रविवार, १० मे, २०१५

ऊर्जा-6: जज्बा हो तो, नामुमकिन कुछ भी नहीं: आनंद कुमार




(शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व सकाळ माध्यम समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'ऊर्जा: संवाद ध्येयवेड्यांशी' या उपक्रमामध्ये सहावे पुष्प गुंफले ते बिहारच्या 'सुपर थर्टी' उपक्रमाचे जनक आनंद कुमार यांनी. अतिशय निरलस, सेवाभावी वृत्तीने आणि कोणत्याही शासकीय मदतीविना झोपडपट्टीतल्या मुलांसाठी मोफत आयआयटी प्रशिक्षणाची सुरवात करणारा हा अवलिया. त्याच्या ३६० विद्यार्थ्यांपैकी ३०८ जण आयआयटीमध्ये निवडले गेले आहेत. उर्वरित विद्यार्थी इतर शैक्षणिक संस्थांत प्रवेश मिळविण्यात यशस्वी ठरले आहेत. कोमेजणाऱ्या फुलांसाठी पोषक परिस्थिती निर्माण करून त्यांचे संगोपन करून जगाचे डोळे दीपविणाऱ्या या मनस्वी व्यक्तीने आपल्या सरळ, थेट संवाद शैलीने कोल्हापूरकर रसिकांना जिंकलं नसतं, तरच नवल! त्यांनी साधलेल्या संवादाचे शब्दांकन शेअर करीत आहे. 'ऊर्जा' मालिकेतील हे अखेरचे शब्दांकन आहे. या मालिकेतील सर्वच शब्दांकनांना वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. काही दैनिकांनी, वृत्तविषयक पोर्टल्सनी त्यांचे पुनर्मुद्रण करून अधिकाधिक वाचकांपर्यंत हे विषय पोहोचविले. यातून अनेक तरुणांना चांगले काम करण्याची, अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली, ही माझ्या प्रयत्नांना मिळालेली पोचपावती आहे, असे मानतो. आनंद कुमार हे सुद्धा असेच परिस्थितीचे चटके सोसून उभे राहिलेले व्यक्तीमत्त्व आहे. त्यांचे विचार आणि कार्य तर प्रचंड प्रभावी आहे. वाचल्यानंतर आपल्याही ते लक्षात येईल. आपल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद!)
 


मेरे प्यारे भाईयों और बहनों, इतक्या प्रचंड संख्येनं आपण सारे मला ऐकण्यासाठी इथं जमलेले आहात, हे पाहून मला गहिवरुन आलं आहे. माझ्या राज्याबाहेर इकडं दूर महाराष्ट्रात बोलावून सकाळ माध्यम समूह आणि शिवाजी विद्यापीठानं माझा हा जो सन्मान केला आहे, त्यामुळं मी भारावून गेलो आहे. मला आपणा सर्वांना निश्चितपणे सांगायला आवडेल, की आज आपण ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावच्या विद्यापीठात जमलेलो आहोत, ते शिवाजी केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत. देशभरात त्यांच्या नावाचा दबदबा आणि आदर आजही कायम आहे. व्यक्तिशः मला शिवरायांच्या चरित्रातून खऱ्या अर्थानं जगण्याची, लढण्याची आणि संघर्षाची ऊर्मी प्राप्त झाली आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
माझ्या बोलण्याला सुरवात करण्यापूर्वी माझ्या काही विद्यार्थ्यांची माहिती तुम्हाला जरुर देईन. संतोष हा एका भाजी विकणारा मुलगा. खायला अन्न नाही, पण त्याची शिकण्याची अन् आईवडिलांची शिकविण्याची ऊर्मी प्रचंडच. एका पडक्या शाळेत दहावी पास झाला. त्यानंतर पाटण्यात आला. इंजिनिअर व्हायचं स्वप्न उराशी जपलेलं, मात्र खिशात कपर्दिकही नाही, अशी अवस्था. तसाच आला माझ्याकडं. दोन वर्षं कठोर मेहनत घेतली त्यानं. त्यानंतर कानपूर आयआयटीमध्ये झाली त्याची निवड. आज पाहा युरोपच्या विद्यापीठात लेक्चरर म्हणून कसा दिग्गज प्राध्यापकांसमवेत वावरतो आहे. अशाच, या काही मुली. गोरगरीब घरातल्या, झोपडपट्टीतल्या. तशीच अवस्था, पण शिकण्याची आकांक्षा दांडगी. त्यासाठी हवे तितके परिश्रम करण्याची तयारी. करून घेतली तयारी त्यांच्याकडून. आज आयआयटीमध्ये ताठ मानेनं शिकताहेत. माझ्याकडं अशा एकूण ३६० विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं, त्यापैकी ३०८ जण आयआयटीमध्ये निवडले गेले. उर्वरित विद्यार्थी अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशित झाले.
या माझ्या सुपर थर्टी बॅचचा इतका लौकिक पसरला की, आरक्षण चित्रपटातील शिक्षकाची भूमिका माझ्याशी मिळतीजुळती असल्याचं समजल्यानंतर प्रत्यक्ष अमिताभ बच्चन यांनीही माझ्या या बॅचची पाहणी केली. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सुद्धा मला काही ठिकाणी घेऊन गेले.
दोस्तों, सुपर थर्टी आज नावारुपाला आली असली, तरी ती काही एका दिवसात उभी राहिलेली नाही. त्यामागे खूप कष्टाची पार्श्वभूमी आहे. माझे वडील रेल कर्मचारी होते. मी खूप चांगलं शिकावं, असं त्यांना वाटत असे. त्यामुळं नेहमी प्रवासाहून येताना माझ्यासाठी चांगली चांगली पुस्तकं घेऊन येत. मला त्यातली मोठ्या लोकांची चरित्रात्मक पुस्तकं खूप आवडायची. मी शिकलो, तसा हिंदी शासकीय शाळेतच. पण वडिलांमुळं शिक्षणाची गोडी लागली. त्यातही गणितात मला विशेष रुची होती. रामानुजन माझे आदर्श बनले. पदवीसाठी पाटणा विद्यापीठाच्या कार्यकक्षेतच प्रवेश घेतला. पदवीला असतानाच गणिताच्या नंबर थिअरीवरचे माझे शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झाले. ते पाहून मला केंब्रिज विद्यापीठात उच्चशिक्षणासाठी येण्याचे निमंत्रण मिळाले. हा खरं तर माझा बहुमानच होता. वडिलांना त्याचा खूप आनंद झाला. त्यांना दरवर्षी युनिफॉर्मसाठी कपडा मिळायचा. दोन वर्षे त्यांनी स्वतःसाठी कपडे न शिवता त्यातून माझ्यासाठी सूट कोट शिवला. नवे बूटही घेतले. पण, लंडनला जाण्यासाठी आवश्यक असलेल्या पैशाचा प्रश्न खूप मोठा होता. लाखभर रुपये तरी लागणार होते. अनेकांनी अनेक सल्ले दिले. आपल्याकडं जातीव्यवस्थेच्या भक्कमपणाची त्यावेळी प्रथम जाणीव झाली. काही जणांनी तुमच्या जातीच्या अमूक नेत्याकडं जा, नक्की मदत करील, असं सांगितलं. त्यानुसार आम्ही त्या नेत्यांकडं गेलो. त्यानं वडिलांना एक काय, दीड लाख देतो, असं तोंडभरून सांगितलं. पण, एक पैसाही दिला नाही. आणखी एक मंत्री एका कार्यक्रमात भेटले. त्यांना माझी व्यथा सांगितली. उद्या बंगल्यावर येऊन भेट, म्हणाले. गेलो दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडं. मिटींग चालली होती कसली तरी. मी तिथं जाऊन बसलो बराच वेळ. शेवटी धीर करून विचारलं, मंत्री जी, आपण मला आज अमूक कारणासाठी बोलावलं होतं. शिक्षणासाठी पैसे लागणार आहेत. म्हणाले, 'बच्चे, सिखो जरुर, लेकिन पैसे के पिछे मत भागो। सिखने के लिए कहीं भी जाओ लेकिन देश के लिए काम करना मत छोडो।' असा फुकटचा सल्लाही त्यांनी देऊन टाकला. पैसे मात्र दिले नाहीतच. बंगल्याबाहेरच्या चहावाल्याकडं चहा घ्यायला गेलो, तिथं मंत्रीजींची असलियत सामोरी आली. तीन महिन्यांपासून चहावाल्याचंच बिल थकवलं होतं त्यांनी.
या अशा धकाधकीत, एक दिवस अचानकच, काही ध्यानीमनी नसताना वडिलांचं निधन झालं. खूप मोठा धक्का होता तो माझ्यासाठी. उनसे मेरा बहोत लगाव था। आमची परिस्थिती एकदम पालटूनच गेली. वडिलांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर नोकरीला लागू शकलो असतो, पण आईनं माझ्या ध्येयासाठी कंबर कसली. पापड करून, विकून तिनं चरितार्थ चालवला. मी आयआयटीमधून शिक्षण पूर्ण केलं. ऑफर्स होत्या पुढ्यात बऱ्याच. पण, चांगला शिक्षक होण्याचं ठरवलं. रामानुजन इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिक्सची स्थापना केली. पहिली बॅच फुकट शिकवली. पुढच्या वर्षापासून केवळ पाचशे रुपये शुल्क आकारून शिकवू लागलो. याच वेळेस एक चुणचुणीत मुलगा माझ्याकडं आला. त्याला शिकायचं होतं, पण द्यायला पैसे नव्हते. एका बंगल्याचा सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असे तो. बंगल्यात कोणीच नसल्यानं जिन्याखालच्या खबदाडात बसून अभ्यास करायचा. खात्री करायची म्हणून मी आणि माझा भाऊ त्यानं दिलेल्या पत्त्यावर गेलो, तर त्यानं सांगितलेलं खरंच असल्याचं दिसलं. त्या क्षणी त्याच्यासारख्या गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिकवायचं ठरवलं. त्यातून सुपर थर्टीचा विचार सामोरा आला. या झोपडपट्टीतल्या गरीब मुलांसमोर रोजच्या खाण्याचा- राहण्याचा प्रश्न मोठा होता. त्यामुळं त्यांच्या वर्षभराची राहण्याची, जेवणाची व्यवस्थाही करण्याचं ठरवलं. मागचे कटु अनुभव असल्यामुळं, आपल्याला कितीही कष्ट करावे लागले तरी चालतील, पण कोणाकडून एक पैचीही मदत किंवा अनुदान न घेता, या सर्व गोष्टी करण्याचं ठरवलं. या आमच्या निश्चयाला माझी आई, आणि नंतर माझ्या पत्नीनंही खूप तळमळीनं साथ दिली. ती सुद्धा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. बेंगलोरमधली चांगली नोकरी सोडून ती आता आईला मदत करते आहे. अशा तऱ्हेनं सुपर थर्टी सुरू झाली. ज्या गरीब मुलाकडं शिकण्याची तळमळ आहे, शिक्षणासाठी काहीही करण्याची ज्याची तयारी आहे, त्याचं सुपर थर्टीमध्ये स्वागत केलं जातं. जज्बा हो तो नामुमकिन कुछ भी नहीं, याची साक्ष माझे विद्यार्थी जगाला देत आहेत. सलग तीन वर्षे माझी तीसच्या तीस मुलं आययटीमध्ये निवडली गेली. माझ्यासारख्या शिक्षकाला आणखी काय हवं?
सुपर थर्टीला जसजसं यश मिळू लागलं, तसतसं शैक्षणिक माफियांच्या पोटात दुखू लागलं. मी कोणाचंही काहीही वाकडं केलं नसताना माझी त्यांना अडचण वाटू लागली. माझ्यावर तसंच माझ्या काही विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. आमच्या विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन केलं. तेव्हा आम्हाला सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली. एकदा तर आमचा विद्यार्थी समजून आमच्यासमोर चहाचा ठेला चालवणाऱ्या मुलालाच उचलून नेण्याचा प्रकार झाला. आता बोला? 'सुपर' नावानं अनेक बनावट संस्थांचंही पीक आलं. पण, हेतू स्वच्छ नसल्यानं ओरिजिनल सुपर थर्टीची सर त्यांना कशी येणार? दातृत्वाचे हातही पुढं आले. पण, आम्ही त्यांना नम्रपणे नकार दिला. नेत्यांकडून अनेक आश्वासनं मिळाली, पण ती आजतागायत प्रत्यक्षात आलेली नाहीत. त्यातले कित्येक जण तर आता सत्तेतूनही बाद झालेत.
दोस्तों, चांगलं काम करणाऱ्याला अडचणींचा सामना तर करावा लागतोच. त्याची तयारी ठेवावीच लागते. आम्ही तर अशा अनेक दिव्यातून गेलेलो आहोत. आता जगभरातून बोलावून आम्हाला सन्मानित करण्यात येतंय. आपल्यासारख्या अनेकांकडून आम्हाला सुपर थर्टीमध्ये प्रवेशासाठी विचारणा होतेय. थेट प्रवेश शक्य नसला तरी, आता ऑनलाइन प्रशिक्षण देता येऊ शकेल का, या दृष्टीनं आमचे प्रयत्न सुरू आहेत. जेणे करून चांगल्या होतकरू मुलांपर्यंत आमचं मार्गदर्शन पोहोचू शकेल.
मित्रहो, मी आजपर्यंत कधीही कोट घातलेला नाही. मी हाती घेतलेलं मिशन बऱ्यापैकी सफल केलंय, असं वाटत नाही, तोपर्यंत वडिलांनी शिवलेला तो कोट व बूट मी अंगावर चढविणार नाही. माझ्या परीनं या देशासाठी, इथल्या गोरगरीब मुलांसाठी मी काम करतच राहणार. तुम्ही सुद्धा तुमच्या पद्धतीनं योगदान देत राहा, या देशाचं भवितव्य उज्ज्वल बनविण्यासाठी. शेवटी एकच सांगतो, 'बुझी हुई शमा, फिर से जल सकती है। उदास न हो, मायूस न हो। सिर्फ मेहनत कर, तेरी किस्मत बदल सकती है।'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा