सोमवार, १ ऑगस्ट, २०१६

स्मार्ट एज्युकेशन फॉर ऑल!('दै. सकाळ'च्या कोल्हापूर आवृत्तीचा आज ३६ वा वर्धापन दिन! या निमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या 'स्मार्ट लाईफ' या विशेष पुरवणीत प्रसिद्ध झालेला लेख 'दै. सकाळ'च्या सौजन्याने माझ्या ब्लॉग वाचकांसाठी येथे पुनर्प्रकाशित करीत आहे.- आलोक जत्राटकर)
 


डिजीटल क्रांतीमुळे आपल्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडून आलेले आहेत. मानवाचे राहणीमान उंचावण्यासाठी डिजीटल तंत्रज्ञान मोठे योगदान देत आहे. या डिजीटल तंत्रज्ञानाची लाभार्थी विशेषत्वाने तरुण पिढी आहे. या पिढीच्या जीवनाच्या प्रत्येक घडामोडीत डिजीटल तंत्रज्ञानाचा सहभाग अधिकाधिक दृगोचर होताना दिसतो आहे. तरुणांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा हा साहजिकच शिक्षणामध्ये व्यतित होतो. त्यामुळे माहिती व संवादाधारित तंत्रज्ञान (आय.सी.टी.) शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनच्या पलिकडे जाऊन पारंपरिक अध्ययन-अध्यापन प्रणालीचे स्वरुप पालटण्यामध्ये या नवतंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
भारत हा नजीकच्या पाच वर्षांत सर्वाधिक तरुण लोकसंख्येचा देश असणार आहे. या डेमोग्राफिक डिव्हीडंडचा लाभ उठवायचा असेल, तर ही तरुण पिढी ज्ञानसंपन्न, कौशल्यसंपन्न असण्याबरोबरच त्यांना आवश्यक करिअर संधी उपलब्ध करण्याची जबाबदारी आजच्या वर्तमानावर आहे. त्यासाठी स्मार्ट तंत्रज्ञानाचा अवलंब करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, शैक्षणिक बाबतीतली माहिती व ज्ञानाच्या अनुषंगाने निर्माण होणारी ग्रामीण, निमशहरी आणि शहरी ही दरी सांधण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे. ही जबाबदारी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्र आणि त्यात कार्यरत धुरिणांवर आहे.
आज माहिती व डिजीटल क्रांतीमुळे इंटरनेटच्या माध्यमातून माहितीचा खजिना विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. तथापि, या माहितीच्या भडिमारातून हाती काय लागणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या माहितीचे प्रोसेसिंग करून त्याचे ज्ञानात रुपांतर करून विद्यार्थ्यांना सादर करणारे शिक्षक आणि या प्रोसेसिंगची सवय लावून घेऊन अधिकाधिक अद्ययावत ज्ञान आत्मसात व निर्माण करण्याची सवय असणारे विद्यार्थी निर्माण होणे हे या आयसीटी आधारित अध्ययन-अध्यापन प्रक्रियेमध्ये अपेक्षित आहे.
डेस्कटॉप पीसीच्या पलिकडे आता पर्सनल कम्प्युटिंग, स्मार्टफोन्स, क्लाऊड कम्प्युटिंग, व्हर्च्युअल क्लासरुम अशा पारंपरिक शिक्षण प्रक्रियेला छेद देणाऱ्या किंवा अधिक पूरक असणाऱ्या म्हणू या, या स्मार्ट बाबींचा आपल्या शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक शिरकाव झालेला आहे. त्यांच्यापासून आपण अजिबात दूर राहू शकत नाही, त्यामुळे त्यांचा स्वीकार करून विद्यार्थ्यांपर्यंत त्यांचे लाभ पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. या गोष्टी कशा प्रकारे करता येऊ शकतील, याचा साकल्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.
यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे उत्तम दर्जाचा अभ्यासक्रम अथवा स्टडी कन्टेन्ट तयार करणे होय. केवळ क्लासरुम टिचिंग किंवा लेखनाच्या पलिकडे जाऊन आज ग्राफिक्स, डिझाईनिंग, ॲनिमेशन, ऑडिओ-व्हिज्युअल्स आदींच्या सहाय्याने संबंधित विषय अधिक परिणामकारकपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कन्टेन्ट निर्मिती करणे ही बाब महत्त्वाची आहे. हा कन्टेन्ट विद्यार्थ्यांना त्यांच्या पीसी, लॅपटॉप, स्मार्टफोन्स अशा कोणत्याही माध्यमाद्वारे ॲक्सेस करता आला पाहिजे. म्हणजे पारंपरिक शिक्षणात अभिप्रेत असलेल्या क्लासरुम टिचिंगच्या पुढे जाऊन कुठेही आणि कधीही शिक्षणाचा अभिनव प्रकार स्मार्ट तंत्रज्ञानामुळे जन्मला आहे. हो, अशा व्यक्तीगत शिक्षणासाठी आवश्यक साधनांची उपलब्धता प्रत्येक विद्यार्थ्यासाठी करण्याची जबाबदारी मात्र आपल्याला, आपल्या यंत्रणेला पेलावी लागणार आहे. देशातल्या प्रत्येक सामाजिक-आर्थिक स्तरामधील विद्यार्थ्याचा विचार करूनच धोरणांची आखणी करावी लागणार आहे, ही पूर्वअट याठिकाणीही लागू होतेच, हे लक्षात घ्यायला हवे.
या स्मार्ट शिक्षण प्रक्रियेत एक महत्त्वाची गोष्ट घडून येऊ शकते, ती म्हणजे व्यक्तीशः विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांकडे लक्ष पुरविता येऊ शकणे, ही होय. वर म्हटल्याप्रमाणे भारतासारख्या देशामध्ये विविध सामाजिक-आर्थिक स्तरातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात सामील होत असतात. यातील बहुसंख्य हे प्रथमच शिकणारे असतात. पारंपरिक शिक्षणामध्ये या प्रत्येकाकडे व्यक्तीशः लक्ष देणे कदाचित शक्य नसते. तथापि, स्मार्ट टीचिंग-लर्निंग प्रक्रियेत या विद्यार्थ्याची अभ्यासाची गती, त्याची गरज आणि त्याची प्रगती यावर लक्ष ठेवून त्याला अधिक सक्षम करण्याकडे लक्ष पुरविता येऊ शकते. त्याचप्रमाणे संबंधित विद्यार्थीही आपल्या प्रगतीची दशा पाहून तिची गती आणि दिशा निश्चित करू शकेल.
क्लाऊड कम्प्युटिंगची सुद्धा स्मार्ट टीचिंग-लर्निंग प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. पीसी, लॅपटॉप किंवा स्मार्टफोन्समधील जागा न अडवता इंटरनेटच्या माध्यमातून क्लाऊडवर माहिती ठेवून ती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्यास अधिक उपयुक्त ठरते. मात्र, याठिकाणी इंटरनेटचा ॲक्सेस आणि गती या बाबी महत्त्वाच्या ठरतात.
शिक्षकांनी क्लासरुमव्यतिरिक्तही विद्यार्थ्यांना आवश्यक अभ्यासक्रमाची, कन्टेन्टची निर्मिती करून त्यांना ऑनलाइन उपलब्ध करून देणे या प्रक्रियेत महत्त्वाचे आहे. विद्यार्थी या कन्टेन्टचा अभ्यास करून वर्गात येतील. त्यावर त्यांचे चिंतन झालेले असेल, त्यांनी पूरक अन्य माहितीचा अभ्यास केला असेल आणि वर्गामध्ये या अभ्यासाच्या अनुषंगाने मंथन होणे या नवव्यवस्थेत अभिप्रेत आहे. विद्यार्थ्यांना पूरक आणि अद्यावत ज्ञान मिळविण्यासाठी, प्रदान करण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षक या दोन्ही घटकांच्या बाजूने प्रयत्न केले जाणे आवश्यक आहे. या स्मार्ट शिक्षण प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना त्यांचा स्मार्ट ऑनलाइन पोर्टफोलिओ निर्माण करणे आणि शिक्षकांकडून त्याचे नियमित मूल्यमापन करणेही सोपे व शक्य होणार आहे, ही सुद्धा यातील महत्त्वाची बाब आहे.
स्मार्ट टीचिंग-लर्निंग प्रक्रिया ही केवळ एखाद्या शिक्षण संस्थेच्या चार भिंती किंवा खोल्या यांच्यापुरतीच मर्यादित आहे, असे मानण्याचे कारण नाही. आज एखाद्या व्यक्तीला, तो लौकिकार्थाने विद्यार्थी नसला तरी त्याच्या आवडीच्या विषयाचे शिक्षण ऑनलाइन घेण्याचे अनेक ऑप्शन उपलब्ध आहेत. केवळ राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांमधील तज्ज्ञांकडून त्याला हे शिक्षण घेता येऊ शकते. एखाद्या विद्यार्थ्याला एखादे विशिष्ट कौशल्य आत्मसात करावयाचे असेल, तर त्याच्यासाठी हे कौशल्य शिकविणारे अनेक ऑनलाइन पर्याय उपलब्ध आहेत. अनेक क्षेत्रांमधील तज्ज्ञांचे त्यांच्या क्षेत्रांमधील अनुभवावर आधारित ऑडिओ-व्हिज्युअल्स उपलब्ध आहेत.
अभ्यासक्रमांच्या बाबतीत बोलायचे झाले तर पारंपरिक शिक्षण पद्धती आता हळूहळू कालबाह्य होत जाऊन तिची जागा आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम निश्चितपणे घेतील, असे वातावरण आहे. व्हर्च्युअल क्लासरुममुळे कोणत्याही ठिकाणावरील विद्यार्थ्याला शिकविणे शक्य झाले आहे. याखेरीज 'मूडल' (MOODLE)च्या माध्यमातून उपलब्ध असणारे मोफत, ओपन-सोर्स ऑनलाइन अभ्यासक्रम, मूक (MOOC) सारखे मॅसिव्ह ओपन, ऑनलाइन अभ्यासक्रम आदींमुळे शिक्षण अधिकाधिक खुले आणि प्रवाही होते आहे. शिक्षण खऱ्या अर्थाने अमर्याद आणि विशाल होते आहे, ते या स्मार्ट व नवतंत्रज्ञानाचे आयाम लाभल्यामुळे! त्याला पूरक असे व्हर्च्युअल डिस्कशन/ लर्निंग फोरमसुद्धा उपलब्ध आहेत. गरज आहे ती त्यांचा डोळसपणे लाभ घेण्याची आणि उपलब्ध माहितीचे ज्ञानात रुपांतर करून त्याचा स्वतःसाठी, स्वतःच्या देशासाठी आणि ग्लोबल कम्युनिटीच्या भल्यासाठी वापर करण्याची!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा