बुधवार, ७ मे, २०१४

महान्यूज आणि मी!

(माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम असलेल्या 'महान्यूज' या वेबपोर्टलला नुकताच उत्कृष्ट ई-प्रशासनासाठीचा सुवर्ण पुरस्कार मिळाला. या निमित्ताने दि. ५ मे २०१४ रोजी 'महान्यूज' वेबपोर्टलवर प्रकाशित झालेला माझा लेख ब्लॉग वाचक मित्रांसाठी शेअर करीत आहे.- आलोक जत्राटकर)
 
'महान्यूज आणि मी' या विषयावर लेख देण्यासंदर्भात काल महान्यूज शाखेतून  फोन आला आणि त्यानंतर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या एका ध्यासपर्वाच्या स्मृतींनी माझ्या मनाचा ताबा घेतला. 'महान्यूज' या वेब पोर्टलची निर्मिती ही जितकी महत्त्वाकांक्षी योजना होती, तितकीच ती निर्मिती प्रक्रिया खूप जिकीरीची आणि तरी सुद्धा एक समृद्ध अनुभव देणारी होती. साधारण सहा-एक महिन्यांचा तो कालखंड खूप भारावलेपणाचा होता. आमच्या कार्यक्षमतेची परीक्षा आणि कामाचा कस पाहणारा असा होता. आम्हा शासकीय अधिकाऱ्यांना अतिशय प्रोफेशनली काम करण्याची संधी आणि स्वातंत्र्य देऊन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची कॉर्पोरेट प्रतिमा इस्टॅब्लिश करण्यात 'महान्यूज'चा अतिशय मोठा वाटा आहे. महाराष्ट्र शासनातील घडामोडींची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून राज्यातील वृत्तपत्रांसाठी अधिकृत आणि अपडेट शासकीय माहितीचा खजिना खुला करण्याचं काम महान्यूजनं केलं. त्याचबरोबर राज्यातील नागरिकांना हवी असणारी अनेक योजनांची माहिती त्यांना मिळू लागली आणि देशातील व जगभरातील मराठी बांधवांना महाराष्ट्र शासनाच्या लोकहितैषि उपक्रमांची माहिती देऊन त्यांना शासनाशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा महान्यूज बनलं. रोजगार संधी शोधणाऱ्या युवकांसाठी सार्वजनिक, शासकीय, निमशासकीय क्षेत्रांत उपलब्ध होणाऱ्या संधींची माहिती रोजच्या रोज अपडेट करून एका क्लिकवर देण्याचं फार महत्त्वाचं काम महान्यूज करत आहे. आणि त्यामागं तत्कालीन महासंचालक आणि आताच्या सचिव मनीषा म्हैसकर यांची तळमळ आणि संचालक श्रद्धा बेलसरे व प्रल्हाद जाधव यांच्या सक्रिय मार्गदर्शनाचाही वाटा आहे.
'महान्यूज' या वेबपोर्टलची संकल्पना प्रत्यक्षात येण्यापूर्वी आणि दि. 19 सप्टेंबर 2008 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री (स्व.) विलासराव देशमुख यांच्या हस्ते या पोर्टलचं लोकार्पण होण्यापूर्वी साधारणपणे दोन ते अडीच वर्षे म्हैसकर मॅडम यांनी महासंचालनालयातील अधिकाऱ्यांची शासकीय चौकटबद्ध कार्यपद्धती बदलण्यासाठी केलेली मशागत ही खऱ्या अर्थानं भरीव पायाभरणी करणारी होती. 'केवळ खुलासे काढणारा आणि कळकट कागदावर मळकट बातम्या देणारा विभाग' (हे मॅडमचे शब्द!) अशी वृत्तपत्र प्रतिनिधींच्या मनातली महासंचालनालयाची सन 2006 पूर्वीची प्रतिमा तोपर्यंत पुसण्यात यश आलं होतं. सन 2006मध्ये मिडियामध्ये काम केलेल्या साधारण वीस सहाय्यक संचालकांची आमची नवी बॅच महासंचालनालयात दाखल झाली होती. या ताज्या दमाच्या टीमच्या जोरावर आणि पूर्वीच्या अधिकाऱ्यांच्या अनुभवाच्या बळावर म्हैसकर मॅडमनी विभागाचा चेहरामोहरा पालटण्याचा ध्यास घेतला. त्यातून विभागीय संपर्क कक्षातून उत्तम प्रकारच्या निर्दोष प्रेस नोट, प्रासंगिक लेख, माहिती यांचा ओघ वाढीस लागला. ब्लॅक ॲन्ड व्हाईट 'लोकराज्य'चं संपूर्ण फोर कलर 'न्यू लूक लोकराज्य'मध्ये रुपांतर झालेलं होतं आणि त्याचं समाजाच्या सर्व स्तरांतून स्वागत झालेलं होतं. गरज नसताना पण स्वतःला चाचपण्याच्या दृष्टीनं 'लोकराज्य' ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन (एबीसी)लाही सामोरं गेलं आणि देशातील विविध शासकीय मुखपत्रांमध्ये सर्वाधिक खपाचं (3,45,997) तर खाजगी मासिकांमध्ये 'वनिता' (मल्याळम) आणि 'मेरी सहेली' (हिंदी) यांच्याखालोखाल तिसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक खपाचं मासिक होण्याचा बहुमान 'लोकराज्य'नं पटकावला होता. या यशानं प्रेरित होऊन 'ऊर्दू लोकराज्य'चंही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दणक्यात लोकार्पण करण्यात आलं होतं. त्याचीही यशस्वी आगेकूच सुरू झालेली होती. मुद्रित माध्यमांमध्ये अशी मोहोर उमटवित असतानाच इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्येही आकाशवाणीवरील 'दिलखुलास' आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील 'जय महाराष्ट्र' हे कार्यक्रम लोकप्रियतेचे नवनवे उच्चांक प्रस्थापित करत होते. या यशाला आता नवमाध्यमाचं परिमाण मिळवून देण्याचा विचार म्हैसकर मॅडम यांच्या डोक्यात घोळत होता. त्या दृष्टीनं इंटरनेटवर वेबपोर्टल तयार करून राज्यातीलच नव्हे, तर जगभरातील मराठी भाषिक वाचकांशी जोडण्याची महत्वाकांक्षा त्यांच्या मनी होती. त्यातून त्यांनी राज्यभरातल्या अधिकाऱ्यांमधून डॉ. गणेश मुळे यांची टीम लीडर म्हणून तर त्यांच्या जोडीला डॉ. किरण मोघे, मनीषा पिंगळे आणि तांत्रिक बाजू सांभाळण्यासाठी मयुरा देशपांडे, अरविंद जक्कल आणि आर्टिस्ट सुनील डुंभेरे यांची निवड केली होती. ही टीम मॅडमच्या मार्गदर्शनाखाली कामालाही लागली होती. त्यावेळी मी 'लोकराज्य'चा सहसंपादक म्हणून काम पाहात होतो. साधारण मे 2008मध्ये म्हैसकर मॅडमनी मला बोलावून 'महान्यूज टीममध्ये काम करणार का?' असं विचारलं. मी नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. कारण त्यापूर्वीही मॅडमनी मला अगदी विश्वासानं मुख्यमंत्र्यांच्या अमेरिका, युरोप आणि दाव्होस दौऱ्याचं वार्तांकन, समन्वयन आणि अहवाल तयार करण्याचं काम माझ्यावर सोपवलं होतं. ते मी यशस्वीपणे केलं होतं. अतिशय महत्त्वाच्या अशा उद्योग, ऊर्जा या विभागांच्या विभागीय संपर्क अधिकारी पदाची जबाबदारी दिली होती. ती व्यवस्थितपणानं पार पाडली होती. 'दिलखुलास', 'जय महाराष्ट्र'साठी वेळोवेळी आदेशानुसार योगदान देत होतो. त्याचप्रमाणं 'लोकराज्य'च्या टीममध्येही अतिशय मनापासून काम करीत होतो. त्यामुळं मॅडमच्या कार्यपद्धतीची मला अगदी जवळून जाणीव झाली होती. त्यांना कन्टेंन्ट नेमका कसा हवा आहे, हे लक्षात येऊन हव्या त्या पद्धतीनं देण्यात माझा हातखंडा झाला होता, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. कदाचित त्यामुळंच 'महान्यूज'च्या कन्टेन्टवर काम करण्यासाठी त्यांनी माझी निवड केली होती. मीही त्यांच्या आदेशाबरहुकूम महान्यूज टीमला जॉईन झालो. काम प्रचंड होतं. राज्यभरातून दररोज यशकथांच्या अक्षरशः शेकडो इ-मेल्स प्राप्त होत होत्या. त्यामुळं त्यातील मजकूर डाऊनलोड करून घेणं आणि त्यांचं विभागनिहाय, विषयनिहाय सॉर्टिंग करणं ही जबाबदारी प्रामुख्यानं मी, मोघे सर आणि पिंगळे मॅडम यांच्यावर होती. बेलसरे मॅडम, मुळे सर हे प्रशासकीय तर देशपांडे मॅडम, जक्कल आणि तांत्रिक सल्लागार संजीव लाटकर हे तांत्रिक बाजू सांभाळत होते.
अनेक चर्चा, बैठकांमधून 'महान्यूज'मध्ये सुरवातीलाच एकूण तेरा सदरं आणि त्या दिवशीच्या राज्यातील सर्वाधिक महत्त्वाच्या पाच बातम्या असाव्यात, असं नियोजन होतं. सदरांमध्ये महाइव्हेंट, ई-बातम्या, साक्षात्कार (मुलाखती), महासंस्कृती, शलाका, तारांकित (यशकथा), चौकटीबाहेर, आलेख (शासकीय योजनांची तपशीलवार माहिती), फर्स्ट पर्सन, गॅलरी (छायाचित्रे), महाऑप (रोजगार संधी), हॅलो (वाचक प्रतिक्रिया), लोकराज्य (कर्टन रेझर), दिलखुलास व जय महाराष्ट्र (मुलाखतींचे शब्दांकन) यांचा समावेश होता. आणि महत्त्वाचं म्हणजे ही सर्व सदरं आम्हाला रोजच्या रोज अपलोड करावयाची होती- अगदी रविवार आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी सुद्धा! हे म्हणजे एक स्वतंत्र दैनिक चालविल्याप्रमाणंच होतं. त्यामुळं कितीही मजकूर आला तरी या 'महान्यूज' नामक महाराक्षसाच्या पोटात तो लगेच गडप होईल, याची जाणीव आमच्या सर्व टीमला होतीच. त्यामुळंच आम्ही कन्टेन्ट जनरेशनवर खूप मेहनत घेत होतो. दैनंदिन बातम्या वगळता किमान पहिले दोन ते तीन महिने तरी सदरांचा मजकूर व्यवस्थित पुरला पाहिजे आणि त्या कालावधीत पुढल्या तीन महिन्यांचा मजकूर उभा करावयाचा, असं आमचं नियोजन होतं. त्यानुसार आम्ही कामाला सुरवात केली होती.
राज्यभरातून आलेला मजकूर ई-मेलवरून डाऊनलोड करून घेण्याच्या प्रक्रियेत असतानाच मनिषा पिंगळे मॅडमच्या इनबॉक्समध्ये आलेल्या एका स्पॅम-मेलनं त्यातल्या सर्व इ-मेल्स अक्षरशः करप्ट झाल्या. शेकडो इ-मेल्समधला सारा मजकूर नाहीसा झाला. हा एक मोठा धडा आम्हाला सुरवातीच्या टप्प्यातच मिळाला. तरीही त्यापूर्वीच्या नोंदी आम्ही घेतलेल्या असल्यामुळं पुन्हा सर्व जिल्हा माहिती अधिकाऱ्यांशी बोलून दोन दिवसांत सारा डाटा जनरेट करण्यात आम्हाला यश आलं. त्यावेळी बाजारात उपलब्ध असलेलं सर्वात प्रभावी ॲन्टीव्हायरस सॉफ्टवेअर आमच्या संगणकांवर तातडीनं इन्स्टॉल करण्यात आलं.
