांच्या बोलण्यात येत असे. त्यांच्या प्रकृतीविषयीही ते चिंतेत असत. अशा नेत्यांची वानवा राज्यात हळूहळू निर्माण होत चालल्याची खंतही डोकावत असे. पण, आपण शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपापलं काम चांगलं केलं, तर अंतिम फलनिष्पत्ती चांगलीच होईल, असा विश्वासही त्यांच्या मनी असे. विधानभवनातील शोकसभेत पांडुरंग पाटील यांच्या निधनाने माझ्या व्यक्तिगत जीवनात खूप मोठी हानी झाली आहे, हे शिवाजीराव देशमुखांचे उद्गार बरंच काही सांगून जातात.
पाटील साहेबांच्या अशा एक ना अनेक आठवणी मनात उसळताहेत. त्यांच्या निधनाचा धक्का हा आम्हा सहकाऱ्यांबरोबरच पत्रकार बंधू-भगिनींनाही सहज पचवता येण्यासारखा नाही. पण, एक मात्र खरं, की विधानभवनातला सभापती दालनाशी जोडणारा एक दुवा जसा त्यांच्या जाण्यानं हरपला आहे, तसंच विधान भवनातला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा पूलसुद्धा पांडुरंग पाटील यांच्या जाण्यानं कोसळला आहे. माझ्या या प्रेमळ सहकाऱ्याला माझी अगदी मनापासून श्रद्धांजली!

२ टिप्पण्या: