(माझे पत्रकारितेमधील ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. प्रवीण बर्दापूरकर सर यांनी यंदा 'उद्याचा मराठवाडा' या दैनिकाच्या दिवाळी अंकाचे संपादकपद भूषविले. या 'नवोन्मेषपर्व' अंकात सरांनी महाराष्ट्रामधील आश्वासक तरुण नेतृत्वांच्या वाटचालीचा वेध घेतला आहे. बर्दापूरकर सर आणि संपादक श्री. राम शेवडीकर या दोघांच्या प्रेमळ आग्रहामुळे कोल्हापूरचे युवा नेतृत्व श्री. सतेज पाटील यांच्याविषयी या अंकात लिहीता आले. हा लेख 'उद्याचा मराठवाडा'च्या सौजन्याने माझ्या ब्लॉगवाचकांसाठी शेअर करीत आहे.- आलोक जत्राटकर)
सतेज पाटील तथा ‘बंटी’ या लाडक्या संबोधनानंच
ज्यांना लोक ओळखतात, त्या बंटी पाटलांशी माझा थेट परिचय आहे म्हणावा, तर तसं काही
नाही. ते मला अपरिचित आहेत, असं म्हणावं तर तसंही नाही. याचं कारण असं की, माझ्या
पत्रकारितेच्या दिवसांपासूनच नव्हे, तर अगदी विद्यार्थी दशेपासून मी या माणसाला
फॉलो करतोय. फॉलो करतोय, म्हणण्यापेक्षाही त्यांना ‘इग्नोर’ करणं शक्य नव्हतं, असं
म्हणणं अधिक योग्य ठरेल. कोल्हापूरमध्ये कदाचित दिग्विजय खानविलकर यांच्यानंतर
प्रचंड म्हणावा, असा लोकसंग्रह जमविणारा नेता म्हणून उल्लेख करावयाचा झाला, तर
त्यात बंटी पाटील यांचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल.
राजकारणातलं ‘दादा’ व्यक्तीमत्त्व असणाऱ्या डॉ.
डी.वाय. पाटील यांचा समृद्ध वारसा लाभलेल्या बंटी यांनी त्यांची कारकीर्द मात्र
केवळ त्या वारशावर विकसित न करता स्वतंत्रपणानं केली, हे त्यांचं वैशिष्ट्य
म्हणावं लागेल. विद्यार्थी चळवळी करता करता घरच्या काँग्रेसी संस्कारातून एक
अत्यंत संतुलित व समंजस कारकीर्द बंटी यांनी घडविली आहे. त्यांच्या राजकारणाला
आक्रमकतेची धार नाही, असं नाही; मात्र, त्या धारेला सुसंस्कृतपणाचं कोंदण लाभलं आहे, हे
महत्त्वाचं!
सतेज पाटील यांच्या राजकीय वाटचालीचा आलेख
रेखाटणं, हा मुळातच माझ्या लिखाणाचा हेतू नाही, तो कोल्हापूरच्या महानगरपालिका,
जिल्हा परिषद, गोकुळ, राजाराम कारखाना आणि महाराष्ट्र विधिमंडळाच्या पानापानांवर
रेखाटलेला आहेच. या राजकारणाच्या पलिकडं जाऊन बंटी यांच्या व्यक्तीमत्त्वाला
असणाऱ्या विविध कंगोऱ्यांमधून त्यांची एक विशिष्ट प्रतिमा निर्माण झालेली आहे, ती
मला महत्त्वाची वाटते.
खरं तर राज्याच्या राजकारणात, समाजकारणात आणि
सहकार क्षेत्रातील वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शरद पवार, राजारामबापू पाटील,
रत्नाप्पाण्णा कुंभार, डी.वाय. पाटील आदींची एक मोठी कर्मयोग्यांची फळी निर्माण
झाली. त्यानंतर राजकीय पटलावर उदयास आलेल्या विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, आर.आर.
पाटील, जयंत पाटील यांच्यासारख्या उच्चशिक्षित व सुसंस्कृत पिढीचे वारसदार म्हणून
बंटी पाटील यांचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल. डी.वाय. दादांच्या राजकीय,
सामाजिक व शैक्षणिक कार्याचा वारसा सांभाळत असताना त्याला त्यांनी स्वतःचा म्हणून
एक वेगळा 'सतेज'स्पर्श देण्याचं काम केलं. एखाद्या मोठ्या
व्यक्तीच्या घरात जन्मलेल्या मुलांमध्ये आत्ममग्नता, तुटलेपणा किंवा इतरांना कमी
मानण्याची भावना निर्माण होण्याची शक्यता असते. मात्र बंटी यांनी लहानपणापासूनच
घराचा उंबरठा ओलांडून समाजात वावर राखल्याने या बाबतीत ते वेगळेपण जपून आहेत. हाती
घेतलेले काम प्रमाण मानून ते तडीस नेण्यासाठी हरेक प्रकारे ते प्रयत्नरत राहतात.
किंबहुना, आपल्या वारशाची जाणीव सदोदित मनी बाळगून त्यांनी आपलं काम चालवल्याचं
त्यांच्या कृती व उक्तीमधून प्रत्ययास येत राहतं.
अत्यंत
सुजाण, समंजस, सुसंस्कृत आणि
अभ्यासू नेतृत्व बंटी पाटील यांच्या रुपानं
कोल्हापूरसह पश्चिम
महाराष्ट्राला लाभलेलं आहे. हाती
घेतलेल्या कोणत्याही कार्याला, प्रकल्पाला
अभ्यासाची जोड देऊन त्याला यशाची चढती कमान प्राप्त करून देण्याचं कसब त्यांनी प्रयत्नपूर्वक साध्य केलं आहे. त्यांचं
राजकारण कन्व्हिन्सिंग आहे, विश्वासपात्र आहे. मित्र-कार्यकर्त्यांना विश्वासात
घेतल्याखेरीज निर्णय न घेण्याचा त्यांचा स्वभाव हा कोल्हापूरच्या स्थानिक
राजकारणात खूप वेगळा आहे. कोल्हापूरचं स्थानिक राजकारण गट आणि मोटबांधणीच्या
दावणीला बांधलं गेल्याचं चित्र होतं. नगरसेवकांची पळवापळवी आणि निवडून आल्यानंतर
मोठ्या प्रमाणात घोडेबाजार भरवून त्या मोटबांधणीतून इथल्या राजकारणाची दिशा, दशा व
दुर्दशा ठरत असे. हे चित्र अलीकडच्या काळात सर्वप्रथम बदललं ते बंटी यांनीच.
गटावरुन पक्षीय पातळीवर नेऊन स्थानिक राजकारणाला एक विशिष्ट दर्जा प्राप्त करून
देण्याचं आणि महत्त्वाचं म्हणजे इथं पारंपरिक पद्धतीनं सुरू असलेल्या घोडेबाजाराला
बऱ्याच अंशी खीळ घालण्याचं आणि येथील स्थानिक राजकारणाला एक किमान प्रतिष्ठा
प्राप्त करून देण्याचं श्रेय बंटी यांना द्यावं लागेल.
बंटी यांचा मला सर्वाधिक आवडणारा पैलू म्हणजे
त्यांचं फायटिंग स्पिरीट. निवडणुकीत पराभव जरी पत्करावा लागला तरी त्याचं दुःख
कुरवाळत न बसता हा युवा नेता दुसऱ्या दिवशी आपल्या मित्र- कार्यकर्त्यांच्या
गराड्यात हजर असतो. तिथं मग पराभवाचं विश्लेषण करून पुढची रणनीती आखून लगोलग कामाला
सुरवात करण्याचा त्यांचा स्वभाव त्यांच्या उमेदीची साक्ष देणारा आहे. अगदी
१९९९पासूनचंच उदाहरण घेतलं तरी हे पटण्यासारखं आहे. १९९९मध्ये काँग्रेसकडून
अपेक्षित असणारी उमेदवारी ऐनवेळी मिळाली नाही, तरी बंटी शांत बसले नाहीत. सन
२००४च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी कार्यकर्त्यांच्या बांधणीला सुरवात
केली. केवळ मतदारसंघातलेच नव्हे, तर बावड्याच्या आसपासच्या आणि कोल्हापूर
परिसरातील खेडोपाड्यातल्या युवा कार्यकर्त्यांमध्ये त्यांनी जाणीवपूर्वक वावर
वाढवला. मात्र, त्या त्यांच्या वावरामध्ये ओढूनताणून आणलेली कृत्रिमता नव्हती. या
नैसर्गिकतेची मूळं त्यांच्या बावड्यातल्या राधेय ग्रुपच्या युथ कट्ट्यानंच
त्यांच्यात रुजवलेली होती. बावड्यातला हा युथ कट्टा म्हणजे दररोज सायंकाळी भरणारा
बंटी यांचा खुला दरबारच जणू. तिथं येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांशी संवाद साधण्याचा,
वाढवण्याचा एक प्रघातच बंटी यांनी पाडलेला. लोकांच्या अडचणींबाबत चर्चा करणं, त्या
सोडविण्याचे उपाय ठरवणं आणि त्या दिशेनं काम करणं, हा त्यांच्या दैनंदिनीचा भाग
होता. सर्वांच्या आनंदात सहभागी होणं आणि दुःखाच्या क्षणी सावरण्यासाठी, मदतीचा
हात देण्यासाठी सर्वांच्या पुढं राहणं, हा त्यांचा स्थायीभावच बनून गेला. कागलचे
विक्रमसिंहराजे घाटगे यांनी त्यांच्या या स्वभावाला दिलेली एक कॉम्प्लिमेंट अत्यंत
बोलकी आहे. राजे म्हणायचे की, ‘हा माणूस सकाळी एखाद्या अंत्ययात्रेत दिसतो, दुपारी लग्नात
असतो. सायंकाळी सार्वजनिक समारंभात तर रात्री कुणाच्या तरी वाढदिवसाला शुभेच्छा
देण्यासाठी उपस्थित असतो.’ त्यांचा मोबाईल नेहमी सुरूच असतो आणि त्या मोबाईलसारखे त्यांचे नेटवर्कही
लोकांच्या समस्यांना भिडण्यासाठी सतत कार्यरत असते. स्वतः टेक्नोसॅव्ही असणारे
बंटी नव्या पिढीशी कनेक्ट होण्यासाठी सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्म्सचा
प्रभावी वापर करताना दिसतात.
भेटायला येणाऱ्या गरजूंची आस्थेवाईकपणे चौकशी
करून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी 'आऊट ऑफ द वे' जाऊन विचार व प्रयत्न
करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. 'अजिंक्यताऱ्या'वरच्या साऱ्या फौजफाट्याला त्यांच्या तशा सूचनाच
आहेत. विविध पातळीवर सुटू शकणारे प्रश्न, त्या त्या पातळीवर सोडविण्यासाठी त्यांची
टीमही त्यांच्या निर्देशानुसार सातत्यानं कार्यरत असते. ते सत्तेत असताना हे
प्रमाण साहजिकच अधिक होतं, पण आज सत्तेबाहेर असूनही त्यांच्या कामाचा झपाटा आहे
तोच आणि तसाच आहे. काही माणसं सत्तेत असली काय किंवा नसली काय, त्यांचं सामाजिक
आणि राजकीय कार्य हे त्यांच्या पद्धतीनं सुरूच असतं. बंटी हे या कॅटेगरीत मोडणारं
रसायन आहे. आजही गणेश मंडळांपासून ते विविध उपक्रमांना उपस्थित राहण्याचा त्यांचा
प्रघात कायम आहे.
बंटी यांच्या आणखी एका गुणवैशिष्ट्याचा मला या
ठिकाणी उल्लेख करावा लागेल, ते म्हणजे सौ. प्रतिमावहिनींना त्यांनी ज्या पद्धतीनं
सामाजिक कार्य करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे, ते खूप महत्त्वाचं आहे. बंटी पाटील
यांच्या बाबतीत प्रतिमा वहिनींनी विविध उपक्रमांतून महिला संघटनाचं चालवलेलं काम अत्यंत
उपयुक्त ठरलं आहे. महिला सक्षमीकरणाबरोबरच स्थानिक कला, संस्कृती, उद्योग,
व्यवसाय, कौशल्य विकास, पर्यावरणपूरकता, आरोग्य रक्षण असे अनेक सामाजिक उपक्रम
प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअर, सतेज यूथ फाऊंडेशन, गृहिणी महोत्सव, सतेज यूथ
फेस्टिव्हल अशा व्यासपीठांवरुन नियमितपणे चालविले जाताहेत. त्या व्यासपीठांवर हे
दांपत्य पूर्ण वेळ उपस्थित राहून लोकांशी सातत्यानं संवाद साधत असतं.
बंटी यांना इतक्या वर्षांमध्ये मी कधीही
संत्रस्त अथवा दुर्मुखलेलं पाहिल्याचं स्मरत नाही. एक सुहास्य सदोदित त्यांच्या
चेहऱ्यावर विलसत असतं. त्यामुळं त्यांना भेटणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्याबद्दल
आपुलकी निर्माण होते. ही क्वालिटी जपली होती, ती विलासरावांनीच. लॉबीमधून जाता
जाता सुद्धा समोर उभ्या असलेल्याकडं पाहून हसणं, त्याची चौकशी करणं, अभिवादन करणं किंवा
अगदीच ओळखीचा व्यक्ती असला तर त्याच्या खांद्यावर, पाठीवर हात ठेवून आवर्जून
विचारपूस करणं, ही विलासरावांची शैली माणसाला पागल करणारीच होती. मुख्यमंत्र्यांनी
दिलेला हा भाव, खरोखरीच त्या माणसाचा इतरांच्या मनातला भाव वधारण्यास आणि
विलासरावांविषयीचाही भक्तीभाव वाढविण्यास कारणीभूत ठरत असे. याच विलासरावांनी बंटी
यांच्या धडपडीची दखल घेत ‘सबसे तेज सतेज’ असे जाहीर कौतुकोद्गार काढून त्यांची पाठ थोपटली होती. आर.आर. आबांची मेमरीही
तशीच. एकदा माणूस भेटला की, तो कायमच आबांचा होऊन जाई, इतकं ते त्याला आपलंसं
करीत. सतेज यांच्यामध्ये मला ही क्वालिटी आढळते आणि या दोन दिवंगत नेत्यांची आठवण
त्यांच्यामुळं माझ्या मनात चाळवते.
मी मंत्रालयात होतो, त्या काळातला एक किस्सा आता
इथं शेअर करायला हरकत नाही. बंटी त्यावेळी आमदार होते. आमच्या एका वरिष्ठ सहकाऱ्याकडून
त्यांचा आम्हाला निरोप आला की, कोल्हापूर जिल्ह्यातील जेवढे म्हणून काही अधिकारी-कर्मचारी
असतील, त्या सर्वांचं एक छोटेखानी गेट टुगेदर बंटींनी आयोजित केलंय. यात वरिष्ठ
अधिकाऱ्यांपासून ते अगदी ड्रायव्हर, शिपाई अशा सर्वांचा समावेश होता. तत्पूर्वी,
मराठवाडा-विदर्भातल्या अधिकाऱ्यांचं संघटन वगैरे बाबी अगदी नियमित म्हणाव्यात, अशा
पद्धतीनं झालेल्या होत्या. मंत्रालयात तिथल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्याही
लक्षणीय. पण पश्चिम महाराष्ट्रातल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचं प्रमाण हे अलिकडच्या
काळात वाढू लागलेलं. त्यामुळं बंटी यांनी आम्हा जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांसाठी
भरवलेलं हे तसं पहिलंच गेट टुगेदर होतं, असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. या
निमित्तानं आम्हालाही आपल्या भागातले किती आणि कोण कोण अधिकारी-कर्मचारी तिथे
आहेत, ते समजलं. एकमेकांच्या ओळखी झाल्या. मंत्रालयात येताना आमच्यातला प्रत्येक
जण एकट्यानं रुजू झालेला. पण, आपल्या भागातले इतके लोक भेटल्यानं एक वेगळ्या
प्रकारचा आत्मविश्वास, दिलासा आम्हा साऱ्यांच्या मनात त्यावेळी दाटून आला. बऱ्याच
लोकांशी त्यानंतरच्या काळात मैत्रही जमलं. आम्ही सारेच काही बंटी यांचे मतदार
होतो, अशातला भाग नव्हता. पण, त्यांनी त्यावेळी आम्हाला दिलासा दिला की, कोणतीही
अडचण असो, काही काम असो, माझ्या कार्यालयाचे दरवाजे सदैव आपल्यासाठी खुले असल्याचं
त्यांनी सांगितलं. ही मोठी गोष्ट होती. आम्हाला कधी गरज पडली नाही, पण, पडली
असतीच, तर आपला एक हक्काचा माणूस इथं असल्याचा विश्वास मनात निर्माण झाला.
गृह राज्यमंत्री पदाच्या कारकीर्दीत सुद्धा आपण
सदैव पोलीसांसमवेत आणि त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास त्यांनी पोलीस दलात
निर्माण केला. विधिमंडळातील त्यांची अभ्यासपूर्ण निवेदने त्याची साक्ष देतात. विशेषतः
अन्न व औषध प्रशासन मंत्री या नात्यानं गुटखाबंदीच्या अनुषंगानं त्यांनी सभागृहात
केलेलं भाषण मला आजही स्मरतं. गुटखा उत्पादकांच्या, उद्योजकांच्या रोषाला सामोरं
जावं लागणार, याची जाणीव असूनही त्यांनी ज्या पोटतिडकीनं गुटखा बंदीच्या निर्णयाला
सभागृहानं समर्थन देण्याचं आवाहन केलं, त्याला तोड नाही. ३१ डिसेंबरच्या रात्री बंदोबस्तावर
तैनात पोलीसांना रात्र-रात्रभर फिरून बिस्कीटांची पाकिटं वाटून त्यांचा
कुटुंबप्रमुख म्हणून काळजी वाहणारा मंत्री पोलीस खात्यानं आणि जनतेनंही बंटी
यांच्या रुपानं प्रथमच पाहिला. गृह राज्यमंत्री असतानाच एका प्रवासादरम्यान
पुणे-बेंगलोर महामार्गावर झालेल्या एका अपघातातील जखमींना स्वतःच्या गाडीतून थेट
हॉस्पिटलपर्यंत त्यांनी पोहोचवलं. बंटींच्या मानवी संवेदनशीलतेचीच प्रचिती देणारा
हा प्रसंग. लोक प्रश्न घेऊन आले की आपल्या केबीनमधून निघून तडक संबंधित मंत्री
किंवा थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनाकडं धाव घेणारा असा हा मंत्री. विभागाच्या
प्रश्नांच्या संदर्भातही विभागातले मुश्रीफ साहेबांसारखे अन्य मंत्री आणि आमदार
यांची मोट बांधून संबंधित प्रश्नाचा पाठपुरावा करण्यातही बंटींचा पुढाकार असे.
बंटी यांच्या पाठपुराव्याचं भक्कम उदाहरण म्हणजे
कोल्हापूरच्या थेट पाईपलाईनचा प्रश्न. कोल्हापूर शहराला स्वच्छ व मुबलक पाणी
मिळावं, यासाठी काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईन व्हावी, हे स्वप्न शहरवासीयांनी
४० वर्षं उराशी बाळगलेलं. २०१०च्या महानगरपालिका निवडणुकीदरम्यान झालेल्या एका
सभेत बंटींनी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासमोरच ‘थेट पाईपलाईन योजनेला
मंजुरी मिळाली नाही, तर २०१४ची विधानसभा निवडणूक लढविणार नाही,’ अशी चकित करणारी घोषणा
केली. त्यांच्या पाठपुराव्यामुळंच थेट पाईपलाईन योजनेला पुढं केंद्र सरकारची
मंजुरी मिळाली.
मुळात बंटी यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरवात
झाली ती १९९२ साली. ‘एन.एस.यू.आय.’च्या माध्यमातून ते शिवाजी विद्यापीठाच्या स्टुडंट कौन्सिलचे चेअरमन म्हणून
बिनविरोध निवडून आलेले. याच काळात त्यांनी विद्यार्थी हिताच्या अनेक प्रश्नांत
लक्ष घालून ते सोडविलेले. यूथ फेस्टीव्हलच्या खर्चात बचत करून मुख्यमंत्री मदत
निधीसाठी एक लाख रुपये त्यांनी दिल्याचं मला आठवतं. स्वतः विद्यार्थी नेता
असल्यापासून विद्यार्थ्यांची काळजी वाहणारा बंटी यांच्यातला तो पिंड आजही कायम
आहे. गोरगरीब घरातल्या दहावी- बारावीत उत्तुंग यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या
घरी सर्वात आधी पोहोचून त्या विद्यार्थ्याचं अभिनंदन करण्यात बंटी पुढं असत.
त्यावेळीही बंटी यांचं नेटवर्क असं होतं, की अशा विद्यार्थ्यांची माहिती आम्हा
पत्रकारांच्या आधी कित्येकदा त्यांच्याकडे असे. त्यामुळं आम्ही आमच्या नेटवर्कमधून
अशा विद्यार्थ्यांची माहिती घेतली तरी बंटी कोणा-कोणा विद्यार्थ्याला भेटतात,
इकडंही आमचं लक्ष असायचं. या जाणीवेतूनच पुढं वाढदिवसाला हार-तुरे, पुष्पगुच्छ न
स्वीकारता त्याऐवजी वह्या संकलित करण्याचा विधायक उपक्रम बंटी यांनी सुरू केला.
गेल्या अकरा वर्षांत त्यांच्या या उपक्रमातून जमलेल्या ५० लाखांहून अधिक वह्यांचा
दहा लाखांहून अधिक गरजू विद्यार्थ्यांना लाभ झालेला आहे. हा उपक्रम आता इतका सेट
झाला आहे की, बंटी यांना आता वाढदिवसाला वह्या घेऊन यायला लोकांना सांगावंही लागत
नाही. ही सवय आता लोकांच्या अंगवळणीच पडली आहे. या उपक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ
रेकॉर्ड्स आणि वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया यांतही झाली आहे, हे विशेष! त्यांच्या सामाजिक
बांधिलकीचं आणखीही एक उदाहरण देता येईल. बंटी यांचे वडील डॉ.डी.वाय. पाटील यांनी
त्यांच्या आमदारकीच्या प्रचारादरम्यान गगनबावड्यासारख्या अतिदुर्गम भागात साखर
कारखाना उभारण्याचं वचन लोकांना दिलं होतं. बंटी यांनी हे वचन निभावण्यासाठी या
भागात गावोगावी फिरुन शेअर्स गोळा केले आणि कारखाना उभारला. आज ते या कारखान्याचे
चेअरमन आहेत. या साखर कारखान्यामुळं गगनबावडा तालुक्याच्या अर्थकारणाला गती
मिळालीय. सुजाण नेतृत्वानं पुढाकार घेतला तर नागरिकांमध्ये चांगला उपक्रम सहजगत्या
रुजवता येतो, त्याला इच्छाशक्तीची जोड मात्र असावी लागते, हेच या उदाहरणांतून
निदर्शनास येतं. सामाजिक जाणिवेनं प्रेरित अशी उदाहरणं राज्यातच नव्हे, तर देशभरात
निर्माण होण्याची गरज आहे. या देशात विधायक कामांत लोकसहभाग आणि लोकांचा पाठिंबा
मिळवायचा तर राजकीय इच्छाशक्ती हा त्यांतला अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याचं
वेळोवेळी सिद्ध झालं आहे.
असो! विषय
बंटी पाटलांचा आहे. दिग्विजय खानविलकर यांच्यासारख्या दिग्गज आणि लाडक्या नेतृत्वाचा पराभव करून
आमदार होत असताना जिल्ह्याच्या प्रचलित राजकारणाची बरीचशी समीकरणं बंटी यांनी
बदलली. दिग्विजय यांनी त्यांच्या आरोग्यमंत्री पदाच्या कार्यकाळात जिल्हा
रुग्णालयांची रुग्णावस्था पार सुधारून टाकली. सर्वसामान्य, गोरगरीब जनतेसाठी अनेक
सुविधा इथं सुरू केल्या. मात्र, मंत्री असल्यानं मतदारसंघातलं काम कमी झालं नसलं
तरी वावर कमी झालेला होता. नेमक्या याच वेळी १९९९च्या वेळी तिकीट नाकारलेल्या बंटी
यांनी मतदारसंघ पिंजून काढायला सुरवात केलेली. सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री
उशीरापर्यंत पायाला भिंगरी बांधून त्यांनी करवीरच्या जनतेशी नाळ जोडली. सत्ता सोबत
नसतानाही जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी आबालवृद्धांच्या हृदयात स्थान मिळवलं.
महापुराच्या काळात अगदी कमरेएवढ्या पाण्यातून चालत जाऊन गावागावांतल्या लोकांना
आपण त्यांच्यासोबत असल्याचा धीर व दिलासा देण्याचं काम केलं. दिग्विजय यांचं नसणं
आणि बंटी यांचं सदोदित असणं, या गोष्टींचा नाही म्हटला तरी मतदारांवर परिणाम
झालेला होता. सलग पाच वेळा आमदारकी मिळविणाऱ्या दिग्विजयांनी मतदारांना यावेळी
जास्तीच गृहित धरलेलं होतं. साहजिकच याचा त्यांना फटका तर बंटी यांना लाभ झाला.
बंटी यांच्या बाबतीत यावेळी म्हणजे २००४ला एक महत्त्वाची गोष्ट झाली, ती म्हणजे
१९९९च्या वेळेस ते केवळ डी.वाय. यांचे सुपुत्र होते म्हणून विधानसभेच्या तिकीटाचे
दावेदार होते. यावेळी मात्र, तळागाळापर्यंत घाम गाळलेला एक सच्चा कार्यकर्ता सतेज
ऊर्फ बंटी पाटील म्हणून त्यांना उमेदवारी मिळणं क्रमप्राप्त होतं. मात्र, यावेळी
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्रितपणे ही निवडणूक लढल्यानं करवीर मतदारसंघातली
उमेदवारीची माळ राष्ट्रवादीच्या दिग्विजय खानविलकर यांच्या गळ्यात पडली. त्या
दरम्यान एका कुस्तीच्या मैदानात ’लांग कुठल्याही रंगाची असेल, कुती मात्र करणारच!’ अशा शब्दांत आपला इरादा
बंटी यांनी स्पष्ट केला आणि खानविलकरांविरोधात अपक्ष म्हणून ही निवडणूक लढविली. जन्मजात
पुण्याईला इथं बंटी यांनी कर्मपुण्याईची दिलेली जोड त्यांच्या कामी आली. स्वतंत्र
ओळख घेऊन त्यांनी ही निवडणूक लढविली आणि तब्बल ४२ हजारांहून अधिक मतांनी जिंकली.
या मतदारसंघात काम सुरू असतानाच साधारणतः सन २००८मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना
झाली. त्यांच्या करवीर मतदारसंघातलं वीस हजारांहून अधिक मतदार असणारं बंटी यांचं
हक्काचं कसबा बावडा कोल्हापूर-उत्तर या शहरी तोंडवळ्याच्या मतदारसंघात समाविष्ट
झालं. बंटी यांनी काँग्रेस पक्षाची व स्थानिक नेत्यांची सोय पाहून
कोल्हापूर-दक्षिण हा शहरी व ग्रामीण असा संमिश्र मतदारसंघ निवडला. सन २००९ साली
त्यांचे पूर्वाश्रमीचे मित्र व सध्याचे कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांच्याशी
त्यांची काटाजोड लढत झाली. यावेळी बंटी साधारणपणे साडेपाच हजार मतांच्या फरकानं
विजयी झाले. आमदारकीच्या या दुसऱ्या टर्ममध्ये सन २०१० साली मुख्यमंत्री पृथ्वीराज
चव्हाण यांनी त्यांना आपल्या मंत्रीमंडळात गृह, ग्रामविकास आणि अन्न व औषध प्रशासन
या तीन महत्त्वाच्या खात्यांच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी देऊन बंटींच्या
राजकीय कारकीर्दीला खऱ्या अर्थानं प्रोत्साहन देण्याचं काम केलं. त्यालाही त्यांनी
त्यांच्या परीनं योग्य न्यायच दिला. मात्र, दिग्विजय यांच्याबाबतीत जे घडलं, तेच
योगायोगानं बंटी यांच्या बाबतीतही २०१४च्या निवडणुकीत घडलं. गृह राज्यमंत्री पदाची
महत्त्वाची जबाबदारी. त्यात पालकमंत्रीपद लातूरचं आणि संपर्कमंत्रीपद साताऱ्याचं.
या जबाबदाऱ्यांना योग्य न्याय देण्याचा ते पुरेपूर प्रयत्न करीत होते.
मतदारसंघाकडं दुर्लक्ष नव्हतं, पण प्रत्यक्ष उपस्थिती दर्शवणं दर वेळीच शक्य होत
नव्हतं. त्याचा फटका त्यांनाही सोसावा लागला. काही 'मित्रां'वर
टाकलेला विश्वास गैरलागू ठरला. या साऱ्या गोष्टी समजून उमजून बंटी यांनी पुन्हा
नव्या उमेदीनं कामाला सुरवात केली. डिसेंबर २०१६मध्ये कोल्हापूर स्थानिक स्वराज्य
संस्था मतदार संघातून प्रतिष्ठेच्या लढतीत विजय मिळवून ते विधान परिषदेचे सदस्य
बनले. त्यांचा पक्ष केंद्र आणि राज्यात अद्यापही लोकसभा आणि विधानसभेच्या
पराभवाच्या धक्क्यातून सावरायला तयार नसताना बंटी यांनी मात्र धोरणी आखणी केली. सर्वत्र
भाजपची लाट असताना २०१५ साली कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लागली. या
निवडणुकीची एकहाती सूत्रं काँग्रेसनं बंटींच्या हाती दिली. पक्षाचा विश्वास सार्थ
ठरविताना बंटींनी आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवत कोल्हापूर महानगरपालिकेत
काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आणले; महापौरही काँग्रेसचाच केला. कोल्हापूर
महानगरपालिकेतील या विजयानं राज्यातल्या काँग्रेसजनांत पुन्हा जान ओतली. पक्षाच्या
चळवळींमध्ये बराचसा जिवंतपणा आला, याचं श्रेयही बंटींनाच द्यावं लागेल.
अशोक चव्हाण यांनी
खासदारकी मिळवून पक्षाचे राज्यात टिकवून ठेवलेले अस्तित्व आणि सतेज यांनी पश्चिम
महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या केंद्रात केलेली मोर्चेबांधणी या गोष्टी पक्षाला
उभारी देणाऱ्या ठरल्या आहेत. राज्यातल्या पक्षीय वर्तुळात बंटी यांचा वावर हा
येथून पुढच्या काळात अधिक व्यापक प्रमाणातील असणार आहे, याचे संकेत आतापासूनच मिळत
आहेत. बंटी यांच्यात मला राज्यस्तरीय नेतृत्व करण्याची क्षमता दिसते. शरद पवार
यांच्यानंतर राज्यव्यापी नेतृत्व म्हणून उभं राहण्याची क्षमता विलासराव देशमुख,
गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, आर.आर. पाटील यांच्यात होती. मात्र, आता त्यातले तिघे
हयात नाहीत, तर भुजबळांच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह आहे. तशीच क्षमता
असणारे हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील यांनी स्वतःला मतदारसंघांपुरते सिमीत करून
घेतले आहे. राज ठाकरे यांनी ती संधी गमावली आहे. अजितदादांना ही संधी मोठ्या
प्रमाणात आहे. काँग्रेसमध्ये असं नेतृत्व करण्याची क्षमता सद्यस्थितीत अशोक चव्हाण
यांच्याकडे आहे. त्यांची व्यापक दृष्टी, त्यांचा लोकसंग्रह आणि बऱ्याच बाबतीत पिता
शंकरराव चव्हाण यांच्याप्रमाणे कठोर निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्याकडं आहे.
त्यांच्या खालोखाल काँग्रेसमध्ये आता चेहरा आणि क्षमता या दोन्ही निकषांवर विचार करावयाचा
झाल्यास बंटी पाटील यांचं भवितव्य मला अत्यंत उज्ज्वल दिसतं. अथक परिश्रम करण्याची
त्यांची तयारी आणि कोणतेही काम तडीला नेण्याची जिद्द या गुणांच्या बळावर पक्षाला
आणि एकूणच राज्याच्या राजकारणाला दिशा देण्याची क्षमता मला त्यांच्यामध्ये दिसते.
विलासराव, आबा, मुंडे साहेब गेल्यानंतर राज्याच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहराही
कोठेतरी हरपला आहे. हा सुसंस्कृत चेहरा प्रदान करण्याची क्षमता बंटी पाटील यांच्या
'सदा'सतेज व्यक्तीमत्त्वात निश्चितपणे आहे. गरज आहे ती योग्य संधी मिळण्याचीच!
आलोक, सुंदर विश्लेषण.
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद सरोज जी...
हटवाअप्रतिम लेखणी
उत्तर द्याहटवापंकज जी, धन्यवाद.
हटवाब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
उत्तर द्याहटवासुंदर विश्लेषण,अप्रतिम लेखणी.
उत्तर द्याहटवाखूप सुंदर वर्णन
उत्तर द्याहटवाश्रेयस जी, धन्यवाद.
हटवा