सर्व डाटा डाऊनलोड करून सॉर्ट करण्याचं काम आम्ही साधारण तीन आठवड्यांत संपवलं असेल. त्यानंतर आमचं महत्त्वाचं काम सुरू झालं, ते म्हणजे त्या संपूर्ण मजकुराचं संपादन करण्याचं! ऑनलाइन मिडियावरील मजकुरासाठीची महत्त्वाची पूर्वअट म्हणजे तो शॉर्ट बट स्वीट आणि क्रिस्पी असला पाहिजे. वाचकाला जास्त स्क्रोल न करावे लागता संपूर्ण स्टोरी आशयासह समजली पाहिजे. या आणि आणखी व्यवधानांसाठी डॉ. मुळे यांनी एक स्टाइलबुकच तयार केलं. त्यामुळं कन्टेन्टच्या आमच्या टीमवर जबाबदारी होती- ती प्रत्येक स्टोरीला शॉर्ट पण आशयसंपन्न बनवण्याची. राज्यभरातून आलेला मजकूर हा प्रिंटच्या साच्यातला असल्यामुळं एक हजार ते अडीच हजार इतक्या शब्दसंख्येचा प्रत्येक लेख होता. आम्ही त्या साऱ्या यशकथा वाटून घेऊन संपादनाचं काम सुरू केलं. कितीही शब्दसंख्येचा लेख असला तरी त्याला पाचशे ते आठशे शब्दांत बसवण्याचं काम आम्ही पत्रकारितेमधला सारा संपादनाचा अनुभव पणाला लावून करत होतो. पण, पुढं गंमत अशी झाली की, महान्यूजची ट्रायल पेजेस तयार झाली, तेव्हा त्यामध्ये आम्ही संपादित केलेला मजकूर एका सिंगल स्क्रोलमध्येच बसत होता. त्यामुळं आमच्या अपेक्षेपेक्षा तो खूपच शॉर्ट वाटत होता. म्हैसकर मॅडमनाही ते पटलं आणि आम्ही पुन्हा ते सारे लेख बाराशे ते दीड हजार शब्दांचे केले. मूळचे लेख माहीत असल्यामुळं ते फारसं अवघड गेलं नसलं तरी हे वाढीव कामही आम्ही तातडीनं पूर्ण केलं.
लाटकर सरांनी डमी साइट आमच्या हवाली केली. त्यावर काम सुरू झालं. साइटमधल्या त्रुटी जशा लक्षात येतील, तशा आम्ही आमच्या तांत्रिक टीमला आणि वरिष्ठांना सांगत होतो. त्यावर काम केलं जात होतं. ऑफिसमध्ये दररोज दिवसातून तीनवेळा आमचं ब्रेनस्टॉर्मिंग सेशन व्हायचं ते बेलसरे मॅडमच्या केबीनमध्ये. पहिलं सकाळी कार्यालयात आल्या आल्या- त्यात दिवसभराचं नियोजन केलं जायचं. दुपारी तीनच्या बैठकीत त्या नियोजनाचा फॉलोअप आणि स्टेटस पाहिला जायचा. आवश्यक तिथं ॲडिशन, डिलीशन व्हायचं आणि संध्याकाळी पाचच्या बैठकीत मजकुरावर अंतिम हात फिरवला जायचा. कामाची एक कॉर्पोरेट स्टाइल ठरुन गेली. दरम्यानच्या काळात वर्षा फडके-आंधळे या नव्या महिला अधिकाऱ्यासह बी.के. झंवर, संजय ओरके व नव्यानं निवड झालेले नंदकुमार वाघमारे, संतोष तोडकर, अंजू कांबळे, मंगेश वरकड आणि प्रमोद धोंगडे ही ताज्या दमाच्या माहिती अधिकाऱ्यांची फळीही महान्यूज टीमला जॉइन झाली आणि कामाचा झपाटा आणखीच वाढला. महान्यूज टीम त्यावेळी महासंचालनालयाच्या (चांगल्या अर्थाने) हेव्याचा विषय होती. कारण आम्ही सारे जण नेहमीच एकत्रित आणि युनिक राहण्याचा प्रयत्न करत असू. म्हैसकर मॅडम आणि बेलसरे मॅडमही हौशी! त्यामुळं महान्यूज टीमनं ठरविलेल्या ड्रेसकोडमध्ये त्याही सामील होत असत. किंबहुना, तो ठरविण्यात त्यांचाही पुढाकार असे.
असं असताना कामाचा ताणही होता. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी उद्घाटनासाठी दिलेली 19 सप्टेंबर 2008 ही तारीख जवळ येईल, तसतसा आमचा उत्साह आणि मनावरचा तणाव वाढतच होता. त्या काळात सकाळच्या सत्रात बेलसरे मॅडमनी त्यांच्या केबीनमध्ये आमच्यासाठी योगाची सेशनही घेतली आहेत.
उद्घाटनासाठी आमच्या प्रत्येक टीम मेंबरनं काही घोषवाक्यही तयार केली होती. त्यावर चर्चा होऊन त्यातल्या काही निवडक घोषवाक्यांचे स्टँडी तयार करून उद्घाटनाच्या ठिकाणी लावण्याचं ठरलं. 'वर्षा' बंगल्यावर सकाळी उद्घाटन होणार होतं. त्यासाठी वेगळं काय करता येईल, यावर विचारमंथन सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे यांनी फ्लॅशमध्ये एक प्रोग्राम तयार करून मुख्यमंत्र्यांनी माऊस क्लिक करताच अगदी चौघडे, ढोलताशांच्या गजरासह (हे सारं व्हर्च्युअलच!) एक महाद्वार उघडते आणि त्यातून महान्यूजचा लोगो सामोरा येतो आणि लगेच पोर्टलचे होम पेज उघडते, अशी कल्पना मांडली. महासंचालकांनी ती उचलून धरली आणि अष्टपुत्रे सरांनी तसा प्रोग्राम तयार करवूनही घेतला.
या उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांना पोर्टलबद्दल लाइव्ह प्रेझेंटेशन देण्याचेही ठरले होते. त्यासाठी नॅरेशनला म्हैसकर मॅडम आणि प्रेझेंटेशनच्या लॅपटॉपवर मी बसावे, असे ठरले होते. या ठिकाणीही मॅडमच्या क्राइसिस मॅनेजमेंटच्या व्यवधानाची प्रचिती आली. समजा, पोर्टल ऐनवेळी ऑनलाइन उघडले नाही, तर प्लॅन ए, बी आणि सी अशी तयारी करण्यात आली. 'प्लॅन ए'मध्ये पोर्टलची एचटीएमएल पेजेस लॅपटॉपवर सेव्ह करण्यात आली. ऑनलाइन पोर्टल नाही उघडले तर ही पेजेस 'ॲज इट इज' दाखवायची. तोही प्लॅन वर्क नाही झाला तर, 'प्लॅन बी'मध्ये पोर्टलच्या सर्व पेजेसचे पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन तयार केले गेले. आणि 'प्लॅन सी'मध्ये त्या प्रेझेंटेशनची हँड-आऊट्सही तयार ठेवण्यात आली. प्लॅन सी पर्यंत जावे लागणे शोभादायक नव्हते, पण ती तयारी आम्ही ठेवली होती. उद्घाटनाच्या दिवशी क्रीम कलरच्या ड्रेसकोडमध्ये महान्यूज टीम 'वर्षा' बंगल्यावर पोहोचली. उद्घाटन समारंभ अगदी झोकात पार पडला. मुख्यमंत्र्यांनी, मुख्य सचिवांनी या प्रकल्पाबद्दल अतिशय समाधान व्यक्त केले आणि त्याच्या यशस्वितेसाठी शुभेच्छा दिल्या. म्हैसकर मॅडमचे नॅरेशन आणि माझे प्रेझेंटेशन यांचं ट्युनिंग अगदी उत्तम जमलं. त्यामुळं दुपारी मंत्रालयाच्या मिनी-थिएटरमध्ये पत्रकार परिषदेमध्येही त्यांच्यासमवेत प्रेझेंटेशनला मीच उपस्थित राहिलो. अशाच पद्धतीनं मग राजभवनवर तत्कालीन राज्यपाल एस.सी. जमीर आणि मंत्री हर्षवर्धन पाटील यांनाही प्रेझेंटेशन देण्यात आले. राज्यपालांनी त्यावेळी एक मार्मिक प्रश्न उपस्थित केला होता, "या तुमच्या उपक्रमाचा माझ्या चंद्रपुरातल्या आदिवासी बांधवांना काय लाभ होणार?" त्यावर म्हैसकर मॅडमनीही खूप प्रभावी उत्तर दिलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, "सर, आम्ही त्यांच्यासाठीच्या साऱ्या योजनांची माहिती या पोर्टलवर देणार आहोत, जेणे करून त्याठिकाणी कार्यरत असलेल्या शासकीय, अशासकीय व्यक्ती, संस्थांना त्यांची माहिती होईल आणि सरकारी दफ्तरातून त्यासंदर्भात थेट मदत मिळवून देता येईल किंवा काम करता येईल. भविष्यात त्यांच्यापर्यंत सहज पोहोचण्याचा हा एक महत्त्वपूर्ण पर्याय असेल. तंत्रज्ञानाचे लाभ तिथपर्यंत पोहोचविण्यासाठीच हा उपक्रम आम्ही आरंभला आहे." आज त्यांच्या या विधानाची प्रचिती आपल्याला येते आहेच.
उद्घाटन झालं, पण आता महान्यूज टीमची जबाबदारी वाढली होती. पहिल्या तीन दिवसांतच दहा हजारांहून अधिक हिट्स पोर्टलला मिळाल्या. यावरुन लोकांचं पोर्टलवर बारकाईनं लक्ष आहे, हे दिसत होतं. माझ्याकडं त्यावेळी तारांकित हे यशकथांचं आणि आलेख हे विविध शासकीय योजनांची माहिती देणारं सदर आणि लोकराज्य यांची जबाबदारी होती. त्याशिवाय, अन्य साऱ्या सदरांचा आणि सर्व बातम्यांचा मजकूर प्रूफरिडींगसह फायनल करण्याची जबाबदारीही माझ्यावर होती. खूप काटेकोरपणे काम करावं लागत असे. एक चूकही महागात पडेल, असा तो नाजूक कालखंड होता. टीममधल्या सर्वांनाच याची जाणीव होती, म्हणून कित्येकांनी आपल्या कितीतरी सार्वजनिक आणि साप्ताहिक सुट्यांचा स्वखुशीनं बळी दिला होता. मी स्वतःही चार-पाच महिन्यांहून अधिक काळ एकही दिवस सुटी न घेता अखंडितपणे काम केले.
म्हैसकर मॅडमनाही आमच्यावरील या दडपणाची जाण होती. त्यामुळंच महान्यूजला एक महिना पूर्ण झाल्याच्या दिवशी त्यांनी सर्व टीमला एक मस्तपैकी पार्टी दिली आणि त्याचवेळी सर्वांच्या कामाचं कौतुक करणारी प्रशस्तीपत्रंही प्रदान केली. हा आम्हा साऱ्यांसाठी एक अनपेक्षित आणि सुखद धक्का होता.
या ॲप्रिसिएशननं भारावलेली महान्यूज टीम पुन्हा नव्या जोमानं कामाला लागली ती अगदी आजतागायत अथकपणे कार्यरत आहे. दरम्यानच्या काळात म्हैसकर मॅडम मुंबई महानगरपालिकेत गेल्या. मी सुद्धा उपमुख्यमंत्री कार्यालयात जनसंपर्क अधिकारी झालो, एमटीडीसीत मॅनेजर, पर्यटन व सार्वजनिक बांधकाम मंत्री कार्यालयाचा जनसंपर्क अधिकारी, रायगड जिल्ह्याचा माहिती अधिकारी आणि आता शिवाजी विद्यापीठाचा जनसंपर्क अधिकारी झालो, तरी माझ्या महान्यूज टीमच्या प्रगतीवर मी नेहमीच नजर ठेवून असतो. अलीकडं पोर्टलनं नवं रुप धारण केलं, ऑनलाइन मिडियामध्ये असे कालसुसंगत बदल करणं आवश्यकही आहे. आता तर ई-प्रशासनाच्या सुवर्ण पुरस्काराची मोहोरही महान्यूज टीमच्या कामगिरीवर उमटली आहे. यावेळी पुन्हा म्हैसकर मॅडमच माहिती व जनसंपर्क विभागाच्या सचिव आहेत, ही सुद्धा अत्यंत योगायोगाची गोष्ट. त्यामुळंही महान्यूज टीमचा आनंद आणि उत्साह द्विगुणित झाला असल्यास नवल नाही. मी आज त्याठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित नाही, पण या साऱ्या आठवणी उचंबळून येत असताना किती लिहू अन् काय लिहू, असं मला झालं आहे. महान्यूज टीमच्या कामगिरीचा मला निरतिशय अभिमान आहे. सुवर्ण पुरस्कार प्राप्त महान्यूजच्या पायोनिअर टीमचा एक महत्त्वाचा भाग म्हणून मला काम करता आलं, अशी अभिमानाची भावना मनी दाटून येते आहे. शेवटी आपलं लेकरू ते आपलंच, हेच खरं!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा