सोमवार, ९ मे, २०१६

जातिव्यवस्थेच्या व्युत्पत्तीची ठोस फेरमांडणी करणारा महान समाजशास्त्रज्ञ



'भारतीय जातिव्यवस्था' ग्रंथाची शताब्दी


(डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठात 'भारतातील जातीव्यवस्था: त्यांची रचना, व्युत्पत्ती व विकास' या विषयावर शोधनिबंध वाचला, या घटनेला दि. ९ मे २०१६ रोजी शंभर वर्षे पूर्ण होताहेत. यानिमित्त विशेष लेख...) 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठात 'भारतातील जातीव्यवस्था: त्यांची रचना, व्युत्पत्ती व विकास' या विषयावर शोधनिबंध वाचला. त्याला आज बरोबर शंभर वर्षे पूर्ण होताहेत. शंभर वर्षापूर्वी झालेल्या या प्रसंगाचे स्मरण ऐतिहासिक आहे, याचे कारण म्हणजे तोपर्यंत जगभरातील तमाम मानववंशशास्त्रज्ञ व समाजशास्त्रज्ञांनी जातीव्यवस्थेच्या व्युत्पत्तीसंदर्भात मांडलेल्या आणि समाजमान्य बनलेल्या सिद्धांतांना सप्रमाण नाकारुन भारतीय जातीव्यवस्थेच्या व्युत्पत्तीची ठोस फेरमांडणी करण्याचे कार्य डॉ. आंबेडकर यांनी या शोधनिबंधाच्या माध्यमातून केले.
डॉ. ए.ए. गोल्डनवायझर यांच्या मार्गदर्शनाखाली कोलंबिया विद्यापीठाच्या मानववंशशास्त्र सेमिनारमध्ये सादर करण्यासाठी बाबासाहेबांनी अथक अभ्यास व परिश्रमातून 'भारतातील जातीव्यवस्था: त्यांची रचना, व्युत्पत्ती व विकास' हा शोधनिबंध तयार केला. ज्या जातिसंस्थेमुळे अस्पृश्य समाजाला हीन अवस्था प्राप्त झाली, त्या जातिसंस्थेबद्दल संशोधनात्मक मांडणी करण्याची संधी या निमित्ताने बाबासाहेबांनी घेतली. समाजशास्त्र, मानववंशशास्त्र आणि इतिहास या विषयांवरची अक्षरशः शेकडो पुस्तके वाचल्यानंतर त्यांना भारतीय समाजातील जातिव्यवस्थेच्या प्रश्नाच्या संदर्भात चिकित्सक व संशोधकीय दृष्टीकोन प्राप्त झाला होता. विविध धार्मिक ग्रंथ, पुराणांमधून जातींच्या निर्मितीबद्दल अत्यंत कपोलकल्पित कथा मांडलेल्या आहेत, त्यामुळे त्या त्याज्य आहेत, याबद्दल त्यांची खात्री पटलेली होती. त्याचप्रमाणे त्यांच्या आधी भारतीय जातिसंस्थेच्या व्युत्पत्तीच्या अनुषंगाने मांडणी करणाऱ्या प्रो. सिनर्ट, प्रो. नेसफिल्ड, सर एच. रिस्ले आणि डॉ. केतकर यांच्या सिद्धांतांचाही त्यांनी चिकित्सकपणे अभ्यास केला. त्यातून त्यांच्या मांडणीतील अपुरेपण बाबासाहेबांना जाणवले आणि त्यांनी जातिव्यवस्थेच्या व्युत्पत्तीबद्दल अधिक समर्पक मांडणी करण्याचा या शोधनिबंधात प्रयत्न केला. हा शोधनिबंध पुढे मे १९१७मध्ये 'इंडियन अँटिक्वरी' या समाजशास्त्राच्या प्रतिष्ठित मासिकात प्रसिद्ध झाला आणि बाबासाहेबांच्या मांडणीमुळे भारतीय जातिव्यवस्थेकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोनच पालटून टाकला. या शोधनिबंधातील विचारसरणी, विषय मांडण्याच्या प्रगल्भ हातोटीने प्रो. गोल्डनवायझर यांच्यासह सारेच प्रभावित झाले. त्याचप्रमाणे या निबंधातील इंग्रजी इतके अत्युच्च दर्जाचे होते की, त्यातून बाबासाहेबांनी या भाषेवर प्रभुत्व मिळविण्यासाठी केलेल्या धडपडीची प्रचिती येते.
तसे पाहता, बाबासाहेबांच्या वाङ्मयीन वाटचालीमध्ये हा शोधनिबंध म्हणजे आद्यपुष्प. यामध्ये भारतीय जातिव्यवस्थेच्या व्युत्पत्तीचा वेध घेत असताना त्यांना आढळले की, 'Endogamy is the only characteristic that is peculiar to caste.' आणि 'The superimposition of endogamy on exogamy means the creation of Caste.' आर्य, द्रविड, मंगोलियन आणि सिंथियन या लोकांच्या मिश्रणातून भारतीय समाज तयार तयार झाला आणि वन्यावस्थेतून सुधारत जात असताना त्यांच्यात रक्तमिश्रणाची कल्पना अमान्य होत गेली आणि शेवटी जमाती-जमातींमधून बेटीव्यवहार बंद होत गेला. या बेटीव्यवहारबंदीच्या घटना कालपरत्वे दृढ होत गेल्या. परिणामी, निरनिराळे समाज परस्परांपासून विलग झाले; त्यांच्यातील रोटी-बेटी व्यवहार बंद पडला. एका समाजाच्या या कृती व प्रथा पाहून इतर समाजही त्यांचीच री ओढू लागले आणि आज आपणास ज्ञात असलेली जातिव्यवस्था निर्माण झाली, असा या शोधनिबंधाचा सारांश आहे. 'जेव्हा मी जातिव्यवस्थेचा उगम असे म्हणतो, तेव्हा मला बेटीव्यवहारबंदीच्या प्रक्रियेचा उगम म्हणावयाचे आहे, असे समजावे,' इतक्या निःसंदिग्धपणे बाबासाहेब विषयाची मांडणी करतात. जात म्हणजे दुसरे तिसरे काही नसून बंदिस्त वर्गव्यवस्था आहे, असेही प्रतिपादन ते करतात. इतकेच नव्हे, तर सती, सक्तीचे वैधव्य आणि बालविवाह या प्रथांचे मूळही समाजातील अतिरिक्त पुरूष वा अतिरिक्त स्त्रियांचे प्रमाण संतुलित करण्यात असून त्याचा हेतूही बेटीव्यवहारबंदी कायम राखणे हाच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कर्मावर आधारित जातीव्यवस्था विकसित झाली, या प्रचलित म्हणण्याला छेद देताना कर्म नव्हे, तर चातुर्वर्ण्याच्या संकल्पनेमुळे ती अधिक बळकट झाल्याचे बाबासाहेब सांगतात. काहींनी दरवाजे बंद केले, तर काहींना त्यांच्यासाठी दरवाजे बंद केल्याचे आढळले, अशा शब्दांत जातिव्यवस्थेचे मानसशास्त्रीय विश्लेषण ते करतात.
'जाती कशा उत्पन्न झाल्या, याबद्दल जो सिद्धांत मी मांडलेला आहे, तो जर कोणी खोडून काढला, तर मला आनंदच होईल; परंतु या विषयावर यापेक्षाही भरभक्कम सिद्धांत तयार करण्याची माझी महत्त्वाकांक्षा आहे,' असे या शोधनिबंधाच्या अखेरीस बाबासाहेबांनी म्हटले. विशेष म्हणजे ही महत्त्वाकांक्षा भावी जीवनात मोठ्या पराकाष्ठेने त्यांनी पूर्णत्वास नेल्याचे दिसते.
बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेबांना पाठ्यवृत्ती देऊन परदेशात शिक्षणासाठी पाठविताना विचारले होते की, ते परदेशात शिकून पुढे काय करणार?, त्यावर बाबासाहेबांनी, 'मी ज्या समाजातून आलो, त्या समाजाचे दुःख, दैन्य कमी करण्याचे मार्ग, उपाय शोधण्यासाठी मला उच्चशिक्षण घ्यावयाचे आहे,' असे उत्तर दिले होते. मुलाखतीमध्ये केवळ शिष्यवृत्ती मिळविण्यासाठीचे हे उद्गार नव्हते, हे बाबासाहेबांनी त्यांच्या या अभ्यासातून आणि त्यानंतर आयुष्यभर केलेल्या कार्यामधून सिद्ध केले.
'भारतातील जातीव्यवस्था: त्यांची रचना, व्युत्पत्ती व विकास' या शोधनिबंधाचा वेध घेत राहून त्याला आणखी संशोधकीय आयाम प्रदान करण्याचे कार्य बाबासाहेबांनी पुढेही सुरू ठेवले. लाहोर येथील जातपात तोडक मंडळाच्या अधिवेशनासाठी १९३६मध्ये त्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक तयार केलेल्या भाषणात या शोधनिबंधाचा उत्तरार्ध आपल्याला दिसून येतो. 'स्पीच प्रिपेअर्ड, बट नेव्हर डिलिव्हर्ड' असे ज्या भाषणाचे वर्णन केले जाते, आणि आजतागायत ज्याच्या लाखो प्रती खपल्या, त्या 'ॲनिहिलेशन ऑफ कास्ट' अर्थात 'जातिनिर्मूलन' या ग्रंथात बाबासाहेबांनी जातीला कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचे त्याचप्रमाणे जातीव्यवस्था ही श्रमाची नव्हे, तर श्रमिकांची विभागणी असल्याचे ठाम प्रतिपादन केले. जातिनिर्मूलनाचे चार उपायही बाबासाहेब यामध्ये सांगतात. धर्मचिकित्सा, आंतरजातीय विवाह, व्यापक लोकशिक्षण आणि संसाधनांचे फेरवाटप या चतुःसूत्रीच्या बळावरच जातिप्रथेचे समूळ उच्चाटन करता येणे शक्य असल्याचा निष्कर्ष मांडतात. त्याखेरीज स्वातंत्र्य, समता व बंधुता या मानवी मूल्यांची प्रस्थापना अशक्य असल्याचे ते सांगतात.
यानंतरच्या कालखंडातही बाबासाहेबांचे भारतीय जातिव्यवस्थेसंदर्भातील चिंतन अधिक सूक्ष्म पातळीवर सुरूच राहिल्याचे दिसते. सन १९४६मध्ये 'शूद्र पूर्वी कोण होते?' या ग्रंथामध्ये चातुर्वर्णामधील अंतिम वर्ण असलेल्या शूद्रांच्या अस्तित्वाचा सर्वंकष मागोवा घेताना बाबासाहेब 'शूद्र हे पूर्वाश्रमीचे क्षत्रिय' असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचतात. एवढ्यावरच न थांबता मग दुसऱ्या वर्णापासून चौथ्या वर्णापर्यंत ते दर्जाहीन, अवनत का झाले, याचा शोध बाबासाहेब घेतात. या अवनतीचे मूळ हे ब्राह्मण व क्षत्रिय या संघर्षात असल्याचे सप्रमाण सिद्ध करतात.
यानंतर सन १९४८मध्ये या विषयाचा आणखी खोलात जाऊन वेध घेताना बाबासाहेबांनी 'अस्पृश्य मूळचे कोण आणि ते अस्पृश्य का बनले?' या ग्रंथाची रचना केली. 'शूद्र पूर्वी कोण होते?' या ग्रंथाचा हा सिक्वेल अर्थात पुढील भाग असल्याचे त्यांनी प्रस्तावनेच्या सुरवातीलाच स्पष्ट केले आहे. चौथ्या वर्णाच्या पलिकडे म्हणजे वर्णव्यवस्थेत स्थान नसलेल्या वर्णबाह्य लोकांचा विटाळ मानण्याच्या संकल्पनेचा वेध यात बाबासाहेब घेतात. 'ब्रोकन मेन' अर्थात जीत आणि जेते यांच्यातील संघर्षाचा अभिनव सिद्धांत त्यांनी यात मांडला आहे. बौद्धवादी आणि ब्राह्मण्यवादी यांच्यातील पराकोटीच्या संघर्षाचे फलित म्हणजे अस्पृश्यता असल्याची मांडणी बाबासाहेबांनी केली आहे. साधारण इसवी सन ४००पासून ही अस्पृश्यता प्रस्थापित झाल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे.
भारतीय जातिव्यवस्थेची इतकी तपशीलवार मांडणी अगर वेध बाबासाहेबांइतका अन्य कोणीही घेतल्याचे दिसून येत नाही. या मांडणीचा कालावधी प्रदीर्घ असला तरी एका समान सूत्रात ती गुंफली आहे. या सूत्रातील अखेरचा कळसाध्याय म्हणजे बाबासाहेबांचा 'बुद्ध आणि त्याचा धम्म' हा ग्रंथ होय. जातिव्यवस्थेचा वेध घेता घेता त्यावरील अंतिम उपाय म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मानवी मूल्ये होय. ही मूल्ये बाबासाहेबांना भगवान बुद्धाच्या बौद्ध धम्मात आढळली आणि त्यातूनच त्यांनी धम्माचा स्वीकार केला. भारतीय समाजावरील अस्पृश्यतेचा कलंक मिटविण्याचे ध्येय उराशी बाळगून या जातिप्रथेचा वेध घेता घेता तिच्या निर्मूलनासाठी कृतीशील समर्पक उपाय त्यांनी शोधलाच, पण त्याचा अंगिकारही केला, हे बाबासाहेबांमधील संशोधकाचे खरे यश आहे. हा लाभ केवळ स्वतःपुरता अगर आपल्या समाजापुरता मर्यादित न राखता राज्यघटनेच्या माध्यमातून अखिल भारतीय समाजाला बाबासाहेबांनी बुद्धाच्या मानवी मूल्यांची देणगी प्रदान केली, हे त्यांचे भारतीय समाजावर थोर उपकार आहेत.
एकीकडे 'भारतीय जातिव्यवस्था' या पुस्तकाची शताब्दी साजरी करीत असताना आणि त्याच्या मांडणीतील प्रस्तुतता अधोरेखित करीत असताना दुसरीकडे एकच प्रश्न मनी उभा राहतो, तो म्हणजे 'भारतीय जातिप्रथे'ची शंभरी कधी भरणार?'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा