(शिवाजी विद्यापीठ आणि सकाळ माध्यम समूह यांच्या संयुक्त विद्यमाने 'ऊर्जा: संवाद ध्येयवेड्यांशी' हा विविध क्षेत्रांत संघर्षातून यश मिळविणाऱ्या तसंच माणूसपण जपणाऱ्या मान्यवरांच्या मुलाखतीचा, संवादाचा उपक्रम गेल्या १४ ते २० फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. विद्यापीठाच्या लोककला केंद्राच्या भव्य खुल्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला रसिकांचा सातत्याने वाढता प्रतिसाद लाभला. त्यांचे शब्दांकन करून माझ्या ब्लॉग वाचकांना या मुलाखतींच्या पुनःप्रत्ययाचा आनंद देण्याचा मानस होता. तो आजपासून सिद्धीस नेतो आहे.
या उपक्रमामध्ये पहिले पुष्प गुंफले ते ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक श्री. सुभाष घई यांनी. त्यांचे मनोगत वाचा त्यांच्याच शब्दांत...)
कोल्हापूरकरांना सुभाष घईचा प्रेमपूर्वक
नमस्कार. कलापूर या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या नगरीत इतक्या मोठ्या संख्येनं आणि अत्यंत
प्रेमानं आपण सर्वांनी माझं स्वागत केलंत, याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. भारतीय चित्रपटसृष्टीची
जननी असलेल्या या कलानगरीनं अनेक दिग्गज, कसदार कलाकार घडविले आहेत, दिले आहेत. माझ्या
व्यक्तिगत आयुष्यावर महाराष्ट्राचा, मराठीचा खूप मोठा प्रभाव आहे. माझ्या अनेक चित्रपटांचं
संवाद लेखन राम केळकर यांनी तर संकलन वामन भोसले यांनी केलं आहे. त्यांच्याखेरीज माझ्या
टीममध्ये अनेक मराठी कलाकार-तंत्रज्ञ आहेत. व्ही.शांताराम यांचं योगदान आणि पु.ल. देशपांडे
यांच्या लेखनाचाही माझ्यावर खूप मोठा प्रभाव राहिला आहे.
रसिक हो, माझ्यावर हा प्रभाव
असण्याचं कारण म्हणजे माझा जन्म नागपूरचा. वडिल डेंटिस्ट असल्यानं त्यांच्याबरोबर पुढं
आम्ही दिल्लीला गेलो. तिथंच माझं बहुतेक शिक्षण झालं. मला अभिनयाची सुरवातीपासून आवड
होती, पण वडिलांना मात्र मी सीए व्हावं, असं वाटायचं. कॉलेजमध्ये मी अभिनयाबरोबर नाटकांचं
दिग्दर्शनही करायचो, पण साराच हौसेचा मामला. वडिलांना हे काही पसंत नव्हतं. पण, एके
दिवशी मनाचा निश्चय करून त्यांना माझ्या आवडीविषयी सांगितलं आणि याच क्षेत्रात काही
तरी करण्याची इच्छा असल्याचंही सांगितलं. वडील काही बोलले नाहीत, पण त्यांनी अडवलंही
नाही. मी अभिनयाचं प्रशिक्षण घेण्यासाठी थेट पुण्यात एफटीआयआय गाठलं. तिथं रितसर प्रशिक्षण
घेतलं. पण, केवळ प्रशिक्षण घेतलं म्हणून संघर्ष संपला, असं कुठाय? खरा संघर्ष त्यानंतर
सुरू झाला. मुंबईत आलो. सात-आठ वर्षं स्क्रिप्ट लिहीणं आणि स्टुडिओच्या चकरा मारणं
सुरू होतं. एकदा निर्माते एन.एन. सिप्पी यांना एक स्क्रीप्ट घेऊन भेटलो. त्यांनी ती
पाहिली, म्हणाले, 'दिग्दर्शन कोणी करावं, असं वाटतं?' मी उत्तरलो, 'मलाच करायचंय.'
त्यावर ते काहीसे चकित झाले. त्यांनी विचारलं, 'यापूर्वी कधी चित्रपटात काम केलंयत?
कधी चित्रपटांशी काही संबंध?' मी उत्तरलो, 'नाही.' त्यांनी पुन्हा विचारलं, 'कधी सहाय्यक
दिग्दर्शक म्हणून तरी काम केलंयत का?' मी पुन्हा उत्तरलो, 'नाही.' यावर त्यांनी 'ठीक
आहे. पाहू या,' असं म्हणून माझी बोळवण केली. त्यानंतर खूप दिवसांनी त्यांचा मला फोन
आला. ते म्हणाले, 'आज संध्याकाळी एक सेलिब्रेशन पार्टी आहे. तिथं या.' असं म्हणून त्यांनी
पत्ता सांगितला. त्यांनी सांगितल्याप्रमाणं मी ठरलेल्या वेळी पार्टीत पोहोचलो. सिप्पी
साहेबांची काही लोकांची बातचीत चाललेली होती. मला पाहून त्यांनी जवळ बोलावलं आणि आपल्या
पाहुण्यांना माझा परिचय करून देत म्हणाले, हे सुभाष घई. माझ्या पुढच्या चित्रपटाचे
दिग्दर्शक!' या त्यांच्या वाक्यानं मी उडालोच. पण, त्यांनी गंमत केली नव्हती. सिरीयस
होते. आणि अशा तऱ्हेनं माझ्या कन्व्हिन्सिंग पॉवरमुळं मला पहिला चित्रपट मिळाला.
कालांतरानं मी माझी पत्नी मुक्ताच्या
नावानंच मुक्ता आर्ट्स नावाची कंपनी उघडली. त्या माध्यमातून एकापेक्षा एक उत्तम चित्रपट
देण्याचा प्रयत्न केला. ओळीनं सिल्व्हर ज्युबिली चित्रपट देण्याचा विक्रम माझ्या नावावर
जमा झाला. या चित्रपटांनी मला भरभरून दिलं. मीनाक्षी शेषाद्रीपासून ते माधुरी, मनिषा
कोईराला ते अगदी महिमा चौधरीपर्यंत अनेक टॅलेंटेड गुणी अभिनेत्रींना, जॅकी श्रॉफसारख्या
अभिनेत्याला माझ्या चित्रपटांतून मी लाँच करू शकलो.
पण, आयुष्यात सर्वाधिक समाधानाचा
प्रसंग सांगावयाचा झाला, तर माझ्या एका चित्रपटाच्या सक्सेस पार्टीला मी माझ्या वडिलांना
आवर्जून घेऊन आलो होतो. प्रकृती बरी नसल्यानं शेजारच्या खोलीत त्यांची व्यवस्था केली
होती. त्या पार्टीला दिलीप कुमार आणि राज कपूर आले होते. या दोघांनीही माझ्याकडं 'आपले
वडील कुठायत?' अशी विचारणा केली. मी त्यांना वडिलांकडे घेऊन गेलो. दोघांनीही त्यांना
वाकून नमस्कार केला. माझ्या वडिलांनी त्यांच्या चेहऱ्यावर तसेही कधी भाव दर्शविले नव्हते.
पण, त्याक्षणी एक अस्फुटशी स्मितरेषा उमटलेली आणि डोळ्यांत काहीसं पाणी तरळल्यासारखं
मला वाटलं. हा क्षण माझ्या हृदयात कायमस्वरुपी बंदिस्त झालेला आहे.
मित्र हो, आपणा सर्वांनाच आयुष्यात
खूप यशस्वी व्हायचं असतं, खूप काही मिळवायचं असतं. पण, केवळ पुस्तकं वाचूनच सारं मिळेल,
या भ्रमात मात्र राहू नका. आयुष्यात येणारे निरनिराळे अनुभव आपल्याला खूप काही शिकवत
असतात. त्यापासून धडा घ्यायला हवा. आमच्या काळी चित्रपट बनवित असताना सारा इमॅजिनेशनचा
मामला असायचा. आकाशाकडे डोळे लावून आम्हाला प्रत्येक दृष्याचा विचार करावा लागायचा.
पूर्वी दिग्दर्शक आणि अभिनेत्यांत गुरू-शिष्याचं नातं असायचं. पण, आता अभिनेताच दिग्दर्शकाचा
गुरू होऊन बसलाय. काळाचा महिमा. दुसरं काय? पण, त्यामुळं माध्यमाचं मोठं नुकसान होतं
आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे.
आता पूर्वीसारखी परिस्थिती नाहीय.
स्मार्टफोन, टॅब्लेटच्या माध्यमातून माहितीचा खजिना आपल्यासमोर खुला झालेला आहे. मात्र,
त्याचा यथायोग्य वापर करून ज्ञानसंपन्न होण्यासाठी आपल्याला प्रयत्नही करावे लागणार
आहेत. विद्यापीठांनाही त्यांची पॉलिसी आणि पुस्तकं सुद्धा बदलावी लागणार आहेत. आपल्या
पॉलिसी मेकर्सनाही याची जाणीव निर्माण होण्याची गरज आहे. एकदा एका नेत्याला मी विचारलं,
'सर, पॉलिटिक्स म्हणजे काय?' त्यावर ते उत्तरले, 'बडाही आसान है। इसको उठाओ, उस को
गिराओ और उसको उठा के इस को गिराओ।' मी पाहातच राहिलो. मग मीच त्यांना सांगितलं, 'सर,
पॉलिटिक्स म्हणजे पॉलिसी मेकिंग आहे. समाजाच्या कल्याणासाठी चांगल्या योजना बनविणं
आणि त्या राबविणं, हे खरं पॉलिटिक्स'. पण लक्षात कोण घेतो? मित्र हो, म्हणून वाचत असताना,
शिकत असताना कन्सेप्ट क्लिअर असणं खूप महत्त्वाचं आहे. शब्दाशब्दाचा अर्थ समजून घ्यायला
विद्यार्थ्यांचं प्राधान्य असायला हवं. ते समजून घेत पुढं गेलात, तर हळूहळू आयुष्याचाच
अर्थ नव्यानं तुमच्यासमोर सामोरा आल्याशिवाय राहणार नाही.
मित्र हो, चित्रपटांकडं पाहण्याचा
आजही आपला दृष्टीकोन हा खूप संकुचित आहे. इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात विस्तार पावलेल्या
या क्षेत्रात शास्त्रशुद्ध ज्ञानाची अद्यापही प्रचंड वानवा आहे. नेमकी हीच बाब लक्षात
घेऊन आणि आयुष्यात बरंच काही मिळविल्यानंतर मी माझी सारी मिळकत खर्ची घालून 'व्हिसलिंग
वूड्स' ही चित्रपटविषयक हरतऱ्हेचं प्रशिक्षण देणारी इन्स्टिट्यूट उभी केली आहे. आंतरराष्ट्रीय
स्तरावरील टॉप टेन संस्थांमध्ये या संस्थेचा अल्पावधीत समावेश झाला आहे. इथे शुल्क
आकारले जातेच, पण केवळ फी भरू शकत नाही, म्हणून तळमळीनं शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याला
काढून टाकलं असं मात्र होत नाही.
आज याठिकाणी उपस्थित असलेल्या
अमोल मांगे या माझ्या विद्यार्थ्याचंच उदाहरण देतो. जेमतेम कौटुंबिक परिस्थितीतला अमोल
छत्तीसगडमधून अभिनयाचं प्रशिक्षण घेण्यासाठी माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झालेला.
कशीबशी पहिल्या वर्षाची फी त्यानं भरली. पुढच्या वर्षीची फी भरण्याची क्षमताच नव्हती.
जड अंतःकरणानं त्यानं इन्स्टिट्यूट सोडण्याचा निर्णय घेतला. मला यातलं काहीच माहिती
नव्हतं. त्यावेळी नसिरुद्दीन शाह शिकवायला येत असत. ते एकदा मला म्हणाले, 'सुभाष जी,
एक बडाही टॅलंटेड लडका है- अमोल मांगे नाम का। वह इन्स्टिट्यूट छोडने की बात कर रहा
है। जरा देखिए।' त्यावर मी अमोलला बोलावून घेतलं. त्याची अडचण माझ्या लक्षात आली. मी
त्याला म्हणालो, 'कोई बात नहीं बेटा। तुम कुछ मत सोचो। सिर्फ अपनी पढाई पर ध्यान दो।
और आज मुझे फक्र है, की वही अमोल आज फिल्म इंडस्ट्री में अपना मुकाम पाने की तरफ आगे
बढ रहा है। और क्या चाहिए?' तुमच्यातली सकारात्मक ऊर्जा तुमच्या अडचणींवर मात करायला
मदत करते, ती अशी!
(शब्दांकन: आलोक जत्राटकर)
छान अनुभव
उत्तर द्याहटवाधन्यवाद जगदीश! .. आणखी पाच मुलाखतींचे शब्दांकनही देणार आहे टप्प्याटप्प्याने.. ते सुद्धा वाचून जरुर प्रतिक्रिया दे..
हटवाब्लॉगचा लूकही आता छान झाला आहे, न्यू लूक ब्लॉग!
उत्तर द्याहटवाLiked it dear.. "New Look" reminds me so many old memories!!!
हटवा