(शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व सकाळ माध्यम समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'ऊर्जा: संवाद ध्येयवेड्यांशी' या उपक्रमामध्ये
पाचवे पुष्प गुंफले नाशिकचे तरुण उद्योजक व डिजिटल डिक्शनरीकार म्हणून जगभरात लौकिक
मिळविणारे श्री. सुनील खांडबहाले यांनी. अतिशय विनम्र, निगर्वी अशा सुनील यांनी मनापासून
साधलेल्या संवादाचे शब्दांकन…)
मित्र
हो, तुम्हाला उपदेश करण्याइतका मी नक्कीच मोठा नाही. तुमच्यातलाच एक जण, तुमच्याच वयाचा
मित्र म्हणून मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरीनजीकच्या
वांजोळे इथं माझा जन्म झाला. घरची परिस्थिती गरीबीचीच होती. घर आमचं कुडाचंच होतं-
चार खांबांवर उभं. जोराचं वारं सुटलं तर एक खांब आई धरून ठेवायची. बाकी खांब धरण्यासाठी
वडिल, आजी आजोबा आणि आम्हा भावंडांची तारांबळ उडायची. रोजंदारी, शेतमजुरी करणाऱ्या
माझ्या आईवडिलांना शिक्षणाचं महत्त्व मात्र कसं कोण जाणे खूप उमजलेलं. त्यामुळं आम्हा
तिघा भावंडांना त्यांनी शिक्षणासाठी कधी अडवलं नाही. परिस्थिती नसतानाही शिकण्यासाठी
प्रोत्साहन दिलं. मी गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मराठी माध्यमातूनच शिकलो. शाळा
तरी कसली? एकाच खोलीत एकच शिक्षक पहिली ते चौथी शिकवायचे. त्यांच्यासमोर चार चटयांवर
चार वर्गातली मुलं बसत. वर्षअखेरीस पास झालो की एका चटईवरुन दुसऱ्यावर बदली व्हायची
इतकंच. पै-पाहुण्यांच्या मुलांनी दिलेल्या पुस्तकांवरच आम्हा सर्व भावंडांचं शिक्षण
झालं. आज जगभर फिरुन आलो असलो तरी, त्या काळात शहर कसं असतं, ते सुद्धा कधी पाहिलेलं
नव्हतं.
एकदा
'सकाळ'च्याच बालकुमार चित्रकला स्पर्धेसाठी नाशिकला जायचं होतं. गावातून बाहेर पडण्याचा
आणि शहराकडं जाण्याचा, आयुष्यातला पहिलाच प्रसंग होता तो. मी कावराबावरा होऊन एसटी
पकडण्यासाठी रस्त्याकडेला उभा राहिलो. कोणी ओळखीचे मित्र-मैत्रिणी दिसताहेत का, हे
पाहात पाहातच कितीतरी बस सोडल्या. स्पर्धेची वेळ केव्हाच उलटून गेली होती. शेवटी मनाचा
हिय्या करून एका एसटीत चढलो. नाशिक स्टँडवर उतरलो. तिथली गर्दी, कोलाहल, गोंगाट, गाड्यांची
रहदारी पाहून गोंधळलोच. कुठे जावे, कसे जावे, काही समजेना. मला रडूच कोसळलं. कसाबसा
स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचलो, तेव्हा स्पर्धा संपायला पंधराच मिनिटं शिल्लक होती. माझ्याकडं
ना ब्रश होता, ना रंग. ज्या मित्राचं चित्र पूर्ण झालं होतं, त्याच्याकडून ते घेतले.
कमी वेळ असल्यानं पेन्सिलनं स्केच न काढता थेट रंगांनीच 'हमाल' या विषयावर चित्र काढलं.
रेल्वे स्टेशन आणि तिथं डोईवर ओझं आणि हाताला लहान मूल घेऊन निघालेली स्त्री मी रेखाटली
होती. आुष्यभर सारी ओझी वाहणारी माझ्या आईसारखी महिला माझ्या डोळ्यासमोर होती. या चित्राला
पहिला क्रमांक मिळाला. दुसरी एक विशेष बाब मला आवर्जून सांगायला आवडेल, ती म्हणजे नाशिकमध्ये
पहिल्यांदा आल्यानंतर ज्या ठिकाणी उभा राहून मी रडलो होतो, त्याच ठिकाणी आज माझं स्वतःचं
ऑफिस मी थाटलं आहे.
पाचवी
ते दहावीपर्यंतही मी असाच मराठी माध्यमातून शिकलो. बाकी विषयांत गती असली तरी इंग्रजीच्या
बाबतीत मात्र आमची प्रगती न के बराबरच होती. मला खरं तर चित्रकारच व्हायचं होतं, मात्र
दहावीला चांगले गुण मिळाल्यानं इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगच्या डिप्लोमाला प्रवेश
घेतला. गणित विषय माझा चांगला होता. दहावीला गणितात १४० गुण होते. डिप्लोमाच्या ॲडमिशनवेळी
शेवटचं एकच ॲडमिशन शिल्लक होतं आणि आम्ही दोघे उरलो होतो. त्यावेळी पॅनलनं सांगितलं
होतं की, तुमच्यापैकी ज्याला गणितात अधिक मार्क आहेत, त्यालाच प्रवेश मिळेल. मला १४०
आणि दुसऱ्याला १३९ गुण होते. त्यामुळं मला प्रवेश मिळाला. ॲडमिशन तर घेतलं, पण तिथं
सारा कारभार इंग्रजीतून असल्याचं समजल्यावर मात्र घाम फुटला. माझ्यासारखे इंग्रजीची
भीती असणारे आणखी चार पाच जण होते. आमचा समदुःखी जनांचा एक ग्रुप झाला. साहजिकच, सेमिस्टरला
आमची सर्वांचीच दांडी गुल झाली. बाकीचे सारे शिक्षण सोडून गावाकडे निघूनच गेले. मलाही
'गड्या आपुला गाव बरा' असं वाटू लागलं. मी सुद्धा परतायचं ठरवलं; मात्र, त्याच क्षणी
आईवडील डोळ्यांसमोर आले. माझ्या वारकरी आईवडिलांनी किती आशाअपेक्षेनं मला शिकायला पाठवलं.
मी परत गेलो तर त्यांना काय वाटेल, असा विचार मनात आला आणि मी इंजिनिअर होऊनच गावाकडं
परतण्याचा निश्चय केला.
त्यानंतर
मी एका प्राध्यापकांची भेट घेतली. त्यांना माझी इंग्रजीची अडचण सांगितली. त्यांनी मला
डिक्शनरी वापरण्याचा सल्ला दिला. 'डिक्शनरी' हा शब्द त्यांच्या तोंडून मी पहिल्यांदाच
ऐकला. मी त्यांना 'डिक्शनरी म्हणजे काय?' असं विचारलं. तेव्हा सरांनी मला त्यांच्याकडचीच
एक डिक्शनरी दिली आणि ती कशी वापरायची, शब्द कसे पाहायचे, ते सांगितलं. त्या दिवसापासून
ते आजतागायत डिक्शनरी माझी सोबती झाली ती कायमचीच. मी मला लेक्चरमध्ये अडलेले शब्द
डिक्शनरीत पाहायचो आणि ते स्वतंत्र कागदावर अर्थासह लिहून काढायचो. तेव्हा मला शिक्षकांनी
काय शिकवलं, त्याचा अर्थबोध व्हायचा. असं करत करत अशा तांत्रिक शब्दांचा संग्रहच माझ्याकडं
तयार झाला. या डिक्शनरीच्या बळावर पहिल्या टप्प्यात नापास झालेला माझ्यासारखा विद्यार्थी
अखेरच्या वर्षी पहिल्या चार क्रमांकांत उत्तीर्ण झाला. मग, माझ्यासारख्या अनेकांना
मी त्या पानांच्या झेरॉक्स करून द्यायला सुरवात केली. पण, त्यालाही खर्चाच्या मर्यादा
होत्याच. त्याच वेळी मग आपण डिजिटल डिक्शनरी तयार करायची, असं मी ठरवलं.
माझं
संगणकाचं ज्ञान खूपच जुजबी होतं. डिजिटल डिक्शनरी साकारायची तर, त्यासाठी उत्तम प्रोग्रामिंग
यायला हवं. त्यासाठी मी एका कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये चौकशी केली. प्रशिक्षण उपलब्ध
होतं, पण खर्च परवडणारा नव्हता. मग, मी माझ्या एका मित्राकडचा एक संगणक तात्पुरता मागून
घेतला, ज्याचा उपयोग तो फक्त गेम खेळण्यासाठीच करायचा. अशीच इकडून तिकडून प्रोग्रामिंगवरची
पुस्तकंही गोळा केली. आणि एक कमी भाड्याची खोली घेऊन अक्षरशः तिथं कोंडून घेऊन साधना
आरंभली. कम्प्युटर प्रोग्रामिंगच्या सर्व भाषा मी एकलव्यासारख्या सेल्फ स्टडी करून
शिकलो. या दरम्यान एक बाका प्रसंग आयुष्यात निर्माण झाला. संगणकासमोर अखंड बसल्यामुळं
माझ्या पाठीत पाणी झालं. ऑपरेशन करावं लागलं. डॉक्टरांनी यापुढं बैठं काम करता येणार
नाही, असं बजावलं. तेव्हा, खुर्चीवर संगणक ठेवून त्यासमोर टेबलवर आडवं पडून मी माझा
उरलेला अभ्यास पूर्ण केला. त्यानंतर मग एकामागोमाग एक शब्दकोष निर्माण करत गेलो. अंध
मुलांसाठी बोलका शब्दकोषही निर्माण केला. मराठीतलाही पहिला बोलका शब्दकोष निर्माण केला.
आणि अशा तऱ्हेनं आमचा व्यवसाय विकसित होत गेला.
आपण
केला तर व्यवसायच करायचा, हे माझं आणि माझ्या मोठ्या भावाचं ठरलेलं होतं. पण, चांगल्या
गुणांनी इंजिनिअर झाल्यामुळं हिंदुस्थान एअरोनॉटिक्समधून मला मुलाखतीसाठी कॉल लेटर
आलेलं होतं. तेव्हा ते आम्ही घरी दाखवलंच नाही. तरीही भाऊ म्हणाला, जा, निदान मुलाखत
तरी देऊन ये. उद्या आपण व्यवसाय सुरू केल्यावर मुलाखत कशी घेतात, ते तरी समजेल.
मी
तिकडे जाणारी बस पकडून निघालो. पण, मनात विचारांचं काहूर माजलं होतं. मनाची द्विधावस्था
झालेली. त्या तिरीमिरीतच उठलो आणि मधल्याच कुठल्या तरी स्टॉपवर उतरलो. फिरता फिरता
एका फॅब्रिकेशनच्या दुकानाजवळ आलो. त्याला म्हटलं, 'काम हवंय. काहीही सांगा. करेन.'
त्यानं बिचाऱ्यानं घेतलं ठेवून. त्याच्याकडं काम करायचो. तिथंच रात्री थांबायचो. सकाळी
उठून सारं आवरुन मालक येण्यापूर्वी दुकान व्यवस्थित ठेवायचो. एकदा मालकाला शंका आलीच.
त्यानं मला जरा खडसावून विचारलं. तेव्हा त्याला सारं काही सांगितलं. त्यानं मला रागावून
घरी पाठवलं. तेव्हापासून मग, चांगली नोकरी आहे, असं खोटंच सांगून घरून डबा घेऊन निघायचो
आणि रात्री वेळेत परतायचो, असं काही दिवस केलं. हा माझा नोकरीचा एकमेव अनुभव.
आता
देशातल्या २३ भाषांत डिजिटल शब्दकोष तयार केल्यानंतर आम्ही आता ग्लोबल लँग्वेज हेरिटेजचे
काम हाती घेतलं आहे. आज जगात सुमारे सात हजार भाषा आहेत. त्यापैकी दर चौदा दिवसाला
एक या प्रमाणे भाषा लुप्त होत आहेत. त्या भाषा वाचवण्याचा, त्यांचं संवर्धन करण्याचा
हा आमचा प्रयत्न आहे. भाषा जोडल्या गेल्या की माणसं जोडली जातील आणि त्याद्वारे आपोआपच
सर्व संस्कृतीही जोडल्या जातील, असं माझं मत आहे. त्यासाठीच आम्ही प्रयत्न करत आहोत.
त्याशिवाय नाशिकला होऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतल्या आघाडीच्या
एमआयटीच्या सहकार्यानं आम्ही 'कुंभथॉन' हा प्रकल्प राबवत आहोत. या माध्यमातून अनेक
तरुण कुंभमेळ्याच्या पर्यावरणपूरक व इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं अनेक
उपयुक्त उपक्रम, प्रकल्प राबवित जोडले गेले आहेत.
याठिकाणी
उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनाही माझं असं सांगणं आहे की, आपल्या हातातल्या स्मार्टफोनचा
केवळ चॅटिंगसाठी वापर न करता एक एज्युकेशनल डिव्हाइस म्हणून वापर केला, तर अधिक उपयुक्त
ठरेल. तुम्ही या माध्यमाचा उपयोग करून हवे ते शिक्षण, प्रशिक्षण प्राप्त करून घेऊ शकता.
संधींचे महाद्वार तुमच्यासमोर खुले होईल. त्यामुळे आजचा काळ तर उद्योग व्यवसाय करण्यास
इच्छुक असणाऱ्यांसाठी खरंच सुवर्णकाळ आहे. त्यादृष्टीने स्वतःला तयार करा आणि पूर्ण
निर्धारानिशी त्यात उतरा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा